बराक ओबामा परिवर्तनाचा पासवर्ड…
www.janvicharnews.com
१९६० सालची गोष्ट आहे. अमेरिकेतल्या होनोलुलू शहरातली एक आई डोळ्यात अश्रू साठवत अॅन डॅनहॅम नावाच्या आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करीत होती . वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी गरोदर असलेल्या एकुलत्या एक मुलीच्या काळजीने आईचा जीव टांगणीला लागलेला होता . त्याच काळात अमेरिकेत काळे गोरे हा वर्णवाद उच पराकोटीला गेलेला आणि गोऱ्या अॅनला गेलेले दिवस हे केनियन वंशाच्या काळ्या हुसेन नावाच्या तरुणापासून होते त्यामुळे आई- बापाच्या तोंडचे पाणी पळालेले. पण उत्तुंग स्वप्न बाळगत जगणाऱ्या त्या तरुणाशी लग्न करण्याचा वाङनिश्चय ह्या हट्टी मुलीने केला . पण जिथे काळ्या लोकांशी बोलणे अपमानास्पद वाटे तिथे मुलीचे लग्न जर काळ्या मुलाशी झाले तर जग काय म्हणेल ह्या प्रश्नाने आईला भंडावून सोडले होते . पण मुलीने आपला निश्चय पूर्ण केला . लग्न आटोपले आणि ऑगस्ट १९६१ रोजी अॅनने एका मुलाला जन्म दिला. सुखी संसाराचे स्वप्न पाहत सगळे सुखात चालले होते.
एके दिवशी हुसेनला न्यूयार्क मध्ये शिष्यवृत्ती जाहीर झाली तसा तो दीड वर्षाचा पोरगा अॅनकडे सोपवत हुसेन हॉवर्ड विद्यापीठात शिष्यवृत्ती घेण्याकरिता निघून गेला आणि परत आल्यावर अॅनला समजले की, हुसेनने दुसरे लग्न केले होते . वीस वर्षाच्या अॅनला प्रचंड मोठा धक्का बसला. ज्याच्यासाठी आईवडिलांना सोडले त्याने अवघ्या दोन वर्षात अॅनला वाऱ्यावर सोडले . डोळ्यासमोर अंधार दाटला. अखेर दुःख काळजात ठेवत छोट्या पोराला कडेवर घेऊन अॅन आई वडिलांच्या घरी परत आली.आईवडिलांच्या छत्रछायेत परत आलेली अॅन काही दिवसातच दुःख विसरली आणि लोलो सोप्टोरो नावाच्या मित्राशी लग्न करुन मोकळी झाली . अँनचा छोटा आजीच्या हाताखाली वाढू लागला. बाप आणि आईचे प्रेम आजी देऊ लागली. परंतु मुलाचे नाव शाळेत घालतांना आजीच्या मनाची घालमेल झाली . अवघ्या दोन वर्षाच्या मुलाला सोडून देणाऱ्या निर्दयी बापाचे नाव ह्या पोराच्या नावासमोर लावायची तिची अजिबातच इच्छा नव्हती पण नाइलाज होता आणि अखेर ह्या मुलाचे नाव शाळेत घातले गेले . * बराक हुसेन ओबामा
गेली कित्येक वर्ष या नावाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या बराक ओबामांचा प्रवास सुध्दा तितकाच खडतर आहे. वंशव्देष आणि वर्णव्देषाने भरलेल्या अमेरिकेच्या विचारात त्यांनी घडवलेले परिर्वतन आश्चर्यकारक आहे. मूळच्या केनियन काळ्या वंशाच्या मुस्लिम बापाचा हा पोरगा अमेरिकन गोऱ्या ख्रिश्चन आईच्या पोटी जन्माला आला. ज्या पोराला समाज स्वीकारेल की नाही हा प्रश्न असताना संपूर्ण अमेरिकेने त्याला स्वीकारेल आणि अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावे ही अमेरिकेच्या इतिहासातली प्रचंड मोठी क्रांती होती आणि ती क्रांती घडवणारे नाव ओबामा सुध्दा तितकेच मोठे क्रांतिकारक ठरले.
बापाचे छत्र आणि आईचे प्रेम नसणारा हा पोरगा ऐंशीच्या दशकात न्यूयार्कच्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत होता. ज्ञानाची भूक भागवण्यासाठी ग्रंथालयात अनेक पुस्तकांचे वाचन सुरु होते. कायद्याची आणि राज्यशास्त्राची पदवी घेऊन सुध्दा करियरची योग्य वाट मात्र सापडत नव्हती . कॉर्पोरेट जगातून नोकरी , समाजसेवा असा प्रवास करीत हा तरुण राजकारणाच्या दरवाजावर येवून ठेपला.
ओबामाचा राजकारण प्रवेशसुध्दा तितकाच वादग्रस्त ठरला . अॅलिस पामर नावाच्या एका मोठ्या सिनेट सदस्यासोबत ओबामा काम करीत होते. सिनेट सदस्या असणाऱ्या पामर यांची अमेरिकेन काँग्रेसच्या पदावर जबर होती पण अमेरिकन काँग्रेसची निवडणूक लढवायची असेल तर सिनेट सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागतो . म्हणून पामर बाईंनी राजीनामा दिला आणि त्या जागेकरीता बराक ओबामाची उमेदवारी घोषित केली. अन् राजीनामा देताना सांगितले की माझे वारसदार म्हणून ब ओबामाना निवडून द्यावे. ओबामांना जाहीर पाठिंबा देऊन पामरबाई काँग्रेसच्या निवडणुकीत उतरल्या खऱ्या पण निकाल मात्र प्रतिकूल लागला. काँग्रेसच्या निवडणुकीत अॅलिस पामर पराभूत झाल्या.
राजकारण हे राजकारणच असते. पामर यांची राजकीय महत्वाकांक्षा पुन्हा उफाळून आली. त्यांना पुन्हा सिनेट सदस्य व्हावेसे वाटू लागले. त्यांनी बराक ओबामांना माघार घ्यायला सांगितली . राजकारणाची पहिलीच पायरी चढणाऱ्या ओबामांना हा मोठा धक्का होता पण त्यांनी ठरवले की आता कुठल्याही परिस्थितीत माघार नाही. ह्या तरुण बराक ओबामांचा आक्रमक पवित्रा पामर बाईच्या लक्षात आला त्यांनी ओबामाच्या विरोधी प्रचाराला सुरुवात केली पण शेवटी व्हायचे तेच झाले. संपर्क व कर्तृत्वाच्या बळावर ओबामा अमेरिकन-आफ्रिकन भागातून सिनेटवर निवडून आले आणि राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. अनेक यश-अपयश पचवत ह्या महत्वाकांक्षी तरुणाची गाडी सुसाट निघाली होती.
तुमच्यामध्ये किती आत्मविश्वास आहे? असा प्रश्न एका पत्रकाराने राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान ओबामांना विचारला. त्यांनी दिलेले उत्तर सुध्दा तितक्याच ताकदीचे होते.
“ माझ्यावर आभाळ जरी कोसळले तरी मी त्याच्यावर उभा राहीन आणि त्याला सांगेन की बघ मी तुला सुध्दा जिंकलंय”
केनियामध्ये जन्माला आलेल्या ह्या कृष्णवर्णीय तरुणाने गोऱ्यांची अमेरिका जिंकायची स्वप्ने पाहणे हे खूप मोठे धाडस होते. कारण ह्या अमेरिकेचा इतिहास वेगळा आहे. क्रांतीचे स्वप्न बघत कृष्णवर्णीयांचे नेतृत्व करणाऱ्या मार्टीन ल्युथर किंग यांना जगाने नोबेल पारितोषिक बहाल केले पण एका काळ्या माणसाला नोबेल मिळाले हे वर्णभेद्यांना सहन होईना म्हणून काही दिवसातच मार्टीन ल्युथर किंग यांचा अमेरिकेत खून झाला .
आज ओबामा जी भाषा बोलतात ती मूळची अब्राहम लिंकन यांची, पण त्याच समतेच्या भाषेमुळे अब्राहम लिंकन यांना जिवाचे मोल द्यावे लागेल. राष्ट्रपती फ्रेंकलिन रुझवेल्ट यांनी बुकर टी वाशिंग्टन ह्या कृष्णवर्णीय नेत्याला व्हाईट हाऊस मध्ये जेवायला बोलावले ह्या एकाच कारणावरुन अमेरिकेत दंगली उसळल्या होत्या .त्या अमेरिकेला ‘ YES WE CAN ‘ म्हणत हा काळा पोर गवसणी घालायचा प्रयत्न करीत होता. ही सामान्य बाब नव्हती.
त्यातच अमेरिकन निवडणूक म्हणजे पैशांचा खेळ. दोन वर्षेचालणाऱ्या ह्या निवडणुकीत उमेदवाराच्या संयमाचा कस लागतो. टीकाकार , प्रसार प्रचारमाध्यमे यांना तोंड देत खोऱ्याने पैसा गोळा करण्याची क्षमता हवी. उद्योगपतींची मदत आणि चर्चचा पाठिंबा त्याशिवाय अमेरिकेची निवडणूक जिंकणेच शक्य नाही . अशावेळी बराक ओबामा ऐवजी बराक ओसामा नावाने हिणवला जाणारा हा तरुण राष्ट्राध्यक्षपदासाठी आपले नशीब आजमावत होता. “बराक ओबामा चुकून अमेरिकेत आले त्यांनी केनियाचे अध्यक्ष व्हायला हवे होते” “ खुद्द येशू सुध्दा ओबामांना मत देणार नाहीं ” इतका विषारी प्रचारखुलेआम सुरु होता . परंतु ह्या स्थितप्रज्ञ माणसाने आपला संयम किंचित सुध्दा ढळू दिला नाही. वंशभेद , वर्णभेद , जात , धर्म ह्या गोष्टीकडे ओबामांनी दुर्लक्षच केले . प्रतिस्पर्ध्याना कितीही वर्णभेदी भूमिका घेतली तरी ओबामांनी आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थशास्त्र, परिवर्तन ह्या विषयांना पुढे आणत प्रचाराची दिशाच बदलून टाकली. ओबामांच्या ह्या विचारांची इतकी प्रचंड मोहिनी अमेरिकेवर पडली की राजकारणाला शिव्या देणाऱ्या उच्चभ्रूपासून तर मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य कामगारांनी ‘YES WE CAN’ म्हणायला सुरुवात केली.
मळलेल्या वाटेने चालण्यापेक्षा आपली वाट आपण निर्माण करु. ज्या वाटेने जग चालेल, हा विश्वास देतच ओबामांनी इतिहास घडवला तब्बल ६८ मतदारांनी ओबामांना कौल दिला आणि जगातली य सर्वात मोठी महासत्ता ओबामांनी आपल्या बाजूने उभी केली. निवडणुकीतल्या विजयानंतर ज्यांनी पराभव पत्करला ते ओबामांचे प्रतिस्पर्धी जॉर्ज मॅक्वेल यांची प्रतिक्रिया मोठी बोलकी होती. मॅक्वेल म्हणाले , ” काही वेळापूर्वी माझी ज्यांच्याशी स्पर्धा होती ते ओबामा माझे आणि माझ्या राष्ट्राचे अध्यक्ष आहेत , खरं तर आपण अनेकदा माणूस बदलतांना पाहतो , समूह बदलतांना पाहतो पण ह्या माणसाने अमेरिकेलाच बदलून टाकले . ” जगात परिर्वतन घडवता येऊ शकते. फक्त ते घडवण्याची ताकद आपल्यात हवी. ती ताकद कुठल्या व्यायाम शाळेत जाऊन कमावता येत नाही. तिच्यासाठी जगाच्या शाळेतच फिरावे लागते आणि तरच बराक ओबामा जन्माला येतो आणि जगाला ओरडून सांगतो की ” नंबर दोनवर मी विश्वास ठेवत नाही . मला क्रमांक एकच आवडतो “ प्रश्न हाच आहे की आम्हाला कोणत्या क्रमांकावर जगायचयं ???
बराक ओबामा चे विचार..
“जो देश ऊर्जेच्या स्त्रोतावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो देश त्याचे भविष्य देखील नियंत्रित करू शकत नाही.”
“आजच्या कामगारांना प्रशिक्षित करणे पुरेसे नाही, आपल्याला उद्याचे कामगारही तयार करावे लागतील. प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल याची खात्री करून.”
“जर तुम्ही योग्य मार्गावर चालत असाल आणि त्या मार्गावर चालत राहण्याची तुमची तयारी असेल, तर शेवटी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.”
“आपण दुसर्या व्यक्तीची किंवा दुसर्या वेळेची वाट पाहिल्यास बदल होणार नाही. याची वाट पाहणारे आम्हीच आहोत. आम्हालाच बदल हवा आहे.”
आम्हाला महत्वाकांक्षेच्या या गरिबीचा सामना करण्याची गरज आहे, जिथे लोक फॅन्सी कार चालवतात आणि चांगले कपडे घालतात आणि छान अपार्टमेंटमध्ये राहतात परंतु या गोष्टी घडवून आणण्यासाठी कठोर परिश्रम करू इच्छित नाहीत. प्रत्येकाने आपली क्षमता ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपली उच्च शिक्षण व्यवस्था ही अमेरिकेला असाधारण बनवणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. उच्च शिक्षणाच्या बाबतीत आपली मालमत्ता आहे असे कुठेच नाही. जगभरातील लोक इथे येऊन अभ्यास करतात. आणि ही चांगली गोष्ट आहे
जेव्हा कोणी दुसर्या व्यक्तीची किंवा वक्त्याची वाट पाहतो तेव्हा बदल होत नाही, आपण ज्याची वाट पाहत आहोत ते आपण आहोत. आम्हाला आवश्यक असलेला बदल आम्ही आहोत.
आम्हाला आमचे रस्ते अधिक सुरक्षित आणि आमची फौजदारी न्याय व्यवस्था अधिक चांगली बनवण्याची गरज आहे – आमची जन्मभूमी अधिक सुरक्षित, आमचे जग पुढील पिढीसाठी अधिक शांत आणि टिकाऊ.