घटका भरली म्हणजे काय

प्रा डॉ सतिश कदम

मानवाची प्रगती व्हायला लागली त्याप्रमाणे तो नवनवीन संकल्पना आत्मसात करायला लागला. आपापले क्षेत्र वाटून घ्यायचे म्हणून जमीन मोजण्याचे एकक स्वीकारायला लागला, धान्य व इतर वस्तूचे मोजमाप करण्यासाठी वजनमापे शोधू लागला तर दिवसरात्री मोजण्यासाठी कालमापन स्विकारले. कालमापणासाठी त्याने घड्याळ्याचा साधन म्हणून वापर करायला सुरुवात केली. तत्पूर्वी आकाशातील सूर्याची जागा पाहून वेळ ठरवत असत. वेळेसाठी त्याने आवश्यक खगोलशास्त्र आत्मसात केले होते. त्यामुळे चांदणी उगवली, तांबडे फुटले, दिवस कासाराभर आला. याप्रमाणे शब्दप्रयोग रूढ झाले. याअगोदर आदिमानव फुलाच्या उमगण्यावरून ठराविक कालमापन करत होता. पुढे कोंबड्याच्या आरवण्यावरून तो वेळेचा अंदाज बांधायला लागला. रात्री एक दोन तीन याप्रमाणे पहिली बांग, दुसरी बांग यावरून पहाटेचे दोन वाजले, तीन वाजले हे ढोबळमानाने ठरवायला लागला.पुढे सावलीवरून वेळ काढली जाऊ लागली. साधारणपणे सावली आपल्या पायाजवळ आली असेलतर दुपारचे बारा वाजल्याचे गृहीत धरतात. चीनमध्ये ठराविक अंतराने दोरीला गाठी मारून ती दोरी जळत असताना एका गाठीपासून दुसर्याा गाठीपर्यंत जळण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे ठराविक वेळ गृहीत धरली जायची. इंग्लडचा राजा अल्फ्रेडने मेणबत्त्याच्या सहाय्याने वेळ काढण्याची पद्धत अवलंबविली, त्यानुसार 12 इंचाच्या 6 मेणबत्त्य्या घेतल्या. 12 इंचाच्या एका मेणबत्तीला एक इंच जळण्यासाठी 20 मिनीटे लागायची. त्यानुसार बारा इंचाची एक मेणबत्ती पुर्णपणे जळण्यासाठी 4 तास लागायचे, तर 6 मेणबत्त्या जळण्यासाठी 24 तास लागायचे. वाढदिवस साजरा करताना मेणबत्ती फुंकून विझवली जाते. त्यामागे माझे आजचे आयुष्य याचठिकाणी राहू दे म्हणून कदाचित मेणबत्ती विझवण्याची संकल्पना रुद्ध झाली असावी.

त्यानंतर वाळूचे घड्याळ वापरले जाऊ लागले, त्यानुसार एका स्टँडला एकाखाली एक असे दोन चंचुपात्र ठेऊन वरच्या पात्रात वाळू भरल्यानंतर ठराविक वेळेनंतर वरच्या पात्रातील वाळू एका छोट्याशा छिद्रातून खालच्या पात्रात जाण्यासाठी ठराविक वेळ लागायचा, त्यानुसार वेळ ठरविला जायचा, 24 तासात खालचे पात्र भरल्यानंतर ते उलटे केले जायचे, त्याला वाळूचे घड्याळ म्हटले जायचे.

हिंदू कालगणनेनुसार प्रहर ही वेळ मोजण्याची अतिप्राचीन पद्धत असून या पद्धतीत कुठल्याही यंत्राचा वापर केला जात नव्हता. तर यामध्ये दिवसाच्या 24 तासांचे विभाजन 8 भागात म्हणजेच 8 प्रहरात केले जाते. एक प्रहर हा 3 तासांचा असतो. यातील 4 प्रहर हे दिवसासाठी तर 4 प्रहर हे रात्रीसाठी मोजले जातात. त्यानुसार सकाळी 6 ते 9 चा वेळ म्हणजे पूर्वान्ह, 9 ते 12 म्हणजे मध्यान्ह, 12 ते 3 म्हणजे अपरान्ह, 3 ते 6 म्हणजे सायंकाळ, रात्री 6 ते 9 म्हणजे प्रदोष, रात्री 9 ते 12 म्हणजे निशीथ, 12 ते 3 म्हणजे त्रियाम आणि पहाटे 3 ते 6 म्हणजे उषाकाळ. त्यामुळे 8 प्रहाराचा दिवस असल्याने अष्टौप्रहर हा शब्द रूढ झाला. अडीच घटकाचा 1 तास तर साडेसात घटकाचा 1 प्रहर होतो. येथे घटका हा शब्द आपल्यादृष्टीने महत्वाचा आहे.

www.janvicharnews.com

तसे पाहिलेतर हजारो वर्षापासून वेळ पाहण्याची कला माणसाला अवगत असल्याचे दिसून येते. त्यानुसार हिंदुस्थानात घटिका पात्र हे वेळ समजण्याचे एक साधन होते. यासाठी एका मोठ्या पात्रात पाणी भरलेले असायचे, त्या पाण्यावर खालून छिद्र पाडलेले वाटीसारखे दुसरे एक भांडे ठेवले जायचे. मोठ्या भांड्याला घटिकापात्र तर वाटीला घटिका म्हणत. वास्तविक पाहता घट म्हणजे घंटा तर घड म्हणजे भांडे. त्यानुसार पाणी भरलेल्या पात्रात छिद्र असलेली वाटी बुडाली की त्याला घटका भरली असे म्हटले जायचे. वाटी बुडण्यासाठी साधारणपणे 60 मिनीट लागत असत. त्यामुळे 60 मिनिटाची एक घटका समजली जाते. वाटीसारख्या घटिकामध्येही खुणा केलेल्या असत. त्याला पळ ( पल किंवा आजच्या भाषेतील क्षण ) म्हणत. त्यामुळे वाटी किती बुडाली यावरून पळ काढले जात असे. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण, ज्योतिर्विलास, खगोलदर्शन इत्यादि पुस्तकात याबाबत सविस्तर वर्णन पाहायला मिळते.

घटिका पात्राच्या सहाय्याने वेळ ठरविण्याचे कोष्टक दिलेले आहे. त्यानुसार

60 विपळे म्हणजे 1 पळ,

60 पळे म्हणजे 1 घटिका,

60 घटिका म्हणजे 1 दिवस,

30 दिवस म्हणजे 1 महिना

आणि 12 महिन्याचे 1 वर्ष म्हणजे 1 संवस्तर.

यातील अडीच विपाळाचा 1 सेकंद,

1 पळ म्हणजे 24 सेकंद,

अडीच पळ म्हणजे 1 मिनीट

आणि अडीच घटकाचा 1 तास याप्रमाणे गणित होते.

दुसऱ्या कोष्टकानुसार

साडेसात घटिका म्हणजे 1 प्रहर,

8 प्रहर म्हणजे 1 दिवस,

15 दिवस म्हणजे 1 पक्ष किंवा पंधरवडा,

2 पक्ष म्हणजे 1 मास,

2 मास म्हणजे 1 ऋतु,

3 ऋतूचा 1 अयन

आणि 2 अयनचे 1 वर्ष.

अशाप्रकारचे घटिकापात्र मंदिर, मश्जिद, राजदरबार याठिकाणी ठेवलेले असायचे. छत्रपती शिवरायांची जन्मतारिख पाहील्यास त्यात ‘ शके 1551, शुक्ल नाम सवंत्सरे, फाल्गुन वद्य तृतीया, वार शुक्रवार, हस्त नक्षत्र, घटी 15, पळे 31’ याप्रमाणे उल्लेख असून हिंदू कालगणनेनुसार त्यात घटे आणि पळे यांचा उल्लेख असल्याने शिवरायांच्या कालखंडात घटिका पात्राच्यासहाय्याने कालमापन केले जात होते हे स्पष्ट होते.

घटिकापात्र सूर्योदयाची वेळ निश्चित मानून ठेवलेले असायचे. ही वेळ सर्वांना समजावी म्हणून दर अडीच तासाला घंटा वाजविली जायची.

ज्यावेळी शाहिस्तेखानाने पुण्यावर आक्रमण केले, त्यावेळी तो पुण्यातील लालमहालात महिनाभर मुक्कामाला होता, तेव्हा दर तीन तासांनी चौघडा वाजविला जात असल्याचा संदर्भ सापडतो. म्हणजे मध्ययुगीन कालखंडात घटका समजण्यासाठी घंटा किंवा गजर वाजविला जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे घंटा या शब्दापासून घड्याळ हा शब्द आला. कारण इंग्रजीत ज्याला clock म्हणतो तो शब्दही फ्रेंच भाषेतील cloche या शब्दापासून तयार झालेला आहे. याअर्थाने तुझी घटका भरली, किंवा तुझा घडा भरला, घटिका जवळ आली हे शब्द रूढ झालेले आहेत.

आठवड्यात सात वार असलेतरी प्रत्येक वार आठ दिवसांनी येत असल्याने त्याला आठवडा म्हटले गेले. वारांची संस्कृत नावे रविवारपासून, आदित्यवार, चंद्रवार, भौमवार, सौम्यवार, बृहस्पतवार, भृगुवार आणि मंदवार. त्यानंतर मराठी महिन्यात 2 पंधरवडे असून पौर्णिमेपर्यंत शुक्ल (पांढरा)पक्ष आणि कृष्ण ( काळसर ) पक्ष म्हणतात. तर अमावस्येतील अमा म्हणजे एकेठिकाणी आणि वसा म्हणजे राहणे. दोनदोन महिन्याचे सहा ऋतु आले. तर 12 चंद्रमासाचे 354 दिवस होत असल्याने 11 दिवसाचा फरक काढण्यासाठी अधिकमास घेतलेला आहे. सवंत्सराची संख्या 60 आहे. अशारितीने पहिले मनगटी घड्याळ कोणी आणले हे महत्वाचे नसून कुठलीही साधनसुविधा नसताना भारतीय माणूसच कायतर आपला कोंबडाही अचूक वेळ सांगत होता हे महत्वाचे आहे.

प्रा डॉ सतिश कदम

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top