डॉ सतीश कदम
श्रीकृष्णाचे जन्मस्थळ आणि कार्यस्थळ हे उत्तर भारत असल्याने तेथील समाज माणसावर वैष्णव पंथाचा पगडा आहे. विविधरुपात श्रीकृष्णाची पुजाअर्चा केली जात असून त्यासाठी मथुरा, वृंदावन, जयपूर, नाथद्वारा, तिरुपती, पंढरपूर, शांतीपूर, अंबिका कलना, जगन्नाथ पुरी, कांजीवरम यासारख्या मुख्यठिकाणी भव्य मंदिरे आहेत. याठिकाणी नाथद्वारा मंदिराची चर्चा करत असताना अनेक रहस्यमय कथा या मंदिराभोवती जोडलेल्या दिसून येतात. 1669 ला औरंगजेबाच्या कालखंडात जेव्हा हिंदू मंदिराविषयी फर्मान निघाले तेव्हा मथुरेतील कृष्णभक्तात भीतीचे वातावरण निर्माण होऊन तेथील मूर्ति इतरत्र हलविल्याशिवाय पर्याय नसल्याने वल्लभपंथीय दामोदरलाल उर्फ दाऊजी यांनी वृंदावनातील मूळ मूर्ति घेऊन राजस्थानचा प्रवास सुरू केला. आग्रा, बुंदी, किशनगड करत ते मेवाड परिसरातील चौपासनी गावात पोहोचले. यादरम्यान मोगलांच्या भीतीने त्यांना कोणी जवळ करायला तयार नव्हते. राजस्थानातील मेवाड म्हणजे राणाप्रतापांची भूमी. या घराण्याने नेहमीच मोगलासोबत खुले शत्रुत्व स्वीकारले होते. दाऊजींचे चुलते गोविंदजी यांनी त्यावेळचे मेवाडनरेश राणा राजसिंह यांची भेट घेऊन आपल्या प्रांतात श्रीकृष्णाचे देवालय व्हावे अशी ईच्छा व्यक्त करताच राणा राजसिंहांनी औरंगजेबाच्या शत्रुत्वाची पर्वा न करता आपल्या प्रदेशात कुठेही त्यास परवानगी असल्याचे संगितले.
त्यानुसार 17 नोव्हेंबर 1671 साली ते सिंहाडानामक गावी पोहोचले. एका मिथकानुसार कृष्णाची मूर्ति असलेला रथ ज्यावेळी सिंहाडा गावात पोहोचला तेव्हा देवाच्या रथाचे चाक अचानक जमिनीत घुसले. अनेक प्रयत्न करुनही रथ पुढे जात नाही हे दिसताच दाऊजीनी त्याचठिकाणी मूर्तिची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. मोगलापासून संरक्षण म्हणून राजसिंहाने राजपूतांची खडी फौज दिली. राणाच्या कृपाशीर्वादाने 1672 साली एका भव्य मंदिराची उभारणी झाली. श्रीकृष्ण म्हणजे श्रीनाथाच्यारुपात ज्याठिकाणी देवाची वस्ती झाली त्या गावाला नाथद्वारा नाव मिळाले. आज जागतिक पातळीवर श्रीकृष्णाचे वसतिस्थान म्हणून श्रीनाथ नावाने ख्याती असलेले नाथद्वारा हे राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात असून ते उदयपुरपासून 50 किमीवर आहे. वल्लभपंथातील श्रीनाथ मंदिराला स्थानिक लोक नंदराय की हवेली म्हणतात. आज नाथद्वारा हे तालुक्याचे ठिकाण असून बडा बाजारनामक परिसरात श्रीनाथ मंदिराला एकूण तीन दरवाजे असून यातील लाल दरवाजा महत्वपूर्ण आहे. सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत श्रीनाथ मंदिरात विविध कार्यक्रम असतात. यामध्ये मंगलाशृंगार, ग्वाल, राजभोग, उत्थापन, भोग, आरती आणि शयन या सेवा महत्वपूर्ण आहेत. त्यात भोगपूजेला अनन्यसाधारण महत्व असून त्याकरिता मंदिर परिसरात स्वतंत्रपणे प्रसाद बनविण्याची व्यवस्था आहे. भक्तगण ड्रायफ्रूट आणि तांदळाचा भोग मोठ्या प्रमाणावर चढविताना दिसून येतात.
पुढे मेवाडबरोबरच इतरही राजपूत घराणी पुढे श्रीनाथजीपुढे नतमस्तक होऊन मंदिराच्या व्यवस्थेकरिता अनेक गावे दान करण्यात आली. त्यामुळे श्रीनाथजी मंदिराचे स्वतंत्र संस्थान तयार झाले. याचा संपूर्ण कारभार दाऊजी घराण्याकडे सोपविण्यात आला. त्यांना तिलकायत म्हटले जाते. अगदी 1959 पर्यंत हे मंदिर याच तिलकायतांच्या ताब्यात होते. पुढे मंदिरासाठी न्यास विभागाकडे अधिकृतपणे नोंदणी करून स्वतंत्र कार्यकारिणी नेमण्यात आली असलीतरी मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी तिलकायत घराण्यातील व्यक्तिलाच ते स्थान देण्याचा प्रघात आहे. त्यानुसार सध्या गोस्वामी तिलकियात इंद्रमणी महाराज संस्थानचे अध्यक्ष आहेत तर प्रसिद्ध उद्योगपती मुकेशजी अंबानी यांच्या मातोश्री श्रीमती कोकिळाबेन धिरुभाई अंबानी उपाध्यक्षा आहेत. साहजिकच अंबानी घराण्यासाठी नाथद्वारा येथील श्रीनाथजींचे मंदिर अति प्रिय असून ते दरवर्षी दर्शनासाठी हजेरी लावतात. एवढेच कायतर अंबानी कुटुंबाच्या जिओ सेवेतील 4 जी आणि 5 जीचा प्रारंभही त्यांनी नाथद्वारातील श्रीनाथजींच्या दरबारातूनच केलेला आहे. राजस्थानसह जगभरातून वैष्णवांचा लोंढा श्रीनाथजींच्या दर्शनासाठी सतत येत असतो. त्यामुळे 2019 – 20 च्या अंदाजपत्रकानुसार श्रीनाथजी मंदिराचे उत्पन्न जवळपास 80 कोटी असून यातील 25 कोटी रुपयाचे दान हे परदेशातून प्राप्त झालेले आहे. तर सध्याचे पुजारी परेश कृष्णकांत राजपुरोहित हे डॉक्टरेट आहेत. नाथद्वाराला थेट रेल्वेने जाण्याची सुविधा आहे. याशिवाय मुक्कामासाठी तेथे अनेक धर्मशाळा असल्याने भक्तांची मोठी सोय होत असल्याने वर्षभर गर्दी असते.
श्रीनाथ मंदिरातील अनोखी प्रथा म्हणजे वर्षातून एकदा बादशाहच्या दाढीने तेथील मंदिराची साफसफाई. यामागच्या इतिहासाचा आढावा घेत असताना आश्चर्यकारक माहिती समोर आली. त्यानुसार औरंगजेबाने जेव्हा हिंदूविरोधात भूमिका घेऊन जिझीया कर लावून मंदिरे पाडण्याची आज्ञा दिली. त्यानुसार नाथद्वाराच्या मंदिराला मोगलांकडून ईजा पोहोचवायला सुरुवात झाली. तेव्हा औरंगजेबाला याचा काही साक्षात्कार झाला. त्यामुळे बादशाहने ही कारवाई थांबविली. याशिवाय त्याने श्रीनाथला एक किंमती हिरा अर्पण केला. विशेष म्हणजे तो हिरा आजही श्रीनाथजींच्या हनुवटीवर लावला जातो. याशिवाय औरंगजेबाने देवाला शरण गेल्याचे प्रतिक म्हणून दरवर्षी होळीच्या दुसर्यादिवशी नाथद्वारा शहरात बादशाह की सवारी नावाने एक अनोखी प्रथा जपली जाते.
त्यानुसार धुलिवंदन किंवा धुरेंडीदिवशी गुर्जर घराण्यातील वंशपरंपरेने एकाला औरंगजेबाचा पोशाख करून डोळ्याला काजळ, लांबसडक दाढी आणि हातात श्रीनाथजीचा फोटो देवून त्याला उघड्या पालखीत बसवून त्याच्यामागे दोन सेवक चौरीने वारे घालत उभ्या असतात. यावेळी बादशाह हातातील फोटोकडे एकटक बघत असतो. ज्यावेळेला बादशाह पुर्यातून बादशाहची स्वारी निघते तेव्हा त्याच्यापुढे घोड्यावरील सेनापती आणि भक्तांचा ताफा वाजत गाजत नाथद्वारातील मुख्य रस्त्याने श्रीनाथजींच्या मंदिराकडे जात असताना भक्तगण महाराष्ट्रात होळीला ज्याप्रमाणे अश्लील शिव्या देतात त्याप्रमाणे अतिशय अश्लील भाषेत बादशाहचे स्वागत करत असतात. तर आपण जेव्हा श्रीनाथजींच्या मंदिराला उपसर्ग पोहोचविण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपली दृष्टी गेली आणि शरण जाताच ती परत मिळाली. अशीच त्यांची कृपादृष्टी राहावी म्हणून तो एकटक फोटोकडे पाहात असतो. अशारितीने वाजतगाजत आणि शिव्यांची लाखोली वाहत बादशाहची सवारी सुरजपोलमधून नग्गर खाण्याच्या पुढील मुख्य दरवाज्यात पोहोचते. तेव्हा बादशाह पालखीतून खाली उतरुन दरवाज्यासमोर उभा राहतो. एकदा श्रीनाथजीला हात जोडून आपल्या दाढीने सलग नऊ पायर्या साफ करतो. उपस्थित भक्तगण मोठ्या समाधानाने बादशाहची साफसफाई पाहात असतात. यामध्ये नऊ पायर्या म्हणजे नवविधा भक्तिचे प्रतिक मानले जाते. साफसफाईनंतर मंदिरच्यावतीने बादशाहाला भरजरी पोषाखाचा आहेर दिला जातो. यावेळी बादशाह होण्याचा मान परंपरेने गुर्जर घराण्याकडे असून सवारी निघण्यापूर्वी भक्तगण जेव्हा त्यांच्या घरापुढे जमा होतात, तेव्हा बादशाहच्यावतीने भक्तांना भांगाच्या पकोड्याचा प्रसाद देतात. त्यामुळे भक्तात मोठा जोश भरलेला असतो. शेकडो वर्षापासून नाथद्वारामध्ये बादशाहची सवारी तेवढ्याच आवेशात निघत असताना स्थानिक मुस्लिमही यामध्ये सहभागी असतात. औरंगजेबासारखा क्रूर शासकही श्रीनाथजीच्या पुढे झुकला. मात्र 1802 साली होळकरांच्या सेनेने जेव्हा नाथद्वारावर आक्रमण केले तेव्हा श्रीनाथजींची मूर्ति जवळच्या गासियारनामक डोंगरावर स्थलांतर करावी लागली होती. याचा इतिहास मात्र अधुरा वाटतो. सर्वच इतिहास लिखीत नसतो, काही मौखिक असतो, जो परंपरेने जपलेला असतो. म्हणून पुर्वजांच्या परंपरा जपल्या पाहिजेत.