Home जीवनसार पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जीवन कसे बदलून जाते?

पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जीवन कसे बदलून जाते?

0
पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जीवन कसे बदलून जाते?

पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी सुखी व आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे. सकारात्मक विचार करून तुम्ही तुमचे जीवन बदलून टाकू शकता. कोणते बदल घडवून आणणे शक्य आहे हे पाहू.

१. पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे तुम्ही आनंदी रहाता.

पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी यशस्वी, सुखी व आनंदी जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगचा लगेच जाणवणारा परिणाम म्हणजे आनंदी जीवन. आपल्याला जीवनात अनेक गोष्टी हव्या असतात, उदा पैसा, घरदार, मानसन्मान इत्यादी. या गोष्टी वापरून आपण आनंदी होण्याचा प्रयत्न करतो. परंतू या सर्व गोष्टी असून विचार नकारात्मक असतील तर मनुष्य दु:खी होतो.

सकारात्मक विचारसरणी असेल तर कोणतीही अडचण ही अडचण वाटत नाही. इतर गोष्टी थोड्या कमी असल्या तरी जीवन सुखी व आनंदी वाटते. जीवनातील अडचणी, काळजी कमी होते. आशावादी वातावरण निर्माण होते. निराशेतून सुटका होते. अडचणीतून मार्ग निघतो. पॉझिटिव्ह थिंकिंग हे मजेत जीवन जगण्याचे अनेक मार्ग दाखविते. आयुष्य सुखी व आनंदी होते.

२. पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला जीवनाबद्दल कृतज्ञ बनविते.

पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जे आहे त्याचा आनंद घेण्याची सवय लागते. जीवनात जे मिळाले ते वरदान वाटते. त्यामुळे जीवनाबद्दल कृतज्ञता वाढते. नकारात्मक व्यक्तीला कितीही मिळाले तरी सगळे अजून पाहिजे असते. अशी व्यक्ती समाधानी होऊ शकत नाही.

नकारात्मक विचारसरणी असणाऱ्या व्यक्तीला इतरांबद्दल द्वेष, असूया वाटते. इतरांचे चांगले झालेले पहावत नाही. अशी व्यक्ती छोट्या छोट्या क्षुद्र गोष्टीत अडकून पडते. जीवनाची भव्यता तिला जाणवत नाही.

तुम्ही जर पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याचे मनापासून ठरविले तर जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकता. इतरांबरोबर हसू, खेळू, नाचू शकता. कोणत्याही परिस्थितीत अगदी मजेत रहाता.

३. पॉझिटिव्ह थिंकिंग तुमचे आरोग्य चांगले ठेवते.

जो आनंदी, समाधानी आहे, जीवनाबद्दल कृतज्ञ आहे, त्यांची प्रकृती, आरोग्य आपोआपच ठीकठाक रहाते. सकारात्मक विचारसरणीमुळे ताण, स्ट्रेस कमी होण्यास निश्चित मदत होते. ताण कमी झाल्याने अधिक कार्यक्षमतेने काम करता येते. स्ट्रेस व आरोग्य याचा जवळचा संबंध आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य चांगले रहाते. ज्यांचे जीवन, करियर, बिझनेस तणावपूर्ण आहे त्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंगची सवय लावून घ्यावी.

संशोधनातून असे दिसून आले आहे की आनंदी व्यक्तीचे आयुष्यमान जास्त असते. वयस्कर लोकांनी पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याचा निर्धार केला तर त्यांचे आयुष्यमान वाढण्याची शक्यता ३५% जास्त असते.

४. पॉझिटिव्ह थिंकिंग तुमची सहनशक्ती वाढविते.

प्रत्येकाला काही ना काही तरी अडचणी समस्या असतात. सकारात्मक विचारसरणीचे लोक जीवनातील अडचणीना धीराने सामोरे जातात. त्यांची सहनशीलता वाखाखण्यासारखी असते. जेव्हा आपण जीवनाची उजळ बाजू पहातो, तेव्हा आपण मनाला एक प्रकारचे प्रशिक्षण देत असतो. या प्रशिक्षणातून आपली सहनशक्ती वाढत जाते.

इतर लोक जेव्हा दुःख, वेदना, राग, यांनी बेजार झालेले असतात, तेव्हा सकारात्मक व्यक्ती यातून मार्ग काढण्याचा विचार करीत असते. या लोकांकडे अमर्याद उर्जा व प्रेरणा असते. कठीण परिस्थितीत ते आत्मविश्वासाने पुढे जातात व यशस्वी होतात.

५. पॉझिटिव्ह थिंकिंग तुमची स्व-प्रतिमा उजळून टाकते

सकारात्मक विचारसरणीचे लोक स्वतःबद्दल नेहमी चांगली भावना ठेवतात. त्याच्या मनात तेजस्वी स्व-प्रतिमा असते. असे लोक, स्वतःमध्ये जे आहे ते पुढे आणतात. जे नाही त्याबद्दल वाईट वाटून घेत नाहीत. त्यांच्या व्यक्तीमत्वात काही कमी असले तरी त्यांच्यात न्यूनगंड नसतो. ते नेहमी आत्मविश्वासाने वावरतात.

नकारात्मक लोक स्वतःबद्दल नाखूष असतात. थोडे जरी वाईट झाले, काही त्रास झाला तरी स्वतःला दोष देतात. त्यांची स्व-प्रतिमा डागाळलेली असते. मग असे लोक जीवनात कसे यशस्वी होणार?

जेव्हा आपण स्वतःवर खूष असतो, तेव्हा जग सुंदर दिसते. आपला दृष्टिकोन विशाल होतो. इतरांचे दोष डोळ्याआड करता येतात. इतरांचाही तुमच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक मोठ्या व्यक्तिमत्वाचा माणूस अशी तुमची प्रतिमा निर्माण होते.

६. पॉझिटिव्ह थिंकिंग नातेसंबंध व मैत्री दृढ करते.

वरील सर्व गोष्टी एकत्र आल्यावर दृढ नातेसंबंध व मैत्री निर्माण न झाली तरच नवल. सकारात्मक विचारसरणी छोटे छोटे दुरावे दूर करून माणसामाणसातील प्रेमसंबंध वाढविते.

नकारात्मक व्यक्तीचा दृष्टिकोन संकुचित असतो. त्यांची इतरांबद्दलची भावना पूर्वग्रहदूषित असते. त्याच्या स्वतःबद्दल व इतरांबद्दल विचित्र कल्पना असतात. नकारात्मक विचार करून अनेक जण जवळच्या नातेवाईकाना दुरावतात.

इतरांमधील चांगल्या गोष्टी पहिल्या तर आपोआपच मैत्री व जवळीक निर्माण होते. सकारात्मक व्यक्ती शक्यतो मोठे गैरसमज करून घेत नाही. काही गैरसमज झाले तरी मोकळेपणाने बोलून टाकतात. माणसामाणसातील प्रेमसंबंध ही खूप मोठी गोष्ट आहे हे त्यांना सहजच पटते. हे लोक जीवन उदात्त करण्याला महत्त्व देतात.