दक्षिणेतील पाच शाह्यांचे हिंदू कनेक्शन

 

 

 

प्रा. डॉ. सतीश कदम

दक्षिणेतील पाच शाह्यांचे हिंदू कनेक्शन

इ. स. 1185 ते 1293 या कालावधीत देवगिरीच्या यादवांचे वैभवशाली साम्राज्य हे महाराष्ट्राबरोबरच आंध्र, कर्नाटक ते गोव्यापर्यंत पसरलेले असून सोन्याचा धूर निघणार्यार यादवांनी दक्षिण भारतात आपल्या हेमाडपंथी मंदिरातून आपली सुबत्ता दाखवून दिल्याने यादवांच्या समृद्धीची चर्चा दिल्लीपर्यंत गेली. तसे 1293 ला अल्लाउद्दीन खिलजीच्यारूपाने दक्षिणेवर पहिली मुस्लिम स्वारी होऊन रामदेवराव यादवाचा पराभव झाल्याने देवगिरीचे नामांतर दौलताबाद झाले. त्यामुळे दक्षिणेत प्रथमच मुस्लिम शासनाला सुरुवात झाली. पुढे 1326 ला महम्मद तुघलकाने काही दिवस दिल्लीची राजधानी देवगिरीवर आणली होती. महमदच्या लहरीपणामुळे दक्षिणेतील सुभेदारांनी बंड करून 1347 साली बहामनी साम्राज्याची स्थापना केली. दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन करणारा जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसन हा मूळचा गुलाम असून तो गंगोपंडित जुजमूनामक ज्योतिषाकडे कामाला असून त्याच्याच सल्ल्याने त्याला खिलजीच्या राजदरबारात मानाचे स्थान मिळून शेवटी तो स्वतंत्र गादीचा मालक झाला. त्या उपकाराची फेड म्हणून त्याने आपल्या साम्राज्याला बामणी किंवा बहामनी असे नाव दिले. स्वत:ही सुलतान हसनगंगू बहामनी असे नाव स्वीकारले. बहामनीत 179 वर्षात एकूण 18 लोकांनी राज्यकारभार केला.

www.janvicharnews.com

त्यानंतर बहामनीतही बंड होऊन दक्षिणेतील पाच सत्तांचा उदय झाला. त्यात वर्हांडची (विदर्भची) इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, नगरची निजामशाही आणि हैद्राबादची कुतबशाही यांचा समावेश होतो. इमादशाहीचा संस्थापक फतहुल्लाखान मुळचा तेलंगी ब्राम्हण होता. 1490 ते 1574 या कालखंडात विदर्भातील एलीचपूर ही इमादशाहीची राजधानी असून 1574 ला नगरच्या निजामशाहाने ते जिंकून घेतले.

www.janvicharnews.com

अशाचप्रकारे बहामनीचा आणखी एक सुभेदार युसूफने 1489 साली विजापूर येथे आदिलशाहीची स्थापना केली. आदिलचा अर्थ होतो न्यायीवृत्तीचा. यूसूफने मुकंदरावाच्या बहिण पुंजी म्हणजे बुबूजी खानमसोबत लग्न केले. पुढे बुबूचा मुलगा इस्माईल आदिलशाहीच्या गादीवर बसला. मुलगी मरियमचा विवाह बुर्हाून निजामशाहबरोबर, खदिजाचा विवाह विदर्भातील इमादशाह इमादल्मुल्कबरोबर तर सितीजीचा विवाह बिदरचा अहमदशाहबरोबर झाल्याने दक्षिणेतील पुढील गादीचे वंशज जन्माने हिंदू होते. 1526 ला सत्तेवर आलेल्या महमद आदिलशाहने रंभावती नावाच्या हिंदू स्त्रीसोबत विवाह केल्याने तिच्या मृत्यूनंतर जगप्रसिद्ध गोलघुमट मध्ये स्वत:बरोबर रंभावतीची कबर बांधली. याच सत्तेत भोसले, घोरपडे, माने, डफळे इत्यादि मराठा सरदार मोठ्या पदावर पोहोचले. इब्राहीम आदिलशाहातर पुर्णपणे हिंदुमय झालेला असून त्यांच्या कालखंडात हिंदू धर्माविषयी सकारात्मक विचार झाला. एवढेच नाहीतर खुद्द इब्राहीम आदिलशाहाने स्वत: जगतगुरु नावाची पदवी स्वीकारलेली असून तो गणपती आणि सरस्वतीचा मोठा भक्त होता. आदिलशाहा इस्लामप्रमाणेच हिंदू देवदेवतांचाही मोठा भक्त असून नरसिंहावर त्याची मोठी भक्ति असल्याने आदिलशाहाच्या ताब्यातील विजापूर, आकलूज आणि सांगोला येथील किल्ल्यात त्याने नरसिंहाची मंदिरे बांधली. धोंडोपंत, नरसू काळे किंवा येसू काळे यांच्यासारखी माणसे महत्वाच्या पदावर काम करत होती. आदिलशाही शियापंथी असल्याने 1686 साली औरंगजेबाने ती बुडवून टाकली.

अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणार्याा मूळ पुरुषाची कथाही अशीच आहे. निजामशाहीची स्थापना करणारा निजाल्मुल्क उर्फ मलिक अहमद हा मूळचा हिंदू घराण्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचा नातू असून बहिरंभटाचा मुलगा तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला. मलिक अहमद हा तिमाभटाचा मुलगा असून बहामनी साम्राज्यात पराक्रम गाजवत तो सुभेदार पदापर्यंत पोहोचला. बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गवाणमुळे साम्राज्यविस्तार झाला परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. त्यानुसार मलिक अहमदने 1490 साली अहमदनगर येथे निजामशाहीची स्थापना केली. आपल्या मूळ पुरुषाच्या नावावरून म्हणजे बहिरंभटावरून बहिरी ही पदवी स्वीकारली. त्यानंतरच्या प्रत्येक निजामशाहने बहिरी पदवी कायम ठेवली. निजामाने जुन्नर, देवगिरी आणि शेवटी अहमदनगर येथे राजधानी ठेवली. नगरच्या किल्ल्यामध्ये पाण्याकरिता ज्या चार विहिरी खोदल्या त्यांची नावे गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई याप्रमाणे आहेत. छत्रपती शिवरायांचे दोन्ही आजोबा मालोजीराजे आणि लखोजी जाधवराव याच निजामशाहीत वाढले. म्हटले जाते की, शिवरायांचे वडील शहाजी आणि चुलते शरीफजी यांची नावे नगरच्या शाहशरीफ नावाच्या पिरावरूनच दिलेली आहेत. शहा शरीफचा अहमदनगर येथे दर्गाही आहे. शिवरायांचा जन्म झालेला शिवनेरी किल्लाही त्यावेळी निजामशाहाच्या ताब्यात होता. अशी ही नगरची निजामशाही 1630 साली मोगलांनी बुडवून टाकली.

www.janvicharnews.com

दक्षिणेतील बिदरची बरीदशाही 1492 साली स्थापन झाली. कासीम बरीद हा बरीदशाहीचा संस्थापक असून त्याचा मुलगा अमीर बरीदने साबाजीनामक सरदाराच्या मुलीसोबत विवाह केला होता. बरीदशाहीच्या शाही घराण्यातील शहा मुर्तुजा कादरी यांनी मुंतोजी बामणी नाव धारण करून अखंडपणे वारकरी पंथाची सेवा केली. मंगळवेढ्याचे संत दामाजी याच शाहीत तहसिलदारपदावर कार्यरत असून त्यांनी दुष्काळात केलेले काम अजरामर ठरले तर 1496 साली महमुद बरीदशाहने श्रीयाळसेठनामक हिंदूला काही वेळासाठी स्वत:च्या गादीवर बसविले होते. बारामतीजवळील मोरेश्वर गणपतीमंदिराच्या बाजूची तटभिंत बरीदशाहीचा सेवक मोरो केशव गोळेनी बांधलेली आहे. अशी ही बरीदशाही 1626 साली विजापूरच्या आदिलशाहने खालसा केली.

www.janvicharnews.com

पाचवी शाही हैद्राबादच्या कुतुबशाहीची स्थापना इ. स. 1518 साली कुली कुतुबशाहने केली असून सुरूवातीला गोवलकोंडा ही कुतुबशाहीची राजधानी राहिली तर कुतुबशाहाची प्रेमिका भागमतीच्या नावावरूनच त्याने नव्याने बसविलेल्या शहराला भागानगर असे नाव दिले होते, त्यानंतर भागानगरचे हैद्राबाद असे नामांतर झाले. पुढे शिवकालखंडात कुतुबशाही तोलून धरण्याचे काम मादन्ना आणि आकन्ना या दोन बंधूंनी केलेले असून छत्रपती शिवरायांना दक्षिण दिग्विजय मोहिमेत यांनी भरपूर मदत केली होती. 1687 साली औरंगजेबाने कुतुबशाही बुडवून टाकली. अशारितीने दक्षिणेतील पाच सत्तानी 1326 ते 1687 असे 360 वर्षे राज्य केले. पुढे मोगलांचे राज्य 1724 ला जाऊन हैद्राबादच्या निजामाचे शासन आले. निजामाचे राज्य 1948 पर्यंत राहिल्याने 1326 ते 1948 अशी सलग 622 वर्षे दक्षिणेवर मुस्लिम शासकांचे साम्राज्य राहिल्याने त्याचा परिणाम येथील सर्व घटकावर पडलेला दिसून येतो

प्रा. डॉ. सतीश कदम, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, मुंबई

Scroll to Top