राजाचा भाऊ राहायला गेला, म्हणून गावाचे नाव पडले राजाचे कुर्ले..
प्रा. डॉ. सतीश कदम
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात महाराष्ट्रातील नामांकित असणाऱ्या अक्कलकोट संस्थानवर राजे भोसले घराणे राज्यकारभार करत असून घराण्याचा इतिहास मोठा रंजक आहे. त्यानुसार या घराण्याचे मुळ पुरुष राणोजी लोखंडे पाटील हे असून छत्रपती संभाजीपुत्र शाहूमहाराजांनी राणोजीला आपले मानसपुत्र माणून त्यांना फत्तेसिंग भोसले नाव देत आपल्या पदरी ठेवून घेतले. 1713 साली राजे किताबासह अक्कलकोटची जहागीर दिली. वास्तविक पाहता अक्कलकोट हे औरंगजेबाने शाहूराजांच्या दुय्यम पत्नी विरुबाईसाहेबांना दिलेली जहागीर होती. अक्कलकोट संस्थानचे क्षेत्रफळ 498 स्क्वेअर मैल होऊन त्याचा महसूल 668392 रुपये होता. संस्थानात 110 गावे मोडत असून सातारच्या राजाच्या नेतृत्वाखाली कारभार करत होते.
छत्रपती शाहूचे अभयदान असल्याने अक्कलकोट संस्थान मोठ्या नावारूपाला पोहोचले होते. 1760 ला फत्तेसिंहमहाराजांच्या निधनानंतर गादीला वारस नसल्याने शोधाशोध सुरू झाली. तत्पूर्वी फत्तेसिंहमहाराजांच्या हयातीतच त्यांचे बंधु बाबाजी लोखंडेपाटील यांना पिलीव ता. माळशिरस जि. सोलापूर येथे धानोरेवगैरे सहा गावची जहागीर रुपये 1872 ची असून ते थेट इंग्रज सरकरमधून दिले जात होते. याच पिलीव शाखेतील बाबाजी राजेभोसले जहागीरदार यांचे पुत्र शहाजी यांना 1760 साली दत्तक घेऊन अक्कलकोटच्या गादीवर बसविले. या पहिल्या शहाजींचे शासन 1789 पर्यंत चालले. या शहाजींना फत्तेसिंह दुसरे आणि तुळजाजी असे दोन पुत्र असून परंपरेने फत्तेसिंह दुसरे उर्फ आबासाहेबांना शहाजींचे वारसदार म्हणून गादीवर बसले.
दुर्दैवाने फत्तेसिंह उर्फ आबासाहेब आणि तुळजाजी या भावामध्ये मोठा संघर्ष निर्माण व्हायला लागला. तुळजाजी थेट दुसर्या बाजीरावाकडे जाऊन तक्रार करू लागल्याने अंताजी माणकेश्वर यांच्या मध्यस्थीने आबासाहेबांनी तुळजाजींना इ. स. 1807 साली कुर्ले ता. खटाव जि. सातारा याठिकाणची 8100 रुपये उत्पन्नाची स्वतंत्र जहागीर दिली. तेव्हापासून या गावाला राजाचे कुर्ले म्हणून ओळखले जाऊ लागले. कुर्लेचा वार्षिक महसूल 5600 रुपये तर 5455 रुपयाचा मोकासा असून ते थेट ब्रिटीशांच्या कोषागारातून देण्यात यायचा. पुढे 3 जुलै 1820 रोजी ईस्ट इंडिया कंपनीकडून अक्कलकोट आणि कुर्ले यांच्यातील अधिकृत वाटणीपत्र करण्यात आले.

www.janvicharnews.com
तुळजाजी राजे भोसले यांनी आपले वास्तव्य राजाचे कुर्ले याठिकाणी ठेवून आपल्या निवासाकरिता एक भव्य गढी बांधायला घेतली. तुळजाजींना शहाजी उर्फ नानासाहेब, शिवाजी उर्फ राजासाहेब आणि संभाजी उर्फ भुम्यासाहेब असे तीन पुत्र होऊन राजाचे कुर्लेत तीन घराचा विस्तार सुरू झाला. शहाजीना भवानजी, शिवाजी, फत्तेसिंह, यशवंतजी अशी चार मुले असून यातील भवानजीला गणपतजी व याच गणपजीचा मुलगा सयाजीना अक्कलकोट शाखेत दत्तक देवून त्यांनी फत्तेसिंह तिसरे म्हणून 1916 ते 1923 असा कारभार केला. शिवाजी शहाजीला शहाजी नावाचा मुलगा झाल्यानंतर पुढील नोंद सापडत नाही. फत्तेसिंह शहाजी यशवंतरावचे नातू पृथ्वीराज दत्तक गेले. यशवंतजीला तुळजाजी, संभाजी दोन पुत्र झाले. वरील शिवाजी तुळजाजीचा विस्तार मालोजी, शिवाजी ( संभाजीशाखेतून दत्तक ), तुळजाजी याप्रमाणे वाढत आहे. तर संभाजी शहाजीला तुळजाजी, तर तुळजाजीला शिवाजी व संभाजी, यातील शिवाजी दत्तक गेले तर संभाजीला भवानजी व मालोजी याप्रमाणे विस्तार झाला. सध्या राजाचे कुर्ले शाखेत पृथ्वीराज फत्तेसिंह राजेभोसले हे सर्वात वयोवृद्ध गृहस्थ असून ते आबासाहेब म्हणून ओळखले जातात. तर संभाजीच्या शाखेतील समरजीत हे कुर्लेचे सरपंच म्हणून राजकरणात सक्रिय आहेत.

www.janvicharnews.com
सुरूवातीला काहीसा संघर्ष झाला असलातरी अक्कलकोट आणि पिलीव किंवा राजाचे कुर्ले येथील राजपुरुषांनी आपापसात अतिशय सलोख्याचे संबंध ठेवले. त्यामुळेच अक्कलकोट नरेश शहाजी तिसरे यांचा 1896 ला मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी कुर्ले शाखेतल्या सयाजीना 8 डिसेंबर 1898 ला दत्तक घेवून त्यांना फत्तेसिंह तिसरे म्हणून संबोधले. इंग्रजी दफ्तरात याची नोंद G. R. 114, 10 जानेवारी 1899 पॉलीटीकल डिपार्टमेंट याप्रमाणे आहे. इंग्रजी शिक्षिका एल. सी. मॉक्सनच्या हाताखाली शिकलेल्या फत्तेसिंहानी अक्कलकोटचा कायापालट केला. 1914 ते 18 च्या पहिल्या महायुद्धात त्यांनी स्वत: भाग घेतल्याने संस्थानसाठी फारमोठा शस्त्रसाठा जमा केला. तेच आजचे अत्याधुनिक शस्त्रसंग्रहालय उभे असून साहजिकच याचे श्रेय कुर्ले शाखेतून आलेल्या सयाजी उर्फ फत्तेसिंहाला जाते. पोटाचा त्रास असल्याने छोट्याशा शस्रक्रियेसाठी त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉ. नायडूनी बेरियम सल्फेटऐवजी बेरियम सल्फाईड दिल्याने 3 एप्रिल 1923 त्यांचे दुख:द निधन झाले.
फत्तेसिंह तिसरे यांचे चुलत बंधु तुळजाजी यशवंतजी हे पुण्यामध्ये शिकत असताना अक्कलकोट संस्थानच्यावतीने त्यांना वार्षिक 500 रुपये दिले जायचे. तुळजाजी पुढे सातारचे नामांकित वकील झाले तर त्यांचे संस्थानात शिवाजी न्यायाधीश झाले. शिवाजीचे चिरंजीव जयाजी आणि जयाजीरावांचे चिरंजीव मनाजीराव यांना 2005 साली अक्कलकोटच्या राजकन्या संयुक्ताराजे यांनी दत्तक घेवून मालोजीराजे तिसरे म्हणून अक्कलकोटच्या गादीवर बसविले जे आज विराजमान आहेत.
राजाचे कुर्लेत एक एकरावरील चार बुरूजाची भव्य गढी, त्यात तीन विहिरी, एका विहिरीवर 1925 चा शिलालेख असून ती तुळजाजी शिवाजीराजे यांनी बांधल्याचा उल्लेख आहे. यांचे ग्रामदेवता असणार्या गिरिजाशंकराचे मंदिर मुळपुरुष तुळजाजीचा मुलगा शिवाजीराजे यांनी बांधले तर त्यापुढील सभामंडप सरस्वतीबाई यांनी बांधल्याचे दिसून येते. कुर्ले आणि अक्कलकोट या दोन्ही घराण्याचे मुळ एकच असून ते पुढेही तसेच टिकून होते. त्यानुसार फत्तेसिंह तिसरे यांच्या पत्नी कैसर ए हिंद महाराणी ताराबाईसाहेब एप्रिल 1927 मध्ये कुर्ले याठिकाणी आलेल्या असून त्यांचा तब्बल तीन दिवस मुक्काम या गावात राहिलेला आहे. अक्कलकोटचे राजे विजयसिंह हे लहान असल्याने ताराबाईसाहेब या प्रत्यक्ष कारभारी म्हणजे रिजंट असून त्यांचे देशविदेशात वास्तव्य असायचे. यादरम्यान खर्याह अर्थाने त्या आपल्या सासरी राहिल्या म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अशारितीने औरंगजेबापासून ते छत्रपती घराण्यापर्यंत ज्या अक्कलकोट संस्थानने आपला ठसा उमटविला त्याची नाळ ही राजाचे कुर्ले घराण्यासोबत जुळलेली होती हे महत्वाचे आहे. कुठल्याही सुखदुख:त दोन्ही घराणे एकत्र नांदताना दिसून येतात. कालक्रमानुसार आज कुर्लेची गढी भग्न अवस्थेत असून गढीच्या मुख्य आवारातच आबासाहेब, समरजीत, संग्रामसिंह, विजयसिंह, विक्रमसिंह, प्रतापसिंह इत्यादी राजेभोसलेंची मंडळी नव्याने बांधलेल्या घरात राहतात. म्हसवडचे माने, बडोद्याचे गायकवाड, कागलचे घाटगे, कवठ्याचे शिंदे, पाटणचे पाटणकर यासारख्या दिग्गज घराण्यात यांचे सोयरसंबंध असून गढीचे बुरूज ढासळलेतरी कुर्लेच्या राजेभोसलेंनी पूर्वजांचा आब कायम ठेवलेला आहे. राजे भोसले घराण्यातील पुरुषांची ऊंची, त्वचेचा तजेलदारपना, घारे डोळे, शांत आणि संयमीवृत्ती यावरून त्यांच्या घरंदाजपणाचा अंदाज येतो. ग्रामदेवी धाकुबाई आणि गिरिजाशंकर यांच्या यात्रेच्या मानाबरोबर गावातील होळीपोळीपासून ते सर्वच मान या घराण्याकडे चालत आले. म्हणून येथील भोसलेंना मिळालेला राजेचा किताब आणि त्यांच्या वास्तव्यावरून गावाला मिळालेले राजाचे कुर्ले हे नाव सार्थ ठरते. स्वातंत्र्यानंतर ही जहागीर अखंड भारतात विलीन होताना गादीचे संस्थापक तुळजाजीराजे यांचे थोरले पुत्र शिवाजीचे पणतु तुळजाजी दुसरे हे गादीवर असून कुर्ल्याच्या गादीचा इतिहास 1807 ते 1948 असा दीडशे वर्ष तुळजाजीपासून ते तुळजाजीपर्यंत चालला..
प्रा. डॉ. सतीश कदम, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, मुंबई.