उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो. सामान्यतः रक्तदाब १२०/८० असतो. त्याहून जास्त आणि १३९/८९ पर्यंतचा रक्त दाब “पूर्व उच्च रक्तदाब” म्हणून ओळखला जातो आणि १४०/९० पेक्षा अधिकच रक्तदाब “उच्च रक्तदाब” म्हणून ओळखला जातो.
उच्च रक्तदाब
प्रकार प्रकुंचनीय रक्तदाबमिमी पारा अनुशिथिलनीय रक्तदाब मिमी पारा
साधारण रक्तदाब ९०-११९ मिमी ६०-७९
पूर्व उच्च रक्तदाब १२९-१३९ ८०-८९
उच्च रक्तदाब अवस्था१ १४०-१५९ ९०-९९
उच्च रक्तदाब अवस्था२ ≥१६० ≥१००
कारणे
शरीरात स्निग्ध पदार्थ वाढले की ते हातापायांच्या लहानलहान रक्तवाहिन्यांच्या भिंतींलगत जमा होतात. त्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो. यास रक्तदाब विकार म्हणतात. हा विकार होण्यास खालील गोष्टी कारणीभूत ठरतात.
अति मानसिक ताण
आनुवंशिक कारणे
आहारात जंक फूड/फास्ट फूडचा समावेश
आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे
खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाळण्याची जीवनशैली
चिंता, राग, भीती इत्यादी मानसिक विकार
वजन जास्त असणे
व्यायामाचा अभाव
स्थूलता
ही प्रमुख कारणे असली तरी इतर कारणेही असू शकतात. उदा०
मूत्रपिंडाकडे जाणाऱ्या शुद्ध रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होणे.
शरीरातून लघवी बाहेर न टाकली जाणे.
उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम
वाढलेला रक्तदाब हा मेंदूमधील वाहिन्या फुटण्याचे कारण असू शकतो. मेंदूमधील वाहिनी फुटल्यास मेंदूत रक्तस्राव होतो. हे रक्त काही काळाने गोठते. रक्ताची ही गुठळी मेंदूवर दाब निर्माण करते. मेंदूचा जो भाग दाबला जातो, तो भाग शरीरातील ज्या भागाचे नियंत्रण करीत असतो तो शरीराचा अवयव लुळा पडतो आणि यालाच अर्धांगवायू (लकवा) असे म्हणतात. थोडक्यात वाढलेला रक्तदाब लकवा निर्माण करू शकतो. लकवा होण्यामागचे कारण बहुदा अनियंत्रित रक्तदाब हेच असते.
विकाराची लक्षणे
उच्च रक्तदाब हा विकार हळूहळू वाढत जाणारा आहे. या विकारात चालल्यावर दम लागणे, छातीत धडधड, डोकेदुखी, दृष्टिदोष, एकदम उभे राहिल्यास किंवा एकदम खाली बसल्यास चक्कर आल्यासारखे वाटणे, पायावर आणि चेहऱ्यावर सूज येणे अशी ही लक्षणे दिसून येतात.
पडताळणी
रक्तदाब वाढल्याचे दिसून आल्यास रुग्णाच्या तपासण्या करणे गरजेचे असते.
ईसीजी (इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम)द्वारे हृदयाच्या कप्प्यांवर किती ताण पडला आहे याचा शोध घेतात..
हृदयाची सोनोग्राफी एकोकार्डिओग्रॅमद्वारे केल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास जुना आहे की नुकताच सुरू झाला आहे हे शोधतात.
रक्ताची तपासणी करून रक्तातील साखर, लिपिड प्रोफाईलच्या पातळ्या आणि युरिक अॅसिडची पातळी तपासली जाते.
कोलेस्ट्रॉल तपासणी आणि इतर रक्त चाचण्या केल्या जातात.
उपाय
नियमित पोहणे, योगासने, प्राणायाम, व्यायाम याचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी उपयोग होतो. मिठाचे आहारातील प्रमाण कमी करण्यानेही दाब नियंत्रणात राहतो.
खसखस आणि टरबुजाच्या बियांचा गर वेग-वेगळा वाटून समप्रमाणात मिसळून ठेवून सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी खाल्याने वाढलेला रक्तदाब कमी होतो व रात्री झोपसुद्धा चांगली लागते.
एक चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण आठवडाभर सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी घेतल्यास उच्च रक्तदाब कमी होतो.
मनुकांसोबत लसणाची पाकळी खाल्याने आराम येतो.
तुळशीची चार पाने, लिंबाची दोन पाने व दोन चमचे पाणी घेऊन एकत्र वाटून. रिकाम्यापोटी घेतल्याने उच्च रक्तदाब कमी होतो.