- प्रा डॉ संग्राम मोरे
- राजकीय विश्लेषक
www.janvicharnews.com
“घोडा का अडला ?,भाकरी का करपली? या प्रश्नाचे उत्तर न फिरवल्यामुळे .शिवसेना नावाचा पक्ष म्हणण्याऐवजी संघटना 1960 ला महाराष्ट्र मध्ये स्थापन झाली. खरंतर सत्ता ,आमदार ,खासदार ,मंत्री याच्यासाठी शिवसेनेची स्थापनाच झाली नव्हती. त्या वेळची महाराष्ट्रातील एकूण परिस्थिती आणि विशेषतः मुंबईमधील परप्रांतीयांची घुसखोरी या एका मुद्द्यावर शिवसेनेची स्थापना झाली .बाळासाहेब ठाकरे यांच्या झंजावाताने महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील जनतेला त्यांच्या मनातील पुल्लिंग जागृत करण्याचे काम करत होत होते. या सगळ्या परिस्थितीत पक्ष नसून सुद्धा ही संघटना राजकीय पटलावर एवढी महत्त्वपूर्ण ठरत गेली की सत्तेत असो किंवा नसो पण शिवसेनेचा विचार घेतल्याशिवाय सरकार कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हते .संघटनेचे रूपांतर हळूहळू पक्षात होऊ लागले मुंबईसारख्या महानगराची महानगरपालिका त्या ठिकाणी आपल्या पक्षाचे नगरसेवक निवडून येऊ लागले एवढेच नव्हे तर अख्खी महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात येऊ लागली आणि कालांतराने मुंबई आणि शिवसेना हे समानार्थी शब्द झाले .मुंबईची गरज शिवसेना हे समीकरण आजही कायम आहे. हे कायम असण्याच्या मागे बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत राहणाऱ्या लोकांच्या अडचणी विशेषतः मराठी लोकांच्या अडचणी ,मराठी कामगारांच्या मराठी व्यावसायिकांच्या, मराठी तरुणांच्या मनातले स्फूल्लिंग जागी केल्यामुळे मुंबई आणि शिवसेना हे समीकरण कायम राहत गेले. कालांतराने शिवसेनेचे आमदार होऊ लागले आणि राजकीय दृष्ट्या वैचारिक एकवाक्यता म्हणून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. जवळपास 25 -30 वर्ष या दोन पक्षांची युती राहिली. 1995 ला या दोन पक्षांचे मिळून युतीचे सरकार महाराष्ट्राने अनुभवलं. या सरकारमध्ये शिवसेना मुख्य स्थानावर होती. म्हणून शिवसेनेला मोठा भाऊ असे बिरूद प्राप्त झालं .भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेच्या बोटाला धरून वाढत होता .1995 ते 99 हा कालखंड सोडला तर पुन्हा 2014 पर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोघेही विरोधी पक्षात राहिले .परंतु आघाडी कायम राहिली .यादरम्यान शिवसेनेचे काही मातब्बर नेते पक्षातून बाहेर पडले .त्यामुळे शिवसेनेतून पक्षांतर होणे हे काही नवीन नाही. फक्त फरक एवढा की आज पर्यंत तंबुतून एक एक सैनिक बाहेर पडला यावेळी मात्र अख्खा तंबूच उडून गेला. हे का घडले? या पाठीमागची कारणे आणि शिवसेनेचे भविष्य यावर चर्चा होणे आवश्यक आहे .मुळात बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत छगन भुजबळ, नारायण राणे आणि स्वतः राज ठाकरे हे पक्षातून बाहेर पडले. पण बाळासाहेब ठाकरे नेतृत्व स्थानी असल्यामुळे यांच्या बाहेर पडण्याला त्या काळामध्ये फार महत्त्व प्राप्त झाले नाही .आज मात्र बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत उद्धव ठाकरे हे पक्षाचे नेतृत्व करत असताना ज्या घडामोडी घडल्या त्या मात्र चर्चा आणि विश्लेषण करण्यासारख्या आहेत .कारण त्यातूनच शिवसेनेच्या भवितव्याची वाटचाल होऊ शकेल.
www.janvicharnews.com
2014 ला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोघांचे मिळून सरकार स्थापन झाले .पण यावेळी मात्र मोठा भाऊ आणि छोटा भाऊ हे बदलून भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ झाला आणि शिवसेना छोटा भाऊ झाला. म्हणून खरी नाराजी ही तिथूनच सुरू झाली .आणि ती कमी की काय म्हणून त्यावेळी शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊ केला. पवार साहेबांच्या या एका वाक्यामुळे भाजप आणि शिवसेना यांचा 2014 ते 2019 पर्यंतचा प्रवास हा नेहमी संशयाचा, धोकेबाजीचा ,परस्परांच्या अविश्वासाचा, परस्परांवरील दबावाचा असाच राहिला .त्यामुळे सत्तेत असून सुद्धा शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही .तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची नेहमीच मनधरणी केली. हे करत असताना शिवसेनेचे हे कर्तव्य होते की ,आपला पक्ष किती अभेद्य आहे हे तपासणे. आपला पक्ष छोटा भाऊ का झाला हे तपासणे ,आपण कुठे कमी पडलो हे तपासणे. या बाबी शिवसेनेने पाच वर्षात करणे आवश्यक होते .परंतु शिवसेना केवळ भाजपवर टीका करत राहिली आणि भाजप आपले पाये मुळे अधिक मजबूत करू लागला.
www.janvicharnews.com
या ठिकाणी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की शिवसेनेची ओळख ही टपरीवाला माणूस आमदार करणारा पक्ष , रिक्षावाला माणूस मंत्री करणारा पक्ष किंवा आणखी एखाद्या बेरोजगार तरुणाला मंत्री, मुख्यमंत्री करणारा पक्ष अशीच राहिली आहे .पण हाच टपरीवाला, रिक्षावाला आत्ता पक्षातला सरंजामदार झाला आहे ,प्रस्थापित झाला आहे, त्याचे स्वतःचे नेतृत्व निर्माण झाले आहे ,पक्षापेक्षा त्याच्या स्वतःच्या नेतृत्वाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे याच्याकडे लक्ष देणे पक्ष प्रमुखांनी केलेच नाही .केवळ शिवसेनेतला प्रत्येक सैनिक हा शिवसेनेवरच निवडून येऊ शकतो हा भ्रम पक्षप्रमुखांचा राहिला .पण पुलाखालून एवढे पाणी वाहून गेले होते की टपरीवाले रिक्षावाले टॅक्सीवाले हे आता मोठे भांडवलदार झाले आहेत आणि ते स्वतःच्या नावावर निवडूनही येऊ शकतात हे तपासण्याकडे गंभीर दुर्लक्ष झाले.
2019 च्या निवडणुका जाहीर झाल्या आणि जागावाटपावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात वाटाघाटी सुरू झाल्या. काय चर्चा झाली ,कशी झाली हे सगळं बंद दरवाजा आड झाल्यामुळे काय ठरले ते ना सैनिकांना कळू शकले ना महाराष्ट्रातील जनतेला .त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अमित शहा या दोघांनी कोणत्या मुद्द्यावर युती केली हे त्या दोघांनाच माहीत. पण आज उद्धव ठाकरे सांगत आहेत की मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याच्या अटीवर ही युती झाली होती .पण जेव्हा 2019 च्या निवडणुकांची रणधुमाळी चालू होती तेव्हा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अमित शहा जाहीर रित्या देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे ठणकावून सांगत होते .मग प्रश्न असा की उद्धवजींनी त्याचवेळी अमित शहा यांना जाब का विचारला नाही ? असो . त्यामध्येही काही अडचणी असतील असे आपण समजू .पण निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि पुन्हा शिवसेना छोट्या भावाच्या रूपातच निवडून आली. स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाच्या जागा जास्त निवडून आल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा सांगणे स्वाभाविक होते .त्यामध्ये या दोघातील बे बनावाचा फायदा पवार साहेबांनी घेतला नाही तरच नवल .परिस्थिती ओळखून बरोबर पवार साहेबांनी शिवसेनेला मदत करण्याची ,सोबत घेण्याची आणि सत्ता स्थापन करण्याची भूमिका घेतली .आणि शिवसेनाही तयार झाली .हे सगळं महाराष्ट्रातील जनता आचिंबित होऊन पाहत होती .कारण महाराष्ट्रातील जनता ही ज्या लग्नासाठी उपस्थित राहिली होती त्या ठिकाणी वधू-वराची अदलाबदली झाल्याचे चित्र दिसून येत होते .तरीसुद्धा उद्धव साहेबांनी महाआघाडीच्या सरकारची घोषणा केली .अतिशय चानाक्षपणे या अनैसर्गिक आघाडीचे नेतृत्व पवार साहेबांनी उद्धवजींकडे दिले आणि उदधवजीच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच खऱ्या अर्थाने सत्तेवर बसली .सामान्य शिवसैनिकापासून ते आमदार शिवसैनिकापर्यंत ही गोष्ट प्रत्येकाला कळत होती पण परिस्थितीच एवढी नाजूक होती की तक्रार करावी तरी कोणाकडे .मुळात आपण हे लक्षात घेतले पाहिजे शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे जरी पक्ष असले तरी अप्रत्यक्षरीत्या हे दोन मालकांचे स्वतंत्र पक्ष आहेत .शिवसेनेचा मालक ठाकरे घराणे आणि राष्ट्रवादीचा मालक पवार .मग नेते, कार्यकर्ते, आमदार ,मंत्री ही मंडळी फक्त डोके मोजण्यासाठी कामाचे आहे. या दोन्ही पक्षाचे निर्णय हे ठाकरे आणि पवार दोघेच घेतात. त्यामुळे आमदाराला मंत्र्यांना आणि कार्यकर्त्याला विचारात घेण्याची यांना कधी गरजच वाटली नाही.
www.janvicharnews.com
शिवसेना ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने सरकार स्थापन झाले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या शत्रुत्वात अधिकृत सुरुवात झाली . कारण शिवसेनेच्या सोबत निवडणुका लढवल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांना मिळून जनतेने पूर्ण बहुमत दिले होते .परंतु ऐनवेळी शिवसेनेने आपला निर्णय बदलल्यामुळे भाजप तोंडघशी पडली . शिवसेनेची चलबिचल ओळखून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार स्थापनेचा प्रयत्न केला .परंतु पवार साहेबांच्या आग्रहामुळे तो प्रयत्न दोन दिवस टिकला .भारतीय जनता पक्षाचा तिळपापड होणे स्वाभाविक आहे .कारण निवडणुकीपूर्वी शिवसेनेने अशी भूमिका घेतली असती तर भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवणे यावेळी अवघड नव्हते .कारण युती करून लढून सुद्धा 105 जागा त्यांनी मिळवल्या होत्या .जर 288 जागा लढवल्या असत्या तर 150 चा आकडा गाठणे भाजपला कठीण नव्हते. परंतु शिवसेनेने निवडणुकीनंतर केलेल्या धोकेबाजी मुळे सत्तेचे समीकरण बिघडले .आता या खोलात या ठिकाणी जाणे उचित नाही.
www.janvicharnews.com
आता खरा प्रश्न आहे की शिवसेना पुन्हा भरारी घेणार का ? याचे उत्तर निश्चितच शिवसेना पुन्हा भरारी घेऊ शकते असेच आहे. परंतु शिवसेनेची भरारी घेण्याची वाटचाल कशी असावी याबद्दल मात्र चर्चा होऊ शकते आणि ती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करू. खरं पाहता शिवसेनेने भाजपची साथ सोडण्याचे जे अनेक कारणे उद्धव ठाकरे सांगत आहेत त्यापैकी महत्त्वाचे कारण असे की त्यांच्या मते भाजपसोबत 25 वर्षे राहून आमचा पक्ष कमजोर झाला किंवा त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर आमची 25 वर्ष युतीमध्ये सडली. पहिल्यांदा या विधानाची चिकित्सा केली असता असे लक्षात येते की शिवसेना-भाजप यांच्या 25 वर्षाच्या युतीमध्ये शिवसेनेचे तीन वेळा बंड झाले .परंतु त्याला फारसे महत्त्व आले नाही. म्हणजे 25 वर्षात तीन नेते शिवसेनेला सोडून गेले .आणि दुसरीकडे केवळ अडीच वर्षात 40 आमदार शिवसेनेला सोडून गेले. याचा गांभीर्याने विचार उद्धव ठाकरे यांनी करायला हवा की ,25 वर्षात आपले नुकसान जास्त झाले का अडीच वर्षात आपले नुकसान जास्त झाले ? आणि हा विचारच शिवसेनेची उभारी कशी व्हायला हवी याचे उत्तर देणार आहे .मुळात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळूनच जनतेने शिवसेना भाजप युतीला दोन वेळा कौल दिला होता हे नाकारता येणार नाही .पवार साहेबांचे राजकारण हे सातत्याने जुळवाजुळवीचे राजकारण असते. पूर्णपणे आपल्या पक्षाची सत्ता ही महाराष्ट्रात येणार नाही हे त्यांना पूर्ण माहित आहे .परंतु विविध कारणे ,काढून काही पक्षाची जुळवाजुळव करून सत्तेचा चेंडू आपल्या भोवती फिरत ठेवणे हे पवार साहेबांचे वैशिष्ट्य आहे .त्यामुळे शिवसेनेने आता हा विचार करण्याची गरज आहे की मुळात शिवसेना ही सत्तेसाठी स्थापन झालीच नव्हती .आणि जेव्हा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता मिळाली तेव्हा ती शिवसेनेमुळे इतरांना सत्ता उपभोगण्याची संधी मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी ला सोबत शिवसेना जी चर्चा करत आहे तेच मुळात चुकीचे आहे .त्यातल्या त्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे एकत्र येणे हे कोणालाच आवडणारे नाही . त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन शिवसेना उभारी घेऊ शकत नाही उलट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागील पन्नास वर्षाच्या कारभारात बदल करून नवी व्यवस्था निर्माण करण्याचे आश्वासन देऊनच शिवसेना पुढे जाऊ शकते .दुसरी बाब अशी की शिवसेनेचे जे वैशिष्ट्य आहे की रिक्षावाला टपरीवाला टॅक्सीवाला या पक्षात आमदार होऊ शकतो खासदार होऊ शकतो या गोष्टींना आता 30- 40 वर्षाचा इतिहास झाला आहे .अलीकडच्या 25 वर्षात सामान्यातला सामान्य शिवसैनिक आमदार झाल्याचे उदाहरणे अत्यंत तुरळक आहेत. म्हणून पुन्हा शिवसेनेने आपल्या मूळ वैशिष्ट्याकडे लक्ष देण्याची गरज आहे .आज एवढे मोठे बंड होऊन सुद्धा आमदार मंत्री खासदार यांनी पक्ष सोडला ,पण सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकांनी आजही पक्ष सोडला नाही हे त्या वैशिष्ट्याचेच गमक आहे. म्हणून शिवसेनेने नव्याने नेतृत्व निर्माण करण्याची, त्यांना संधी देण्याची आवश्यकता आहे. तिसरी बाब अशी की जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेसच्या शिवसेनेच्या भाषेवर महाराष्ट्रातील तरुणाई शिवसेनेकडे आकर्षित होत गेली. आज तीच भाषा वापरावी असे नाही .मात्र ज्याला आपण आपला बाणा म्हणतो तो ठाकरी बाणा शिवसेनेच्या नेतृत्वाने नव्याने शिकण्याची गरज प्रकर्षाने जाणवते आहे .कारण अर्ज विनंती करणारी शिवसेना कधीच नव्हती . ठोकून मागणी पूर्ण करून घेणे हे शिवसेनेचे वैशिष्ट्य होते .आज शिवसेनेचे नेतृत्व त्या पद्धतीने होण्याची गरज आहे . तिसरी बाब अशी की आजपर्यंत शिवसेना म्हणजे मुंबई ,ठाणे, पुणे, नाशिक ,संभाजीनगर असे समीकरण राहिले आहे .परंतु चांद्यापासून बांद्यापर्यंत गाव तेथे शाखा ही उपाययोजना शिवसेनेला करावी लागेल . आपल्याला आठवत असेल एकेकाळी शिवसेनेचा शाखाप्रमुख हा आमदारापेक्षा जास्त महत्त्वाचा होता . शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊन आपले महत्त्व स्वतःच संपवून टाकले आहे .कारण शिवसेना सत्तेवर नसताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला स्वतः भेटायला यायची आणि आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या साध्या साध्या आमदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला बॅनर लावावे लागतात. हेच मुळात न पटणारे गणित आहे .म्हणून शिवसेनेने आपले महत्त्व पुनश्च ओळखून ते नव्याने स्थापन करण्याची गरज आहे .चौथी बाब अशी की येणाऱ्या काळात शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना 288 जागा स्वतःच्या ताकतीवर लढण्याची तयारी ठेवावी लागेल .कारण युती करून स्वतः शिवसेना अर्ध्या जागेवर आली आणि आता तीन पक्ष सोबत युती करून तर शिवसेना केवळ शंभर जागा लढवण्याचा हक्क सांगणार होती . म्हणजे यापूर्वी 150 जागा लढवून शिवसेनेला 56 जागा मिळवता आल्या .आता महाविकास आघाडीत जर शिवसेना पुन्हा राहिली तर 100 जागा लढवून शिवसेना किती जागा जिंकणार ? हा विचार करण्याचा प्रश्न आहे .म्हणून शिवसेनेने पक्षाची पुनर्बांधणी करताना फक्त शिवसेना म्हणजे शिवसेना हे सूत्र हाती घ्यावी लागेल .यामधून एक गोष्ट नक्की साध्य होईल .ती म्हणजे शिवसेना एक तर पूर्ण सत्तेत येईल किंवा पूर्ण विरोधी पक्षात येईल .या दोन्ही गोष्टी होणे शिवसेनेसाठी फायद्याचेच आहे .उलट शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहिली तेव्हा तेव्हा शिवसेना जास्त ताकतवान होती .आणि सर्वात शेवटी शिवसेनेने जाणीवपूर्वक शिवसेनेची भाषा बोलणारे नेतृत्व समोर आणण्याची गरज आहे . कारण अलीकडच्या काळात फक्त राज्याचेच नव्हे तर देशाचे राजकारण सुद्धा राशन पेक्षा भाषण वरच जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेने जाणीवपूर्वक या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कोणताही पक्ष पूर्णपणे संपत नसतो .त्यातल्या त्यात शिवसेना ही तर संपणारी नाहीच.फक्त प्रश्न आहे आत्ताच्या बंडा नंतर किती वेगाने शिवसेना उभारी घेणार . शिवसेनेला उभारी घेण्यासाठी दोन वर्षाचा अवधी आहे .पक्ष नेतृत्व यांनी ठरवले तर दोन वर्षात प्रत्येक गाव पिंजून काढून शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ शकते .त्यासाठी पक्षप्रमुखांनी गांभीर्याने व्युव्हरचना आखण्याची गरज आहे.
प्रा. डॉ. संग्राम मोरे