डॉ.बाबासाहेब आंबेडकर या युगप्रवर्तक महापुरुषाच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा आपण वस्तुनिष्ठ व चिकित्सकपणे अभ्यास केला तर आपणास असे निदर्शनास येते की, या महामानवाने आपल्या जीवनातील संपूर्ण कार्य हे भारत देशातील शोषित- वंचित जनांसाठी खर्ची घातलेली आहे. ज्यात त्यांनी विशिष्ट अशा एका वर्गापुरते कार्य न करता तत्कालीन काळातील सर्वच जाती धर्म समूहातील लोकांच्या न्याय, हक्कासाठी एत्तद्देशीय राजकारणी व ब्रिटिशांशी संघर्ष करून या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले दिसतात.
क्लिक करा आणि सविस्तर वाचा –सुभाषचंद्र बोस एक दुर्लक्षित देशभक्त…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळातील धार्मिकतेला आपल्या लिखाण व कार्यातून तिलांजली देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यात त्यांनी येथील असणाऱ्या वर्णव्यवस्थेला हादरा दिला. व स्पष्टपणे अधोरेखित केले कि माणसाचे कर्तृत्व हे त्याच्या जातीने न ठरवता त्याच्या कर्मावर किंवा कामावर ठरवावे व त्याच्या बुद्धीचातुर्याच्या कमावलेल्या कलेवर ठरवावे. त्यांनी जात, धर्म ही माणसाला लागलेली कीड आहे ती वेळीच नष्ट केली पाहिजे असे आपल्या अनेकानेक विधानातून व कार्यातून त्यांनी हे विचार मांडलेले दिसतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव मुक्तीच्या सामाजिक चळवळीला अग्रक्रम दिलेला आपणास दिसतो. त्यांचे असे मत होते की राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचे आहे. कारण येथील बहुतांश समाज हा वर्णव्यवस्था व जातीव्यवस्थेने बंदिस्त केलेल्या गुलामगिरीत अडकून पडला आहे त्याला त्यातून अगोदर बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच तत्कालीन काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील वंचित, अस्पृश्य, दलित या सर्व घटकातील लोकांना विषमतादायी जोखडातून बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केलेले आपणास दिसते. आणि या कार्याची आजही तितकीच नितांत आवश्यकता आपणास दिसते. कारण आजतागायत हे प्रश्न सर्वार्थाने सुटलेले दिसून येत नाही. अनेक महापुरुषांनी आपल्या सामाजिक आणि धार्मिक कार्यातून पूर्वापार चालत आलेल्या हिंदू धर्मातील कर्मकांड, विखारी चालीरीती, अंधश्रद्धा, रूढी- परंपरा यांना विरोध केला. येथील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी हा धर्मांध शक्तींना बळी पडू नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आपणास दिसते त्यासाठी त्यांनी नियतकालिक काढून त्यातुन समाज जागृती करण्याचे कार्य केलेले आपणास दिसून येते .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वैचारिक प्रभाव
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये केवळ तीन गुरु आहेत असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे त्यात भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांना आपल्या गुरुस्थानी मानून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सर्व कार्याला जणू पुढील दिशा देण्यासाठी या महापुरुषांच्या विचारधारेचा अवलंब केल्याचे दिसून येते. या सर्व महापुरुषांनी येथे असणाऱ्या अमानुष प्राचीन रूढी- परंपरा, कर्मकांड, अज्ञानपणा यात गुरफटून गेलेल्या लोकांना एक नवसंजीवनी किंवा नवीन दिशा देण्यासाठी आपल्या संपूर्ण कार्यातून आपले विचार व कार्य केलेले आपणास दिसते. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रथम गुरू भगवान गौतम बुद्ध यांनी आपले राजेशाही जीवन त्यागून अहिंसेचा पुढाकार करून केवळ सत्याचा शोध घेऊन स्वयं प्रकाशमान व्हा हा संदेश येणाऱ्या हजारो पिढयांना दिला. आपल्या जीवन प्रवासात कोठेही हिंसेला स्थान त्यांनी दिले नाही आणि त्यांच्या सर्वच कार्याचे एक सूत्र आपणास दिसते, की बहुजन हिताय व बहुजन सुखाय. सामाजिक समूहातील केल्या गेलेल्या स्तरीकरणामुळे सर्वात खालच्या स्तरातील माणसाला जीवन जगण्याचा अधिकार हा निसर्गानेच दिलेला आहे त्याला कोणीही बंदिस्त करू शकत नाही आणि त्यासाठी अहिंसात्मक मार्गाने आपले सर्व कार्य करीत राहावे असा संदेश भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या कार्यातून आणि विचारातून दिलेला आपल्याला दिसतो आणि त्याचे पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुकरण केलेले आपणास दिसते म्हणूनच या व अशा महापुरुषांच्या वैचारिक विचारांचा वारसा डॉ. आंबेडकरांनी पुढे चालवलेला आपणास दिसतो. अशाच प्रकारे मध्य काळातील एक विद्रोही संत म्हणून ज्यांचा आपण उल्लेख केला
जातो ते संत कबीर यांनी आपल्या विचार व कर्तुत्वातून येथील हिंदू धर्मामधील सर्वच अनिष्ट रूढी परंपरांना निस्तनाबूत करण्याचे कार्य केलेले दिसते. त्यांनी आपल्या विचार व दोह्यामधून त्यांची विचार मांडलेले आहेत. उदाहरणार्थ संत कबीर असे म्हणतात पूछो साधु की, पूछो साधू का ज्ञान ;मूल्य करून तलवार का पडी रहने दो मॅन . याचाच अर्थ संत कबीर यांनी जातिव्यवस्थेला स्पष्टपणे नाकारलेले दिसते. उलटपक्षी ज्ञान महत्वाचे आहे अशीही मांडणी ते करतात. त्याचप्रमाणे तलवार मॅन मधेच असू द्या याचा अन्वयार्थ हिंसेला विरोध करा किंवा हिंसा करू नका असा संदेश व असा वैचारिक वारसा संत कबीर आपल्या दोह्यांमधून पुढील पिढीला देऊ करतात. व हाच वैचारिक धागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातही दिसतो. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तिसरे गुरु म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत. महात्मा फुले यांनी देखील आपली संपूर्ण हयात समाजप्रबोधनासाठी घालविलेले दिसून येते. महात्मा फुल्यानी शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. त्यांनी अज्ञान हे गरीब दलित जनतेसाठी, त्यांच्या वाईट अवस्थेसाठी मुख्यतः कारणीभूत आहे असे अधोरेखित केले. तत्कालीन समाजातील खूप मोठा अज्ञानी वर्ग उच्च वर्णातील लोकांची गुलामी करत असल्याकारणाने त्यांच्यासाठी त्यांनी बहुजन समाजातील मुलं-मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम केलेले आपणास दिसते. त्यासाठी त्यांनी शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुणे हे ठिकाण निवडले व पहिली दलित व अस्पृश्य समाजातील मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा उघडली. आणि त्यासाठी त्यांनी तत्कालीन काळातील ब्राह्मण वर्गाचा रोष हि पत्करलेला निदर्शनास येतो. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षणाविषयीचे कार्य हे आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या समवेत त्यांनी घडवून आणले
त्याबद्दल या अज्ञानी बहुजनांना कशा पद्धतीने ग्रासलेले आहे त्याबाबतीत त्यांनी काही ओळी लिहिल्या आहेत.;विद्याविना मती गेली ,मतीविना नीती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले. या अशा सर्व समाज सुधारकांनी,अज्ञानी बहुजन समाजाला, अस्पृश्य समाजाला शोषित वंचित घटकांना एका मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य केलेले आहे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वरील तीनही महापुरुषांना आपले गुरु मानलेले दिसते. तसेच छत्रपती शाहू महाराज यांनी सुद्धा या महापुरुषांचा वैचारिक गाडा पुढे चालवण्यासाठी सामाजिक कार्याची धुरा वाहिलेली दिसते. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानांमध्ये बहुजन समाजातील मुला-मुलींसाठी अनेक वसतिगृहाची स्थापना व शाळांची निर्मिती केलेली आपल्याला दिसते बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षणाची द्वारे खुली करण्यासाठी व त्यांचे अंधकारमय जीवन बदलविण्यासाठी त्यांनी आपले कार्य पणाला लावलेले आपणास दिसते . त्याचबरोबर त्यांनी या बहुजन समाजातील मुला- मुलींना त्यांच्या या अंधारमय जीवनात प्रकाश पडावा व बाकीच्या समाजातील लोकांसमवेत त्यांना बरोबरी करता यावी या साठी आरक्षणाची सोय करून आपल्या संस्थानात 50 टक्के आरक्षणाची सोय त्यांनी केलेली आपणास दिसते. या महापुरुषांचा वैचारिक वारसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जपलेला आपणासदिसून येतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्व कालखंडात अनेक असे समाज सुधारक होऊन गेलेले आहेत, ज्यांनी या समाजातील लोकांना त्यांच्या अनेक लेखणी व कार्या द्वारे समाज जागृती केली. त्यात किसन फागु बनसोडे , शिवराम जानबा कांबळे अशा अस्पृश्य समाजातील लोकांनी समाज जागृतीची पताका पुढे वाहिलेली आपणास दिसते. त्यांनी आपल्या साप्ताहिकातून व समाज प्रबोधनातून उदा. सोमवंशीय मित्र साप्ताहिक या द्वारे समाज जागृतीचे काम केलेले आपणास दिसते. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक विचारांचा वारसा हा अनेक अशा दिग्गज महापुरुषांनी केलेल्या समाज जागृती व कार्यातून मिळालेला आपणास दिसतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवमुक्तीचे कार्य व काही निवडक चळवळी व आंदोलने
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज जागृतीच्या कार्याचा एक केंद्रबिंदू होता. तो म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली वर्णव्यवस्था व त्या वरील सर्वात मोठा घटक म्हणजे अन्यायकारी, विषमतावादी मांडणी असणारा मनुस्मृती ग्रंथ यांना विरोध करणे व समतदायी व मुक्तिदायी विचारांकडे वाटचाल करणे हा होय. होय. या मनुस्मृतीद्वारे उच्च वर्णातील लोकांनी खालच्या वर्णातील लोकांचा तसेच शूद्र ,अस्पृश्य, वंचित लोकांना आपल्या अंधश्रद्धा रुपी जाळ्यामध्ये अडकवून त्यांना त्या द्वारे आपली सर्व कामे करवून घेऊन त्यांना गुलामीच्या जोखडात अडकवण्याचा उच्चवर्गीयांचा असलेला जो प्रयत्न होता, त्याला छेद देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज परिवर्तनाचे किंवा मानवमुक्तीचे कार्य केलेले आपणास दिसते त्यासाठी त्यांनी अनेक अशा समाज प्रबोधनात्मक चळवळी व आंदोलने केलेली आहेत.
मनुस्मृति दहन :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानव मक्तीच्या लढ्यामधील सर्वात मोठा लढा म्हणून या मनुस्मृती दहनाकडे पाहिले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृति दहन करून येथील असणाऱ्या हजारो वर्षापासूनच्या एका जुलमी राजवटीचा अंत करू पाहिलेला आहे. त्यांनी मनु प्रणित व्यवस्थेला हादरा देण्याचा प्रयत्न केला. कारण याच मनुस्मृतीतून येथील असणाऱ्या आपल्याच समाज बांधवांना धार्मिकतेच्या बंधनात व जातिव्यवस्थेमध्ये अडकून टाकण्याचे सर्वच कायदे कानून या मनुस्मृतीत समाविष्ट केलेले होते आणि येथील असणाऱ्या स्त्रियांनाही मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्याचा हक्क याच ग्रंथामधून हिरावून घेतलेला होता. म्हणून डॉ. आंबेडकरांनी या मनुस्मृतीलाच दहन करण्याची व येथील असणाऱ्या उच्चवर्णीय ब्राह्मणांना एक फार मोठा हादरा देण्याचा प्रयत्न केलेला आपणास दिसतो कारण या ब्राह्मण्य हिंदू समाज व्यवस्थेने या मनुस्मृतीतून
अंधश्रद्धा, कर्मकांड, रुढी,परंपरा या सर्व आयुधांतून मानवाला गुलाम करण्याचा गोरख धंदाबनविलेला होता त्याला नेस्तनाबूत करण्याची काम म्हणजे मनुस्मृती दहन हे होय. कारण याचा फटका हा येथील गोरगरीब अस्पृश्य शोषित वंचित जनतेलाच नाही तर भारतातील व महाराष्ट्रातील अनेक मोठ्या राजांना किंवा महाराजांना सुद्धा याची झळ लागलेली इतिहासात नोंदविली गेली आहे.
उदाहरण म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व राजश्री शाहू महाराज यांना आलेले अनुभव होत. कारण याच मनुस्मृतीतून जन्मास आलेल्या अत्यंत हीन प्रकारच्या आयुधांतून या थोर महापुरुषांना त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी तत्कालीन काळातील ब्राह्मणांनी आम्ही शूद्रांचा राज्याभिषेक करणार नाही अशी आळवणी दिलेली होती. आणि या दोन्ही महामानवांच्या राज्याभिषेकास त्यांनी टाळाटाळ केलेली आपणास दिसते. म्हणून येथील असणाऱ्या शूरवीर महाराजांचीच अशी अवस्था तर सामान्य जनतेचे किती अतोनात हाल होत असतील हे न सांगितलेलेच बरे. या व अशा सर्व घटकांना कारणीभूत असणारी मनुस्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहन करून विषमतेला खतपाणी घालणाऱ्या विचारसरणीला हादरा दिला.
अशा स्तरीकरणयुक्त भेदाभेद करणाऱ्या धर्म व्यवस्थेला छेद देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक येथील येवला या ठिकाणी अशी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मला आलेलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. कारण कोणत्या जातीत जन्मने हे जरी माझ्या हातात नसले तरी कोणत्या जातीत मरणे हे माझ्या हातात असेल. म्हणूनच त्यांनी या सर्व सामाजिक परिस्थितीचा विचार करून 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे जगातील एकमेव अहिंसक धर्म समजल्या जाणाऱ्या बौद्ध धर्म याची दीक्षा घेऊन जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या महामानव भगवान गौतम बुद्ध यांचा बुद्ध धम्म अंगीकारला व आपल्या अनेक लाखो सहकाऱ्यांसोबत अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. याचाच परिपाक म्हणजे ज्या मनुस्मृतीने भारतातील वंचित घटकांना जगण्याच्या अधिकारापासून रोखले होते किंवा वंचित ठेवले होते त्या सर्व रोखणातून त्यांना मुक्त करण्याचे महत्वपूर्ण कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.
महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतातील एक असे समाज सुधारक आहेत की ज्यांनी अत्यंत लहानात लहान वाटत असणाऱ्या गोष्टींविषयी सत्याग्रह केला. त्यांनी महाड येथे चवदार तळ्याचा अर्थात पाण्यासाठी सत्याग्रह केला. भारतीय समाजव्यवस्थेतील स्तरीय भेदाभेद असणारी सामाजिक संरचना शोषित वंचित लोकांना सार्वजनिक पाणवठ्याला स्पर्श करण्याचा अधिकार देत नव्हती. काही लोकांना निसर्गाने बहाल केलेल्या नैसर्गिक वस्तूलाही पिण्याचा किंवा त्याला स्पर्श करण्याचा अधिकार नाकारला गेला होता अशा पाण्यासाठी संघर्ष करणारा भारतातीलच नाही तर जगातील एकमेव असा नेता म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होय. तत्कालीन समाजव्यवस्थेत येथील असणारी वर्णव्यवस्था व त्यावर व्यवस्थेने येथील असणाऱ्या सर्वात खालच्या म्हणजे अस्पृश्य समाजाला शूद्र लोकांना पाणी पिण्याचा व सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याचा सुद्धा अधिकार नाकारला होता त्यांच्या हक्कासाठी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे येथील पाण्याचा सत्याग्रह केला. भारतातील तत्कालीन समाज व्यवस्थेने ज्या ठिकाणी पशु, पक्षांना, जनावरांना पाणी पिण्यासाठी बंधने नव्हती त्या ठिकाणी अस्पृश्य समजल्या गेलेल्या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नाकारला होता. त्यांना या विषमतेच्या दरीतून समतेचा मार्ग मिळावा यासाठी व त्यांना आपला नैसर्गिक हक्क मिळावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार पाण्याचा सत्याग्रह केला व सर्वसामन्य वंचितांना आपल्या नैसर्गिक अधिकार मिळवून देण्यासाठी या आंदोलनानंतर कायद्याने तेथील सर्व बंधने धुडकावून त्यांना न्याय मिळवून दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील सूत्र हे येथील उपेक्षित समाजाला स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या आधारावरती त्यांचा नैतिक भौतिक विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी सबंध आयुष्यभर त्यांनी अहिंसक म्हणजे ज्या काही आंदोलने व चळवळी त्यांनी केल्या त्या सर्व चळवळी ह्या रक्तहीन म्हणजेच अहिंसात्मक मार्गाने करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला दिसतो आणि त्यातीलच एक म्हणजे चवदार पाण्याचा सत्याग्रह होय
काळाराम मंदिर सत्याग्रह :-
निसर्गनिर्मित सर्व माणसे जर का एका निर्मिक आणि परमात्म्याने त्यांची उत्पत्ती केलेली असेल तर त्यांच्यात भेदाभेद कोणी निर्माण केला? वर्णव्यवस्था व जातीव्यवस्थेची शिकार झालेल्या अस्पृश्य व शूद्र समाजातील लोकांना आपल्या निर्मिकाना पुजण्याचा किंवा त्याची दर्शन घेण्याचा सुद्धा अधिकार येथील मानवनिर्मित व्यवस्थेने नाकारला होता त्याच्या विरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला हा काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह व पार्वती मंदिर सत्याग्रह होय. कारण हा लढा सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामते समतेच्या मार्गाने किंवा या लोकांनाही आपल्या समान न्याय हक्कासाठी पुकारलेला लढा होता. ज्या मंदिरात गेल्याने जर का तो देव आणि त्याच्या धर्माला विटाळ सहन करावा लागत असेल तर त्यात सत्यता नाही. आपल्या सृष्टीतील निर्माण केलेल्या माणसांना या अनिष्ट भेदाभेद रुपी विषमतेला सामोरे का जावे लागत असे याचा शोध घेण्याचा व येथील वर्णव्यवस्थेला छेद देण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला हा एक प्रयत्न होय आणि त्यातून या अस्पृश्य व वंचित घटकांना त्यांच्या जीवनाचा एक अधिकार प्राप्त करून देता यावा यासाठी केलेला हा काळाराम मंदिर सत्याग्रह होय.
यावरून आपणास हे लक्षात येते की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली चळवळ किंवा आंदोलन ही मूलभूत अधिकारासाठी व न्याय हक्कांसाठी केलेली आहे. समतेच्या या लढ्याचे रणशिंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर फुंकलेले आपणास दिसते. त्यांच्या या धर्म चिकिस्सेवरून त्यांनी भारतीय संविधानात नमूद केले कि, सर्व धर्माला समान न्याय व तत्त्वाने आपापल्या धर्मातील देवी देवतांना श्रद्धेने त्यांची पूजा अर्चा किंवा उपासना करण्याचा मूलभूत हक्क बहाल केलेला आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही जाती धर्माची हेटाळणी नकरता त्यातील असणाऱ्या अनेक अनिष्ट रूढी परंपरा यांचा नायनाट करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता.
स्त्री हक्क विषयीचे चिंतन व त्यामागील भूमिका:-
सामाजिक आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वात अग्रणी भूमिका अशी होती की स्त्रियांना आपले अधिकार व भूमिका अगदी रोखठोकपणे बजावता आले पाहिजे. तसेच स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरी ने खांद्याला खांदा लावून काम करता यावे म्हणून त्यांनी त्यांचे प्रबोधन केलेले आहे. त्यांच्या सर्व चळवळी व आंदोलनात स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आपणास आढळून येतो. त्यांचे असे मत होते की जर का एक स्त्री शिकली तर ती अख्खे कुटुंब सुधारते. म्हणून स्त्री शिक्षणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अग्रक्रम देताना आपणा दिसतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांप्रती कोणताही भेदभाव भेदभाव केलेला नाही. त्यांनी सर्वच जाती धर्मातील स्त्रियांना विशेषतः हिंदू, मुस्लिम, अस्पृश्य, ख्रिश्चन, बौद्ध या सर्व धर्मातील स्त्रियांना आपले अधिकार व कार्य करता यावे यासाठी; तसेच पुरुषांनी केलेल्या अन्याय- अत्याचाराच्या विरुद्ध आपणही आवाज उठवू शकतो या सर्व भावनेमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना विशिष्ट हक्क बजावण्यासाठी आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा दिलेला आपणास दिसून येतो. त्याचेच प्रतीक म्हणजे त्यांनी सर्वच स्त्रियांच्या बाबतीमध्ये मांडलेले हिंदू कोड बिल हे होय. हिंदू कोड बिलाचा अर्थच असा होता की सर्वच धर्मामधील स्त्रियांना विशेषतः हिंदू स्त्रियांना आपला अधिकार व हक्क पुरुषांच्या बरोबरीने मिळावा हा त्यांचा प्रमुख हेतू आपणास दिसून येतो. प्राचीन काळापासून स्त्रियांवर होणारा अत्याचार मग तो बालविवाह, विधवा पुनर्विवाह, घटस्फोटीत स्त्रिया, देवदासी स्त्रिया किंवा टाकून दिलेले स्त्रियांना महत्तम अधिकार प्राप्त व्हावा हा त्या पाठीमागे हेतू आपणास दिसून येतो. पुरुषांच्या बरोबरीने आपल्या वडिलांच्या संपत्तीतील अधिकार किंवा हक्क स्त्रियांनाही मिळावा हीच त्या हिंदू कोड बीला मागील संकल्पना असलेली आपणास दिसून येते. म्हणूनच त्यासाठी त्यांनी तत्कालीन राजकीय पुढार्यांच्या विरुद्ध जाऊन हिंदू कोड बिलासाठी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री म्हणजे ती कोणतीही विशिष्ट जाती किंवा धर्मामधील असो त्यामध्ये भेदाभेद न करता त्यांनी मुस्लिम समाजामधील स्त्रियांनाही त्यांच्यावरती असणाऱ्या बंधनाला झुगारून देण्यासाठी व मुस्लिम स्त्रियांमध्ये असणारी पडदा पद्धती या अनिष्ट प्रथा बंद करण्यात याव्या आणि त्यांच्यावरती धर्माच्या नावाखाली एक किंवा दोन त्यापेक्षा अधिक मुले आपत्य जन्मास घातल्या कारणामुळे होणाऱ्या अनेक नानाविध रोग व आजारांची त्यांच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो म्हणून मुस्लिम समाजामधील स्त्रियांनाही इतर स्त्रियांप्रमाणे बंधने नसावेत अशी त्यांची आग्रही भूमिका होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे समाज सुधारक होते की त्यांनी कोणालाही दुजाभाव न देता त्यांना त्यांच्या न्याय हक्क व शिक्षणासाठी आपली परखड बाजू मांडता यावी असा आग्रह होता म्हणून आंबेडकरांच्या आंदोलनात चळवळीत मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा सहभाग असायचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी धर्म परिवर्तन :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे महान समाज सुधारक होऊन गेले की त्यांनी आपण ज्या जातीमध्ये किंवा धर्मामध्ये जन्म घेऊनही त्यांनी त्या जातीला व धर्माला शेवटपर्यंत न चिटकून राहता त्यामध्ये असणाऱ्या अनेक अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, वाईट चालीरीती या सुधारण्यात याव्या यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेले किंवा धर्मचिकित्सा केलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोंबर 1935 ला नाशिक च्या येवला या ठिकाणी अशी घोषणा केली की मी ;हिंदू म्हणून जन्माला आलो असतो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही ; या क्रांतिकारी घोषणेनंतर भारतातील सर्वच धर्मांना याचे आश्चर्य वाटले. या महान विद्वानाने आपल्या धर्मामध्ये समाविष्ट व्हावे किंवा त्यांनी आपला धर्म स्वीकारावा असे त्यांना वाटू लागले आणि त्या पद्धतीने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख या धर्मातील धर्मगुरूंनी त्यांना अनेक प्रकारची प्रलोभने व आश्वासने दिली होती. काहींनी तर असे म्हटले की जर का डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या प्रत्येक अनुयायांनी मग ते शेकडो किंवा लाखो असो त्यांना प्रत्येकी हजार रुपये रक्कम दिली जाईल. अशा प्रकारच्या प्रलोभनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक घातली नाही. तर त्यांचा हा विशिष्ट हेतू होता की जर का आम्ही दुसऱ्या धर्मामध्ये धर्म परिवर्तन करून तर त्या धर्मामध्ये असलेल्या जाती आणि त्या धर्माची शिकवण आम्हाला आणखीनच गुलामी मध्ये कितपत राहावी लागेल व त्या धर्मामधील हिंसा हे आम्हाला नकोशी आहे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व अस्पृश्य व दलित समाजाला किंवा वंचित समाजाला सन्मानाने जगता यावे किंवा ज्या धर्म परिवर्तनाने त्या
धर्मामध्ये उच्च नीच भेदाभेद ही दरी नसेल तो धर्म स्वीकारला जावा अशी त्यांची मनोकामना असलेली आपणास दिसते. सर्व मानवाला एकसमान वागवणारा धर्म त्यांना काही निवडक धर्मातून निवडावा असे वाटले व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा नागपूर या ठिकाणी घेतली व त्यानंतर त्यांनी तो धर्म किंवा धम्म निवडण्यामागचे कारण सांगितले. ते अधोरेखित करतात की धम्म निर्मिकाची संकल्पना मानत नाही. बाकीच्या धर्मातील निर्मिती ही संकल्पना मानत आपणास देवांचे सुपुत्र मानत. परंतु भगवान गौतम बुद्ध यांचा बुद्ध धर्म हा भारतातील असा धम्म आहे की जो निर्मिकाची संकल्पना मानत नसून तो भारताच्या मातीतला धर्म आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आपणा दिसते. तसेच बौद्ध धर्म हा आपल्या बुद्धीच्यातुर्याच्या व कर्मावर विश्वास ठेवावयास भाग पाडतो. तसेच हा धम्म सर्व मानव प्राण्यास एकसमान मानून आपल्या विचारावर किंवा तत्त्वज्ञानावर डोळेझाक न करता आपल्या सदसद् विवेक बुद्धीला पटेल तरच आपण याचा स्वीकार किंवा विश्वास ठेवावा अशी शिकवण देतो व मूर्ति पूजेलाही विरोध करतो बुद्ध धर्मात मूर्तिपूजा कर्मकांड अंधश्रद्धा पूजा आर्चा या पद्धतीवर पूर्णतः बंदी आहे. आपले विचार हीच आपली ताकद यावर विश्वास असणारा एकमेव धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. यातून त्यांनी एक समाज परिवर्तनाची लाट आणून आपले ध्येय गाठलेले आपणास दिसते. म्हणूनच दलित, अस्पृश्य, शोषित वचितांना एका विशिष्ट धर्मातून दुसऱ्या धर्मात प्रवेश देऊन एक नवी क्रांतिकारी संजीवनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आपणास दिसून येते.
सर्व समावेशक सामाजिक भूमिका :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमेव समाज सुधारक व महापुरुष होऊन गेले आहेत की, त्यांनी आपल्या सर्व चळवळी व आंदोलनाचा केंद्रबिंदू हा भारतातील वंचित, शोषित, अस्पृश्य समुदाय या घटकांना मानलेले आपणास दिसते. तत्कालीन काळातील उच्चवर्णीय लोकांनी या समाजाला व या बहिष्कृत लोकांना एकत्र आणून त्यांच्या न्याय हक्कासाठी आपली भूमिका बजावली. मग तो विरोध हा एत्तद्देशीय लोकांशी असो किंवा तत्कालीन काळातील ब्रिटिशांशी असो त्यांनी तो अत्यंत चोख पार पद्धतीने पाडलेला आपणास दिसतो. यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या विरोधाला सामोरे जावे लागलेले आपणास दिसते. म्हणूनच तत्कालीन काळातील असणाऱ्या राजकीय चळवळीच्या अगोदर किंवा राजकीय स्वातंत्र्याच्या अगोदर देशात त्यांनी सामाजिक स्वातंत्र्याला अग्रक्रम दिलेला दिसतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथे इ स 1930 -31 साली जी गोलमेज परिषद झाली त्या गोलमेज परिषदेमध्ये दलित वर्ग यांच्या हक्कांची बाजू मांडण्यासाठी जगासमोर भारतामधील जो दलितांचा प्रश्न आहे तो प्रथमच त्यांनी मांडला म्हणूनच या त्यांनी मांडलेल्या मागण्या ना दलितांच्या अस्पृश्य मानले गेलेल्या समाजाच्या मुक्ती लढ्यात ऐतिहासिक स्थान प्राप्त होते. प्रमुख मागण्यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या प्रगतीसाठी विकासासाठी तसेच त्यांच्या राजकीय ,सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उद्धारासाठी ज्या मागण्या करून त्यांना जे संरक्षण पाहिजे त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले आहे.
या गोलमेज परिषदेमधील मागण्या पुढील प्रमाणे :
१) दलितांना समान नागरिकत्वाचे हक्क प्राप्त करून द्यावे
२)दलितांना कायदे कौन्सिलात पुरेशी प्रतिनिधित्व द्यावे .
३) भारतीय समाज व्यवस्थेमध्ये दलितावरती अत्याचार होतात व त्यांच्यावरती बहिष्कार टाकले
जातात त्यासाठी त्यांना कायद्याचे संरक्षण देण्यात यावे .
४) भारतामधील दलित अस्पृश्य समाजाला जो जातीभेद याचा अत्याचार सहन करावा लागत होता
त्यापासून संरक्षण मिळावे
५) तसेच दलितांना सरकारी नोकरीत योग्य प्रमाणात भरती करून घ्यावे
या व अशा पद्धतीच्या मागण्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये मांडून भारतातील दलित अस्पृश्य शोषित , बहिष्कृत यांच्या मुक्ती लढ्यात व मुक्तिसंग्रामामध्ये एक मूलभूत अशी पायाभरणी केलेली आपणास दिसून येते. सर्वच वंचित समाजातील घटकांसाठी त्यांनी भारतातील संविधानात लोकशाही मार्गाने सर्व मानव जात ही एक समान मानून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांना प्राधान्य देऊन सर्वच घटकांना स्वातंत्र्य व मूलभूत अधिकार बहाल करण्याची एक अतुलनीय कार्य केलेले आपणास दिसते. त्यांच्या मते माणूस हा कोणत्याही विशिष्ट जाती धर्माचा असो त्याला माणूस म्हणून त्याचा अधिकार हा मिळालाच पाहिजे हि प्रमुख बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधोरेखित केली आहे. त्यांच्यासमोर सर्व जाती धर्मातील लोक हे एक समान होते म्हणूनच समान वागणूक व न्याय देण्याचेकार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामधून दिलेले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सार्वजनिक जीवनातील पहिले पाऊल म्हणजे साउथ ब्युरो कमिटीला २७/१/१९२७ रोजी जे निवेदन दिले. त्यात अस्पृश्य, वंचित समाजासाठी ज्या काही मागण्या होत्या त्या त्यांनी त्या कमिटीसमोर मांडल्या. व त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर असे मत मांडतात की, लोक नियुक्त सरकारात समाजातील विविध स्तरांना विविध मतप्रवाहांना प्रतिनिधित्व दिले पाहिजे, सामाजिक धार्मिक अन्यायामुळे अस्पृश्य वर्गाला माणूस म्हणून जीवन नाकारले गेले आहे , त्यांचे संपूर्ण आयुष्य गुलामिचेच आहे आणि त्यांनी आपल्या गुलामगिरी विरुद्ध एक शब्दही काढू नये अशी उच्च म्हणणाऱ्या लोकांची अपेक्षा, याच व अनेक कारणामुळे अस्पृश्य वर्गांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळावा व कायदेमंडळात प्रतिनिधित्व मिळावे अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती.
1924 ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. त्याचे कारणच हे कि जो कोणी वंचित समाज आहे त्यांचे हक्क व प्रश्न त्यांना मदत यावे व आपले गुलामीचे
जोखड तोडण्याचे साहस त्यांच्यात निर्माण व्हावे,या संघटनेचे ब्रीदवाक्य असे होते कि शिका, संघटित व्हा व संघर्ष करा.
सामाजिक अस्पृश्यतेबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर असे नमूद करतात की, हिंदू
धर्मियांप्रमाणे अस्पृश्यांना समान हक्क नाहीत, सार्वजनिक शाळा पानवठ्यावर त्यांना पाणी भरता येत नाही, सार्वजनिक रस्त्यावरून त्यांना चालता येत नाही. जन्मसिद्ध अयोग्यते मुळे व अपवित्रतेमुळे आर्थिक दृष्ट्या त्यांचे तितकेच नुकसान झाले आहे. अशा लोकांना त्यांच्या अमानुषपणाला जर कोणी जिम्मेदार असेल तर तो म्हणजे त्यांचा अज्ञानीपणा म्हणूनच या वंचित वर्गाला एकत्र करून त्याना या प्रवाहाच्या विरुद्ध उभे करण्याचे कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आपणास दिसते.
सायमन कमिशन 1928 ला भारतात आले व त्या कमिशन पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली , तर त्यांच्यावर त्या काळातील वृत्तपत्र व राजकीय पुढार्यांनी टीका केली, पण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे असे राष्ट्रवादी नेते होते की त्यांनी भारतात आलेल्या कमिशन पुढे भारतीयांचा व तसेच अस्पृश्य म्हणून मानल्या गेल्या दलित बहिष्कृत वर्गातील लोकांचा प्रश्न मांडला. त्यात त्यांनी पहिला प्रश्न आपल्या देशाचा मांडला व दुसऱ्या प्रश्नात त्यांनी अस्पृश्य वर्ग, बहिष्कृत वर्गाचा प्रश्न अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने मांडला आता पर्यंत अशाप्रकारच्या प्रश्नाला भारतातील कोणत्याच राजकीय नेत्यानेयाला वाचा फोडलेली दिसत नाही म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हा प्रश्न ऐरणीवर आणला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या सामाजिक चळवळी किंवा आंदोलनाचा प्रमुख हेतू असा होता की भारतातील असणाऱ्या बहुजन समाजामधील
अस्पृश्य, दलित, शोषित, वंचित लोकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे . यासाठी त्यांना तत्कालीन काळातील अनेक राजकीय नेते व समाज सुधारक यांच्या रोशालाही त्यांना सामोरे जावे लागलेले आपणास दिसते. या वंचित समुदायातील लोकांना जितक्या प्रमाणात ब्रिटिशांकडून हक्क मिळवून देता येतील व त्यांची उन्नत्ती करता येईल याचा अतोनात प्रयत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्याचे एक उदा . म्हणजे गोलमेज परिषेदेत त्यांनी आपणच कशा प्रकारे भारतातील शोषितांचे मुक्तिदाते आहोत व त्या प्रकारे त्यांनी या वर्गाची बाजू मांडलेली आहे व या घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आपणास दिसतो. या सर्व सामाजिक चळवळी किंवा आंदोलने याला प्राधान्यक्रम देण्यापाठीमागचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एकमेव उद्देश असा होता की तत्कालीन काळातील प्रचलित हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी ,परंपरा आणि अस्पृश्यता याचे चटके हे स्वतः त्यांना बसलेले होते. हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा, परंपरा, चालीरीती आणि कर्मकांड यात येथील कामगार दलित, शेतकरी, शेतमजूर , अस्पृश्यवर्ग हा अशा भेदाभेद रुपी सामाजिक, धार्मिक,आणि आर्थिक विवंचनेत गुरफटला गेलेला होता, व त्याला जबाबदार तेथील असणारा उच्चवर्ग किंवा ब्राह्मण वर्ग होता. त्यांनी या सर्व खालच्या जातीतील लोकांना त्यांच्या कायदे कानून व नियमांमध्ये अडकवून ठेवलेले होते. जर का निसर्गानेच स्त्री-पुरुषांमध्ये भेदाभेद केलेला नसेल तर हा भेदाभेद ब्राह्मण वर्ग किंवा हिंदू समाज किंवा मनुस्मृती कसा काय करू शकतो असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते . म्हणूनच या समाज व्यवस्थेतील ब्राह्मण्य वर्गाचा पगडा नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यातून प्रयत्न केलेला आपणास दिसतो. म्हणूनच या वंचित समजावर असलेला तो जाती-धर्माचा पगडा किंवा बंधने झुगारून देण्यासाठी त्यांनी सामाजिक सुधारणेला महत्त्व दिले, व तत्कालीन काळात मानव मुक्तीचे शाश्वत व निरंतर प्रयत्न त्यांनी केले व त्याचा झरा हा आज तागायत वाहताना आपणास दिसतो .