एकनाथ शिंदे म्हणजे, कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी एकहाती केलं. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री. या पार्श्वभुमीवर जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास.

www.janvicharnews.com
एकनाथ शिंदे यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1964 साली झाला.मूळचे सातारा जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याला आपले कार्यक्षेत्र बनवले. लहानपणीच ते ठाण्यात स्थायिक झाले. ठाण्यातील मंगल हाईस्कूल शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम केले. पुढे त्यांनी ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह केला. यादरम्यान वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षी म्हणजेच 1984 साली त्यांना किसन नगर येथील शाखाध्यक्ष पद मिळाले.
राजकीय प्रवास
एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे प्रभावित होऊन, आनंद दिघे यांनी त्यांना थेट नगरसेवकाचे तिकीट दिले. 1997 साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 2001 मध्ये त्यांना ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेपद मिळाले. पक्षाची हिंदुत्व विचारधारा आणि बाळ ठाकरे यांच्यामुळे प्रभावित होऊन शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना आमदारकीचे तिकीटही देण्यात आले.कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे आमदार एकनाथ शिंदे हे रस्त्यावर उतरून राजकारण करण्यासाठी ओळखले जातात. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर टाकली. महत्वाची बाब म्हणजे, 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता, परंतु एकनाथ शिंदे जिंकून आले होते. 2004 पासून ते शिवसेनेचे ठाण्याचे आमदार राहिले आहेत. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (2009, 2014 आणि 2019)) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (2004) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे आज लोकसभेत खासदार आहेत.
सत्तेच्या सारीपाटात शिंदेची सरसी..
2019 साली राज्यात सत्तांतर झालं. भाजप काही शिवसेनेला मुख्यमंत्री पद देत नव्हतं. त्यामुळे युती पुन्हा फिस्कटली आणि भलतंच समीकरण देशानं पाहिलं. शिवसेना चक्क राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी स्थानप करत सत्तेत बसली. बरं मुख्यमंत्री पदाचा पेच कायम होताच. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, पण कोण? या शर्यतीत दोन नावं आघाडीवर होती. एक म्हणजे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दुसरं नाव म्हणजे एकनाथ शिंदे. पण शरद पवारांनी आग्रह धरला आणि अखेर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद हुकलं. पण सत्ता स्थापन झाल्यावर सत्तेत कॅबिनेट मंत्री झाले. शिवाजीपार्कवर झालेल्या ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्यात 7 ते 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथा घेतली. त्यात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. त्यांना नगरविकास मंत्री हे खातं देण्यात आलं. सरकार स्थापन झाल्यापासूनच महाविकास आघाडीत अनेक खटके उडाले.एकनिष्ठ असलेला खंदा कार्यकर्ता आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक पक्षावर आणि पक्षश्रेष्ठींवर नाराज. एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार म्हणजेच, ठाकरे सरकार अडचणीत सापडलं अखेर. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आज राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली. दिल्ली स्थित नेतृत्वाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली.
वैयक्तिक आयुष्यातील दुःख विसरून जनतेच्या सेवेत
एक वेळ अशी आली जेव्हा शिंदे वैयक्तिक आयुष्यात दुःखी झाले. त्याचे कुटुंब उध्वस्त झाले. एकनाथ यांचा 11 वर्षांचा मुलगा दिपेश आणि 7 वर्षांची मुलगी शुभदा यांचा 2 जून 2000 रोजी मृत्यू झाला. शिंदे हे मुलांसह साताऱ्याला गेले होते. बोटिंग करत असताना हा अपघात झाला. मुलगा आणि मुलीच्या मृत्यूनंतर त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता. या वाईट काळात आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे योग्य मार्ग दाखवून राजकारणात राहण्यास सांगितले.त्याचे आज योग्य फलित झाले…आणि एक ऑटो चालक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला ….