जी प्रतीकं त्यांची नाहीतच , त्या प्रतिकांच्या विचारांचा आणि ज्यांचा काडीचाही संबंध नाही, अशी माणसे जेंव्हा ही प्रतीकं बदनाम करतात तेंव्हा ती प्रतीक त्यांची नाहीतच हे छाती ठोकून वेळोवेळी सांगणे तितकेच गरजेचे असते.
काल पुण्यात “निर्भय बनो”ची भव्य दिव्य सभा पार पडली.
या सभेला हजारो लोक उपस्थित होते.
भाजप कडून या सभेला आधीच विरोध जाहीर झाला होता.
त्यामुळे सभास्थळी त्यांचे आंदोलन आणि घोषणा या अपेक्षित होत्या. त्यात विशेष करून अशा आंदोलनात भाजप वाले भगवी टोपी घालूनच उपस्थित असतात आणि काहीही कारण नसताना जय श्रीराम च्या घोषणा देतात.
या सगळ्या त्यांच्या उठाठेवींनी त्यांनी खरेतर हा भगवा रंग आणि श्रीराम यांना उन्मादाचे प्रतिक बनवून टाकले आहेत. आणि जणू काही ही त्यांची खाजगी मालमत्ताच आहे अशा अविर्भावात ते वावरत असतात.
हा अविर्भाव मोडून काढण्यासाठीच काल खास भगव्या रंगाची टोपी घालून सभेला आलो होतो.
भगवा रंग ही त्यांची खाजगी मालमत्ता नाही. आणि श्री रामाचं नाव तर त्यांनी घेऊही नये कारण मर्यादा पुरुषोत्तम रामाचे नाव घेऊन त्यांनी कालही पुण्यात सर्व मर्यादा ओलांडल्या.
‘मूंह मे जय श्रीराम ओर दिमाग मे नथुराम’ हे भाजपचे आधीपासूनचे संस्कार आहेत. त्याचे प्रत्यक्ष दर्शन कालही पुणेकरांनी आणि सबंध महाराष्ट्राने घेतले.
काल भगवी टोपी घालून गेटमधून आत गेल्यानंतर जो अनुभव आला तो चकित करणारा होता. काहींना मी संघी वाटलो, काहींना नथुरामचा समर्थक वाटलो, काहींना मी सभेत गोंधळ घालण्यासाठी आलोय असे वाटले,
बरेच जण भगव्या टोपीतला व्यक्ती मी आहे म्हणून निश्चिन्त झाले, भगवी टोपी घातलेला तरुण कोण हे पाहण्यासाठी काहीजण पुढे आले. मी एकटाच भगव्या रंगाची टोपी घालून सभेत असेल अशी अपेक्षा मला न्हवती पण तो एक योगायोग होता.
पण खरंच सांगतो, या संघ भाजपच्या लोकांनी हा भगवा रंग चांगलाच बदनाम करून ठेवला आहे. त्याला यांनी उन्मदाचे प्रतीक बनवले आहे. जागतिक पातळीवर या रंगाला असुरक्षिततेचे प्रतीक बनवले जात आहे. हे आपण खरेतर थांबवायला हवे.
कारण या रंगाला कित्येक शतकांचा दैदिप्यमान इतिहास आहे.
एका ताईंनी मला विचारले तुमच्या डोक्यावरील हा भगवा रंग कोणाचा आहे ?
मी म्हणालो हा महाराष्ट्राच्या शिव-फुले-शाहू-आंबेडकरी संस्कृतीचा भगवा रंग आहे. हा भगवा रंग इथल्या शेकडो वर्षांच्या संत परंपरेचा आहे
. तो गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांनी बदनाम केला आहे त्यामुळे तो इथे डोक्यावर घेऊन आलोय. तो रंग त्यांचा नाही हे त्यांना सांगणे गरजेचे आहे.
तो रंग आमचा आहे, हा भगवा तथागत गौतम बुद्धांचा अष्टांग मार्ग आणि पंचशील मानणाऱ्या प्रत्येकाचा आहे, हा भगवा छत्रपती शिवरायांच्या अठरा पगड जाती आणि सर्व धर्मियांनी मिळून उभ्या केलेल्या स्वराज्याचा आहे. हा भगवा संत परंपरा जोपासणाऱ्या पुरोगाम्यांचा आणि सुधारणावाद्यांचा आहे.
जो तुम्ही रोज बदनाम करताय. त्यामुळे तो रंग आपला आपण सांभाळून ठेवायला हवा.
तो रंग त्यांचा नाही हे त्यांना ठासून सांगायला हवे. तुम्ही भगवा रंग डोक्यावर घेऊन उन्माद माजवायला याल तर आम्हीही तोच भगवा रंग डोक्यावर घेऊन तुमच्याशी दोन हात करू आणि इथल्या शिव-फुले-शाहू-आंबेडकरी संस्कृतीची आठवण करून देऊ.
हा संदेश त्यांना द्यायला हवा..!
बिलिव्ह मी, हे लोक त्यावेळी सपशेल पळून जातील. कारण यांच्याकडे यांचे असे काहीच नाही.
यांनी सगळं काही ढापलेले आहे. आणि ढापुन त्याला स्वतःचा मुलामा लावला आहे. आता ते देशातील लोकशाही आणि संविधान ढापत आहेत.
आणि त्यावर आपल्याच प्रतीकांचा मुलामा लावून देशात हुकूमशाही आणि मनुवादी व्यवस्था राबवणे सुरू आहे.
खरेतर हे प्रयत्न ‘उधळून लावणे’ खरे राष्ट्रहिताचे राहील..!
#समजलंतरठीक
– पैगंबर शेख
पुणे, महाराष्ट्र
९९७००७०७०५