भारताच्या जडणघडणीत महात्मा गांधींचे योगदान
व्यक्ती विकास व जडणघडणीत जसे राष्ट्राचे योगदान असते तद्वतच राष्ट्र निर्मिती व राष्ट्र घडणीमध्ये अनेक व्यक्तीचे, व्यक्तिमत्वाचे विचारांचे व कार्याचे योगदान महत्वपूर्ण भूमिका बजावते. भारताच्या इतिहासात देखील वेगवेगळ्या कालखंडात राष्ट उभारणीत विविध व्यक्तीचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. प्राचीन काळापासून आजतागायत भारताची निर्मिती अनेकांच्या विचार व श्रमाचे फलित आहे त्यातीलच एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून भारतीय राष्ट्रीय आंदोलनाचे नेते, स्वातंत्र्य लढ्याचे प्रमुख व राष्ट्रवादी चळवळीला जनसामान्याची चळवळ बनविणारे लोकनेते महात्मा गांधी हे होय.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते व तत्वज्ञ महात्मा गांधी हे होते. अहिंसात्मक असहकार आंदोलनाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. शतकानुशतके दडपल्या गेलेल्या भारतीयांना निर्भय बनवून त्यांच्यातील नैतिक शक्ती व आत्मविश्वास जागृत करून ब्रिटीश अधिसत्तेविरुध्द् लढयाकरिता त्यांना कटीबध्द् करणारे राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व यशस्वी पणे करणारे, केवळ भारतालाच नव्हे तर हिंसाचार, विध्वस, विनाश, यामुळे भयग्रस्त झालेल्या जगाला सत्य अहिंसा व शांती याचा मौलिक संदेश देऊन मानवी कल्याणाचा मार्ग दाखविणारे महान राजकीय संत म्हणून भारताच्या इतिहासात गांधींचे नाव अजरामर झालेले आहे. महात्मा गांधींचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते, त्यांनी आपल्या आयुष्यातील ५५ वर्षे भारताच्या सेवेत घालवली. सन १९२० ते १९४७ या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडास गांधीयुग या नावाने ओळखले जाते. ब्रिटीश राजवटीत भारताची अस्मिता धुळीस मिळाली होती, तसेच भारताचा स्वाभिमान व चैतन्य हरवले होते. अशा परिस्थितीत गांधींनी भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
भारताच्या उभारणी संदर्भात अनेक महत्वपूर्ण भारतीय व्यक्तीमत्वानी आपले जीवन अर्पण केले. त्यामध्ये महत्मा गांधींच्या योगदानाबद्दल विशेषत्वाने चर्चा होते. जागतिक प्रश्नाबाबत गांधीं हे किती मोठ्या प्रमाणात प्रासंगिक आहेत तसेच त्यांनी हिंद्स्वराज्य मध्ये मांडलेले विचार हे आजच्या जगातील प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कसे मार्गदर्शक आहेत. यावर नेहमी चर्चा होते पण स्वातंत्र्यपूर्व व वर्तमान भारताच्या जडणघडणीच्या तसेच राष्ट्र उभारणीच्या संदर्भात त्यांनी केलेल्या योगदानाची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत नाही. ब्रिटीश राजवटीत भारतीयांना अन्यायी, अत्याचारी, आणि दडपशाही सारख्या धोरणाचा बडगा होता, तसेच सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा अभाव असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीत देखील गांधींनी ज्या कल्पकतेने व समर्पकतेने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याच बरोबर एकात्म भारत उभारणीसाठी कोणत्या प्रकारचे योगदान गांधींनी दिले? गांधीनी भारताच्या जडणघडणी संदर्भात दिलेल्या योगदानाची चर्चा एका शोध निबंधात करणे शक्य नाही म्हणून शोध निबंधाच्या सोयीसाठी यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील काही महत्वपूर्ण घटना, राष्ट्रीय ऐक्यात महात्मा गांधींची भूमिका, गांधींचा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, गांधींची विधायक कार्यामागची भूमिका आणि भारतीय राज्यघटनेत गांधीं पुरस्कृत तत्वे या सर्व घटकाच्या चर्चा विषय अनुषंगाने प्रस्तुत शोध निबंधात करण्यात आलेली आहे.
- भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि महात्मा गांधींची भूमिका:-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गांधींच्या कार्याला सुरवात १९१५ पासून झाली असेच म्हणावे लागेल कारण त्यांनी प्रत्यक्ष अखिल भारतीय राजकारणात १९२० मध्ये प्रवेश केला असला तरी भारतात आल्यानंतर सुरुवाती पासूनच स्थानिक प्रश्नावर आपले लक्ष केंद्रित केले चंपारण व खेडा जिल्ह्यात अनुक्रमे मळेवाले व शासन यांनी केलेल्या जुलमाविरुध्द झगडा करून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिवून दिला. अहमदाबाद मधील गिरणीकामगारांचा लढा त्यांनी आपल्या सत्याग्रही पध्दतीने यशस्वीरित्या चालवून सत्याग्रहाची महता जनतेसमोर आणली. पहिल्या महायुद्धापूर्वी भारतातील साम्राज्याविरोधी चळवळ बहुशी उच्चवर्णीय बुध्दीजीवी मध्यमवर्गीयापुरती मर्यादित राहिली होती शेतकरी व कामगार व ब्राह्मणेत्तर आणि दलित असे अनेक गट कांग्रेसच्या राजकारणापासून दूर राहिले होते. चंपारण खेडा आणि अहमदाबाद मधील घडामोडीनंतर महात्मा गांधी हे सर्वसामान्याचे पुढारी म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात निर्माण झाली.
ब्रिटीश साम्राज्याचा एक अविभाज्य घटक म्हणून भारतात जबाबदार शासनपध्दती क्रमाक्रमाने स्थापना करण्याचे उद्दिष्टे भारतमंत्री मान्टेग्यू यांनी युध्दकाळात जाहीर केले होते. परंतु रौलेक्ट् कायद्याने भारतीयाची घोर निराशा केली या कायद्याने लोकांच्या मुलभूत हक्कावर गदा येत असल्याने त्याला विरोध करणे आवश्यक होते असे गांधींचे मत होते, म्हणून १९१९ साली त्यांनी सत्याग्रह सभेची स्थापना केली आणि बंदी घातल्या गेलेल्या लिखाणाची विक्री करून हा कायदा मोडण्यास लोकांना प्रवृत्त केले.
गांधीप्रणीत अहिंसात्मक असहकाराचा कार्यक्रमाने १९२० साली भारतीय राजकीय अन्यायाविरुध्द सामुदायिक प्रतिकाराच्या चळवळीला प्रारंभ झाला. “इंग्रजांचे भारतातील साम्राज्य केवळ शस्त्रास्त्राच्या बाबतीतील त्याच्या श्रेष्ठतेवर आधारलेले नाही, तर भारतीय लोकांनी त्यांना दिलेल्या सहकार्यामुळे इतकी वर्षे टिकून राहिले आहे जर हे सहकार्य काढून घेतले तर ब्रिटिशांना एक दिवस हि राज्य चालविता येणार नाही असा गांधींचा युक्तिवाद होता”१ गांधींनी ब्रिटिशांना शासन चालविताना ज्या ज्या गोष्टी सोयीस्कर होत्या त्या सर्व गोष्टीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन जनतेला केले. गांधींचा असहकाराचा मार्ग हा सत्य अहिंसा यावर आधारलेला असल्यामुळे या आंदोलनात सर्व समाजातील स्त्री पुरुषांनी हिरहिरीने भाग घेतला. महात्मा गांधीनी सामान्य माणसातील भयगंड नष्ट करून त्यांना वीरपुरुष बनविण्याची हि जी किमया गांधीनी करून दाखविली त्यातच त्यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचे रहस्य आहे. असहकार चळवळ हि शहरी भागापुरती मर्यादित न ठेवता ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याचे व्यापक कार्य गांधींनी केले यातूनच त्यांच्या सखोल योगदानाची प्रचीती आपणास येते
गांधींचे उच्चतम यश भारत छोडो चळवळीत होते असे काहीच मत असले तरी १९३०-१९३३ च्या दरम्यान गांधींनी चालवलेल्या कायदेभंगाच्या चळवळीच्या ते खऱ्या अर्थाने कर्तुत्वाच्या शिखरावर होते. कायदेभंगाच्या चळवळीत सर्वसामान्य जनतेने अहिंसा आणि स्वदेशीचा वापर या गांधींच्या तत्त्वप्रणालीचा पुरस्कार केला. कायदेभंगाच्या चळवळीचा प्रांरभ मिठाच्या सत्याग्रहापासून झाला. १२ मार्च १९३० ला सविनय कायदेभंगाचा एक भाग म्हणून मिठावरील जाचक कराच्या विरोधात आवाज दिला. सविनय कायदेभंगाच्या चळवळीने भारताला लगेच स्वातंत्र्य मिळाले नाही तरी पण एका सामर्थ्यशाली सत्तेचा शेवट करण्याच्या हेतूने हा फार मोठा धक्का ठरला. गांधींच्या या अहिंसक लढ्यात लाखो भारतीय एका निष्ठेने, ध्येयाने प्रेरित होऊन त्याच्या शिकवणीचे तंतोतंत पालन करून स्वातंत्र्य लढ्यात उतरले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निर्णायक लढा म्हणजे १९४२ चे भारत छोडो आंदोलन होय मे १९४२ ला अहमदाबादच्या राष्ट्र्सभेच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी सांगितले कि, हिंदुस्तान स्वातंत्र्य आपल्या स्वबळावर मिळवेल व टिकवेल” गांधीनी तेव्हापासून ‘भारत छोडो’
(चलेजाव) चळवळीस प्रारंभ केला. हि चळवळ ८ ऑगस्ट १९४२ पासून प्रारंभ झाली. महात्मा गांधीना बिर्ला भवन येथे त्यांच्या शेकडो अनुयायासह अटक करण्यात आली. या घटनेमुळे चलेजाव चळवळीचा प्रसार अल्पशा काळात भारतभर झाला. महात्मा गांधीनी चलेजाव चळवळीच्या यशस्वीतेसाठी १२ कलमी राबविला. यामध्ये हरताळ, सभा घ्याव्यात, मिठाचे कायदे मोडणे, ग्रामीण जनतेने असहकार करावा, तरुणांनी नोकऱ्या शाळा व महाविद्यालये सोडावी असे अनेक आव्हाने या १२ कलमी कार्यक्रमात गांधींनी केली होती. गांधीनी जो जनतेसमोर ठेवलेला कार्यक्रम होता तो व्यापक तर होताच पण त्याच बरोबर सत्य अहिंसा या त्याच्या शाश्वत मूल्याशी तादाम्य पावणारा होता. एकंदरीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील गांधी पुरस्कृत आंदोलने हे सत्य अहिंसा याची कस धरणारे होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
- राष्ट्रीय ऐक्यात महात्मा गांधींची भूमिका:-
भारतात इंग्रज येण्यापूर्वी भारतीय समाज हा विविध धर्म, भाषा, पंथ, जाती आणि छोटी-छोटी राज्य-संस्थाने यात विभागला होता. इंग्रजांचे साम्राज्य भारतात निर्माण झाल्यानंतर इंग्रजांविरुध्द चालू असलेल्या राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीच्या संघर्षात यश मिळविण्यासाठी भारतातील वेगवेगळ्या गटाची अभंग एकजूट निर्माण होण्याची आवश्यकता होती. हि तत्कालीन नेते व समाजचिंतक यांच्यापुढील सर्वात ज्वलंत समस्या होती. ब्रिटीश हे भारतीय समाजात फुट पाडण्याचे षढयंत्र तयार करीत होते,. उदा. बंगालीची फाळणी तसेच मुस्लीम लीगच्या स्थापनेला खतपाणी घालून १९०९ च्या कायद्यात मुस्लिमांना वेगळे प्रतिनिधित्व देण्याची तरतूद केली. ब्रिटिशांनी आपले साम्राज्य टिकविण्यासाठी भारतीय समाजात विशेषत हिंदू-मुस्लीम फुट पाडण्याची एकही संधी दवडली नाही, त्याचबरोबर हिंदू समाजातील अस्पृश्य जातींना विभक्त मतदारसंच्या माध्यमातून वेगळे करण्याचे ब्रिटीशांचे कारस्थान, एकंदरीत ब्रिटिशाविरुध्द राजकीय व सामाजिक ऐक्याचा लढा देण्यासाठी गांधीनी विधायक कार्य हाती घेतले. धर्म, जाती, भाषा, आणि वाढती आर्थिक विषमता यांनी विभागल्या गेलेल्या या समाजात एकराष्ट्रीयत्वाची भावना कशी निर्माण करावयाची हाच येथील नेते व समाजचिंतक यांच्यापुढील एक महत्वाचा प्रश्न होता. धर्मनिरपेक्ष शासन, लोकशाही जीवनपध्दतील व्यक्तीचे मुलभूत हक्क सर्व माणसाची समानता, समाजिक न्याय अहिंसा आणि सामंजस्य अशा मुलभूत तत्वाच्या आधारे येथील राजकीय आर्थिक व सामजिक जीवनाची पुनर्बांधणी केल्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य प्रस्थापित होणार नाही गांधीनी ओळखले होते. “हिंदू-मुस्लीम ऐक्य, स्पृश्य-अस्पृश्य, शहरी व ग्रामीण, श्रीमंत व गरीब यांच्यातील दुरावा नाहीसा करून त्यांना एकाच राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेण्याच्या दृष्टीने महात्मा गांधींनी आपल्या विषयक कार्यक्रमाची आखणी केली”२ संपूर्ण मानवजातीच्या व सर्व देशाच्या मुलभूत ऐक्यावर त्यांची श्रध्दा होती. थोडक्यात तत्कालीन परिस्थितीत महात्मा गांधींचे भारतात राजकीय व सामाजिक ऐक्य साधण्यात महत्वपूर्ण योगदान राहिले आहे, त्यांनी तयार केलेला रचनात्मक कार्यक्रम हा वर्तमान भारताच्या प्रगतीसाठी व उथानासाठी महत्वपूर्ण आहे. भारताचे ऐक्य अधिक मजबूत करण्यासाठी गांधींचा सर्वधर्मसमभाव व धार्मिक सहिष्णुचा दृष्टीकोन उपयुक्त आहे.
- गांधींचा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद:-
भारतातील निरनिराळ्या धर्माच्या व जातीच्या लोकांमध्ये ऐक्य घडवून आणण्याच्या हेतूने राष्ट्र्साभेच्या स्तपांपासून तिची उभारणी धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयत्वाच्या पायावर करण्यात आली होती, गांधींनीही याच तत्वाचा पाठपुरावा करून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सर्व धर्मियांना सोबत घेऊन लढा दिला. गांधीच्यामते “जे जे कोणी येथे जन्मले आणि वाढले आणि ज्याची दृष्टी दुसऱ्या कोणत्याही देशाकडे नाही अशा सर्व लोकांचा हा भारत देश आहे म्हणून तो जितका हिंदूंचा, तितकाच पारश्यांच्या आहे, इस्त्राइलांचा आहे. हिंदी ख्रिश्चनांचा आहे, मुसलमानाचा आहे आणि अन्य सर्व अहिंदूचा आहे. स्वातंत्र्य भारताचे राज्य हे हिंदू राज्य होणार नाही ते भारतीय राज्य होईल तो कोणा एका धर्मपंथाचा किंवा जमातीच्या बहुमताचे असणार नाही तर कोणताही धर्मभेद न मानता अखिल भारतीय नागरिकांच्या प्रतिनिधित्वाचे ते राज्य असेल”३ असे त्यांनी पुन;पुन्हा आवर्जून सांगितले. धर्मनिरपेक्ष नागरिकत्व, धर्ममत, उपासना, प्रचार आणि आचार यांचे स्वातंत्र्य आणि धर्म व शासन याची फारकत हि आधुनिक इहवादी शासनाच्या संकल्पनेची तीन प्रमुख लक्षणे मानली जातात. गांधींनी आपल्या भाषणातून व लेखामधून या तिन्ही तत्वांचा पुरस्कार केलेला आहे. कराची येथे १९३१ साली भरलेल्या राष्ट्र्सभेच्या अधिवेशनात मुलभूत हक्क आणि आर्थिक धोरण यासंबंधीचा जो ठराव करण्यात आला. या ठरावामागील मूळप्रेरणा जवाहरलाल नेहरू यांची असली तरी त्याचा मसुदा गांधीच्या संमतीनेच तयार करण्यात आला होता आणि गांधींच्या पाठींब्यामुळेच या अधिवेशनातील प्रतिनिधीची आणि देशातील शेकडो कॉंग्रेस कार्यकर्त्याची त्याला मान्यता मिळाली. भारत स्वातंत्र्य राष्ट्र झाल्यानंतर जी राज्यघटना येथे अस्तित्वात येईल तिच्यानुसार भारतातील सर्व नागरिकांचे हक्क व जबाबदाऱ्या सारख्या राहतील, शांतता, सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्ता यांना बाधा येणार नाही अशी खबरदारी घेउन धर्माच्या बाबतीत शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही असे या ठरावान्वये राष्ट्रसभेने येथील लोकांना आश्वासन दिले. या ठरावातील तत्वे जनमानसात रुजावी या दृष्टीने गांधीं सतत प्रयत्नशील राहिले. देशातील सर्व लोक जरी एकाच धर्माचे असले तरी शासनाला स्वताचा धर्म असू नये करणा धर्म हि प्रत्येकाची खाजगी बाब आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हि म्हण धर्माच्या बाबतही लागू पडते प्रत्येक व्यक्तीची परमेश्वराबाबतची संकल्पना वेगवेगळी असते म्हणून शासनाने धार्मिक बाबतीत तटस्थ राहणेच समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक असे विचार गांधी वेळोवेळी प्रकट केले आहेत. भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यापाठीमागे महात्मा गांधीचा स्वातंत्र्यपूर्व कालीन धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा लढा महत्वपूर्ण ठरतो.
- गांधींची विधायक कार्यक्रमा मागची भूमिका:-
ब्रिटीशांच्या दास्यातून भारतवर्षाला मुक्त करण्यासाठी जो १०० हून अधिक वर्षे दीर्घकाळ लढा व आंदोलन चालू होते, त्यात महात्मा गांधींचे कार्य व स्थान फार उच्च दर्जाचे होते. राजकीय स्वातंत्र्य इतकीच गांधींना समाजाच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ होती. गांधींची स्वराज्याची व स्वातंत्र्याची कल्पना उथळ वरवरची नव्हती तर मूलगामी वास्तव आणि तसेच तत्वज्ञानही शुध्द होते.
गांधींच्या मते, “राजकीय सत्ता ब्रिटीशांच्या हातून काढून घेऊन ती भारतीयांच्या हाती घेणे एवढाच स्वातंत्र्याचा अर्थ अमाज्ने हे संकुचितपणाचे ठरेल. केवळ एकाच्या हातून दुसऱ्याच्या हाती सत्ता जाणे हे स्वातंत्र्याचे व स्वराज्याचे खरे लक्षण किवा अर्थ समजणे रास्त ठरणार नाही तसेच भारतीयांच्या स्वराज्य आणि स्वातंत्र्य हाती आले म्हणजे सर्व काही आपोआप ठीक होईल व आपले दैन्य, दारिद्र्य दुर्दशा नष्ट होईल अशा भ्रमात राहू नये”४ असा त्यांनी त्याच काळी इशारा दिला होता आपणास आता हे स्वातंत्र्य मिळत आहे ते केवळ राजकीय स्वातंत्र्य आहे. इंग्रज भारतातून गेले कि आपल्या सुखसोयी वाढतील आणि विधायक कार्याची गरज राहणार नाही आहे कोणी मानु नये असे गांधींचे मत होते. “गांधीनी स्वातंत्र्य पूर्व काळात भारताच्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने भावी राष्ट्राच्या उभारणीसाठी विधायक व्रते हाती घेतले. त्याच्या विधायक कार्यक्रमात त्यांनी विचारपूर्वक खालील गोष्टी लोकांनी करण्यासाठी समावेश केला होता त्या गोष्टी किवा कार्यक्रम असे होते. १) जातीय ऐक्य २) अस्पृश्यता निवारण ३) दारूबंदी-व्यसनबंदी ४) खादी तयार करणे व वापरणे ५) पूर्वापार चालत आलेले व घरोघरी चालविले जाणारे छोटे छोटे कुटिरोद्योग या व्यतिरिक्त ग्रामसफाई, आरोग्याचे शिक्षण, स्त्रियांची मुक्ती, शेतीविषयक ज्ञान अशा अनेक मानवाला स्वावलंबी करणाऱ्या गोष्टीचा समावेश या विधायक व्रतात होता.”५ हे सर्व विधायक कार्य भारताची अनेकांगी दुर्दशेतून सुटका करून भारताला स्वावलंबी, स्वयपुर्ण व सामर्थ्यवान बनवण्यासाठी आवश्यक असे होते व अजूनही आहेत. गांधींनी प्रतिपादित केलेली विधायक कार्याची कल्पना व उपपत्ती जगाच्या इतिहासात अभूतपूर्व ठरणारी आहे.
- भारतीय राज्यघटनेत गांधीं पुरस्कृत तत्वे:-
भारतात घटनात्मक लोकशाही अस्तित्वात यावी असा आग्रह धरला त्यात महात्मा गांधी प्रमुख होते. राज्यघटना कशी असावी आणि उद्याची भारतीय समाजव्यवस्था कशी असावी याबद्दल त्यांची स्वताची काही मते होती. स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींचे नेतृत्व जरी कॉंग्रेसने स्वीकारले तरी त्यांची राज्यघटने बदलची सर्वच मते कॉंग्रेसने स्वीकारली नव्हती. भारताच्या राज्यघटनेबद्दल आपली मते गांधीनी स्वतंत्रपणे एकाच ठिकाणी सांगितलेली नाहीत. त्यांच्या मनात भारताच्या राज्यघटनेचे स्वरूप विखुरलेले आहे ते सर्व एकत्र करून आपल्याला लक्षात घ्यावे लागते. घटनात्मक लोकशाही हि कल्पना गांधीना मान्य होती पण हि आपल्या देशातील परिस्थितीप्रमाणे वेगळ्या प्राधान्याची राज्यघटना भारताला असावी असा त्यांचा आग्रह होता देशाला निश्चित दिशा दर्शविणारा असा दस्तऐवज असावा पण तो दर निवडणुकीगणिक कि दर पिढीगणिक वेगळी दिशा मिळू शकणारी अस्थिर व्यवस्था त्यांना नको होती. भारतात घटनात्मक व्यवस्था अस्तित्वात आली यांचे थोडेसे श्रेय म्हणून गांधीना जाते.
“महात्मा गांधीना राज्यघटने संदर्भात अभिप्रेत असणाऱ्या गोष्टीबद्दल मसुद्याच्या चौथ्या भागात कलम ३६ ते कलम ४०, मध्ये समावेश करण्यात आला त्या पुढील प्रमाणे.
- ग्रामपंचायती स्थापन करणे आणि त्यांना व इतर पंचायातीना (जसे नगरपंचायत किवा किवा जिल्हा पंचायत) अधिकार देणे.
- खेड्यांना स्वायत्त बनवण्याच्या दृष्टीने एक प्रयत्न म्हणून कुटिरोद्योगाना प्रोत्साहन देणे.
- दारूबंदी आणि इतर मादक पदार्थावर बंदी घालण्याचा प्रयत्न करणे.”६
संपूर्ण गो हत्या प्रतिबंध करण्याची गांधींची मागणी घटनेत समाविष्ट झाली नाही पण ४८ व्या कलमात गोहत्या आणि इतर दुभत्या जनावरांची हत्या थांबवण्यासाठी कायदे केले जातील असा आहे. एकूणच घटनेचे स्वरूप गांधींच्या विचारा प्रमाणे असावे असे झाले तरी राज्याच्या मार्गदर्शक तत्वात वरील तीन गोष्टीचा समावेश करून घेण्यात गांधी विचाराच्या पुरस्कर्त्यांना काही प्रमाणात यश मिळाले. प्रौढ मताधिकाचा कॉंग्रेसने आणि गांधीनी आग्रह धरला होता. प्रौढमताधार याचा अर्थ देशातल्या प्रत्येक प्रौढाला मताचा अधिकार असेल व त्या मताच्या द्वारे तो आपल्या प्रतिनिधीची निवड असा आहे. विधिमंडळे याचप्रमाणे सरळ निवडणुकीने निवडली जातील हे हि कॉंग्रेसच्या धोरणात ग्रहीत होते कॉंग्रेस चे धोरण अनेक वेळा ठरावाद्वारे, निवेदनद्वारे आणि इतर मार्गांनी प्रगट झाले होते व गांधी हि त्या प्रक्रियेत भागीदार होते.
राज्यघटनेतील आणखी दोन महत्वाच्या गोष्टीबद्दलचे काही श्रेय गांधींना जाते. “अस्पृश्यतेसारख्या अमानुष रूढी विरुध्द लोकजागृती करण्यात महात्मा गांधींचा मोठा सहभाग होता त्याच्याच आग्रहामुळे कॉंग्रेसच्या कार्यक्रमात अस्पृश्यता निवारण कार्याचा समावेश झाला होता. ज्यांना या अमानुषतेची झळ बसत होती त्या वर्गातून डॉ आंबेडकरासारखे नेतेही निर्माण झाले व त्यांनीही चळवळी उभारून संघर्षाला प्रारंभ केला, या सर्व गोष्टीचा एकत्रित परिणाम म्हणून अस्पृश्यता जो स्वतंत्र्य भारतात शिल्लक राहता कामा नये राज्यघटनेत अस्पृश्यता नष्ट करण्या संदर्भात अस्पृश्यता पाळणे गुन्हा असेल असे जाहीर करणारे १७ वे कलम समाविष्ट झालेले आहे”७
राज्यघटनेच्या प्रास्ताविकात देशातील सर्व नागरिकांना राजकीय आर्थिक आणि सामाजिक न्यायाचे आश्वासन देण्यात आले तसेच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुलत्रयीला व्यवस्थेचा आधार मानण्यात आले आहे या सर्व बाबी महात्मा गांधी आणि कॉंग्रेस या दोघांनी आग्रह धरलेल्या आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्वाच्या मानल्या होत्या. घटनेत त्यांचा अंतर्भाव होणे यांचे श्रेय इतिहास, जगभर झालेली जागृती या सर्वाना तर आहेच पण त्याचबरोबर ते गांधींच्या नेतृत्वालाही दिले पाहिजे. आधुनिक भारताच्या इतिहासात शांततामय आणि सनदशीर चळवळीत महात्मा गांधीचे स्थान हे सर्वोच्य आहे. महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सत्य अहिंसा या शाश्वत मुल्यांचा सत्याग्रहाच्या माध्यमातून वापर करून स्वातंत्र्य चळवळ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवली, आणि राजकारणाला लोकाभिमुख करण्याचे महत्वपूर्ण कार्य गांधीनी केले. राष्ट्रीय ऐक्य घडवून आणण्यासाठी व राष्ट्रीय उभारणीसाठी धार्मिक सलोख्या संबधीचे गांधींचे विचार हे मौलिक आहेत. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून संबोधले जाते यापाठीमागे गांधींचे योगदान हे महत्वपूर्ण आहे. गांधीनी विधायक कार्याच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीला व्यापक दिशा दिली तसेच भावी राष्ट्र उभारणीच्या कार्याची मुहर्तमेढ रोवली. त्याच बरोबर भारतीय राजकीय व्यवस्थेच्या जडणघडणीत गांधी विचारांचा प्रभाव दिसतो
सदरील लेख माहितीस्तव आहे तरी हा लेख प्रकाशित करू नये …..