सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा शहराच्या नावाचा इतिहास
डॉ सतीश कदम
भारतातील मानवी वस्ती नदीनाल्याच्या काठावर तयार झाली. त्याला ग्राम किंवा गाव म्हटले गेले. ऋग्वेद आणि वाल्मिकी रामायणात ग्राम नावाचा उल्लेख येतो. वस्तीभोवती किर्दसार म्हणजे वहितीला योग्य जमीन आहे आणि जिच्यामध्ये मातब्बर शेतकरी व पुष्कळसे मजूर राहतात. अशा वस्तीला गाव म्हटले. गावाचा उल्लेखात शेवटी पूर, गाव, नगर आणि बाद लावले जाते. यातील पूर म्हणजे अकलमंद किंवा गाव, शहर, कसबा असा अर्थ होतो. यातही पूर प्रत्यय मोठ्या वस्तीलाच लावला जातो. उदा. हस्तिनापूर, पंढरपूर. वि. का. राजवाडेंनी ग्रामनामाचा अभ्यास करून गावाच्या नामाभिधानाचे प्राण्याच्या नावावरून, मनुष्य, देवता व जातीवर आधारित, निर्जीव पदार्थावर आधारित व मुसलमानी पद्धतीवर आधारित असे चार प्रकार सांगितले आहेत. महाराष्ट्रातील ग्रामनामे प्रत्यय लागून बनलेली व प्रत्यय नसलेली आढळून येतात. पाचव्या शतकापर्यंत ती प्राकृत होती. पुढे ग्रामनावावर संस्कृतचा प्रभाव पडला. कुठल्याही गावाच्या नावाला इतिहास असतो. याठिकाणी सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा गावाच्या नावाचा इतिहास पाहणार आहोत.

www.janvicharnews.com
त्यानुसार सोलापूरच्या नावाचा इतिहास पहात असताना इ. स. 1180 च्या ताम्रपटात सोलापूरचा उल्लेख सोन्नलिगे, सोन्नलगे असा आढळतो. सोलापूर म्हणजे 12 व्या शतकातील श्री सिद्धरामेश्वरांची नगरी असून त्यांच्या कालखंडातील एका शिललेखात सोन्नलिगे येथील नागप्पा जहागिरदार व त्यांच्या पत्नी चामलादेवी यांनी श्री सिद्धरामेश्वरास गाव बसविण्यासाठी एक कोस प्रदेश दिल्याची नोंद सापडते. इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी 16 गावे मिळून बनलेले ते शोळापूर चे पुढे सोलापूर झाल्याचा उल्लेख केला आहे. तर 1884 च्या स्टेट गॅझेटियमध्ये अहमदपूर, आदिलपूर, चामलादेव, फत्तेपूर, जामदापूर, काळजापूर, खाडरपूर, खंडेरायाची वाडी, महम्मदपूर, राणापूर, संदलपूर, शेकापूर, सोलापूर, स्वन्नलगी, सोनापूर, वैदकीवाडी अशा सोळा गावाचे मिळून सोलापूर बनल्याचे म्हटले आहे. यातील अहमद, महम्मद ही नावे दक्षिणेत 14 व्या शतकानंतर प्रचलित झाल्याने आदिलशाही पत्रातील संदलपूर आणि कामती तसेच सोलापूऱ किल्ल्यातील शिलालेखात सोलंनपूर असा उल्लेख असून वरील स्वन्नलगी किंवा सोलंनपूर म्हणजे सुवर्णवल्ली अर्थातच सोन्यासारखे सुंदर ते सोलापूर असे नामकरण झाल्याचे ग्राह्य वाटते. इंग्रजांनी शेवटपर्यंत याला शोलापूर ( sholapur ) म्हटले. 1974 ला एका शासकीय आदेशाद्वारे ते सोलापूर solapur करण्यात आले.

www.janvicharnews.com
© कोल्हापूरलाही दोन हजार वर्षाचा इतिहास असून देवी महालक्ष्मी किंवा अंबाबाईचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. वि. का. राजवाडे यांच्या मतानुसार सह्याद्रीच्या पूर्वेकडे उघडणाऱ्या खोऱ्यांना मावळ तर पश्चिमेकडल्यांना कोल म्हणतात. त्यानुसार सह्याद्रीच्या पश्चिमेकडील भागात कोल किंवा कोळ लोकांची वस्ती होती. त्या कोलांच्या वस्तीवरून त्या गावाला नाव पडले कोल्हापूर. याउलट पुरातत्व शाखेचे तज्ज्ञ सांकलियाच्यामते या शहराचा राजा शृगाल असून शृगालचे प्राकृत रुप म्हणजे कोल्हा व त्याला पूर जोडल्याचे म्हटले आहे. प्राचीनकाळी पंचगंगेच्या काठी ब्रम्हपुरी, रंकाळा, पद्माळा, खोलखंडोबा, रावणेश्वर व कोल्हापूर अशा वस्त्या असून यातील कोल्हापूरच्या वस्तीचेच नाव पुढे रुढ झाले. पद्मपुराणात कोल्हापूरला करवीर म्हटलेले असून प्रलयकाळात महालक्ष्मीने या नगरीला आपल्या करांनी म्हणजे हातांनी सुरक्षित ठेवले म्हणून करवीर नाव पडले आहे. या क्षेत्रात असलेल्या देवीच्या वास्तव्यावरून या गावाला दक्षिणेतील मातृपीठ म्हटले गेले.
काही ग्रंथात या गावचा उल्लेख कोल्लापूर केलेला असून कोल्लापूर म्हणजे दरीतील गाव असा त्याचा अर्थ होतो. आणखी एका संदर्भानुसार या भागात छोटी मोठी तळी असून त्यात खूप कमळपुष्पे होती. कानडी भाषेत कमळाला कोलिह म्हटले जाते. कोलिहवरुन कोल्हापूर नाव पडल्याचे म्हटले आहे. धार्मिक ग्रंथानुसार या भागात कोलासुर आणि करवीर हे या भागाचे स्वामी असून त्यांनी या भागात उच्छाद मांडला तेव्हा देवी महालक्षी आणि तिची सखी त्र्यंबोली यांनी त्यांचा वध केला. त्यांच्या नावावरून कोल्हापूर आणि करवीर ही नावे पडली असावीत. कागदोपत्री आज कोल्हापूर हे नाव रुढ असून कोल्हापूर वा करवीर हे कायमस्वरूपी राजधानीची गावे राहिल्याचे दिसून येतात. अगदी 1788 पर्यंत मराठ्यांची गादी पन्हाळ्यावरच होती. त्यामुळे प्राचीन काळापासून करवीर असो की कोल्हापूर राजधानी म्हणून पन्हाळा हे महत्वाचे ठिकाण असुनही गावाचे नाव म्हणून कुठेही पन्हाळ्याचा उल्लेख नाही. अशारितीने ब्रम्हपुरी, करवीर ते कोल्हापूर असा या शहराच्या नामकरणाचा विषय आहे.

www.janvicharnews.com
सांगलीच्या नावाचा इतिहास पाहिलातर कृष्णा नदीकाठावर एक बसले, त्या गावात सहा गल्ल्या तयार झाल्या. या सहा गल्ल्यांच्या गावाला संगलगी म्हटले गेले. संगलगी या कानडी शब्दाचा अपभ्रंश होऊन सांगली नाव तयार झाले. याशिवाय कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पवित्र संगमाजवळील गावाला संगमहल्ली म्हटले गेले. त्यावरूनही सांगली नाव रूढ झाले असावे. मराठी विश्वकोशातही या दोन नद्यांच्या संगमावरील गावाला संगम म्हटले गेले. त्यावरून सांगली झाले. 1857 च्या काही जुन्या कागदपत्रात सांगलीचा उल्लेख सागली याप्रमाणे केल्याचे आढळून येते. याठिकाणी सा वर अनुस्वार लावला जात नव्हता हे विशेष आहे. 1807 ते 1948 पर्यंत सांगली हे पटवर्धन संस्थानच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे 1949 पर्यंत सांगली हे दक्षिण सातारा जिल्ह्यात मोडत होते. 1960 साली दक्षिण सातारचे हे जिल्ह्याचे नाव बदलून सांगली करण्यात आले.

www.janvicharnews.com
सातारा शहरलाही प्राचीन इतिहास असून 1190 साली राजा भोज दुसरा याने तेथील किल्ला बांधला. त्या किल्ल्याला 17 दरवाजे व 17 बुरूज होते. यावरून किल्ल्याला व बाजूच्या वस्तीला सतरावरुन सातारा नाव पडले. याशिवाय किल्ल्यावर सप्तर्षिचे मंदिर असून सप्तर्षि म्हणजे आकाशातील सात तारे. त्यावरून सात तारे – सातारे – सातारा असे त्याचे नाव पडल्याचे सांगितले जाते. जुन्यापोथ्यात या परिसराचा उल्लेख सप्तर्षिपूर असा आल्याने याला काही प्रमाणात पुष्टी मिळते. याशिवाय किल्ल्याच्या पायथ्याला 7 ओढे असल्याने 7 दऱ्या निर्माण झाल्या. या सात दऱ्यावरून सातारा नामकरण झाले असावे.
याशिवाय आणखी एका मतप्रवाहानुसार किल्ला बांधण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याला जे खोदकाम करण्यात आले. त्याची दूधबावी, सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर, सप्तऋषि, कोठी, भवानी याप्रमाणे 7 तळी निर्माण झाली. या सात तळ्याच्या बाजूला मंगळाई, शंकर, महालक्ष्मी, सप्तऋषि, बिरोबा, हनुमान आणि नृसिंह अशी 7 देवळे बांधण्यात आली. या सात वरुन सातारा नाव घेतले असावे. यातील सप्तर्षिवरुन सातारा योग्य वाटते. औरंगजेबाने किल्ला जिंकून घेतल्यानंतर किल्ल्याचे नाव आझमतारा ठेवले. 1706 ताराबाईनी तो परत घेतल्यानंतर किल्ल्याचे नाव अजिंक्यतारा ठेवले. शिवराय, संभाजीराजे, राजाराम, ताराबाई अशा सर्वांचे पाय या नगरीला लागलेले असून सातारा म्हणजे विपुल किंवा विस्तार करणारा असा याचा सोपं अर्थ आहे. शेवटी हा तर्क असून गावगाड्यात ज्याला शेती आहे त्याला कुणबी तर बिगर शेतकऱ्याला अडाणी म्हटले. कारण साधन हा महत्वाचा घटक असतो.