माती देते जन्म! माती देते जीवन
www.janvicharnews.com
नमस्कार शेतकरी बंधूनो,
भुईमूग हे सर्वांत जुने तेलबिया पीक महाराष्ट्रात व देशात सर्वच भागांत प्रामुख्याने खरिपात घेतले जाते. मागील दोन दशकांपासून सोयाबीन, सूर्यफूल, पामतेल आदी पर्याय उपलब्ध झाल्याने भुईमूग लागवडीसाठी शेतकरी फारसा उत्सुक नाही, तसेच मिळणारा बाजारभाव व मजुरांची कमतरता असल्याने या पिकाखालील क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले आहे. परंतु, भुईमूग हे असे पीक आहे की त्यापासून सकस चारा, तेल, खाद्य (भाजके शेंगदाणे, चिक्की) सकस पेंड व टरफलापासून उत्तम खत मिळते. भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत.
भुईमुगाचे महत्त्व :-
भुईमुगाची उन्हाळी हंगामात १४०० किलो प्रति हेक्टर आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी ८० टक्के तेलासाठी, १० टक्के प्रक्रिया करून खाणे व १० टक्के निर्यातीसाठी वापरले जाते. दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रथिने (२५ टक्के) आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फळबागांची लागवड तसेच कापसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये आंतरपीक घेऊन उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर करता येणे शक्य आहे.
उन्हाळी हंगामासाठी योग्य शिफारशीत भुईमूग जातींची निवड करावी. एकात्मिक पिक व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावा, वेळेवर पेरणी, योग्य बियाणे, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तुषार सिंचन पद्धतीचा वापर, रोग व किड व्यवस्थापन आणि तणनियंत्रण या बाबींकडे लक्ष दिल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळवणे शक्य होते. भुईमूग हे तीनही हंगामामध्ये घेतले जाणारे गळीत धान्य पीक असून, खरिपामध्ये भुईमुगाखाली क्षेत्र अधिक असते. तुलनेने क्षेत्र कमी असूनही उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता अधिक असते.
१) ऊन्हाळी भुईमूग पेरणीचा योग्य कालावधी :- १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत.
२) हवामान :-
अ) पेरणीवेळी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे.
ब) फुलोरा अवस्थेदरम्यान या पिकाला दिवसाचे तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस लागते; अन्यथा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. अतिउशिरा पेरणी केल्यास फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते.
क) हे पीक उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील आहे. भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते.
३) जमीन व मशागत :-
अ) मध्यम प्रकारची, भुसभुशीत, चुना (कॅल्शियम) व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य समजली जाते.
ब) जमीन तयार करताना नांगरणीची खोली साधारणत: फक्त १२ -१५ सें.मी. एवढीच राखावी. जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात. पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना अथवा वखराद्वारे काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राहतात. परिणामी उत्पादनात घट येते.
क) नांगरणीनंतर उभी-आडवी वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणी किंवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत सुमारे २ टन प्रतिएकर याप्रमाणे द्यावे.
४) बियाणे प्रमाण :-
जात निहाय तसेच दाण्याच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण ठरते. कमी आकाराचे दाणे असलेल्या जातींसाठी एकरी ४० किलो, मध्यम आकाराच्या बियाण्यासाठी एकरी ५० किलो , तर टपोऱ्या दाण्याच्या जातीसाठी एकरी ६० किलो बियाणे वापरण्याची शिफारस आहे.
५) जाती :-
a) प्रामुख्याने पसऱ्या, निमपसऱ्या तसेच उपट्या अशा तीन जाती आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने उपट्या म्हणजेच (इरेक्ट – बंची) प्रकारच्या जातींची लागवड करावी.
b) एसबी – ११, टीएजी- २४, फुले उन्नती, टीजी-२६, जेएल -२४ (फुले प्रगती) या जाती निवडाव्यात.
c) टीपीजी -४१ ही मोठ्या दाण्याची जात असून, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांसाठी शिफारस आहे.
d) जे एल -२२० (फुले व्यास) हीसुद्धा मोठ्या दाण्याची जात असून, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांसाठी शिफारस आहे.
e) जेएल-५०१ हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी शिफारशीत आहे.
f) जेएल -७७६ (फुले भारती) या जातीची उत्तर महाराष्ट्रासाठी शिफारस आहे.
वरील शिफारशीप्रमाणे परिसरात उपलब्ध, उत्पादनक्षमता, उन्हाळी हंगामात वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता या बाबींचा विचार करून बियाण्यांच्या जातींची निवड करावी.
६) बीजप्रक्रिया :- (प्रतिकिलो बियाणे)
पेरणीपूर्वी अर्धा तास आधी
अ) थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा
ब) मॅंकोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोड्रर्मा कल्चर (भुकटी) ४ ते ५ ग्रॅम किंवा
क) ट्रायकोड्रर्मा कल्चर (द्रव्य) ३ ते ५ मि.लि.
सूचना : बीजप्रक्रियेनंतर बियाणे थोडा वेळ सावलीत वाळवून मग पेरणीसाठी वापरावे.
७) जिवाणुसंवर्धकाची बीजप्रक्रिया :-
a) रायझोबियम कल्चर (द्रव्य) ५ मि.लि. किंवा
रायझोबियम कल्चर (भुकटी) २५ ग्रॅम अधिक
b) स्फुरद विरघळविणारे जिवाणू कल्चर (द्रव्य) ५ मि.लि. किंवा
स्फुरद विरघळविणारे जिवाणू कल्चर (भुकटी) २५ ग्रॅम अधिक
c) पाेटॅश विरघळविणारे जिवाणू कल्चर (द्रव्य) ५ मि.लि.
सूचना : बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया झाल्यानंतर जिवाणूसंवर्धकांची बीजप्रक्रिया करावी.
८) सिंचन व्यवस्थापन :-
a) जातीनूसार भुईमुगाचा कालावधी साधारणत: ९० ते ११५ दिवसांचा असू शकतो. उन्हाळी भुईमुगाच्या ओलीत व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर फायद्याचा राहतो.
b) पेरणीपूर्वी ओलीत देऊन जमीन भिजवून घ्यावी. वाफसा आल्यावर अथवा जमिनीचा वरचा पापुद्रा सुकल्यावर लगेच पेरणी करावी. पेरणीनंतर ४-५ दिवसांनी पाणी द्यावे किंवा उगवण झाल्यानंतर लगेचच ओलीत करावे.
c) यानंतर पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा. यादरम्यान जमिनीला भेगा पडलेल्या नाहीत, याची खात्री करावी.
d) फुले येण्याच्या अवस्थेपासून (पेरणीपासून २२ -३० दिवस ) ठराविक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून ४०- ४५ दिवस), शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून ६५-७० दिवस) या वेळी पाण्याची पाळी चुकवू नये.
e) पाण्याच्या पाळ्यांचे प्रमाण जमिनीचा प्रकार, मगदूर, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण यानुसार ठरवावे.
f) एप्रिल-मे महिन्यांत गव्हाचा गव्हांडा व बारीक काड पिकाच्या ओळीमधील जागेत पातळ थरात पसरून घेतल्यास पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवता येते.
g) ओलीत व्यवस्थापन करताना जमिनीला भेगा पडणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी. आऱ्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखणे आवश्यक आहे.
९) खत व्यवस्थापन :-
१) पेरणीवेळी प्रतिएकरी युरिया २५ किलो + सिंगल सुपर फॉस्फेट १२५ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ३५ किलो + जिप्सम १५० ते २०० किलो याप्रमाणे द्यावे.
२) पेरणीवेळी ४-५ किलो झिंक सल्फेट तसेच बोरॅक्स २ किलो प्रति एकरी द्यावे.
३) पीक आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत पुन्हा जिप्सम १५० ते २०० किलो प्रतिएकर याप्रमाणे द्यावे. जिप्समच्या वापरामुळे शेंगा चांगल्या पोसून, उत्पादन वाढण्यास मदत होते.
१०) आंतर मशागत :-
अ) पेरणीपासून साधारणत: १० ते १२ दिवसांनी खांडण्या (तुटाळ्या) भरून घ्याव्यात.
ब) पेरणीपासून सुरवातीच्या ६ आठवड्यांपर्यंत २ ते ३ डवरणी तसेच १ ते २ वेळा खुरपणी करावी.
क) आऱ्या सुटण्याच्या अवस्थेपासून पिकात आंतरमशागतीची कामे (डवरणी) करू नयेत.
११) तणनाशकांचा वापर :-
तणनाशकांचा वापर आवश्यकता असल्यास करावा.
प्रमाण : पेंडीमिथॅलीन ७ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सूचना : फवारणी पेरणीनंतर ४८ तासांच्या आत पीक उगवणीपूर्वी जमिनीत भरपूर ओल असताना करावी. त्यामुळे पीक सुरवातीच्या २० ते २५ दिवस तणविरहीत राखता येते.
गवतवर्गीय तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास :-
प्रमाण : क्विझॉलोफॉफ ईथाईल २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सूचना : ही फवारणी पेरणीनंतर २० दिवसांनी जमिनीत मुबलक ओलावा असताना करावी. काही रुंदपानांची तणे तसेच गवतवर्गीय तणे या दोन्हीसाठी, ईमीझाथापर या तणनाशकाचा वापर शिफारस व लेबल क्लेमप्रमाणे करावा.
१२) कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन :-
भुईमुगाच्या पिकावर पाने गुंडाळणारी अळी, मावा, फुलकिडे, तुडतुडे या किडी प्रामुख्याने आढळून येतात. याशिवाय काही भागात हुमणी, वाळवी किंवा पाने खाणा-या अळ्या या किडींचाही उपद्रव झाल्याचे आढळून येते. मावा ही कोड विशेषतः पाऊसमान योग्य असेल तेव्हा भुईमूग फुलोऱ्यात किंवा आऱ्याच्या अवस्थेत असताना जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात दिसून येते. तुडतुडे खरीप हंगामात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जास्त प्रमाणात दिसून येतात. कमी पाऊसमान आणि उष्ण हवामानात तुडतुड्यांचा उपद्रव जास्त हानिकारक असतो. आपल्याकडे फुलकिड्यांच्या तीन प्रकारच्या जाती असून पाऊसमान व जास्त तापमान असेल त्यावेळी काळसर रंगाचे फुलकिडे दिसून येतात. भुईमुगाच्या खालील पानावर पांढरट चट्टे/पट्टे दिसून येतात. तर इतर दोन प्रकारच्या तुडतुड्यामुळे भुईमुगाच्या वरील आणि मधल्या पानावर पिवळसर चट्टे दिसतात आणि त्यामुळे पाने अत्यंत छोटी राहून ‘शेंडामर’ (बूड Necrotic Disease) हा विषाणुयुक्त रोग पडतो. विशेषतः ऑगस्ट-सप्टेंबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात या किडीमुळे जास्त नुकसान होते. या किडींशिवाय पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर पडत असल्याचे दिसून आलेले आहे. विशेषत: खरीप हंगामाबरोबर उन्हाळी हंगामात जिथे भुईमूग घेतला जातो अशा भागामध्ये या किडीमुळे खरीप हंगामात भुईमुगाचे खूप नुकसान होते. तापमान वाढत जाऊन पाण्याचा ताण जेव्हा पिकावर पडतो अशावेळी ही किड फार मोठ्या प्रमाणावर पडून भुईमुगाचे संपूर्ण नुकसान झाल्याचे दिसून येते. या किडी बरोबरच निरनिराळ्या प्रकारच्या पाने खाणा-या अळ्या काही वेळेस काही भागात दिसून येतात. तर मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रात हुमणी/वाळवी सारख्या किडीमुळे झाडे वाळून गेलेली दिसतात. या सर्व किडींच्या उपद्रवाचा काळ फुलो-यात किंवा आऱ्याच्या अवस्थेत असल्याने पिकाचे नुकसान जास्त होते. भुईमूग उगवणीनंतर ३० ते ६० दिवसांचा काळ हा मावा, फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी, पाने गुंडाळणारी अळी व पाने खाणा-या अळ्या या किडींच्या नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाचा असून या अवस्थेत जर पीक संरक्षणाचे उपाय योजले नाहीत, तर उत्पादनात घट येऊन आर्थिकदृष्ट्या किफायतशीर उत्पादन होत नाही.
किडी व त्यावरील उपाययोजना :-
मावा :- मावा किडींचा प्रादुर्भाव दिसताच ५% निंबोळी अर्काची किंवा निमगार्ड २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी १५ दिवसांनंतर डायमिथोएट १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलकिडे :- फुलकिड्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आर्थिक नुकसानीची पातळी गाठन्यापुर्वी निमकरंज २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ५ फुलकिडे प्रति शेंडा गाठल्यावर क्विनॉलफॉस २५% प्रवाही २ ते २.५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे :- तुडतुडयांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठन्यापुर्वी गार्ड-303 २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्थिक नुकसानीची संकेत पातळी १५ ते २० तुडतुडे प्रति झाड गाठल्यानंतर क्विनॉलफॉस २५% प्रवाही २ ते २.५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाने पोखरणारी अथवा गुंडाळणारी अळी :- आर्थिक नुकसानीची पातळी गाठन्यापुर्वी फायटर २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या अळीच्या नियंत्रणासाठी दोन अळ्या प्रति झाड किंवा झाडाच्या मध्यवर्ती भागात १०% पाने पोखरलेली किंवा प्रत्येक मीटर ओळीतील झाडावर १ अळी अशी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी आढळल्यास क्विनॉलफॉस २५% प्रवाही २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार शिफारसीत कीटकनाशकांच्या पुढील फवारण्या कराव्यात.
जैविक नियंत्रण:-
वरिल सर्व प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी बिव्हेरिया बसियाना अधिक मेटार्झीयम अनिसोप्ली या जैविक उत्पादनाचा एकत्रित वापर प्रत्येकी ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी करावा.
रोग व त्यावरील उपाययोजना :-
भुईमुगावर मर, मुळकूज, खोडकूज, तांबेरा, टिका आणि शेंडेमर हे रोग प्रामुख्याने आढळतात.
तांबेरा आणि टिका :- तांबेरा आणि टिका या रोगाच्या नियंत्रणाकरिता बोर्डेक्स २ ते २.५ मिली किंवा टेब्युकोनॅझोल २५% डब्ल्यु.जी. १ ते १.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हेक्साकोनॅझोल १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मुळकूज आणि खोडकूज :- मुळकूज व खोडकूज रोगाच्या नियंत्रणाकरिता थायरम ३७.५% डी.एस. याची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी किंवा काबॅन्डॅझिम २५% + मॅन्कोझेब ५०% डब्ल्यु.एस. ३ ते ३.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
जैविक नियंत्रण:-
वरिल सर्व प्रकारच्या रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी अधिक ब्यँसीलस सब्टिलस या जैविक उत्पादनाचा एकत्रित वापर प्रत्येकी ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी तसेच प्रत्येकी १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यातून आळवणीसाठी करावा.
१३) काढणी :-
भुईमुगाचा पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगाचे टरफल टणक बनून आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात. त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते ९ टक्क्यांपर्यंत खाली आणावे.
१४) उत्पादन :-
सुधारित पद्धतीने भुईमुगाची पेरणी योग्य पद्धतीने संतुलित खतांचा वापर, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण केल्यास भुईमुगाच्या सुधारित वाणांपासून हेक्टरी २०-२५ (खरीप), तर ३०-३५ (उन्हाळी) क्विंटल वाळलेल्या शेंगा तसेच ४ ते ५ टन कोरडा पाला मिळण्यास काहीच हरकत नाही.
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!
शेतकरी हितार्थ
—-
*!! अन्नदाता सुखी भव: !!*
*काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो*
“Agriculture is my Love, Passion, Culture & Life”
*विचार बदला! जीवन बदलेल!!*
*Mr.SATISH BHOSALE*
जागतिक मृदा दिन
www.janvicharnews.com
नमस्कार शेतकरी बंधूनो…!!!
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कृषी व्यवसायावर आधारित आहे. कृषी व्यवसायामध्ये जमीन (माती/मृदा) नैसर्गिक साधन संपत्ती असुन आपल्या शेतकरी बांधवांचे मुख्य भांडवल आहे. त्यामुळे जमीन (माती/मृदा) हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी 5 डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. एवढेच नाही तर जमिनीच्या आरोग्यावरच मानवांसह सर्व पशु, पक्षी, प्राणी व इतर अनेक सजीव घटकांचे जीवन व आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे मातीचा जिवंत थर जपण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. अन्नधान्याच्या 90 टक्के गरजा मातीद्वारेपूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील महाकाय लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही.
www.janvicharnews.com
शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, इ. कारणांमुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो. जमिनीच्या धुपीमुळे सुपीक माती वाहुन जाते. सुपीक जमिनीबरोबर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाळू, खडकांचे बारीक तुकडे वाहत येतात व सुपीक भागात पसरतात. यामुळे सुपीक जमीन नापिक होण्याची शक्यता असते.
भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, धरण, रस्ते, इ. विविध कारणांमुळे सुपीक जमीन जात असल्याने लागवडीलायक क्षेत्रात घट होत आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.
वर्षानुवर्ष शेतकरी जमिनीत विविध पिके घेत आला आहे. पुर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणांत उपलब्ध होते व ते जमिनीत टाकण्याचे प्रमाणसुद्धा जास्त होते. त्यामुळे जमिनीत पोत टिकण्यांस आपोआपच मदत होत असे. देशाची लोकसंख्या वाढल्यामुळे अन्नधान्याची गरज वाढू लागली त्या प्रमाणात शेतामधून अधिक उत्पादन वाढविण्याकडे कल वाढत गेला. हरित क्रांतीनंतर अधिक उत्पादन देणाऱ्या तसेच संकरीत वाणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत गेला. अधिक उत्पादन देण्यासाठी रासायनिक खतांचा अवाजवी वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. सिंचनाच्या विविध सोयी उपलब्ध झाल्यामुळे बागायत क्षेत्रात सर्व हंगामात पिके घेण्यात येऊ लागली. पर्यायाने पीक घनता वाढून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. तसेच रासायनिक खतांच्या किंमती वाढल्यामुळे शेतकरी कमी किंमतीच्या खतांचा वापर करु लागला. रासायनिक खतांच्या असमतोल वापरामुळे काही मुलद्रव्यांची जमिनीत कमतरता जाणवु लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करुनही उत्पादकता वाढीस मर्यादा आलेल्या आहेत. त्याच बरोबर रासायनिक कीटकनाशके व रोगनाशके यांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर होऊ लागल्यामुळे मातीच्या सुपिकतेत महत्वाचे कार्य करणारया सूक्ष्म जीवावरती याचा परिणाम होऊन असमतोल निर्माण झाला आहे.
www.janvicharnews.com
जिवाणू हाच शेतीचा आत्मा ! रासायनिक खतांचा अति वापर टाळा !! एकात्मिक शेती पध्दतीचा वापर करा !!!
इ.स. १९६०च्या दशकात शेतकी संशोधन, विकास, तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात कृषिउत्पादन वाढले. हा काळ भारतातील हरितक्रांती म्हणून ओळखला जातो. त्यांच्या सहकार्याने जास्त उत्पन्न देणारे जातींची बियाणांचा विकास, सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार, व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण, संकरित बियाणांचे, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण इत्यादी मार्गांवर यात भर देण्यात आला. भारताच्या कृषिमंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांनी डॉ. नॉर्मन बोरलॉगांना भारतात बोलावले. अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशन आणि भारतीय केंद्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून मेक्सिकोमधील आंतरराष्ट्रीय मका व गहू विकास केंद्रातून गव्हाचे बियाणे आयात करण्यात आले. पाण्याची मुबलक उपलब्धता व शेतकीची सफल पार्श्वभूमी यांमुळे भारतीय केंद्रशासनाने नवीन पिकांच्या प्रयोगांसाठी पंजाबची निवड केली. अधिक उत्पन्न देणारी बियाणी व जलसिंचनाच्या वाढत्या वापराद्वारे भारतातील अन्नधान्याचे उत्पादन वाढले. मात्र कालौघात रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अतिरिक्त वापरामुळे शेतजमिनींवर विपरीत परिणाम झाले.
१९६५-७० मध्ये हरितक्रांतीला सुरवात झाली १५-२० वर्षे सर्वत्र भरघोस पिकाचे उत्पादन मिळाले. याकाळात मर्यादित संसाधनात कमी खर्चात भरघोस उत्पादन मिळाले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. पुढे उत्पादन पातळी घटत गेली. किडी रोग यांचे प्रमाण वाढत गेले. संसाधनांचा वापर वाढत जाताना त्यावरील खर्चाचे प्रमाण वाढत गेले. शेतीतील निव्वळ नफ्याचे प्रमाण घटत चालले आहे. थोड्याशा संकटानेही ती आतबट्ट्याची होते. पहिली २० वर्षे उत्तम उत्पादन का मिळाले आणि आता का मिळत नाही, या प्रश्नाचे उत्तर डॉ. एफ. जे. स्टिव्हन्सन यांच्या “ह्यूमस केमिस्ट्री’ या पुस्तकातील एका संदर्भात मिळते. ते म्हणतात, निसर्गाने जमिनीत सुरवातीला जी सेंद्रिय कर्बाची साठवण करून ठेवली होती, त्या जीवांवर ती जमीन आपल्याला १५-२० वर्षे समाधानकारक उत्पादन देईल. त्यानंतर उत्पादन पातळी घटत जाईल. हरितक्रांती ज्या-ज्या ठिकाणी राबविली गेली, तेथे सर्वत्र हाच अनुभव आहे. यावर उपाय फक्त जमिनीत सेंद्रिय कर्ब पुन्हा साठवणे हाच आहे. पारंपरिक मार्गाने हे कधीच साध्य होणार नाही. यासाठी नवीन मार्गाचा शोध घ्यावा लागेल. इंग्रजीमध्ये याला “कार्बन सिक्वेस्ट्रेशन” असे म्हणतात.
आपण शेतात चालताना शेतजमीन इतकी भुसभुशीत असली पाहिजे की त्या जमिनीवरून चालताना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे, ती जमीन सुपीक, अशा जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब उपलब्ध असतो, जिवाणूंची संख्या एक ग्राम मातीत 2 कोटी 40 लाख पेक्षा जास्त असते, त्यात 130 प्रकारचे जिवाणू असतात. ज्या जमिनीचा सामू 6.5 आहे, ज्या जमिनीचा EC 0.5 च्या आत आहे, ज्या जमिनीची सेंद्रिय कर्बाची पातळी 0.8 च्या पुढे आहे, ज्या जमिनित क्षारांची पातळी योग्य आहे असे खुप महत्वाचे घटक आहेत, कि ज्यावर आपल्या जमिनीची सुपीकता, आणि उत्पादकता अवलंबून असते. आपण शेतीतून उत्पन्न घेतो, ज्याकाही पिकांचे आपण उत्पन्न घेतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 16 अन्न घटकांची आवश्यकता असते.
पिकास आवश्यक असणारे ” मूळ अन्नद्रव्ये – घटक ” 16 आहेत. आपल्या सोयीसाठी याचे 4 गट केलेले आहेत. (A) नैसर्गिक अन्न घटक 3 =1) कार्बन 2) हायड्रोजन 3) ऑक्सिजन(प्राणवायु)
हे घटक नैसर्गिक रित्या हवा, पाणी, सूर्यप्रकाश यांच्या पासून उपलब्ध होतात.
(B) मुख्य अन्न द्रव्ये 3 = 1) नत्र 2) स्फुरद 3) पालाश.
वरील अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात पुरवावे लागते म्हणून मुख्य अन्नद्रव्ये म्हणतात.
(C) दुय्यम अन्नद्रव्ये 3 = 1) कॅल्शियम 2) मॅग्नेशियम 3) गंधक.
मुख्य अन्नद्रव्यांच्या मानाने खुप कमी पुरवावे लागतात् म्हणून यांना दुय्यम अन्नद्रव्ये म्हणतात.
(D) सूक्ष्म अन्नद्रव्ये 7 = 1) फेरस = लोह 2) झींक = जस्त 3) कॉपर = तांबे 4) मॅन्गनीज 5) मोलाब्द (मॉलेब्डेनम) 6) बोरॉन 7) निकेल ही 7 अन्नद्रव्ये, मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांच्या मानाने खुप कमी किंवा अति सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात ,म्हणून यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये असे म्हणतात.
वरील A क्रमांकाची अन्नद्रव्ये नैसर्गिक रित्या पिकास मिळतात. त्याची फारशी चिंता करावी लागत नाही. मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये या तिन्ही अन्नद्रव्यांच्या बाबतीत लक्ष्य द्यावे लागते. हे 13 अन्नद्रव्ये जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात, ते वजा जाता आवश्यक अन्नद्रव्ये जमिनीला पुरवावी लागतात. हे पुरवलेले अन्न घटक जसेच्या तसे म्हणजे दिलेल्या स्वरुपात पिकास “अपटेक्” “शोषण” करता येत नाहीत. म्हणून या स्वरूपास “स्थिर स्वरूप”किंवा Fix Form असे म्हंटले जाते. ही अन्नद्रव्ये पिकास “अपटेक्” करण्यायोग्य स्वरुपात रूपान्तर व्हावे लागतात्. हे रूपान्तरणाचे कार्य जमिनीतिल जीवाणु करीत असतात. ह्या विविध प्रकारच्या जीवाणुंची ‘संख्या आणि कार्यक्षमता’ ही अत्यंत महत्वाची असते. यासाठी त्यांना त्यांचे खाद्य योग्य प्रमाणात पुरवावे लागते. आणि ते म्हणजे सेंद्रिय कर्ब होय. जमिनीत सेंद्रीय कर्बाची पातळी योग्य असावी लागते. जी आपल्याकड़े फारच कमी आहे. {वर्षानुवर्ष सातत्याने होणारा गरजेपेक्षा जास्त रासायनिक खतांचा मारा याला कारणीभूत आहे } सरासरी 0.3 ते 0.5 एवढीच आहे. ही पातळी वाढवण्यासाठी जैविक कर्ब द्यावा लागतो. जैविक कर्ब हा सेंद्रिय खतातून उपलब्ध होत असतो.
www.janvicharnews.com
जीवामृत, वेस्ट डी कंपोझर, ह्युमीक, ऍझो, रायझो, पीएसबी, केएसबी अशी जैविक खते व हिरवळीची खते स्वस्त आणि कमी खर्चात देता येतात. जैविक खतामुळे किंवा जीवाणूमुळे आपल्याला चांगले उत्पन्न मिळते.
शाश्वत शेतीसाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन आणि जमिनीची सुपिकता यांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सेंद्रीय खतांच्या वापराचा अभाव, असंतुलित खत पुरवठा, पीक फेरपालटीचा अभाव इत्यादीमुळे जमिनींचे गुणधर्म बदलत असून मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. जमिनीची सुपीकता खालावत चाललेली असून तिचे आरोग्य बिघडत असल्याचे दिसून येत आहे. सेंद्रीय कर्बाचे जमिनीतील प्रमाण गांभीर्याने घटत चाललेले आहे. हवामान बदलाचा परिणाम म्हणून काही विपरीत बदल देखील जमिनीच्या गुणधर्मात होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी वापरण्यांत येणाऱ्या किंमती निविष्ठांचा प्रभावी वापर होत नसून फक्त खर्चात वाढ होऊन शेतीचा किफायतशीरपणा कमी होत आहे.
जमीन हा मर्यादीत स्वरुपाचा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करुन भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक गरजेनुसार योग्य व्यवस्थापन पद्धतीचे अवलंबन करण्याची गरत आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा नियमित वापर, इत्यादींचा वापर करुन जमिनीची सुपिकता टिकवुन ठेवणे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. जमीनीच्या आरोग्याचे निदान करण्यासाठी माती परीक्षण तंत्रज्ञानाचा वापर अपरीहार्यच होणार असुन या पुढील काळात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे गंभीर परीणाम फक्त शेतीवरच न दिसता मानवी शरीर आणि प्राणी इत्यादींना सुद्धा जाणवणार आहेत.
सर्व शेतकरी बंधुना विनंती आहे की, आपण आपल्या शेत जमिनीचे नियमीत माती परिक्षण करुन आपल्या जमिनीची सुपिकता जाणुन घ्यावी व त्यानुसारच पिकाना खताची मात्रा द्यावी जेणे करुन जमिनीचे आरोग्य अबाधित ठेवुन आपणास आधिक उत्पादन घेत येईल. व जमीनीच्या आरोग्य बरोबरच मानवी आरोग्याचे ही जतन होईल…!!!✍
🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी हितार्थ 🙏🙏🙏🙏🙏
🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏
Mr.SATISH BHOSALE
(General Manager)
DevAmrut Agrotech Pvt Ltd