अबकी बार चारसो पार…म्हणजे काय?


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी निवडणुकीचा “अबकी बार चारसो पार” हा नारा दिला आहे. या “अब की बार चारसो पार” चा अर्थ काय? याचे गमक काय? यामागे रहस्य काय? निवडणुकीत चारशेच्या वर खासदार निवडून आणायचे आणि त्या एकहाती खासदारांच्या बळावर देशातील सर्व विरोधीपक्ष संपवून टाकायचे आणि देशाला एकसंघ बांधून ठेवणारी राज्यघटना बदलून टाकायची हा छुपा अजेंडा तर आहेच. त्या बदललेल्या राजघटनेनुसार देशातील जनतेच्या डांगीवर चारशे चाबकाचे फटके पडणार आहेत. शासकीय शाळा बंद करुन गुलामांच्या पिढ्या तयार केल्या जातील. सरकारी नोकरीचे खाजगीकरण करुन सुशिक्षित तरूणांना देशोधडीला लावले जाईल. शेतकऱ्यांना हमीभाव नाकारून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जाईल. सगळीकडे हाहाःकार माजवून जनतेला महागाईच्या आगडोंबात ढकलून “ना घर का, ना घाट का” अशी परिस्थिती केली जाईल.

पुढील पाच वर्षात देशाची आर्थिक नाडी असलेल्या इंधन म्हणजे पेट्रोल आणि डिझेल “चारशेच्या पार” नेले जाईल. जनतेच्या खिशातील पैसा काढण्याचे हे एक जबरदस्त साधन आहे. पेट्रोल, डिझेल वाहनात भरल्याशिवाय लोकं कुठेच जाऊ शकत नाही. बदलत्या जीवनशैलीचा तो अविभाज्य भाग आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यामुळे जनतेच्या प्रवासाचे भाडे वाढणार. याचा प्रभाव भाजीपाला, दुध, कडधान्ये, साखर आणि सर्व जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर पडणार आहे. सर्वसाधारण सर्वच वस्तूंच्या किंमती “चारशेच्या पार” जाणार आहेत. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळेल. सामान्य जनता उपासमारीने तडफडून मरतील. “चारसो पार” चा खरा अर्थ चारशे रूपयाच्या कमी जनतेला कोणतीच वस्तू मिळणार नाही. म्हणजे देशात कोणत्याही वस्तूंची सुरवात ही “चारशे” पासूनच होईल म्हणूनच “अबकी बार चारसो पार” हा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

हल्ली टीव्हीवर सतत एक जाहिरात झळकताना पहायला मिळते. आई आणि वडिलांना मजबूत कोण बनवितो, तर मोदी. म्हणजे आई वडिलांच्या मेहनतीला, त्यागाला काही किंमतच उरली नाही. सर्वकाही मोदीच देत आहेत. मोदींमुळेच सर्व घडत आहे. सुशिक्षित व्यक्तींमध्ये “विकास” आणि “विनाश” करण्याची ताकद असते. ती व्यक्ती कोणता बटन दाबते यावर ते अवलंबून आहे. सध्या हे अति झाले असून जनतेने या निवडणुकीत योग्य बटन दाबले नाही तर खरचं “अबकी बार चारसो पार” होणार यात शंका नाही. आणि हेच चारशे तुमचे आयुष्य मिटवून टाकण्यात कारणीभूत ठरणार आहे! ✍️

महेंद्र कुंभारे,

Scroll to Top