आपत्ती व्यवस्थापनाच्या परिभाषेत हिट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती ( सायलेंट डिझास्टर) आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तपमानापेक्षा वातावरणातील तपमान ३ डिग्री सेल्शियसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान सलग दोन दिवसांसाठी ४५ डिग्री सेल्शियस पेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे, असे म्हटले जाते.
वातावरणात होणाऱ्या बदलामुळे, हरित गृहवायू परिणामामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. भारताच्या उत्तर भागात दरवर्षी ५ ते ६ उष्णतेच्या लाटा येतात. हे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढताना दिसते आहे. १९९२ ते २०१५ या काळात भारतात उष्णतेच्या लाटेमुळे २२, ५६२ लोकांनी आपला जीव गमावला आहे. माणसांबरोबरच पक्षी, प्राणी, वनस्पती यांची होणारी हानी मोठी आहे. साधारणपणे मार्च ते जून या मान्सूनपूर्व काळात या उष्णतेच्या लाटा येताना दिसतात. वातावरणाचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस असते तो पर्यंत मानवाला त्याचा काही त्रास होत नाही मात्र त्या नंतर मात्र मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो. उदाहरणार्थ प्रत्यक्ष तापमान ३४ डिग्री सेल्सियस असेल पण आर्द्रता ७५ टक्के असेल तर तापमान निर्देशांक ४९ डिग्री सेल्सियस इतका असतो म्हणजे व्यक्तीला ते तापमान ४९ डिग्री सेल्सियस इतके त्रासदायक ठरते.
या प्रकारे उष्णतेच्या लाटेमुळे होणारी जीवितहानी लक्षात घेता उष्णतेमुळे होणारी हानी टाळण्याकरिता हिट अॅक्शन प्लान अर्थात उष्मा प्रतिबंधक कृतियोजना ही एक महत्वाची बाब आहे. प्रत्येक जिल्हा आणि शहर या अनुषंगाने आपला हिट ॲक्शन प्लॅन तयार करते.
जनतेला संभाव्य उष्णतेच्या लाटेची आगाऊ कल्पना देण्यासाठी हवामान खात्याच्या मदतीने एक यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे आणि असे इशारे विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मेसेजपासून टीव्हीपर्यंत अनेक माध्यमे वापरण्यात येतात.
सर्वसामान्य लोकांना हे इशारे सहज समजावेत या करिता कलर कोडिंगची कल्पना वापरण्यात येते. उदाहरणार्थ …
पांढरा रंग…
सर्वसामान्य दिवस ( नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा कमी तापमान)
पिवळा अलर्ट…
उष्ण दिवस ( जवळपास नेहमीच्या कमाल तापमानाएवढे तापमान)
केशरी अलर्ट…
उष्णतेची मध्यम स्वरुपाची लाट (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा ४ ते ५ डिग्री सेल्सियस जास्त तापमान )
लाल अलर्ट…
अत्यंत उष्ण दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा ६ डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान )
अतिजोखमीच्या व्यक्तींची विशेष काळजी…
उष्णतेच्या लाटेचा त्रास कोणत्या व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक आहे , हे लक्षात घेणे देखील आवश्यक आहे. उष्मा खाली नमूद केलेल्या व्यक्तींना अधिक त्रासदायक ठरु शकतो.
उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारी माणसं…
* ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले.
* स्थूल लोक, अयोग्य कपडे घातलेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक.
* गरोदर महिला.
* अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक.
* काही विशिष्ट औषध उपचार सुरू असलेली माणसं.
* निराश्रित, घरदार नसलेली गरीब माणसं.
या अतिजोखमीच्या लोकांची उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. उष्णतेमुळे होणारा शारिरिक त्रास मुख्यत्वे किरकोळ स्वरुपाचा त्रास किंवा गंभीर स्वरुपाचा त्रास या प्रकारचा असतो. किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा असतो तर गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश होतो. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. साधारणपणे उष्णतेमुळे होणारा त्रास आणि त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही खालील तक्त्यात नमूद करण्यात आलेली आहे.