प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर जि. लातूर
महाराष्ट्र सरकारने नुकताच माजी खासदार व आमदार भाई डॉ. केशवराव धोंडगे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला आहे. त्यानिमित्ताने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी लिहिलेला लेख वाचकांसाठी देत आहोत. – संपादक
www.janvicharnews.com
महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या देशाच्या क्रांतीचं प्रेरणादायी असलेलं नाव म्हणजे माजी खासदार व आमदार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, तल्लख बुद्धीचा हिमालय...आज बिरबल आपल्यात नाहीत; ते जर असते तर नक्कीच बिरबलाने भाईंकडून हजर जबाबीपणा शिकून घेतले असते... प्रसंगी वज्रासारखा कठोरपणा; तर प्रसंगी विनोदाचा अलवारपणा मनाचे कंगोरे न् कंगोरे मोकळे करणारा भाईंच्या व्यक्तिमत्त्वाच्या सहज गुणधर्माची व्यापक व पुरोगामी विचारांची लाभलेली विशाल खोली....जी कधीच कोणत्याच मोजपट्टीने मोजता येणार नाही अशीच आहे...त्यांची अभिजात प्रतिभेची तरलता...संपन्नता ...एकमेवाद्वितीयच...!
मातोश्री मुक्ताई हेच त्यांचं दैवत... हेच श्रद्धा स्थान...हेच वैकुंठ.... हाच त्यांचा स्वर्ग आणि हेच त्यांचं प्रेरणास्थान...क्रांतिचं बाळकडू पाजणाऱ्या मातोश्री मुक्ताई हाच त्यांचा ध्यास आणि श्वास... मातोश्रींच्या पवित्र कुशीतून अजाणबाहूचा वारसा लाभलेल्या...भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेबांचं अभिष्टचिंतन... महाराष्ट्राच्या विधान सभा आणि विधान परिषदेच्या वतीने भाईंच्या विविध सामाजिक कार्याचा... ऐतिहासिक दस्तावेज बनलेल्या राजकीय कार्याचा... त्यांनी केलेल्या सत्याग्रहांचा... सांभाळलेल्या स्वच्छ चारित्र्याचा... भ्रष्टाचार विरोधाच्या बुलंद आवाजाचा... पक्षनिष्ठेचा... मतदार राजांबद्दलच्या आस्थेचा... त्यांनी दीनदुबळ्यांसाठी वेचलेल्या कष्टांबद्दलचा....हा.... हृद्य... हृद्य सत्कार सोहळा २४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात पार पडला.
वयोमानानुसार भाईंची शारीरिक अशक्तता जाणवत असली...तरीही मनाची दुर्दम्य इच्छाशक्ती... बंदुकीत ठासून बारूद भरावी अशी प्रेरणादायी आहे. भाईंची कृती.... विचार एक नव्हे.... हजार नव्हे.... तर लक्ष लक्ष हत्तीचं बळ देणारी आहे ...! मराठवाड्यासह.... महाराष्ट्राचा.... सुग्यामुग्याचा... गुराखीराजांचा.... कुणबी, साळी माळी, तेल्या- तांबोळ्यांचा .... सर्वांगीण विकासाची तेज:पुंज मुद्रा हे अद्भूत... अद्वितीय...आणि त्यांना लाभलेलं दैवी... निसर्गदत्त... विद्वत्तेसह... इतर सर्व बाबतीत असलेले हे अजब... गजब रसायनशास्त्र आहे....भल्या- भल्यांना मंत्रमुग्ध करणारं... भारावून टाकणारं...भारभूत करणारं व्यक्तिमत्त्व हे त्रिकालाबाधित सत्य आहे....!
भाई डॉ. केशवरावजी धोंडगे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व... परखड वक्ते... सिद्धहस्त लेखक... बहुजन समाजाला उजेडाची वाट दाखवणारी त्यांची अमाप अशी ग्रंथ संपदा आहे... भारताचा इतिहास आणि भूगोल जाणणारे, संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास असणारे ते बुद्धीवादी लेखक आहेत... डाव्या... उजव्या विचारसरणीच्या बाहेरचे विचारवंत आहेत...'आहे रे' ... आणि नाही रे' ...च्या मधली दरी ओळखून 'नाही रे 'चे कृतीशील उद्घोषक आहेत... त्यांचा वर्गसिद्धांत.... त्यांचा मूल्यसिद्धांत आगळावेगळा आहे.... मानवतावादी सैद्धान्तिक विश्लेषण करावे तर ते केशवरावांनीच...! सर्व हारा वर्गाचे होणारे शोषण त्यांना क्रांतिची हाक देते.... गुराखी राजांचा विकास... त्यांचा वसा आणि वारसा, त्यांच्या वरील होणा-या नैसर्गिक... मानवी... जुलमाचे... अन्यायचे कर्दनकाळ म्हणजे भाई केशवराव धोंडगे आहेत... बहुजन समाज आणि त्यांच्या वेदना... व्यथा मुखरीत करणारे भाई केशवराव गुराखी राजांचे दार्शनिक वैचारिक क्रांतीचं नेतृत्त्व करतात... प्रगत मानवतावादी विचारधारा ही त्यांची दृष्टी आहे... समाजातील दीन... दुबळ्या... कष्टकरीराजे... सालदार राजे... बेलदार राजे... गुराखी राजे माकडवाले... आस्वलवाले... मेंढपाळ राजे... सुगे मुगे... पालवाले... नंदीबैल वाले... चुडबुडकेवाले... पोपटवाले.... उंटवाले... जोतिषी... गोसावी... नाथगोसावी... महानुभाव... जाने... जोगी.... राईंदर.... शिंगाडे... मसनजोगी... पोतराज... गोंधळी... वाघे... मुरळी... पांगूळ... गोंदणा-या माय माऊल्या... यासह असंख्य भटके विमुक्तांच्या जीवनातल्या पोटाच्या खळगीसाठीचा होणा-या दररोजच्या संघर्षाची... द्वंद्वात्मक भौतिकवादाची ते मूलगामी मांडणी करून त्याला पर्यायी व्यवस्थाही देतात... हाच त्यांचा आधुनिक मानवतावादी बहुजनवादी सिद्धांत आहे. म्हणूनच मला ते आधुनिक भारताचे कार्ल मार्क्स वाटतात.
अखिल भारतीय गुराखी साहित्य संमेलनाची अभिनव आणि आजच्या बुद्धिवादी... वैज्ञानिक दृष्टिकोनाची बाजू जगासमोर आणतात... वर्तमानास इतिहासाची... राजकारणाची... राजकारणातल्या भ्रष्ट व्यवहारांची... मोहत्तरीवृतीचा पर्दाफाश करीत करीत क्रांतिकारी... ओजस्वी असे भाष्य करून राजकीय वाटचालीचे होकायंत्र कसं घातक होऊ पाहतंय... याच बरोबर राजकारणात जे चांगलं घडतंय त्याचं तोंडभरून कौतुकही करतात... शिवजयंती...श्रीकृष्ण जयंती ... यातून एकतेचा मंत्र देतात... कुस्तीचा फड... कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्याचे स्वतंत्र कार्यक्रम घेणारे भाई केशवराव आहेत... काळानुरूप सर्वच क्षेत्रातला नवा तीष्ण नीतिवाद ... नव्या समाजवादाची... परिवर्तनवादाची ... पुरोगामी सामाजिक व्यवस्थेची ... अचाट आणि आफाट अशी अभिनव मांडणी भाईंचीच टोकदार क्रांतीकारी 'कलम' करू शकते .... त्यांच्या खालील काही निवडक ग्रंथाची शीर्षकेच पाहा कशी त्यांच्या प्रखर... स्पष्ट... क्रांतिकारी वैचारिकतेची साक्ष देतात ते असे -
www.janvicharnews.com
१) ‘सज्जनगडास आसनगावच्या
समर्थ दासीचा दासीबोध’
२) ‘शंबुकाचा खुनी राम व त्याची
वानरशाही’
३) ‘ सुग्यामुग्याचे उपनिषद’
४) ‘तुपकुंडी कौरव मायकुंडी
युयुत्सु’
५) ‘गीता रहस्याचे रहस्य; अर्थात
गीतेतील सनातनी अद्भूत
मृगजळी तत्त्वज्ञान’
६) ‘संत महात्मा चोखोबाजी
आपण का नाही केले
धर्मांतर ?’
७) ‘जगाला जेव्हा जाग येते तेव्हा
रायगडाची पाटीलकी झोपी
जाते’
८) ‘आयोध्येत राममंदिर का
नथुराम मंदिर ?
या काही ग्रंथांचा आशय समजून घेण्यासाठी साधा नामोल्लेखही पुरेसा आहे ….या शिवाय त्यांची एकूण ग्रंथसंपदा विपुल …ती ३८ वर आहे… शिवाय आगामी ८ ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत… तसेच ‘सा.जयक्रांति’ मधून… आपल्या प्रभावशाली वक्तृत्वातून त्यांना जे मांडायंचंय… जे बोलायचंय… ते अगदी तळमळीने… पोटतिडकीने… कधी आक्रमकतेने तर कधी अंत:करणाला पाझर फुटेल अशा मार्दवी… कनवाळू… अस्सल मराठमोळ्या शैलीत कसलीही भीडभाड न बाळगता बोलणारे… आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हिरीरिने पुरस्कार करणारे भाई केशवराव हे… समतेचे… समान न्यायाचे… खंदे पुरस्कर्ते आहेत… पक्षपातीपणाचा… भेदाभेदाचा… श्रेष्ठ- कनिष्ठतेचा वारा त्यांच्या आजूबाजूनेही वाहत नाही … त्यांच्या साहित्यातून वैचारिकता आविष्कृत होते तशी… तशीच काही साहित्य कृतींमधून त्यांचे आत्मचरित्रही कळत न् कळत… प्रतिकात्मकरित्या डोकावतेय… त्यांचा सहवास हा त्यांच्या वैचारिकतेबरोबरच… अत्तराच्या सुगंधाबरोबरच वैचारिक सुगंधाने आपल्याला गंधीत करणारा… मोहित करणारा… खुलवणारा … प्रसन्न करणारा आहे…!
www.janvicharnews.com
भाई केशवरावांच्या प्रगल्भ वैचारिकतेला लेखनाला जागतिक पातळीवर कार्ल मार्क्सचा विचारांच्या कक्षा रूंद करण्याचा दर्जा दिला जातो हे विशेष आहे.भारतात आणि तेही मराठवाड्यातील नांदेडातल्या मन्याडखो-यातले डॉ. केशवराव धोंडगे हे एक नास्तिक वृत्तीचे पण आस्तिकतेचा खरा चेहरा न्याहाळण्यासाठी अनेक प्रांतांच्या सीमारेषाही पार पाडणारे आहेत.वैचारिक क्रांतीचं वादळ आहेत.आधुनिक भारताचे साम्यवादी तत्त्वज्ञानाची पुनर्मांडणी करणारे 'कार्ल मार्क्स' आहेत हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही.! ते आहेत.समाजवाद + कार्ल मार्क्स + महात्मा बसवेश्वर + महात्मा फुले + राजर्षी शाहू महाराज + भारतरत्न डॉ. आंबेडकर + कर्मवीर भाऊराव पाटील आदिंचा सत्यशोधक वाद= साम्यवाद होय. आणि या साम्यवादाची भारताला नव्हे तर आज जागतिकीकरणाच्या काळात जगाला गरज आहे.आज तो आवश्यक आहे.असं नमूद करून या विचारांची शृंखलात्मक आणि मजबूत मांडणी करणारे भाई केशवराव हे आधुनिक भारताचे कार्ल मार्क्सच..!
वैचारिक क्रांतीशिवाय खरा भारतीय साम्यवाद येणार काय? तर नाही… म्हणून तो आणण्यासाठी जात…वर्ग आणि वर्णव्यवस्था… धार्मिक विषमता भांडवलशाही समाजव्यवस्था मोडून काढल्याशिवाय ‘नाही रे’ वाल्यांना पतहिनांना दुबळ्यांना श्रमजीवीं वर्गांना… न्याय मिळण्यासाठी वैचारिक क्रांतिशिवाय पर्याय नाही….असे म्हणणा-या केशवरावांचा ‘मार्क्स वाद’ हा जीव की प्राण आहे…. म्हणून ते सामाजिक न्यायाचे जागतिक विद्यापीठ ठरतात…!
परंतु आपल्या दुर्दैवाने त्यांना आजमितीला कोणत्याही भारत सरकारने ‘,पद्मश्री’ … पद्मभूषण’….’ पद्मवीभूषण’… ‘भारतरत्न’ दिले नाही…देऊ शकले नाहीत…? … त्यापासून त्यांना कोसो दूर का ठेवलं गेलं…? पुरोगामी महाराष्ट्रातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदापासूनही ते दूरच राहिले…? महाराष्ट्र सरकारनेही ‘महाराष्ट्र भूषण’ पासूनही भाई केशवराव धोंडगेंना दूरच ठेवले आहे…? का…?
( ही आमच्या सारख्या असंख्य जनतेची प्रामाणिक भावना आहे. )
तसे तर भाई डॉ. केशवराव धोंडगे यांना या बाबींची कसलीही अभिलाषा नाही… त्यांच्यासाठी हे सर्व पुरस्कार गौण असले तरीपण, ते त्यांना त्यांच्या वयाच्या शतकोत्तर वाटचालीत तरी सनमानाने प्रदान करण्याचं औदार्य केंद्र सरकार … राज्य सरकार वा संबंधितांना दाखवता येईल काय…?
www.janvicharnews.com
बरं हे जाऊ द्या हो….! महाराष्ट्र शासनाने नुकताच दि. २४ ऑगस्ट २२ रोजी मुंबईत शासकीय सत्कार केला खरा… पण, भाई डॉ. केशवराव धोंडगे आणि त्यांच्या कुटुंबियांना… नातवंडांना, सहका-यांना… मुंबईला सत्कार स्वीकारायला जाण्यासाठी व सत्कार घेऊन मुंबईहून परत येण्यासाठी… महाराष्ट्र सरकारने साधी विमानाची सेवा सुद्धा पुरवू शकली नाही… ती उपलब्ध करून दिली असती तर राज्याची तिजोरी रिकामी झाली असती काय? नाही… पण ती सुविधा सुद्धा दिली नाही… ? ती दिली असती तर महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेसह… गुराखी राजे… सुगेमुगे… आनंदाने बागडले असते… मुके प्राणी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केले असते…पशू पक्षी आनंदाने आकाश पाताळ एक केले असते…गायी..वासरं हंबरू लागले असते…! त्यांच्या आनंदाला उधाण…भरती आली असती…!भाई केशवराव आज वयाच्या १०३ व्या वर्षी नांदेड ते मुंबईचा प्रदीर्घ कालावधीचा, दगदगीचा अथक प्रवास रेल्वेने करणं कसं शक्य आहे…? हे सत्कार संयोजकांना कसे कळले नाही …? याचे आश्चर्य वाटते…! तरीही भाईंनी हा सत्कार स्वीकारून सत्कारालाही… सुगंधाच्या महरिपाने प्रतिष्ठा मिळवून दिलीय… याचा विसर राज्य सरकारला पडू नये असे वाटते …!
भाई…! उशिरा का होईना महाराष्ट्र सरकारने आपल्या लोकोपयोगी कार्याची दखल घेतली. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी आपला विधानभवनात सत्कार केला.
आपणास उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच प्रार्थना..!
तुम्हाला मानाची कोटी कोटी जयक्रांति…!
इडापीडा टळो, बळीचे राज्य येवो..!!
लाल सलाम…!!
वंदे मातरम्…!!!