“मधुमेह” अशी घ्या काळजी

डॉ. गौरी दामले, मधुमेहतज्ज्ञ

मधुमेहाच्या पूर्वीची स्थिती म्हणजे काय आणि त्यात कशी काळजी घ्यावी याबद्दल अनेकांना शंका असतात. त्या दूर करण्याचा हा एक प्रयत्न. मधुमेह झालेल्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे तेही पाहू या.

‘प्री-डायबेटिक कंडिशन’चे निदान कसे होते?

www.janvicharnews.com

मधुमेहाच्या निदानात उपाशीपोटी (फास्टिंग) आणि खाल्ल्यानंतर दोन तासांनी (पीपी) अशी दोन वेळा साखरेची चाचणी केली जाते. यातील ‘फास्टिंग शुगर’ १२६च्या वर असेल आणि ‘पीपी शुगर’ २००च्या वर असेल तर त्या व्यक्तीस मधुमेह असल्यावर शिक्कामोर्तब करता येते. ‘फास्टिंग शुगर’ ११० ते १२६ यामध्ये असेल तर त्याला ‘इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज’ असे म्हटले जाते, तर ‘पीपी शुगर’ १४० ते २००च्या मध्ये असेल तर त्याला ‘इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स’ म्हणतात. ‘इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज’ आणि ‘इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स’ असलेल्या व्यक्तींची रक्तातील साखर मधुमेहाच्या सीमारेषेवर आहे, असे म्हणता येईल. याला ‘प्री-डायबेटिक’ अर्थात मधुमेहापूर्वीची स्थिती असे म्हणतात. ‘फास्टिंग शुगर’ ११०च्या आत व ‘पीपी शुगर’ १४०च्या आत असेल तरच ती सामान्य असते. काही अभ्यासानुसार तर ‘फास्टिंग शुगर’ १००च्या आत असायला हवी, असे मानले जाते.

गैरसमज दूर करा

www.janvicharnews.com

आपली साखर २००च्या आत आहे म्हणजे ती सामान्यच आहे, असे अनेकांना वाटते; पण आपण मधुमेहपूर्व स्थितीत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही. मधुमेह हा वेदनाविरहित आजार आहे. त्याची लक्षणे रुग्णाला चाचणी न करता ओळखू येण्यासारखी नाहीत. तहान-भूक अधिक लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, रात्री उठूनलघवीस जावे लागणे ही लक्षणे सहसा दुर्लक्षिली जातात. रक्तातील साखर खूप वाढू लागली तर कितीही खाल्ले तरी वजन कमी होण्याचे लक्षणही दिसू शकते. रक्तातील साखर वाढली की हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर ती शरीरभर पसरते आणि शरीरातील प्रथिनांना चिकटते. त्यामुळे विशिष्ट रासायनिक क्रिया होऊन प्रथिनांचे कार्य बिघडते. यात प्रथम रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि हळूहळू गुंतागुंत होत जातात. त्यामुळे मधुमेहपूर्व स्थिती हा एक इशारा असतो. तिथपासूनच काळजी घेणे आवश्यक ठरते.

मधुमेहपूर्व स्थितीत काय करावे?

www.janvicharnews.com

जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे मधुमेहपूर्व स्थितीत फार गरजेचे. आहारावर नियंत्रण ठेवणे, रोज अर्धा ते पाऊण तास ‘एरोबिक’ प्रकारचा व्यायाम करणे, ताणतणाव दूर ठेवणे, व्यसनांपासून दूर राहणे, स्वत:साठी वेळ काढणे, नकारात्मक विचार दूर करणे या सगळ्याचा त्यात समावेश होतो.
रात्री ११ ते ४ या वेळेत आपल्या शरीराची चयापचय क्रिया दिवसापेक्षा वेगळी असते. त्यामुळे रात्री वेळेवर व सलग सात तास झोप आवश्यकच. रात्रीची झोप दुपारी घेऊन चालणार नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. दुपारी १५-२० मिनिटे विश्रांतीसाठी झोपणे चालू शकेल. दुपारी फार झोपणे आणि सततची बैठी जीवनशैली टाळायला हवी.
घरात इतर कुणाला मधुमेह असो वा नसो, पस्तिशीनंतर रक्तातील साखर तपासून पाहणे चांगले. शंका असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरावीक काळाने रक्तातील साखरेची तपासणी करावी. मधुमेहाची आनुवंशिकता असल्यास अधिक जागरूक राहणे गरजेचे.

www.janvicharnews.com


हृदय, डोळे, मूत्रपिंडे, मज्जातंतू, पाय हे अवयव मधुमेहात विशेष जपावे लागतात. व्यक्तीला मधुमेह झाला असल्यावर जेव्हा शिक्कामोर्तब होते, तेव्हा त्याचे स्वादुपिंड (पॅनक्रिआ) जवळपास ७० टक्के खराब झालेले असते; पण ते खराब होण्यास सुरुवात खूप आधीपासून झालेली असते. त्यामुळे फक्त साखर खूप वाढलेली दिसणे म्हणजेच मधुमेह नव्हे. शरीरात हळूहळू तयार होणाऱ्या गुंतागुंतींचा विचार करणे गरजेचे असते. ही गुंतागुंत टाळण्यासाठी मधुमेहपूर्व स्थितीपासून आरोग्याकडे लक्ष द्यायलाच हवे.

मधुमेहींनो, काळजी घ्या

कानात सुया टोचून किंवा कारल्याचा रस पिऊन मधुमेह घालवा, अशी जाहिरातबाजी आजूबाजूला मोठय़ा प्रमाणावर सुरू असते, परंतु मधुमेहातील संभाव्य गुंतागुंतींचा विचार करता योग्य पात्रता असलेला डॉक्टर निवडणे आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वत:च्या मनाने प्रयोग न करणे आवश्यक आहे.
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे आजार एकच असला तरी सर्वाना एकाच प्रकारचा आहार, एकच औषध चालते असे नाही. काही रुग्णांना मधुमेहावरील गोळ्या दिल्या जातात, तर काहींना इन्शुलिनची इंजेक्शन घेण्यास सांगितले जाते. गोळ्या घेतल्या म्हणजे मधुमेह फारसा वाढलेला नाही आणि इन्शुलिनचे इंजेक्शन घेतले म्हणजे आजार वाढला आहे, असे तर्क करणेही चुकीचे आहे. या गोष्टींसाठी काही ठोकताळे नाहीत. रुग्णाला गोळ्या द्यायच्या की इंजेक्शन हे डॉक्टरांना ठरवू द्या.

www.janvicharnews.com


मधुमेहात रक्तातील साखरेचे संतुलन बिघडते. त्यामुळे साखर बंद करावी लागते हे खरे. मधुमेही रुग्णांनी साखर, गूळ, मध, काकवी, जॅम, जेली, चिक्की, आंब्यासारखी गोड फळे, चॉकलेट असे पदार्थ बंद करायला हवेतच, पण नुसती साखर बंद करून बाकी आहार कधीही व कसाही घेऊन चालत नाही. इतर पदार्थामधूनही साखर व ऊर्जा मिळते. (उदा. पोळी हीदेखील एक प्रकारे साखरच आहे.) आपल्या प्रकृतीप्रमाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आहाराचे कोष्टक तयार करणे व ते काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.

www.janvicharnews.com


आहाराच्या वेळा पाळणे गरजेचे. घरातील इतरांचे जेवण झाले नाही म्हणून उशिरा जेवणे, मुळातच घरात उशिरा जेवण्याची सवय असणे, कार्यालयात जेवणाची सुट्टी उशिराची असणे किंवा जेवणाच्या वेळेत चालढकल होऊ देणे हे मधुमेहींसाठी निश्चितच योग्य नाही. दर चार तासांनी खाणे आवश्यक.
साखर बंद केलेली असतानाही योग्य प्रमाणात व वेळेवर आहार घेतला तर ‘हायपोग्लायसेमिया’ होण्याची म्हणजे रक्तातील साखर एकदम कमी होण्याची शक्यता कमी होते.
– डॉ. गौरी दामले, मधुमेहतज्ज्ञ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top