टरबूज ऊर्फ कलिंगड हे एक मोठे, हिरव्या रंगाचे, लाल पाणीदार गोड गर असणारे फळ आहे. या वनस्पतीला संस्कृतमध्ये काालिन्द असे नाव आहे . शास्त्रीय नाव सिटरूलस लेनेटस (Citrullus lanatus)असे आहे. हे फळ उन्हाळ्यात मिळते. गोड टरबूज ओळखण्यासाठी टरबूज हातात घेऊन त्याच्या पाठीवर थाप मारून पाहतात. पिकलेल्या टरबुजातून प्रतिसादात्मक कंपने निर्माण होतात. कालिन्द (संस्कृत), तर्बुज (हिंदी), तर्मुज (बंगाली), तर्बुजि (तेलुगू), बचंग (कोंकणी), कलिंगड (मराठी) अशा विविध नावांनी हे फळ संबोधले जाते. कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत, कमी खर्चात, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेलवर्गातले पीक आहे. त्याला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते. आरोग्यवर्धक, व्याधीशामक, स्वदिष्ट असून जाम –जेली, सौस निर्मितीत उपयुक्त. सुकवलेल्या बिया आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी आणि पौष्टिक असतात. कलिंगडच्या गरात अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते. पिष्टमय पदार्थ (शर्करा) ७ टक्के, स्निग्ध पदार्थ o.२ टक्के, प्रथिने १ टक्के, क्षार o.२ टक्के व पाणी ९१.६ टक्के याशिवाय कलिंगडाच्या बियांमध्ये २० टक्के स्निग्धांश असतो. तसेच कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस ही खनिजे असतात. आरोग्याच्या बाबतीत हे बलवर्धक, शीतकारक, पौष्टिक आणि पित्तशामक आहे. कलिंगडाचे उत्पादन व प्रत सुधारण्यासाठी पुढील लागवडी संबंधीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.
लागवडीचा कालावधी व जमीन :-
कलिंगड पिकांस उष्ण व कोरडे हवामान, भरपूर सूर्यप्रकाश या पिकास मानवते. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४ ते २७ अंश सेल्सियस तापमान उपयुक्त ठरते. लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.
दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. या पिकाला मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.
जाती :-
शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती व असाही यमाटो या जातींचा वापर लागवडीसाठी केला जातो. तसेच खाजगी कंपनीच्या अनेक नवनवीन जाती विकसित झाल्या असून त्यापैकी शुगर क्वीन, किरण १, किरण २, पूनम, ऑगस्टा यासारख्या जातींची लागवड बऱ्याच प्रमाणात केली जाते. एकरी ३५० -४०० ग्रॅम बियाणे लागते.
रोपवाटिका :-
लागवडीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ मिली किंवा कार्बेंडाझीम २.५ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. कोकोपिट ट्रेमध्ये भरल्यावर बोटांच्या सहाय्याने एक छोटा खड्डा घेऊन प्रत्येक कप्प्यात एक बी टोकून कोकोपिटने झाकून घ्यावे व पाणी द्यावे. सुमारे ८ ते १० ट्रे एकावर एक ठेऊन काळ्या पॉलीथीन पेपरने झाकून घ्यावेत. झाकल्यामुळे ओलावा निघून जात नाही. पाणी कमी लागते. उबदारपणा टिकून राहिल्यामुळे बी लवकर उगवून येते. रोपे उगवून आल्यानंतर ३ ते ४ दिवसांत पेपर काढावा व ट्रे खाली उतरून ठेवावेत. मर होऊ नये म्हणून दहाव्या दिवशी बोर्डेक्स ३ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी द्यावी. साधारणतः १६ ते १८ दिवसांनी पुनर्लागवड करावी.
लागवड पद्धत :-
लागवडीसाठी गादीवाफा / सरी वरंबा हा योग्य पर्याय आहे. पाण्याचा निचरा होऊन पांढऱ्या मुळांच्या वाढीस मदत होते.
लागवडीसाठीचे अंतर :-
चांगली भारी जमीन दोन सरीमधील अंतर ८ फूट x दोन रोपांमधील अंतर १ फूट, मध्यम जमीन ७ फूट x १.५ फूट तर हलकी जमीन ५ फूट x १.५ फूट अंतरावर लागवड करावी. लागवड हि मल्चिंग पेपरवर केल्यास योग्य राहील तसेच गादी वाफा / सरी वरंबा उत्तर – दक्षिण दिशेने ठेवावा म्हणजे सूर्यप्रकाश सर्व रोपांना सामान प्रमाणात मिळेल व रोपांची एकसारखी संतुलित वाढ होईल.
बेसल डोस खत व्यवस्थापन :-
पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे. गादीवाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार भूमीअमृत (अखाद्य पेंडीयुक्त सेंद्रिय खत) १०० किलो, डीएपी (१८:४६:००) १०० किलो, एमओपी ५० किलो, न्यूट्रिमॅगसल्फ (मॅग्नेशियम सल्फेट) ५० किलो, न्यूट्रीमिक्स ग्रेड-१ = १० किलो, सिलऍक्टिव्ह ५ किलो, सॉईल पॉवर-जी १० किलो, फरटेरा ४ किलो किंवा क्लोरो दाणेदार ५ किलो.
गादीवाफ्यावर ठिबक अंथरल्यावर कलिंगड लागवडीपूर्वी मल्चिंग पेपर (३० मायक्रॉन जाडीचा) अंथरावा. एकरी पेपरचे ४ ते ५ रोल लागतात. रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन लॅटरल आणि मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर कलिंगड लागवडीसाठी वाफ्याच्या मध्यभागी ६० से.मी. अंतरावर १० से.मी. व्यासाची छिद्रे तयार करावीत. गादीवाफा ओला करून घ्यावा लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी. ३ दिवसानी पाणी देऊन घ्यावे. पाणी नियमित द्यावे ( जमिनीच्या पोतानुसार).
कलिंगड पिकांच्या भरघोस उत्पादनांसाठी फवारणी व ड्रीपद्वारे द्यावयाची खते औषधे :-
१) रोपांची पुनर्लागवड करतेवेळी रोपे ट्रायकोडर्मा ५ मिली अधिक सॉईल पॉवर ५ मिली यांच्या द्रावणांमध्ये बुडवून लागण करावी,
२) आवश्यक फवारणी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून लागवडीपासून काढणीपर्यंत २० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
३) ५ व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा २५० ग्रॅम + ब्लू कॉपर- ५०० ग्रॅम + ऑरगॅनिक कार्बन – १ लिटर प्रति एकरी पाण्यासोबत द्यावे.
४) (लागवडीपासून ५ ते २० दिवस) विद्राव्य खत ठिबकमधून १९:१९:१९ – ५ किलो + रूट्सपॉवर – ५०० ग्रॅम ५ दिवसाच्या अंतराने ४ वेळेस द्यावे
५) ७ व्या दिवशी फवारणी एम ४५- ३० ग्रॅम + असाटाफ ३० ग्रॅम + स्टीकोस्प्रेड ८ मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
६) १५ व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळ्यावर असलेल्या किडिंच्या प्रादुर्भावानुसार कमी अधिक प्रभावशाली कीटकनाशकांची फवारणी करावी.
७) (लागवडीपासून २० ते ३५ दिवस) विद्राव्य खत ठिबकमधून १२:६१:०० -५ किलो + फुल्वीचार्ज ५०० ग्रॅम प्रति एकरी ५ दिवसाच्या अंतराने ३ वेळेस द्यावे.
८) २० व्या दिवशी निमकरंज २५० मिली + फंगीनिल २५० मिली + स्टीकोस्प्रेड १०० मिली २०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
९) २५ व्या दिवशी मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो ठिबकमधून प्रति एकरी द्यावे.
१०) ३० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो + बोरॉन ५०० ग्रॅम याप्रमाणे प्रति एकरी द्यावे.
११) ३१ व्या दिवशी गार्डप्लस २५० मिली + साफ २०० ग्रॅम + न्यूट्रीमिक्स ग्रेड २ – २५० ग्रॅम + स्टीकोस्प्रेड १०० मिली २०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
१२) ३५ व्या दिवशी सॉईल पॉवर १ लिटर + न्यूट्रीसल्फ १ लिटर ठिबकमधून पाण्यांसोबत प्रति एकरी द्यावे.
१३) (लागवडीपासून ३५ ते ५० दिवस) विद्राव्य खत ठिबकमधून १३:४०:१३ – ३ किलो + अमिनो जी ५०० ग्रॅम प्रति एकरी – ५ दिवसाच्या अंतराने ३ वेळेस द्यावे.
१४) ४२ व्या दिवशी ग्रोथ मास्टर ५०० मिली + सुपरफर्ट १००० मिली + स्टीकोस्प्रेड १०० मिली २०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
१५) ५१ व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो + बोरॉन ५०० ग्रॅम याप्रमाणे प्रति एकरी द्यावे.
१६) (लागवडीपासून ५० ते ६५ दिवस) विद्राव्य खत ठिबकमधून किलो १३:००:४५ – ३ किलो १ वेळेस द्यावे. तसेच विद्राव्य खत ठिबकमधून ००:५२:३४ – ४ किलो ५ दिवसांच्या अंतराने २ वेळेस द्यावे.
१७) ५२ व्या दिवशी फ्लॉवरबूस्ट २५० मिली + अमिनो-जी ५०० ग्रॅम + स्टीकोस्प्रेड १०० मिली २०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
१८) ६५ व्या दिवशी पोटॅशिअम शोनाईट ५ किलो अधिक ड्रीप के १ लिटर ठिबकमधून एकरी द्यावे.
१९) (लागवडीपासून ६५ ते ८० दिवस) विद्राव्य खत ठिबकमधून किलो ००:००:५० – ५ किलो + ड्रीप-के २ लिटर प्रति एकरी ५ दिवसाच्या अंतराने २-३ वेळेस द्यावे.
२०) ६२ व्या दिवशी फ्रुट ऍडव्हान्स ५०० मिली + ड्रीप-के ५०० मिली + स्टीकोस्प्रेड १०० मिली २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
एकात्मिक रोग व किडी व्यवस्थापन :-
एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापनात बीजप्रक्रिया, नैसर्गिक नियंत्रण, जैविक नियंत्रण, सेंद्रिय नियंत्रण, सापळा पद्धतीने नियंत्रण, रासायनिक नियंत्रण या पद्धतीचा अवलंब केल्यास कमी खर्चात, जास्त व दर्जेदार उत्पादन मिळवणे शक्य आहे.
१) केवडा रोग :- केवडा रोग हा पानांच्या खालच्या बाजूला पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात नंतर पानाचे देठ व फांद्यावर याचा प्रसार होतो.
उपाय :- बोर्डेक्स किंवा फंगीनील किंवा मँकोझेब याचा फवारणीसाठी वापर करावा.
२) भुरी रोग :- भुरी या रोगाची सुरवात पानापासून होते. पानांच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पानांच्या पृष्टभागावर वाढते त्यामुळे पाने पांढरी दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.
उपाय :- बोर्डेक्स किंवा फंगीनील किंवा डायफेनकोनॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल याचा फवारणीसाठी वापर करावा.
३) मर रोग :- हा बुरशीमुळे होणारा रोग असून पिक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाने पिवळी पडतात. फुल गळ होऊन वेल निस्तेज दिसतात. व कालांतराने मरतात.
उपाय :- हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे पेरणीपुर्व किंवा लागवडीपूर्व १ किलो बियाण्यास १० मिली ट्रायको किंवा ३ ग्रॅम थायरम चोळावे.
3) फळमाशी :- या माशीच्या अळीमुळे पिकाचे नुकसान होते. माशी फळांच्या सालीत अंडे घालते. त्यामुळे आळी फळातील गर खाते त्यामुळे फळे सडतात. कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत.
उपाय :- कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. पिकांवर व जमिनीवर गार्डनिम किंवा निमकरंज किंवा गार्डप्लस फवारा मारावा. क्यूल्युरचे एकरी ५ सापळे लावावेत.
4) रसशोषणाऱ्या किडी :-
तांबडे भुंगे – बी उगूवून अंकुर वर आल्यावर त्याच्यावर नारंगी तांबड्या रंगाचे भुंगेरे उपजीविका करतात.
मावा – हिरव्या किंवा काळ्या रंगाचे बारीक किडे पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पिवळी पडून मलूल पडतात.
उपाय :- गार्डनिम किंवा निमकरंज किंवा गार्डप्लस किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.५ %). किंवा फिप्रोनील (५ ई.सी.)
टीप : बुरशीनाशके व कीटकनाशके यांची आवश्यकतेनुसार आलटून पालटून फवारणी करावी.
काढणी व उत्पादन :-
फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळे सडतात. फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्व फळावर वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो तर अपक्व फळांचा टणटण असा आवाज येतो. कलिंगडाच्या देठाजवळील बाळी सुकते. साधारणपणे बियाणे लागवडीपासून ९० ते १०० दिवसांमध्ये फळे काढणीस तयार होतात. साधारणतः जातीनिहाय एकरी ३० ते ५० टन उत्पादन मिळते.
लेखक:
श्री.सतिश भोसले
संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी,
कृषीवाला फार्मर्स ग्रुप, पुणे.
महाव्यवस्थापक,
देवअमृत अग्रोटेक प्रा. लि. पुणे.