हा डोंबा-याचा खेळ औट घटकेचा ठरणार आणि घटनेची पायमल्ली करणारे सरकार लवकरच पडणार!

एक संवैधानिक पद आणि दुसरे असंवैधानिक पद या पदावर विराजमान असणारे दोघेजण घटनात्मक मंत्रीमंडळ समजून निर्णय घेत आहेत, हे लोकशाहीला आणि घटनेला अनुसरून नाही ..हे निर्णय घेतात ते पण दिल्लीतील केंद्रीय भाजपा नेत्याच्या इशाऱ्यावर… स्वत: पदावर असून हि निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल……

www.janvicharnews.com

महाराष्ट्रात गेले 27 दिवस डोंबा-याच्या खेळाप्रमाणे सरकार नावाचे बुजगावणे कारभार हाकत आहे.एक दोरखंडावर भाजपाच्या इशा-यावर कसाबसा तोल सावरत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद सांभाळत आहेत, तर दुसरा उपमुख्यमंत्री खालून डमरु वाजवून “देखो भाई देखो बिना पैसे का तमाशा देखो” म्हणत प्रेक्षकांना रिझवत आहे. हे सरकार‌ दोन‌ चाकी रिक्षावर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका झटक्यात हा डोंबा-यांचा खेळ खल्लास होऊ शकतो. भाजपा श्रेष्ठी या खेळात तरबेज आहेत,ते ज्याला उंंचावर नेतात त्याला दणकाऊन आपटणारी दोर आपल्या हातात ठेवतात. टेकू काढला की वर बसवलेल्या डोंबा-याचा कपाळमोक्ष; वर तो आपल्या कर्माने पडला म्हणून बोंबलायला मोकळे असतात.

एकनाथ शिंदे यांची अवस्था या डोंबा-याच्या खेळातील तारेवरील कसरत करणा-या डोंबा-यासारखी झाली आहे. वर तर चढले पण स्वतः च्या मर्जीने खाली उतरू शकत नाहीत. ही अवस्था एखाद्या बंदीवानापेक्षा दयनीय असते. शिवसेनेच्या अवकाशात स्वच्छंदपणे विहार करणारा शिवसेनेचा वाघ सोन्याच्या पिंज-यात बंद झाला आहे. भाजपाचे वरिष्ठ या जायबंदी वाघाला मेंढराप्रमाणे हाकत आहेत.आणि आता वाघाचं कातडं पांघरलेला; मात्र भाजपा श्रेष्ठीसमोर शेळी झालेले एकनाथ शिंदे अनाथ झाले आहेत. आपल्या भाग्य विधात्याशी बेईमानी करून पाठीत खंजीर खुपसणारे शिंदे विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. यास एकनाथ शिंदे हेच जबाबदार असतील पण हम तो डुबेंगे,लेकिन तुम्हे लेकर सनम असे कृत्य एकनाथ शिंदे यांनी केले असून‌ स्वतः सोबत 40 आमदारांच्या भवितव्याचा खेळखंडोबा करणार आहेत.

www.janvicharnews.com

एकनाथ शिंदे यांची पराभूत मानसिकता स्पष्टपणे दिसत आहे. स्वतः मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली परंतू ते आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार गेल्या 27 दिवसांत करू शकले नाहीत. ते उठसुठ म्हणतात कॅबिनेट मध्ये अमका निर्णय झाला तमका निर्णय झाला. एकनाथ शिंदे हेच एकमेव मुख्यमंत्री व त्यांचे एकनाथी मंत्रीमंडळ व कॅबिनेट.कारण उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक पद नाही ते शोभेचे पद आहे. जगाच्या इतिहासात एका व्यक्ति चे कॅबिनेट शोधुनही सापडणार नाही.असे हे एकनाथी सरकार म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. अशा तकलादू सरकारला सरकार वा कॅबिनेट म्हणण्याचा मुर्खपणा न्यायालय अथवा संविधान करू शकत नाही. एकनाथ शिंदे हे 2004 पासून विधानसभेत कोणत्या ना कोणत्या पदावर आहेत. त्यांना इतक्या नाममात्र बाबीचे ज्ञान नसेल‌ का ? त्यांना दीर्घकालीन व धोरणात्मक निर्णय घेण्याचा कायदेशीर व नैतिक अधिकार आहे आहे का ? याचे आत्मपरीक्षण व चिंतन केले तरी आपण किती चुकीचे वागत आहोत हे लक्षात येईल व भ्रमाचा भोपळा फुटायला मदत होईल.

दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470

अस्वीकरण-सदरील लेखात पत्रकाराची व्यक्तिगत मते आहेत त्यामुळे JANVICHARNEWS.COM कडे कोणतीही जबाबदारी नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top