मी कांग्रेस मध्ये असतो तर राहूल गांधीच्या वक्तव्याचे समर्थन केले असते.मी भाजपमधे असतो तर भगतसिंग कोशीयारी व चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचे समर्थन केले असते.मी शिवसेनेत असतो तर राऊतांच्या वक्तव्याचे समर्थन केले असते.मी शिवसेनेत असतो तर सुरेश दादांच्या स्वागताला जळगाव रेल्वे स्टेशनवर रात्री गेलो असतो.तसे करणे मला आवश्यक असते.त्यातील अर्थ मला कळला न कळला तरी सुद्धा.कारण त्यापलिकडे मी बोलू शकत नाही.त्यापलिकडे विचार ही करू शकत नाही.कोणी मला सज्जन,सभ्य, बुद्धीमान,ज्ञानी माणसाने माझ्या आकलनाबाबत जाणिव करून दिली तर मी एडीचोटीचा जोर लावून त्याचा विरोध केला असता.तरीही तो चूप बसला नसता तर हाणामारी सुद्धा केली असती.कारण तसा प्रोग्राम माझ्या मेंदूच्या चीपमधे इन्स्टाल केलेला असतो.जरी तसा मी एकांतात बसून विचार केला ,जो माझ्या पक्षाच्या प्रोग्रामींगच्या विरोधात असला तरी मी बोलू शकत नाही.नको बाबा,चुलीत गेली बुद्धी आणि विचार. पण आपल्याच पक्षाच्या विरोधात जाणे नको.कारण एकदाचा मी त्या पक्षाकडे मेंदू गहाण ठेवला आणि मला एखादी ठेकेदारी, दुकानदारी, फौजदारी,जहागिरी,मनसबदारी,नाकेदारी,हप्तेखोरी,टोलवसुली,रेतीचोरी, पाटीलकी,देशमुखी मिळाली तर मी ती गमवणार नाही.त्यासाठीच तर मी त्या पक्षाचा पदाधिकारी बनलो आहे.आणि सद्सद्विवेक,सतबुदी चा असा अनाठायी वापर का करायचा?म्हणून माझ्या कवटीचे स्क्रू मी आधिक फिट करून ठेवतो.जेणेकरून विचार ,उच्चार थोढा ही इकडे तिकडे हलू नये.असे स्क्रू ढिला ठेवणे आणि मेंदू हलणे मला हानीकारक ठरू शकते.
भगतसिंग कोशीयारी यांनी जे काही बोलले, ते जरी मला कळले नसले तरीही,कळण्याची मला अक्कल नसली तरीही ते चुकीचे बोलले,असेच म्हणावे लागते.माझ्या पक्षाने मोर्चा काढला.बैनर बनवले.चप्पलमार सांस्कृतिक कार्यक्रम करायला सांगितला तर मला तसे करणे आवश्यक आहे.माझ्या जळगाव चे रस्ते न बनवणाऱ्या कार्यशुन्य आमदाराला मी काहीच बोलू शकत नाही.बैनरला चप्पल मारणे तर दूरच.तितके धाडस माझ्यात नाही.पण मुंबईत बसलेल्या राज्यपालांच्या बैनर वर चप्पल मारण्याचे पाप करू शकतो.नव्हे ,तसे माझ्याकडून करवून घेतले जाते.माझा नेता मला बैनर बनवून देतो.चप्पल ही विकत घेऊन देतो.पेपरला फोटो ही छापून आणतो. गरज पडली तर पैसे ही देतो.अटक झाली तर वकील लावून देतो.तर मग,काय हरकत आहे, कोणालाही चप्पल मारायला? तेंव्हा मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता तसे करणे आवश्यक होऊन बसते.कारण माझ्या कवटीचे स्क्रू फिट करून ठेवलेले आहेत.
कोणा महापूरुषाचा जन्म महाराष्ट्रातील आहे किंवा नाही,हे मलाही माहित नाही पण असे संजय राऊत बोलले तर माझा नेता सांगतो म्हणून मी राऊत विरोधात काहीही अदातदा बोलतो. राऊतांचे इतकेसे अज्ञान माझा राष्ट्रीय स्वाभिमान प्रदर्शित करण्यासाठी पुरेसे असते.महापुरुषाचे जन्मस्थान महाराष्ट्र काय भारत काय इंग्लंड अमेरिकेत असले तरी मला काहीच फरक पडत नाही.उलट माझा जन्म महाराष्ट्र ऐवजी इंग्लंड किंवा अमेरिकेत झाला असता तर मी गौरवाने सांगितले असते.दुर्भाग्य! मला आई वडिलांनी तशी संधी दिली नाही . तरीही मला तितकेसे कारण पुरेसे आहे,संजय राऊत यांच्या विरोधात बोलण्यासाठी.माझ्या मेंदूचे स्क्रू तसे कवटीत फिट करून ठेवलेले आहेत.ते कालांतराने ढिले झाले तर मी तसे सुधारीत वक्तव्य करीनच.
असे बिनबुद्धीचे आरोप मी एकटाच करीत नाही.संजय राऊत सुद्धा करतात.नव्हे, तसे काहीतरी कारण शोधतात.खुसपुट काढतात.पराचा कावळा करतात.तसे करण्यात त्यांची ठाकरेंप्रती निष्ठा प्रदर्शित होते.राऊत उबाठा शिवसेनेत आहेत तोपर्यंत तरी त्यांना तसे खुसपट काढणे,आरोप करणे,पराचा कावळा करणे आवश्यक आहे.कारण कवटीचे स्क्रू तितके फिट करून ठेवलेले असतात.पक्ष बदलला तरच मेंदू १८० डिग्रीत फिरवून पुन्हा कवटीचे स्क्रू फिट करून ठेवले जातात.याचा अनुभव नाना पटोले, राधाकृष्ण विखे पाटील, गुलाबराव पाटील , एकनाथ खडसे यांना आहेच.काही कार्यकर्ते व नेत्यांचे मेंदूचे स्क्रू मुद्दाम ढिले ठेवलेले असतात.ते दरमहा पक्ष बदलतात.तशी सोय कवटीत करून ठेवलेली असते.वारा आला तसा उपणणे ,हे त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर असते म्हणून.जळगांव महानगरपालिकेतील भाजपचे २७ नगरसेवकांचे स्क्रू ढिले करून शिंदेंनी शिवसेनेत घेतले.नंतर तेच स्क्रू आता शिंदेकडून फिरत नाहीत.कदाचित महाजन हेच यांचे स्क्रू ढिले करून पुन्हा भाजपात घेऊ शकतात.कारण भाजपात सज्जन जास्त झाले.आता गुन्हेगारांची उणिव भासत आहे.खूप गरज आहे.मेंदू ,कवटी,स्क्रू नसले तरी चालेल.
महाराष्ट्र कधीकाळी पुरोगामी होता.आता नाही.आता भयंकर प्रतिगामी झाला आहे.प्रतिगामी शष्दाचा अर्थ प्राचार्य किंवा कुलगुरू किंवा साहित्यिकांना विचारण्याची गरज नाही.कदाचित ते घाबरून नंतर सांगतो,असे उत्तर देतील.त्यांना पद,पदवी, पुरस्कार हवे असतात.पण मी सांगतो.मी धाडस करतो.प्रतिगामी म्हणजे कांग्रेस विरोधातच भाजप कार्यकर्त्यांनी बोलणे किंवा भाजप विरोधातच कांग्रेस कार्यकर्त्यांनी बोलणे.ते चूक कि बरोबर असा कोणताही विचार न करता,त्यांचा पक्ष कोणता, यावरून ते ठरवावे लागते.आणि पुरोगामी म्हणजे काय?थोढे कठिण आहे म्हणून उदाहरण देऊन सांगतो.कांग्रेस, राष्ट्रवादी,उबाठा शिवसेना एकत्र संडासला गेले,नदीवर.एकाने पादले कि, दुसऱ्याने त्याच्या सुगंधाचे तर्कशुद्ध, शास्त्रशुद्ध अर्थ सांगणे.जे कधीकाळी एकमेकांचा खोकला,ठसका ही सहन करीत नव्हते.ते आज एकमेकांच्या पादण्याला कस्तुरी ची उपमा देतात.हे खरे पुरोगामी.कारण त्यांनी काही काळ कि असेना काकांच्या पिंचिस ने कवटीचे स्क्रू फिट करून घेतलेले आहेत.स्क्रूच्या थ्रेडला गंज लागेपर्यंत तरी ते फिट राहातील अशी आम्ही आशा बाळगून आहोत.
एकदाचे राजकीय पक्षात शिरले कि,तशी दिक्षा दिली जाते.आपल्या नेत्यांच्या भ्रष्टाचार, बलात्कार विरोधात ब्र काढायचा नाही.सामनेवाला पक्षाच्या लहानसहान चुका शोधून त्यावर आकांडतांडव करायचा.दरमहा एखादा रस्ता रोको, चप्पल मारणे ,पुतळा जाळणे कार्यक्रम करायचा.आपला नेता म्हणेल ती पुर्व दिशा.शाळेत शिकलेली दिशा येथे सांगायची नाही.आपल्या मेंदूला कवटीत स्क्रू इतका फिट करायचा कि,उलटा पडलो तरी मेंदू ढिला होऊ द्यायचा नाही.आपला पक्ष निवडणूक हारला तरी , आम्हाला आधीपेक्षा मतदान जास्त झाले असे सांगायचे.ते ही कमी झाले तरी, आमचेच खरे,असेच सांगायचे.इतर विरोधी पक्षातून आपल्या पक्षात आलेल्या नेत्यांचे उणेदुरे काढू नये.त्यांची आधीची व्हिडिओ दाखवू नये.जरी चुकून कोणी तशी व्हिडिओ दाखवली तरही ,ती आमच्याच बाजूने होती,असे ठासून सांगायचे.असे ज्याला जमले तो भराभर पदोन्नती पावतो.जिल्हा अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष बनतो.कोणतीही अक्कल नसली तरी चालते.फक्त नक्कल जमली पाहिजे.तुर्त तरी सुषमा अंधारे यांच्या आधीच्या व्हिडिओ कोणीही दाखवू नयेत.ते शिवसेना सोडून कांग्रेस किंवा राष्ट्रवादीत जातील तेंव्हा कामाला येतीलच.त्या भाजपात गेल्या तर ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत, असे भाजप नेते स्वतः सांगतीलच.चिंता नसावी.आपण आपले मेंदू आपल्याच कवटीत स्क्रू फिरवून पुन्हा फिट करून ठेवावेत.घरी बायको विचारते.का हो, तुम्ही असे चप्पल मारणे चुकीचे नाही काय?मी उत्तर देतो,अगं,हेच तर आपल्या उत्पन्नाचा ,पोटापाण्याचा व्यवसाय आहे.
…. शिवराम पाटील