कुठलीच कुवत नसताना सत्तेसाठी भीक मागून जगणारा व्यक्ति कमरेचं सोडून डोक्यावर कसं बांधतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे रामदासाची ही मुलाखत..
“…मोदींना हटवणे येड्या-गबाळ्याचे काम नाही…2024 मध्ये आम्हाला अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीचे 370 पेक्षा जास्त लोकं… अं.अंअं..खासदार निवडून येतील…आणि NDA चे आमच्या 400 पेक्षा जास्त…अंअंअं…(pause).. ‘मेंबर ऑफ पार्लियामेंट’ असतिल…अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे..त्याचबरोबर आता जी लोकसभेची निवडणूक येते आहे..महाराष्ट्रामध्ये बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांची मोठी ताकद आहेच आहे..पण या मोठ्या ताकदीला मदत करणारी आरपीआय ची मोठी ताकद आहे…अं.. (चूक सुधारत) आरपीआय ची..छोटी ताकद आहे…पण निवडून आणण्यासाठी जी balancing मतं असतात ती मतं देण्याची जबाबदारी माझ्या पक्षावर आहे..आणि उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचाही चांगला उपयोग होणार आहे..त्यामुळं आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझी नम्र विनंती आहे की… मी राज्यसभेवर आहे ही गोष्ट खरी आहे पण मी तसा लोकसभेतला माणूस आहे..मी तीन वेळा लोकसभेमध्ये होतो आणि चौथ्या वेळेला मी शिर्डीतून हरलो होतो.. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक जागा तरी देणं अत्यंत आवश्यक आहे.. महाराष्ट्रामध्ये सारा देश वाट पाहतो आहे.. सगळ्या देशातले लोक मला फोन करताहेत आणि रिपब्लिकन पक्षाला एक जागा आपण मिळवुन आपण त्याठिकाणी शिर्डीमध्ये उभं रहावं आपण तिथं निवडून यावं…अशी मागणी देशभरातील लोकांची आहे… त्यामुळं माझं माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार यांना नम्र निवेदन आहे की आमच्या भावनांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे..आम्हाला एकतरी जागा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळाली नाही तररर आम्हाला लोकांना तोंड दाखवणं अत्यंत अवघड जाईल…यामुळं..अ.अं..अं……… मला एक जागा दिलीच पाहिजे अशा प्रकारचा माझा आग्रह आहे..आणि त्याचा विचार नक्किच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे… bla…bla…bla..”
फक्त अन फक्त स्वतःसाठी खासदारकीची एक जागा पदरात पाडण्यासाठी रामदासने सदर मुलाखत दिलीय. गंमत म्हणजे भाजपाच्या महायुतीकडे भीक मागण्यासाठी आयोजिलेल्या या मुलाखतीत रामदास मात्र चक्क ‘महाविकास आघाडीच्या’ नेत्यांना आर्जव घालत आहे आणि हे एकदा-दोनदा नव्हे तर संपूर्ण मुलाखतीत असंच चालू राहिलं.
स्वतःचा रिपब्लिकन पक्ष हा मोठा पक्ष आहे की ‘लहान’, लाचारीच्या नादात याचंही भान नाही.
“महाराष्ट्रामध्ये सारा देश वाट पाहतो आहे” या वाक्याचा अर्थ रामदासच्या फंटर्स ला देखील लागला नसेल..
तर,
‘सगळ्या देशातून लोकं रामदासालाच फोन करून एक तरी जागा मिळवून घ्या अन शिर्डीतूनच निवडून या’ असं का सांगत आहेत हे त्या शिर्डीवाल्या ‘शाही बाबा’ लाच काय ते माहीत असावं…
रामदासाच्या रिपब्लिकन पक्षाला भाजपाने एकही जागा सोडली नाहीतर रामदास व त्याच्या पक्षवाल्यांना ‘तोंड दाखवायला जागा उरणार नाही’ अशा आशयाचे वक्तव्य म्हणजे स्वतःच्या खासदारकीसाठी रामदासाची अगतिकता आणि त्यासाठी त्यानं आपला ‘पदर’ घेवून मोदीच्या पायावर लोटांगण घातल्याची स्पष्ठ कबुलीच..
जाता जाता: याच मुलाखतीत रामदासाने त्याच्या रिपाईची स्थापना चक्क, लक्षद्वीप बेटावर ते ही शिवजयंती निमित्त करत आहे असं जाहिर करतांना तिकडच्या अधिकाऱ्यांचे प्रश्न भारत सरकार कडून सोडविण्याचे आश्वासन लक्षद्वीपच्या लोकांना दिल्याचेही सांगितले…
या अर्थानं रामदासाने शिर्डी ऐवजी लक्षद्वीप मधूनच खासदार होणं अधिक संयुक्तिक नव्हे का..तेव्हढीच तिकडील आदिवासींना करमणुकीची संधी आणि आपल्या डोक्याचा ताप कमी.
एकीकडे हे चालू असतांना, रामदासच्या पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यानं मिरज मधील कार्यकर्ता मेळाव्यात नवीनच गुऱ्हाळ लावलं..काय तर म्हणे, “भाजपा सोबत युती केल्याने सामाजिक क्षेत्रात न्याय मिळवता आला मात्र राजकिय क्षेत्रात कमी पडलो..”
भाजपा सोबत गेल्याने समाजिक क्षेत्रात कोणता न्याय मिळवून घेतलाय रामदासाच्या रिपाइंने..सविस्तर मांडता येईल का?
अन राजकिय क्षेत्रात कसलं कमी पडला..दम असेल तर सांगा ना रामदासाला, “तू राज्यसभेवर आहेस ना..मग दुसरं कोणाला तरी उभं कर खासदारकीला..” आहे का हिम्मत सूर्यकांतराव.. अरेच्या मी पण काय विचारतोय.. तेव्हढा स्वाभिमान असता तर रामदास सोबत असता का सूर्यकांत वाघमारे..
आणखीन एक अफलातून विधान केलंय याच वाघमारेनी… “रामदासाच्या योजना कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचविल्या पाहिजेत..”
अशा नक्की कोणत्या योजना आहेत रामदासाच्या?
गेली तीन दशकं तर समाज रामदासाची एकच योजना पाहतोय.. लाचारीची… स्वतःच्या खुर्चीसाठी सर्वात आधी ‘शरद पवार’ मग ‘सोनिया गांधी’ परत ‘शरद पवार’ नंतर ‘बाळ ठाकरे’ मग ‘मोदी’ अन सध्या ‘एकनाथ शिंदे + फडणवीस + अजित पवार’ यांचे पाय धरण्याची…ही ‘लाचारपंथी’ ची योजना दलितांमध्ये तळागाळात पोहोचवायचीय का?
शेवटचं: समाजात तोंड दाखवता यावं म्हणून एक तरी जागा द्या या रामदासाच्या याचनेला दया दाखवून, भाजपा त्याला खासदारकीचे तिकीट देईल ही एखादवेळी…पण रामदासाने स्वतःच्या ‘संविधान’ नावाच्या घरातील आरश्यात बघावं – दाखवायला तोंड राहीलं पण चेहर्यावर ‘नाक’ शाबूत आहे का…
अजून शेवटचं: सध्या देशाचे राजकारण म्हणजे गजकर्ण झालं आहे…सर्व नीतिमत्ता लयाला गेलीय…
सत्तेसाठी कोण..कधी..कुठे जाईल याचा नेम नाही..
मग अशा गढूळ वातावरणात दलित नेते ही निश्चितपणे तसेच नीतिशून्य वागतील..त्यांच्याकडूनच नीतिमत्तेच्या अट्टहास का?
असा प्रश्न साहजिकपणे विचारला जावू शकतो..
याचे एकच उत्तर आहे – दलित पुढाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेही जावून ‘शेण’ खाओ तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.. आपल्याला त्याच्याशी काही देणंघेणं असण्याचा संबंधच नाही. पण, ही ‘साल्ली’ लबाड मंडळी चक्क बाबासाहेबांचं नाव घेवून ‘शेण’ चाटतात आणि म्हणूनच ‘डोक्यात जातात’.
नाहीतर यांच्यावर वेळ घालवावा एव्हढी यांची लायकी निश्चितच नाही..!
मिलिंद भवार
पँथर्स
9833830029