शकुनीमामा ते अब्दालीपर्यंतचा हिंदुस्तान
– १. महाभारतात सांगितले जाणारे गांधार म्हणजे आजचे अफगाणिस्तान, त्यामुळे शकुनीमामा मूळचा अफगाणिस्तानचा
२. पानिपतात एक लाख मराठ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा अहमदशहा अब्दाली हा अफगाणिस्तानचा राष्ट्रपुरुष आहे.
३. अफगाणिस्तानात १० वर्षे राहून आलेला म्हणजे फॉरेन रिटर्न असणारा नेताजी पालकर हा पहिला मराठी माणूस
४. अब्दालीने अनेक मराठ्यांना जबरदस्तीने कैदी म्हणून नेल्यानंतर त्यांना धर्मांतरीत केले तरी मूळच्या मराठ्यांनी आपले रीतीरिवाज सोडले नाहीत. ते बुगती मराठा, साहू मराठा म्हणूनच ओळखले जातात.
५. अफगाणिस्तानच्या मराठ्याने आई हा शब्द जपून वापरात ठेवला आहे.

www.janvicharnews.com
अफगाणिस्तान म्हणजे प्राचीन हिंदुस्तानचा एक भाग असून काबुल म्हणजे महाभारतातील गांधारदेश. याच ठिकाणाहून गांधारीचा भाऊ आणि अनीतीने वागणार्याण दुर्योधनाचा मामा शकुनीमामा आला. ज्याच्या कूटानीतीमुळे महाभारत घडले. प्राचीनकाळी याला कपिसा किंवा हुएन त्संगच्या भाषेत कीआपिशे म्हटले जायचे. इ.स. पू. 1000 मध्ये सोळा महाजनपदातील कंबोज म्हणजे आजचे अफगाणिस्तानच. तर मोगल काळात याला खुरासान म्हटले जायचे. येथील हवाई कंपनी आणि मोठी हॉटेल कंपनीही आर्यांना नावाने खूप प्रसिद्ध पावली. प्राचीन काळातील कुभा म्हणजे काबुल, क्रमू म्हणजे कूर्म, गोमती म्हणजे गुमाल, पेशावर म्हणजे पुरुषपूर. गझनी, घोरी, मोगल, नदीरशहा ते अब्दालीपर्यंतचे सर्व आक्रमक हे याच भूमीचे रहिवासी. बहुतेक प्रदेश डोंगरदर्या.चा असून एका भागात सतत बर्फ पडतो तर दूसरा भाग पुर्णपणे वाळवंटी. डोंगरदर्याडतील शुष्क वातावरणामुळे येथील लोक लढवय्ये परंतु क्रूर आहेत. उंटाच्या काफिल्यातून फिरत असताना हल्ले करणे हा यांचा मूळ उद्योग. त्यामुळे अफगाणी नागरिकांचे सरासरी आयुर्मान फक्त 46 वर्षे एवढे कमी आहे. घरात आलेल्या पाहुण्याचे जेवढे स्वागत करतील तेवढेच तो जर निर्जन ठिकाणी भेटलातर त्यालाही लुटायला कमी करणार नाहीत. येथील टोळ्यात आफ्रिदी, ओटाक्झी, बंगश, तोरी, झरी, कक्कर, यूसुफजाई, दलाजक, पश्तुनी, उझबेक, ताजिक, हजारा, पठाण या प्रमुख असून 18 व्या शतकात दुर्राणवंशी सुलतान अहमदशहा अब्दालीने या सर्वांना एकत्र करून एकसंघ अफगाणिस्तानची स्थापना केल्यामुळे अब्दालीला ते राष्ट्रपुरुष मानतात. भारताच्या दृष्टीने तिसर्याा पानिपतात एक लाख मराठ्यांच्या रक्ताचे पाट वाहणारा क्रूरकर्मा म्हणजे अहमदशहा अब्दाली.
हिंदूकुश पर्वतामुळे देशाचे दोन भिन्न भाग पडले तर हेमलंड नदीमुळे काही भाग सुपिक वाटत असलातरी बहुतेक भागात वाळवंट असल्यामुळे उत्पन्नाची साधने कमी असल्यामुळेच पूर्वीपासून या प्रदेशातील लोकांनी इतर देशावर आक्रमणे केली. प्राचीन काळातील हिंदू संस्कृतीबरोबरच काबुल परिसरात बौद्ध धर्माचा प्रसारही मोठ्या प्रमाणावर झालेला होता. आजचा हवाईअड्डा बामियान ही बौद्धाची राजधानी असून जगातील उंच मुर्त्यापैकी एक असणारी 174 फुट उंचीची बौद्ध मूर्ति 6 व्या शतकात बनविलेली होती. मात्र अलीकडे 2001 साली तालिबानी मुल्ला मोहम्मदने ती स्फोटकाने उडवून टाकली. ग्रीक सम्राट अलेक्जांडरनेही या भागावर आक्रमण करून आपले वर्चस्व ठेवले होते. आलेक्झांडरला सिकंदर म्हटले म्हणजे तो मुस्लिम नाही कारण त्याच्यानंतर हजारएक वर्षांनंतर मुस्लिम धर्माची स्थापना झालेली आहे.

www.janvicharnews.com
7 व्या शतकात मुस्लिम धर्माची स्थापना होईपर्यंत काबुल कंदहार परिसरावर हिंदूंचे राज्य असून इ. स. पूर्व 135 नंतर येथे कनिष्क हा प्रमुख हिंदू राजा होता. त्याने पुढे बौद्ध धर्म स्वीकारला. अरबांच्या आक्रमणाबरोबरच येथेही मुस्लिम धर्म आला असलातरी त्यानंतरही 9 व्या शतकातपर्यंत येथे कल्लार, सामंतदेव, अष्टपाल, भीमपाल, जयपाल इत्यादि पराक्रमी राजे होऊन गेले. अगदी 1938 च्या आसपास येथे फक्त हिंदू जाटांची संख्या पाच लाखावर होती. काबुलमध्ये आजही म्हणजे लेख लिहिपर्यंतच्या दिवसापर्यंत अस्तित्वात असणारे आसा माई नामक दुर्गामातेचे मंदिर जवळपास दोन हजार वर्षापासून अस्तित्वात असल्याचे संगितले जाते. 10 व्या शतकात महम्मद गझनीने हिंदूवंशीय राजा त्रिचोनापालचा पराभव करून मुस्लिम राजवटीची स्थापना केली. अनेक वंश आणि त्यात अनेक जाती जशा देगानी, लमघाणी, साधू, कवल, निमचाकाफिर अशी कित्येक नावे सापडत असलीतरी टोळ्याच्यास्वरुपातील वावर असल्यामुळे नेहमी वर्चस्वाची लढाई केल्याशिवाय आपल्या टोळीचे नाव होत नाही या जाणिवेतून येथे नेहमी संघर्ष पाहायला मिळतो. बाकी काही असलेतरी सर्व टोळ्यांच्या समंतीने जातपंचायतीप्रमाणे एक अलिखित संघटना अस्तित्वात असून त्याला लोया जिर्गा असे म्हटले जाते. बाकी सत्तांतरे काही झालीतरी अजूनही लोया जिर्गाचे निवाडे कुणीच नाकारू शकत नाही.
टोळीच्या वर्चस्वातूनच या वळवंटातून गझनी, घोरी, दारा पहिला, नादीरशहा, बाबर यासारखे आक्रमक तयार झाले. हिंदुस्थांनातून युरोपकडे जाण्यासाठी खैबर खिंडीसारख्या अनेक खिंडी या भागात असल्याने अफगाणीस्तान हा युरोप आणि हिंदुस्तानचा मध्यबिंदू ठरला. आजही जगाचा नकाशा उघडून पहिलातर पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असतातर आपला व्यापार हा रस्त्याच्या सहाय्याने थेट युरोपपर्यन्त राहिला असता. स्वस्त दरातील वाहतुकीमुळे भारताची निर्यात कित्येक पटींनी वाढली असती. याचा नेमका फायदा अफगाण टोळ्यांनी घेतला. त्यांच्यासाठी वैभवशाली हिंदुस्तान म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली. त्यामुळेच महम्मद गझनी आणि घोरीला 17 -17 स्वार्या केल्यावरही समाधान वाटले नाही. सोरटी सोमनाथची लूट असेल की, पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहानची विटंबना असेल फक्त अन्यायाची मालिका यांच्या कृतीतून समोर येते.
मोगलांच्या काळातील हा खुरासण किंवा काबुल कंदहार हा एक सुभा असून यावर राजा मानसिंग, शाहीस्तेखान यांनी वर्चस्व ठेवले. तर स्वराज्याचे सेनापति नेताजी पालकरांना मुस्लिम बनवून कुलीखान हे नाव देवून जवळपास दहा वर्षे याच काबुल भागात ठेवले होते. अफगाणिस्तानमध्ये पाय ठेवणारा नेताजी पालकर हा पहिला मराठा असून येथील टोळ्यांच्या उपद्रवाची औरंगजेबालाही नेहमीच धास्ती असायची. त्यामुळे छत्रपती शिवरायांना आग्र्याच्या कैदेत ठेवल्यानंतर त्यांना काबूल प्रांतात पाठवून या रानटी टोळ्यासोबत लढायला लावून त्यांचा परस्पर काटा काढायचा औरंगजेबाचा बेत होता. परंतु अशाचप्रकारे सूरत स्वारीच्यावेळी महाराजांना जव्हार भागातील गोंड आदिवासीनी अडविल्यानंतर राजांनी त्यांना फक्त आपलेले केले असे नसून त्यांना मोगलांच्या विरोधात उभेही केले. त्यामुळे महाराज काबूलला गेले असतेतर हा काळाच्या गर्भातला प्रश्न अनुत्तरित राहील. यापेक्षा 1674 ला राज्याभिषेकाप्रसंगी औरंगजेब यूसुफजाही टोळ्यांच्या बंदोबस्ताकरिता काबूल प्रांतात गेल्यामुळेच हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.
1526, 1556 आणि 1761 अशी तीनही पानीपत युद्ध घडविणारी मंडळी याच अफगाणिस्तानची असून पहिल्यात बाबर, दुसऱ्यात अकबर तर तिसऱ्यात अहमदशहा विजयी ठरला. तिसरे पानीपत हे मराठे आणि अब्दाली यांच्यात 14 जानेवारी म्हणजे ऐन संक्रातीदिवशी घडून त्यात मराठ्यांचा विदारक पराभव होऊन यात मराठ्यांची एक लाख बांगडी फुटली. त्यामुळे आजही संक्रात सणाविषयी मराठी माणसात धाकधूक असते. काहीजण जीव वाचवून पळून जाऊन विविध भागात स्थिरावले. हरियाणातील पानीपत परिसरातील या मराठ्यांना रोर मराठा म्हटले जाते. परवा सुवर्ण पदक मिळविणारा नीरज चोप्राही यात मोडतो. अब्दालीने शेकडो बायका पोरांना गुलाम बनवून त्यांची वाटणी केली. त्यांना अफगाणीस्थानात नेवून मुस्लिम बनविलेतरी त्यांनी आपले मराठापण जपत बुगटी मराठा, साहू मराठा यासारख्या 7 जाती कायम ठेवल्या. आजही त्यांची नावे कमोल, गोदी याप्रमाणे मराठी असून नवरदेवाला हळद लावणे, नवीन वस्तूला ओवाळणे यासारखे विधी केले जातात. अफगाण मराठा भलेही मुस्लिम झालातरी त्याने आई हा शब्द कायम ठेवला असून त्याची भारतमाता कधीतरी त्याला भेटेल या आशेवर तो जगतो आहे. –
डॉ. सतीश कदम