बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का?…
भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार,रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी – भाजी – वरण – भात – कोशिंबीर – चटणी – उसळ वगैरे वगैरे,आणि लाडू – चिवडे – मिठाया – पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का?
फोडणीला तेल किती घेऊ,मोहरी किती,हिंग किती,हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?
गॅस किती मोठा,किती लहान, केव्हा कमी – जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा,उलथनं की डाव,का झारा? कढई का पातेलं?
पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?
एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?
ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?
प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा,खरकटं, चिकटपणा आवरता कसा घ्यायचा?
दूध तापत असताना,कुकर शिजत असताना,तेल गरम होत असताना,आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे,एखादी यादी करणे,एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे (किंवा गदागदा हलवून येणे) हा वेळेचा हिशोब कसा करायचा?
मीठ,तिखट,साखर किती घालायचं?
पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची?
उरलेल्या अन्नाचं काय करायचं?
वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?
किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?
मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजन ही शिकायला लागणार आहे.
बुद्धिमत्ता,हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे involvement.उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं.
गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं,प्रसंगी पूर्ण अशिक्षित असुन स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकाच्या हुशारीला आपण दाद कितीवेळा देतो?
निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते पण आपण डिग्री,मार्क,इंग्लिश येणे असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो.
एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी.
किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं.
खाण्यापूर्वी,दिवसातुन एकदा तरी निसर्गाने आपल्या घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत.