*समाजभान असलेला अलौकिक नायक : राजर्षी शाहू महाराज*

डॉ मल्हार शिंदे

    *समाजभान असलेला अलौकिक नायक : राजर्षी शाहू महाराज*

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सुशासनात परिवर्तन करणारे, व स्वराज्याचा संकल्प वास्तवात उतरविण्यासाठी आपल्या राज्यकारभाराला  ‘सामाजिक न्याय ‘ या अर्थाशी जोडणारे. राजर्षी शाहू महाराज यांची 26 जून या दिवसी जयंती आहे. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या जन्म आणि मृत्यूतील जे जिवंत आयुष्य होते. ते अत्यंत अल्पायुषी होते. आज त्यांच्या ( जन्म दि.26 जून 1874) जन्माला जवळपास दिडशे वर्ष तर मृत्यूला (मृत्यू दि. 6 मे 1922 ) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या आयुष्याच्या उण्यापुऱ्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीत छत्रपती शाहू महाराजांचा  किर्तीवंत देह महाराष्ट्राच्या नव्हे. तर विश्वाच्या गाभाऱ्यात आपल्या कार्यकर्तृत्व आणि विचाराच्या सुंगंधाने दरवळत आहे.

     त्यांच्या मृत्यूला शंभर वर्ष पूर्ण झाले. आजही  आपण त्यांची जयंती  मोठ्या भक्तिभावाने का साजरा करीत आहोत. या प्रश्नांची उत्तर शोधल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वाभिमान, आत्मसन्मान आणि अस्मिता मिळून स्वराज्याची उभारणी केली होती. पण त्यानंतर महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याचा अंमल समाप्त झाला.त्याठिकाणी  ब्रिटिश साम्राज्याचा प्रभाव वाढीस लागला. त्यामुळे परकिय राजवटीच्या साम्राज्याखाली वावरणारी भारतातील सर्व संस्थाने  ब्रिटिशांची मांडलिकत्व स्वीकारून राज्यकारभार करत होती. या राज्यात सामान्य जनतेच्या हितापेक्षा ब्रिटिशांच्या हिताला अधिक प्राधान्य होते. असे असले तरीही आपल्या  राज्यकारभारात सामान्य माणसाला न्याय देता आले पाहिजे. त्यांना त्यांचे अस्तित्व काय आहे. याची जाणीव करून देता आली पाहिजे. दिनदलितांना, गोरगरिबांना, अठरापगड जातीतील धर्मातील लोकांना न्याय देण्याचे महान कार्य उभारणे आवश्यक होते. ही गरज ओळखून कोल्हापुर संस्थांनचे छत्रपती  राजर्षी शाहू महाराज यानी आपल्या कार्य कर्तृत्वातून पूर्णत्वास आणले.  आज आम्ही त्यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करत आहोत. त्यांच्या जयंती दिनाला सामाजिक न्याय दिन असे संबोधले जाते. त्यांच्या जयंतीला  सामाजिक न्याय दिन संबोधण्या पाठीमागे एक समाज परिवर्तनाचा दृष्टीकोण होता. राजर्षी  नेहमी म्हणायचे आपल्याला मिळालेला राज्याधिकार अथवा राजवैभव हा केवळ राजविलासतेचा उपभोग घेण्यासाठी नाही. तो आपल्यात असलेल्या रंजल्या-गांजल्या प्रजाजनाच्या विशेषतः गरीब, दलित, अज्ञानी व सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगिण उद्धारासाठी वापरला पाहिजे. सर्व सामान्यांना योग्य तो सामाजिक न्याय मिळावा. न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी. यासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, संस्कृतीत स्वरूपाच्या सुधारणा करण्यासाठी सर्व स्तरावरील लोकांची मानसिक गुलामगिरीतून मुक्तता झाली पाहिजे. हा विचार घेऊन शाहू महाराजांनी राज्यकारभाराचा वारसा पुढे चालवला.

www.janvicharnews.com

   एखाद्याला आपल्या कार्याचा दीर्घकालीन ठसा उमटवायचा असेल. तर त्याच्याकडे दीर्घ दृष्टीकोण आणि शहाणपणाच्या विचारांची साथ असावी लागते. त्याशिवाय त्याची धोरणे आणि कार्यपद्धती अजरामर ठरू शकत नाही. जसे दृष्टी पायाजवळ पडते, आणि दूरदृष्टी दूर पर्यंत पोहोचत असते. असाच दूरचा विचार डोळ्यासमोर ठेवून राजर्षी  शाहू महाराजांनी दीर्घकालीन सामाजिक परिवर्तनाचा दृष्टिकोण अंगीकारला. त्यांनी सामाजिक परिवर्तनाची खूप सुंदर रचना केली.त्याबाबत राजर्षी शाहू महाराज म्हणतात की,  प्रत्येक बदल हा सामाजिक परिवर्तन असतो. असे असत नाही, तर अशा बदलात सामाजिक क्रांतीचे व त्यातील अंतरक्रियेचे आकृतीबंध, मूल्ये, संस्कृतिक फलिते आणि प्रतीके विचारात घ्यावी. तसेच यांच्या आविष्कारासाठी निश्चित अशी रचनात्मक, कार्यात्मक व गुणात्मक वस्तुनिष्ठता डोळ्यासमोर ठेवावी लागते. त्या आधारेच नव्या समाजाची निर्मिती करता येते.अशा सर्वसमावेशक विचारातून जो बदल होतो.त्या  बदलाला सामाजिक परिवर्तन असे म्हणता येईल.अशा सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनाला राजाश्रयाच्या माध्यमातून अंमलबजावणीत उतरविणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज एक समाजभान असलेले अलौकिक अवतार पुरुष आहेत. त्यांनी आपल्या राजेशाही ऐश्वर्याचा उपभोग न घेता.  आपल्या राज्यात आदर्श समता प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र स्वतःला मातीत पेरून घेतलं. त्यामुळेच आज या समाजात आम्हाला समता उगवलेली आणि रुजलेली पाहायला मिळते. अशा सामाजिक समतेची पेरणी करण्यासाठी सामाजिक परिवर्तन करताना राजकीय सत्तेचे सामाजिक संदर्भ अधिक महत्त्वाचे असतात. अगदी महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात त्याप्रमाणे, सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून राजकीय सत्ता अधिक महत्त्वाची आहे. ती महात्मा फुल्यांची स्वप्नकांक्षा समाज परिवर्तनाच्या रुपाने राजर्षी शाहू महाराज यानी वास्तवतेत उतरविली आहे. पुढे याच विचारांचा वारसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे चालविला आहे.

www.janvicharnews.com

     सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे. ज्याप्रमाणे थोर क्रांतीकारक भगतसिंग म्हणतात की, समाज परिवर्तनासाठी बंदुक किंवा पिस्तोलाची गरज नाही. तर शिक्षणातून निष्पन्न झालेले विचार हेच समाज परिवर्तनाचे अग्रदूत असतात. म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सामाजिक समतेच्या आणि परिवर्तनाचा अर्थ वास्तवात उतरण्यासाठी शिक्षणाला अधिक महत्त्व दिले. सध्याच्या जीवन कलहातून मानवाला सुखाकडे नेणारे  सर्वस्पर्शी एकमेव साधन म्हणजे शिक्षण आहे. एवढेच नव्हे तर कोणत्याही देशाची राजकीय भवितव्य त्यातील लोकांच्या सुचरित्रावर अवलंबून असते. त्यासाठी आपण सर्वांनी आपले शील सुधारण्याचा प्रयत्न करावा लगतो. यानंतरच आपणास दिलेल्या हक्काचा उपयोग करण्याची योग्यता प्राप्त होते. असे आपले वर्तन आपल्याला शिक्षणातून विकसित करता येते. असा विशाल दृष्टिकोन ठेवून राजर्षी  शाहू महाराजांनी शिक्षणातून झालेल्या जागतिक बदलांचा संबंध कोल्हापूर संस्थानशी जोडण्याचा प्रयत्न केला.

www.janvicharnews.com

अशा प्रकारचे सामाजिक भान डोक्यात ठेवून राजर्षी शाहू महाराज यानी आपल्या कोल्हापूर संस्थानात चांगल्या शिक्षण संस्थांची स्थापना करण्याची परवानगी दिली. शिक्षणविषयक सोयी उपलब्ध करून दिल्या. शिक्षण संस्थांना सर्व प्रकारची सहाय्यता दिली. शिक्षणासंबंधीच्या वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यास प्रोत्साहन दिले. विविध जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सोय उपलब्ध करून दिली. वस्तीगृहात जातीविरहित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सामान्य व्यक्तीच्या मनात ज्ञानलालसा निर्माण करावी. त्याबाबत सातत्याने प्रयत्न केले. रोजगार निर्माण करण्यासाठी औद्योगिक शिक्षण, यांत्रिकी शिक्षण, व्यवसायिक शिक्षण, शेती शिक्षण यासाठी विद्या वेतनाची सोय उपलब्ध करून दिली. नवनवीन शिष्यवृत्या मंजूर केल्या. शिक्षणासाठी स्त्री पुरुषांच्या सहशिक्षणाचा पुरस्कार केला.महराजानी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण हे एक आवश्यक साधन मानले होते.या एकाच साधानावर सामाजिक परिवर्तनाचा विचार करणे अशक्य होते. येथील सामाजिक वास्तव शिक्षणासारख्या एका साधनातून पूर्ण होऊ शकत नाही. समाजात अन्य प्रकारची खूप अडथळे आहेत. त्या अडथळ्यांना पार केल्याशिवाय कोणतेही सामाजिक परिवर्तन करता येत नाही. ही शास्वती शाहू महाराजांना कोल्हापूर संस्थानात आली होती. केवळ शैक्षणिक परिवर्तन करून भागणार नाही. तर त्यास सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची जोड देणे आवश्यक आहे. समाजातील कोणतीही सत्ता मूठभर लोकांच्या हाती जाऊ नये. म्हणून अगोदर सार्वत्रिक शिक्षण प्रसार करण्या बरोबर धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक व मानवतावादी विचार आणि आचार ग्रहण करण्याची संधी प्रजेला  मिळाली पाहिजे. ही पात्रता पूर्ण झाल्यानंतर राजकीय सुधारणांचा हक्क ते आपोआप शिकतील. मग समाजात सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक परिवर्तन घडून येईल.

www.janvicharnews.com

शाहू महाराज येवढ्यावर थांबत नाहीत. तर त्याही पुढे जातात.धर्मभेद व जाती व्यवस्था निर्मूलन, शिक्षण, आरक्षण यातून सकारात्मक बदलाचा विचार करता यावा.यासाठी  उद्योग, क्रीडा, कला, व्यापार, सहकार, शेती यासारख्या विविध क्षेत्रात सामाजिक परिवर्तना बरोबर त्याना संरक्षण, हक्क आणि उपभोक्ता मिळवून देण्यासाठी समन्वय घडवून  प्रत्यक्ष सुधारणा करण्याचा पुढाकार घेतला. शाहू महाराजांच्या सुधारणांचे काही महत्त्वाचे प्रसंग अभ्यासल्याशिवाय त्यांच्या विचार आणि कार्याचे सामाजिक भान काय आहे. हे आपल्या लक्षात येणार नाही.

www.janvicharnews.com

त्यानी आपल्या संस्थानातील अस्पृश्य जातीतील गंगाराम कांबळे यांना स्वतःच्या पुढाकारातून हॉटेल व्यवसाय टाकून दिले. त्याचा ग्राहक म्हणून स्वतःपासून सुरुवात केली. आपल्या चुलत बहिणीचा विवाह इंदूरच्या यशवंतराव होळकर या धनगर समाजातील मुलांशी लावून दिला. आंतरजातीय विवाहसाठी  स्वतःच्या घरातून पुढाकार घेतला. मागास जातींना 50 टक्के आरक्षण दिले. चर्मकार समाजातील दत्तोबा पवार यांना वकिलीची सनद दिली. सत्यशोधक भास्करराव जाधव यांना संस्थानात सहाय्यक सरसुभा म्हणून नेमणूक केली. वतन, हजेरी लावणे, यासारख्या पद्धती पुसून टाकल्या. भटक्या-विमुक्तांना निवासासाठी जागा दिल्या, रोजगार दिला, विशेष म्हणजे संस्थानातील सर्व महिला भगिनी साठी सुधारणात्मक धोरणे राबविली. यामध्ये महिलांना वारसा हक्क देणे, संपत्तीचा हक्क देणे, छाळा विरुद्धचा लढा देण्याचा वैधानिक हक्क दिला. हा उपलब्ध करून दिलं. यासारख्या अनेक मूलभूत सुधारणा करण्याचा  निर्धार त्यानी प्रत्यक्षात उतरविला.

www.janvicharnews.com

हरी जॉन्सन म्हणतो त्याप्रमाणे, सामाजिक परिवर्तन हे पूर्णता आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, तांत्रिक अशा पुर्ण रचनेवर अवलंबून असते. ती पूर्ण पुनर्रचना नव्या समाजाच्या उभारणीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातील सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून उभारले आहेत. राजर्षी  शाहू महाराज हे केवळ आरक्षणाचे जनक नाहीत. तर जातिव्यवस्था निर्मूलनासाठी  घेतलेला पुढाकार यावरुन लक्षात येते. की ते  एक महान सामाजिक भान असलेले कृतिशील सुधारक सुद्धा आहेत. म्हणून महाराजांचा नेहमी आग्रह असे की,या राज्यात जेवढं महत्त्व मला राज राजा म्हणून आहे. तेवढं महत्त्व आपल्या ज्ञानाला, श्रमाला, विचाराला आणि प्रत्येक व्यक्तीला प्राप्त झाले पाहिजे.या विचारातून त्यानी राजेशाही असतानाही सामाजिक न्यायावर आधारलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या लोकशाही मूल्य रचनेची समाजात निर्मिती केली. म्हणून सामाजिक भान असलेले अलोकिक नायक म्हणून राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा गौरव हा अजरामर ठरतो. त्यांच्या या विश्वरूपी कार्याला विनम्र अभिवादन करू या.तसेच या जयंती दिनानिमित्ताने त्यांचा संकल्प भारतीय संविधानाच्या माध्यमातून पूर्णत्वास कसा येईल. यासाठी आपण सर्वांनी आपापसातील मतभेद सोडून एकत्र येवू या. असे झालं तरच राजर्षी शाहू महाराजांचे स्वप्न लवकरात लवकर पूर्णत्वास येईल. असा आशावाद बाळगू या..

Scroll to Top