झुकिनी पीक लागवड – सविस्तर माहिती

-

झुकिनी पीक लागवड – सविस्तर माहिती

सतीश भोसले

- Advertisement -


शेतीवर बोलू काही, #झुकिनी पिक मार्गदर्शन, #एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, #एकात्मिक रोग व किड नियंत्रण, #पाणी व्यवस्थापन, #जैविकअजैविक ताण व्यवस्थापन
नमस्कार शेतकरी बंधूनो,
काकडीवर्गीय पिकामध्ये झुकीनी लागवड, सलाड आणि प्रक्रीया उद्योगासाठी करण्यात येते. याची मागणी मोठ्या शहरांतून वाढत आहे. सध्या लहान प्रमाणावर लागवड होत असली तरी काकडीसारखाच उपयोग होत असल्याने याची लोकप्रीयता वाढून मागणी वाढण्याची शक्यता आहे. झुकीनी या नावाने ओळखल्या जाणा-या या पिकाचा काकडीवर्ग असल्याने हे काकडीसारखेच आहारदृष्ट्या महत्वाचे आहे. झुकिनी हे समर स्क्वॅश आणि विंटर स्क्वॅश या नावाने ओळखले जाते. त्याची शास्त्रीय नावे अनुक्रमे कुकुरबिटा मॅझिमा आणि कुकुरबिटा पेपो अशी आहेत. दोन्ही प्रकारातील झाडे बुटकी, झुडूप वजा असतात. झुकिनीच्या झुडूपवजा झाडांवर नर आणि मादी अशी दोन्ही प्रकारची फुले असतात. नर फुलांचा आकार मादी फुलांच्या आकारापेक्षा लहान असून, दोन्ही फुलांचा रंग पिवळा असतो. इतर देशांमध्ये या फुलांचा उपयोग खाण्यासाठी किंवा पदार्थ सजविण्यासाठी करतात. काकडी आणि दुधी भोपळ्याची मिश्रित चव व काकडीसारखेच आकाराने दिसणारे या पिकाचे फळ गर्द हिरवे, पोपटी, राखाडी व पिवळ्या रंगात येते. झुकिनी निरनिराळ्या पद्धतीने शिजवून खाण्याची इतर देशांत पद्धत आहे. उदा. पाण्यात किंवा रसात मंदपणे शिजवून खाणे, मांसाहारी खाद्य तयार करण्यासाठी झुकिनीचे तुकडे करून त्यात मिसळणे, टोमॅटो, ढोबळी, मिरची, वांगी, गाजर आदींमध्ये मिसळून ऑलिव्ह तेलामध्ये गरम करणे अशा विविध पद्धती वापरून झुकिनीचे आहारात सेवन करतात. भारतात झुकिनीचे बारीक तुकडे तयार करून ‘सॅलड’ म्हणून खाण्यासाठी वापरतात. फळाच्या गोल चकल्या करून त्यास मीठ लावून कच्च्या स्वरूपात खाल्या जातात. भारतात मोठमोठ्या शहरातील हॉटेल्समधून झुकिनीला मागणी असते. झुकिनी या भाजीत भरपूर प्रमाणात पोषक द्रव्ये (जीवनसत्त्वे, खनिजे, तंतूमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ) उपलब्ध असतात. फळाच्या सालीत तंतूमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते. हृदयाचे ठोके नियंत्रित करणे तसेच पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी झुकिनी फळ महत्त्वाचे आहे.

लागवड कालावधी :
झुकिनी पिकाचा कालावधी फारच कमी असतो. तो जातीपरत्वे हंगामाप्रमाणे बदलतो. लागवड वर्षभर करता येते हे पीक भारतात तीनही हंगामांत घेतले जाते. उन्हाळी लागवड हि जानेवारी ते मार्च यादरम्यान केली जाते तर पावसाळ्यातील लागवड हि जून ते जुलै या महिन्यात करण्यात येते तर हिवाळ्यात लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यादरम्यान केली जाते. हरितगृहात लागवड केल्यास बिगरहंगामी उत्पादनही चांगल्या प्रकारे मिळते. हरितगृहातील नियंत्रित तापमान आणि आर्द्रतेमध्ये लागवड केल्यास वर्षभर लागवड करणे शक्‍य होऊन फळांची प्रत व उत्पादनामध्ये वाढ होते.

पोषक हवामान :-
जमिनीचे तापमान २१ अंश सेल्सिअस चांगल्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. सरासरी तापमान २५ ते ३५ अंश सेल्सिअस लागवडीसाठी उपयुक्त असते. किमान तापमान १६ अंशांपर्यंत असावे. जास्त तापमानात नर फुलांची संख्या वाढून मादी फुलांची संख्या कमी होते. उष्ण व समशितोष्ण हवामानात लागवड यशस्वीपणे करता येते. सूर्यप्रकाश, कमी आर्द्रता (४०-४५ टक्के) आणि रात्रीचे तापमान १८ अंश से. तर दिवसाचे तापमान ३० अंश से. अशा हवामानात झुकिनीचे उत्पादन व फळांची प्रत चांगली मिळते. हरितगृहात वर्षभर लागवड करण्यासाठी तापमान १० ते ३० अंश से. आणि सापेक्षा आर्द्रता ४० ते ४५ टक्के नियंत्रित असावी. पंचतारांकित हॉटेल्समध्ये दर्जेदार झुकिनी फळांना मागणी वर्षभर असल्याने हरितगृहात लागवड किफायतशीर ठरते.

झुकीनीचे प्रकार व सुधारित जाती :-
झुकीनीचे हिरवे आणि सोनेरी पिवळे असे दोन प्रकार आहेत. हे आयात झालेले पीक असल्याने सर्वच वाण हे परदेशातील आहेत. यामध्ये आपल्या भागात लागवड करण्यासाठी झुकिनी, गोल्डन झुकिनी, गोल्ड रश, गोलाकार झुकिनी, ऑस्ट्रेलियन ग्रीन, पुसा अलंकार आणि अरीस्टोक्रॅट या वाणांच्या प्रामुख्याने वापर केला जातो.
१) झुकिनीची गर्द हिरव्या रंगाची फळे असलेली जात फार लोकप्रीय असून फळांचे उत्पादन अधिक येते. याचा वापर सलाड म्हणून तसेच भाजी करण्यासाठी होतो.
२) गोल्डन झुकिनी आणि गोल्ड रश या सोनेरी पिवळ्या रंगाच्या फळांच्या जाती असून गर दुधाळ रंगाचा आणि चांगल्या स्वादाचा असतो. गोल्ड रश वाण लवकर येणारा असल्याने त्याची लोकप्रीयता वाढत आहे.
३) अरीस्टोक्रॅट हा संकरीत वाण आहे. हिरव्या रंगाचा, लवकर येणारा व फळाचे अधिक उत्पादन ही या वाणाची वैशिष्ट्ये आहेत.

आवश्यक जमीन :-
हे पीक हलक्‍या व मध्यम भारी जमिनीत चांगले येऊ शकते. परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन उत्तम मानवते. जमिनीचा सामू (पी. एच.) ६.५ ते ७ पर्यंत असावा. लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे आवश्‍यक आहे.

लागवड व्यवस्थापन व बियाण्याचे प्रमाण :-
पारंपरिक लागवड पद्धतीत जमिनीची पूर्व तयारी झाल्यानंतर ६० सेंमी रुंद व ३० सेंमी उंच आणि सोयीप्रमाणे लांब आकाराचे गादीवाफे तयार करून घ्यावेत. दोन गादीवाफ्यांमधील अंतर ६० सेंमी ठेवावे. म्हणजे एक एकर क्षेत्रामध्ये ४० मीटर लांबीचे ८३ वाफे तयार होतात. १.५ ते २ किलो बियाणे प्रति हेक्टरी, खुल्या शेतात गादीवाफ्यावर मध्यावर सरळ रेषेत ९० सेंमी अंतरावर बी टोकून अथवा रोपे लावून लागवड केली जाते. एकरी ३७२५ एवढी झाडांची संख्या ठेवता येते. बियाणे एकरी ७०० ते ८०० ग्रॅम लागते. बाजारात झुकिनीच्या गर्द हिरव्या फळांना जास्त मागणी असून, पिवळ्या रंगाच्या झुकिनी फळांना साधारण मागणी असते. बी टोकल्यांतर किंवा रोपांची लागवड झाल्यानंतर लगेच पाणी देण्याची व्यवस्था करावी.

हरितगृहातील लागवड :-
चार हजार चौरस मीटर हरितगृहात निर्जंतुकीकरण आणि वाफे तयार झाल्यानंतर व मल्चिंग पेपर वाफ्यांवर टाकल्यानंतर लागवड वर नमूद केल्याप्रमाणे ९० सेंमी अंतरावर बी टोकून अथवा रोपे लावून करावी. लागवड पूर्ण झाल्यानंतर ठिबकच्या साहाय्याने पाणी द्यावे. बी टोकून लागवड केल्यावर ५ ते ६ दिवसांत बियांची उगवण होते. बियाणे उगविण्यासाठी हरितगृहामध्ये १९ ते ३० सें. ग्रे. तापमान आणि सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के नियंत्रित करावी.

पाणी व्यवस्थापन :-
जोमदार वाढीसाठी आणि उत्तम प्रतीचे उत्पादन मिळण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे अतिशय आवश्‍यक आहे. ठिबकद्वारे पिकाला वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांच्या मात्राही देता येतात. पिकाच्या वाढीच्या काळात कोरडी हवा पडली असल्यास किंवा पाण्याची कमतरता पडण्यास पिकावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. विशेषत: बी उगवताना, पिकाची जोमदार वाढ होताना आणि फळधारणा होऊन फळे पोसतांना पाण्याचा तुटवडा पडू देऊ नये. जास्तीचे पाणी साचून पिकांवर रोगाचे प्रमाण वाढते, त्यामुळे शक्यतो पाणीपुरवठा करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.

खत व्यवस्थापन :-
झुकिनीच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी खतांचा योग्य प्रमाणात आणि योग्यवेळी वापर महत्त्वाचा आहे. लागवडीच्या अगोदर शेताची तयारी करताना हेक्टरी २० – २५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी हेक्टरी ५० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ५० किलो पालाश याप्रमाणे खते द्यावी. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी, नत्र तीन समान हप्त्यांत विभागून द्यावे. ठीबक सिंचनावर पीक घेतल्यास खते ठीबक सिंचनाद्वारे थोडीथोडी द्यावी. त्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करावा. अधिक उत्पादनासाठी पीक वाढीच्या अवस्थेनुसार १९:१९:१९, १२:६१:००, ००:५२:३४, १३:००:४५, १३:४०:१३ या विद्राव्य खतांचा फवारणी व ठिबक सिंचनाद्वारे वापर केल्यास फळांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते. झुकिनीची चांगल्या वाढीसाठी जमिनीत नियंत्रीत ओलावा असणे आवश्यक आहे. हवामानाला अनुसरून नियमीत पाणी द्यावे. ओलावा राखण्यासाठी आच्छादनाचा (मल्चींग) वापर करावा. पाण्याचा सामू व विद्युतधारकता योग्य असल्याची निश्‍चिती करावी.

झुकिनी पिकांतील कीड व रोग व्यवस्थापन :-
झुकिनी पीक नियंत्रित ठेवण्यासाठी एकात्मिक कीड व रोग नियंत्रण प्रणालीचा अवलंब करावा. पिकाभोवती मक्याची तसेच झेंडूची लागवड करावी. ज्यामुळे कमी खर्चात योग्य नियोजन साधणे शक्य होईल आणि उत्पादनातही भरघोस वाढ मिळेल.
अ) कीड व्यवस्थापन :-
काकडीवर्गीय पिकाप्रमाणेच झुकिनी पिकावर मावा, लाल भुंगे, लीफ मायनर (पाने पोखरणारी अळी) आणि फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या एकात्मिक नियंत्रणासाठी फळमाशीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळ्यांचा (ट्रॅप्स) वापर करता येतो. लीफ मायनरच्या नियंत्रणासाठी सुरूवातीलाच पिवळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. त्याचबरोबर कीड प्रतिबंधात्मक म्हणून नीमगार्ड (निम १००००ppm)ची फवारणी घ्यावी. किडीची आर्थिक नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन १० लीटर पाण्यात २० मिली मॅलेथिऑन फुले येण्याच्या अगोदर आणि फुले आल्यानंतर १० लीटर पाण्यात २० मिली प्रमाणे गार्डप्लस फवारावे. किड लागलेली फळे काढून नष्ट करावीत. लीफ मायनरच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफोस किंवा डिमेक्रान या कीटकनाशकांच्या वापर करावा.

ब) सूत्रकृमी :-
लक्षणे :- सूत्रकृमी अतिशय बारीक आकाराचे असून, रोपांच्या मुळांमध्ये शिरून अन्नरस शोषून घेतात. मुळांवर गाठी होऊन मुळे जमिनीतील पाण्यातून अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाहीत. यांच्या नियंत्रणासाठी सुरवातीलाच निमॅटोड या जैविक उत्पादनाचा वापर करावा.

क) रोग नियंत्रण :-
रोगांमध्ये केवडा, भुरी, करपा, जिवाणूजन्य मर आणी व्हायरस या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो. काही ठीकाणी जमीनीत ओलावा वाढल्यास मर रोगाच्या प्रादुर्भाव होतो. त्यामुळे सुरूवातीस ट्रायको (ट्रायकोडर्मा व्हीरीडी) या जैवीक बुरशीचा वापर जमिनीतून करावा. केवडा, भुरी आणी करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी फंगीनिल १५ मिली १० लिटर पाण्यासाठी याप्रमाणे फवारणी घ्यावी. व्हायरस या रोगांच्या नियंत्रणासाठी व्हायरोकिलर अधिक गार्ड प्लस १५ मिली १० लिटर पाण्यासाठी याप्रमाणे या उत्पादनांचा रोग प्रतिबंधात्मक म्हणून फवारणीसाठी वापर करावा. विषाणूमुळे होणा-या केवडा रोगाने ग्रासलेली रोपे उपटून नष्ट करावी आणी मॅन्कोझेबची १० लीटर पाण्यात २५ ग्रॅम प्रमाणे फवारणी करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कॅलक्झीन ३ ते ४ किलो किंवा बाविस्टीन १० ग्रॅम यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची १० लीटर पाण्यातून फवारणी करावी. गंधकाची धुरळणी करू नये. मर रोगाच्या प्रादुर्भाव झाल्यास रोपांचा मुळाजवळ कॉपरऑक्सीक्लोराईड किंवा कॅपटान १० लीटर पाण्यात २० ग्रॅम प्रमाणे द्रावण तयार करून त्याचा वापर जमिनीतून करावा.
भुरी :-
लक्षणे :- पानांच्या दोन्ही बाजूंनी पांढरी भुकटी टाकल्याप्रमाणे दिसते. फळांवरही पांढरी भुकटी आढळून येते. या रोगांमुळे फळांची प्रत खराब होऊन झाडाची वाढ खुंटते. रोगाचा प्रादुर्भाव तीव्र असल्यास पाने वाळून जातात. हा रोग हमखास झुकिनी पिकावर येतो.

पीक काढणी :-
जातीनिहाय ६० ते ९० दिवस कालावधी असलेल्या या पिकाचा हंगाम लागवडीपासून ३५ ते ४० दिवसांनी सुरू होऊन ६० ते ६५ दिवसांत संपतो. बी उगवून आल्यानंतर किंवा पुनर्लागवडीनंतर सुमारे ३० ते ३५ दिवसांनी पहिले फळ काढणीस तयार होते. फळे काढावयास सुरवात झाली की पुढे २५ ते ३० दिवस काढणी सुरू राहते. काढणी दररोज करावी. कोवळी व लहान आकाराची फळे काढू नयेत. कारण बाजारात पाठवितानाच फळे सुकू लागतात. झाडावरून फळ काढताना ते देठासहित काढावे. याकरिता धारदार चाकूचा वापर करावा. तुटलेली, वेडीवाकडी, निमुळती फुगीर फळे वेगळी निवडून घ्यावीत. ती बाजारात पाठवू नयेत. फळे हाताळताना सालीला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

 

पॅकिंग :-
काढणी झाल्यावर पॅकिंग हाऊसमध्ये फळांच्या लांबीप्रमाणे लहान, मध्यम आणि मोठी याप्रमाणे काळजीपूर्वक प्रतवारी करावी. प्रत्येक फळ टिश्‍यू पेपरमध्ये गुंडाळून घेऊन कोरूगेटेड बॉक्‍समध्ये एकावर एक थर देऊन पॅकिंग करावे. प्रतिबॉक्‍समध्ये पाच किलो वजनापर्यंत पॅकिंग करावे.

उत्पादन :-
पावसाळी हंगामात प्रतिझाड सरासरी तीन किलो म्हणजे एकरी ११ टनांपर्यंत उत्पादन मिळते. अन्य हंगामात प्रतिझाड २ ते २.५ किलो उत्पादन मिळते. हरितगृहात उत्तम प्रतीचे उत्पादन प्रतिझाड चार किलोपर्यंत मिळते. म्हणजेच एकरी १४ ते १५ टन उत्पादन मिळते. फळे पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बडोदा, बंगळूर, गोवा आदी ठिकाणी पाठविली जातात. फळांची प्रतवारी, पॅकिंग झाल्यानंतर हा माल सायंकाळनंतर विक्रीसाठी पाठवावा. कमी कालावधीत चांगला आर्थिक फायदा देणारे झुकिनी पीक आहे.

 


एकात्मिक अन्नद्रव्ये, पाणी व रोग-किड व्यवस्थापन मार्गदर्शन…पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, भरघोस फुलधारणा, फळधारणा, फुगवण, चकाकी आणि संपुर्ण रोग व कीड संरक्षणासाठी देवअमृत अॅग्रोटेकची दर्जेदार व विश्वसनीय उत्पादने एकदा अवश्य वापरून पहा…
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍

🙏🍓🍎🥭🍊🍇 शेतकरी हितार्थ 🍇🍊🥭🍎🍅🙏

अन्नदाता सुखी भव:
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏

“Agriculture is My Love, Passion, Culture & Life.”
Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP
(General Manager)
DevAmrut Agrotech Pvt Ltd.
Mob No.: 09762064141
FB Link: https://www.facebook.com/sp.bhosale2151
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

 

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

खोके संस्कृतीने देशप्रेम आणि पक्षनिष्ठा ह्या आणखी धुळीस मिळतील याबद्दल आपणास काय वाटते?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें