Home संपादकीय करोडो भारतीयांच्या हातातील मोबाईलच्या स्क्रीनवर अदृश्य डीपी राजीव गांधी यांचाच आहे……

करोडो भारतीयांच्या हातातील मोबाईलच्या स्क्रीनवर अदृश्य डीपी राजीव गांधी यांचाच आहे……

0
करोडो भारतीयांच्या हातातील मोबाईलच्या स्क्रीनवर अदृश्य डीपी राजीव गांधी यांचाच आहे……

हेरंबकुलकर्णी

www.janvicharnews.com

राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा मी ९ वीत शिकत होतो.इंदिरा गांधीची हत्या झाल्या दिवसापासून मी पेपर वाचायला लागलो.त्यामुळं त्या शाळकरी महाविद्यालयीन वयात उमटलेले राजीव गांधी मनात अजूनही सुस्पष्ट आहेत. मी ९ वीत असताना ते पंतप्रधान झाले आणि महाविद्यालयात असताना सरकार गेले पण त्या किशोर वयातील स्मृती किती खोलवर आहेत हे ही पोस्ट वाचताना कळेल.

काँग्रेस म्हणजे भ्रष्ट लोकांचा पक्ष अशी तरुण वयात मनात प्रतिमा होती (त्याचे कारण इतर पक्ष सत्तेत न आल्याने त्यांचे पराक्रम बघितले नव्हते: ते संधिअभावी सज्जन होते त्यामुळे विरोधी पक्ष पांडव आणि काँग्रेस कौरव वाटायचे 😊)त्यामुळे काँगेसचा राग ,घराणेशाही चा राग पण राजीव गांधी आवडतात अशी अतार्किक मनःस्थिती असलेली आमची पिढी होती…

ते पंतप्रधान झाल्यावर काँग्रेसला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अधिवेशनातील त्यांचे भाषण अजूनही आठवते.’पक्षातील दलाल हटवा’ ही त्यांची आक्रमक भावना मनात एक उभारी देणारी होती.त्याने एक वेगळीच अपेक्षा तयार झाली. घराणेशाहीतून आलेले भ्रष्ट काँग्रेस चे जुने नेते राज्याराज्यात संतापाचा विषय बनले होते.तेच काँग्रेसचा चेहरा बनले होते. अशा काळात परदेशात शिकलेले,तंत्रज्ञानावर हुकूमत असलेले राजीव ही देशाला बदलवणारी आशेची जागा वाटली. इतका तरुण पंतप्रधान झाल्याने तरुणांना एक चैतन्य वाटून गेले. त्यात १८ वर्षाच्या तरुणांना त्यांनी मतदानाचा अधिकार दिला. या तरुण पिढीला २१ व्या शतकाचे त्यांनी दाखवलेले स्वप्न प्रेरणा निर्माण करून गेले..

त्यांच्या चेहऱ्यात एक सात्विकता होती.आश्वासकता होती.नजरेत जिव्हाळा होता.समोरच्यावर विश्वास टाकण्याची वृत्ती होती.त्यातून हा माणूस आपला वाटत होता.खेड्यापाड्यात ते फिरताना हा विश्वास गरीब माणसांच्या नजरेत होता.त्यातून देशभरात अगदी विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा त्यांना मते दिली होती.

www.janvicharnews.com

प्रत्येक प्रश्नाकडे अगदी सरळ नजरेने बघणे हे एक वैशिष्ट्य होतं. त्यातून पंजाब,काश्मीर,नागालँड,दार्जिलिंग सारखे धुमसत असलेले प्रश्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला.लोंगोवाल करार झाल्यावर तर देश अपेक्षेने बघू लागला पण दुर्दैवाने लोंगोवाल यांची हत्या झाली आणि त्यावर पाणी फिरले. अनेक महत्वाचे निर्णय वेगाने ते घेत गेले.पंचायत राज व्यवस्था बळकट करण्याचे विधेयक हा तर देशाच्या ग्रामीण भागाला बदलवून टाकणारा विषय होता.परदेशातून शिकून आलेल्या राजीव गांधींना ग्रामीण भारत काय कळणार असा प्रश्न विचारणाऱयांना ते उत्तर होते पण ते विधेयक इतरांनी वादग्रस्त बनवले.

www.janvicharnews.com


राजीव यांनी जुने भ्रष्ट नेते दूर ढकलून शिकलेले अनेक तरुण पुढे आणले. माधवराव शिंदे, राजेश पायलट असे अनेक चेहरे भारतीय राजकारणाचे ठरले होते..शिक्षणात आमूलाग्र बदल करण्याची त्यांनी घेतलेली दिशा फार मोलाची होती. आजच्या सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणातील अनेक गोष्टी जशाच्या तशा त्या धोरणातील आहेत इतके ते महत्वाचे धोरण ठरले.नवोदय विद्यालय उभारणे हे तात्विक दृष्टीने चूक होते (कारण अशी बेटे केली की मुख्य शिक्षण दुय्यम होते) पण तरीही या प्रयोगातून अनेक गरीब कुटुंबातील मुले अधिकारी झाले, त्यांचे जगणे बदलले.
हे सारे इतके सुंदर सुरू असताना शाहबानो प्रकरण घडले,पुरोगामी मुस्लिमांना बळकटी देऊ अशी भूमिका त्यांनी घेतली व नंतर धर्मांध नेत्यांच्या दडपणाने भूमिका बदलली याने आमच्यासारख्या तरुणांना धक्का बसला.तलाकपीडित महिलांना त्यांनी वाऱ्यावर सोडले त्यातून हिंदुत्ववादी राजकारणाला ध्रुवीकरण करणे सोपे गेले. ते ध्रुवीकरण मोडायला त्यांनी त्यावर उतारा म्हणून रामजन्मभूमी चे दरवाजे उघडले आणि त्याने केवळ लोकसभेत २ जागा मिळालेल्या भाजपला संजीवनी मिळाली.राजकारण त्यांच्या हातात गेले. त्यातच बोफोर्स चा धुरळा उठला.त्यांनी पैसे घेतले असे कोणीही मानत नव्हते पण सतत बदलत जाणाऱ्या विधानांनी हे कोणाला तरी वाचवत आहेत असे perception बनले आणि तो आरोप त्यांना चिकटला…पण आजही राजीवजीं नी त्यात पैसे घेतले हे सिद्ध झाले नाही…मीडियाने त्यांच्यावर खूप मोठा अन्याय केला…त्या तणावाने ते खूपच बॅकफूटवर गेले. मला आठवते की इंडिया टुडे मासिकाने १९८९ ला त्यांचे ५ वर्षातील ५ चेहरे एकत्र मुखपृष्ठावर छापले होते.त्यातून निरागस चेहरा ते केस गळलेला चिंताक्रांत चेहरा असा प्रवास दिसत होता…आणि त्यानंतर व्हीपी सिंग बाहेर पडले.काँगेस फुटली आणि सरकार गेले त्यानंतर १९९१च्या निवडणुकीत त्यांना बहुमत मिळेल अशी हवा असताना त्यांची हत्या झाली…ती ५ वर्षे जर त्यांना मिळाली असती तर देश पुन्हा वेगळ्या वळणावर गेला असता, धार्मिक ध्रुवीकरण मोडून काढले असते आणि चुका होऊ न देता त्यांनी तंत्रज्ञान निष्ठ भारत घडवला असता…त्यामुळेच त्यांचे जाणे ही भळभळती जखम वाटते…
माणूस म्हणून त्यांचे उमदेपण भावते. व्ही पी सिंग यांनी त्यांची बदनामी केली. सरकार घालवले पण त्या शपथविधी ला ते उपस्थित राहिले, व्हीपी च्या मुलाला भेटून त्याच्या शिक्षणाची चौकशी करत होते.ही त्यांची उंची होती.आर के लक्ष्मण यांना आपल्यावरील व्यंगचित्राबाबत दाद देणारे राजीवजी बघितले की आज व्यंगचित्र, लेख,कविता,पोस्ट यावरून तुरुंगात पाठवणारे असहिष्णू राजकारणी आठवतात व कुठून कुठवर आपण आलोय असा प्रश्न पडतो..

www.janvicharnews.com

आज इतक्या वर्षानी वाटते की इतके बहुमत असूनही या माणसाचे नेमके काय चुकले असेल ? राजकारणाचा अनुभव नसल्याने त्या मर्यादा त्यांच्या सरकारच्या मर्यादा ठरल्या व डून स्कुलमधील त्यांचे सहकारी हे कोंडाळे त्यांना सामान्य कार्यकर्त्यापासून दूर घेऊन गेले.त्यातून निर्णय चुकत गेले.त्यांनी दूर केलेले जुने नेते त्यांना एकटे पाडत गेले. शाहबानो ते रामजन्मभूमी हा प्रवास एका चुकीकडून दुसऱ्या चुकीकडे घेऊन गेला…अनुभव नसल्याने हे सारे घडत गेले
१९९१ च्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारांची यादी बघितली तेव्हा निराश होऊन ते म्हणाले होते की या असल्या भ्रष्ट लोकांना निवडून आणायला मी जीवाचे रान करायचे का..? ही त्यांच्यातील प्रामाणिकपणाची
आणि अगतिकतेची भावना होती…काँगेस पक्षाला १०० वर्षे होताना दलाल हटवा ही त्यांची भूमिका ते पार पाडू शकले नाही या राजकीय अपरिहार्यतेने
ते अस्वस्थ होते..

पण राजकीय यश अपयशापलीकडे राजीव उरतात..ते राजीव एका पक्षाचे नसतात. तर ते राजकारणात शिकलेल्या माणसाचे, मध्यमवर्गाच्या सहभागाचे प्रतिनिधी असतात, तंत्रज्ञानाने देश बदलायला निघालेल्या इथल्या तरुणाईचा चेहरा असतात..त्यामुळे ते निवडणूक हरले तरी जिंकलेले असतात आज ते नसताना भारतीय राजकारणाने काय गमावले हे कळते आहे.काँग्रेस विस्कटली तर देश विस्कटेल हे वाक्य प्रचाराचे नव्हते तर वास्तव दाखवणारे होते हे आज कळते आहे.काँग्रेसमुळे इथला उदारमतवाद ,सर्वधर्मसमभाव,राजकारणातील सुडभावनेपेक्षा उमदेपणा शाबूत राहिला हे आज उमजते आहे.काँग्रेस आज कमजोर होताना धर्मांध, सुडभावनेचा भाजपा आणि भ्रष्ट आत्मकेंद्रित घराणेशाही चे प्रादेशिक पक्ष हे दोनच पर्याय देशापुढे उरले आहेत…ही राजीव नसण्याची फळे आहेत….

एका मोठ्या खोलीएवढा संगणक ते तुमच्या माझ्या हातातला संगणकीय मोबाईल हा प्रवास हा राजीवजींच्या दूरदृष्टीचे यश असते..देशाच्या राजकारणाचा भले ते आज चेहरा नसतील पण
तुमच्या माझ्या आणि करोडो भारतीयांच्या हातातील मोबाईलच्या स्क्रीनवर अदृश्य डीपी राजीव यांचाच आहे…याचे भान ठेवू या

हेरंबकुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here