वजनावर नियंत्रण ठेवा.
शरीरात चरबी अधिक असेल, विशेषत: पोटाच्या भागात चरबी साठून राहिली असेल तर इन्सुलिन तयार करण्यास शरीराकडून होणारा प्रतिकार वाढू शकतो. यामुळे टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता असते.
नियमित व्यायाम करा.
दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. दररोज साधारण प्रकारची शारीरिक हालचाल केल्यास वजन नियंत्रणात राहते. रक्तशर्करेचे प्रमाण कमी होते आणि रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलमध्येही सुधारणा होते.
समतोल, सकस आहार घ्यावा.
तुमच्या आहारातील चरबीयुक्त पदार्थ कमी करावेत. विशेषत: सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट्स टाळावेत. फळं, भाज्या आणि तंतुमय पदार्थ असलेला आहार घ्यावा. आहारातील मीठ कमी करावं. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठ, चरबी आणि कॕलरीज अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे ताजे घटक वापरून घरी तयार केलेल पदार्थ खाण्यावर भर असावा.
मद्यपान मर्यादित करावं आणि धुम्रपान सोडून द्यावं.
मद्यपान केल्याने वजन वाढतं आणि तुमचा रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढते. पुरुषांनी दिवसाला केवळ दोन प्रमाणित ड्रिंक्सपेक्षा अधिक मद्यसेवन करू नये आणि महिलांनी एका प्रमाणित ड्रिंकपेक्षा अधिक मद्यसेवन करू नये.
रक्तदाबावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम, समतोल आहार आणि संतुलित वजन ठेवून बहुतेक जण हे साध्य करू शकतात. काही जणांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्यावी लागू शकतात.
नियमित तपासणीसाठी डॉक्टरांची भेट घ्या.
तुमचे वय जसजसे वाढते तसतसं तुमच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण, रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टरॉलच्या पातळीची तपासणी करणं हितावह आहे.
पदार्थांमधील छुपे धोके टाळा
घरातील पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर स्वयंपाक करताना थकवा येत असल्यामुळे तयार आणि रेडी-टू-ईट पदार्थांवर अधिक भर देण्यात येतो. एकल किंवा विवाहित, जे बाहेरील पदार्थांवर अवलंबून आहेत, त्यांना आरोग्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात भेडसावू शकतात.
तुम्हाला ट्रान्सफॅटबद्दल माहिती आहे का? तुम्ही सेवन करत असलेल्या बहुतेक पदार्थांमध्ये ट्रान्सफॅट असतात, जे आरोग्यासाठी अपायकारक असतात. ट्रान्स-फॅटमुळे हृदयविकार आणि मधुमेह जडण्याचं प्रमाण वाढतं असं संशोधनाअंती आढळून आलं आहे. ट्रान्सफॅट हे हायड्रोजनित फॅट्स (चरबी) असतात. चरबीच्या पेशी या कार्बन आणि हायड्रोजनच्या साखळीने दुहेरी बंधांतून गुंफले गेलेले असतात. हायड्रोजनित चरबीमध्ये तळलेले पदार्थ अधिक काळ टिकतात. ते अधिक कुरकुरीत होतात आणि तूपाच्या तुलनेने स्वस्त असतात. त्यामुळे डालडा पिढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिढीचे यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. घरात, खानपानसेवा केंद्रांमध्ये आणि बेकरीमध्ये त्याचा मुबलक प्रमाणात वापर करतात. वेफर, कूकीज, बिस्किटं, केक, पिझ्झा, मेवामिठाई नमकीन आणि इतर चमचमीत पदार्थांमध्ये ट्रान्सफॅट असतात. व्यावसायिक पातळीवर तयार करण्यात येणाऱ्या बहुतेक पदार्थांमध्ये ट्रान्सफॅट कमी-अधिक प्रमाणात असतात. हायड्रोजनित वनस्पती तेल, प्रक्रिया केलेले अन्न, प्रि-मिक्स्ड पदार्थ, प्रि-मिक्स्ड चिकन, गोठवलेले पदार्थ, मायक्रोवेव्ह पदार्थ, पाव आणि रेडी-टू-ईट (तयार पदार्थ) यामध्ये ट्रान्स फॅट असतात.
संशोधनात असं आढळून आलं आहे की, भारतीयांच्या शरीरात साचणारे ८०% ट्रान्स फॅट रस्त्यावरील खाद्यपदार्थांमधून जमा झालेले असतात. म्हणजेच चाट, सामोसे, जिलबी, भजी विकणारे खाद्यपदार्थ विक्रेते ट्रान्सफॅट खाऊ घालत असतात ही चिंतेचीच बाब आहे!