Home कृषी साक्षरता *शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर

*शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर

0
*शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर

शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर

निसर्गतः जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. जीवाणूंचे प्रमाण अधिक असलेल्या मातीला जिवंत माती असे म्हटले जाते. मातीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणे गरजेचे आहे.

जैविक खते म्हणजे काय? : प्रयोगशाळेत उपयुक्त कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररीत्या वाढ करून योग्य वाहकता मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला “जीवाणू खत’, “जीवाणू संवर्धन’, “बॅक्‍टेरीयल कल्चर’ किंवा बॅक्‍टेरियल इनॉक्‍युलंट म्हणतात.
नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर करता येतो, त्यांना जैविक खते असे म्हणतात. शेतात असणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा जलदरीत्या विघटनासाठी ते उपयुक्त ठरतात.
जैविक खतांचे फायदे :

  • जैविक खतांमुळे रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन, त्यात बचत होऊ शकते.
  • जैविक खते पर्यावरणपूरक आहेत.
  • जैविक खतांमुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते.
  • जैविक खते सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबरच जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन इन्डॉल ऍसिटीक ऍसिड, यासारखी संप्रेरके व विटामीन “बी’ झाडांना मिळवून देतात.
  • जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविके सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य रोगांचेदेखील नियंत्रण होते.
  • जैविक खते वापरल्याने जमिनीचा पोत सुधरतो.
  • उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते, तसेच उत्पादन खर्च कमी होतो.
    जैविक खतांचे प्रकार :
    १. नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू – रायझोबियम, ऍसिटोबॅक्‍टर, ऍझोटोबॅक्‍टर, अझोस्पिरीलम, निळे-हिरवे शेवाळ, ऍझोला
    २. स्फुरद विरघळविणारे जीवाणू
    ३. पालाश विरघळविणारे जीवाणू
    ४. सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू
    ५. सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू
    १. नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू :
    रायझोबियम:या जीवाणूंचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. हे जीवाणू कडधान्यवर्गीय पिकांच्या मुळामध्ये स्थिर होऊन गाठी बनवतात. मुळावर वाढलेले जीवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात.
    एकाच प्रकारचे रायझोबियम जीवाणू खत सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाहीत. त्यामध्ये वेगवेगळे सात गट आहेत. वेगवेगळ्या गटातील विशिष्ट पिकांना त्याच गटाचे रायझोबियम जीवाणू खत वापरावे.
    चवळी गट – तूर, भुईमूग, बाग, चवळी, मूग, उडीद इत्यादी
    हरभरा गट – हरभरा
    वाटाणा गट – वाटाणा, मसूर
    घेवडा गट – घेवडा
    सोयाबीन गट – सोयाबीन
    अल्फा- अल्फा गट – अल्फा- अल्फा, मेथी, लसूण घास
    बरसीम गट – बरसीम
    प्रमाण – बीज प्रक्रियेसाठी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे.
    ऍसिटोबॅक्‍टर: हे जीवाणू मुख्यतः ऊस व इतर शर्करायुक्त पिकांसाठी जैविक खत म्हणून वापरण्यात येते. हे जीवाणू उसाच्या मुळे व इतर भागात वाढून नत्र स्थिरीकरण करतात. हे जीवाणू आंतरप्रवाही असल्याने स्थिर केलेल्या नत्राचा पीक वाढीमध्ये सर्वाधिक वापर होऊ शकतो. प्रमाण – बेणे प्रक्रियेसाठी २.० लिटर, फवारणीसाठी- १० मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये.
    ऍझोटोबॅक्‍टर : हे जीवाणू पिकाच्या मुळावर गाठी न बनवता असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात, तसेच हे जीवाणू बीजांकुरण व पीक वाढीसाठी उपयुक्त अशा काही रसायनांचा (उपयुक्त) स्राव तयार करतात. काही रासायनिक तत्त्व बुरशीनाशक तसेच कृमिनाशक म्हणूनही कार्य करतात. या जीवाणूंचा उपयोग एकदल व तृणधान्य पिके उदा. ज्वारी, मका, कापूस, बाजरी, मिरची, सूर्यफूल, वांगी, डाळिंब इत्यादी पिकांमध्ये होतो. प्रमाण – बीजप्रक्रियेसाठी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे, एकरी ४ किलो- शेणखतातून, एकरी २ किलो – ड्रीपद्वारे, फळझाडांसाठी- ५० ग्रॅम प्रति झाड.
    ऍझोस्पिरीलम: हे जीवाणू तृणधान्य व भाजीपाला पिकाच्या मुलांमध्ये आणि मुळांवर राहून नत्र स्थिरीकरण करतात. ज्वारी व मका या पिकांमध्ये या जीवाणूंचा प्रभावी उपयोग दिसून येतो. निळे हिरवे शेवाळ – हे एक विशिष्ट प्रकारचे शेवाळ असून, हवेतील नत्र भात पिकाला उपलब्ध करून देते. भाताच्या पुनर्लागणीनंतर दहा दिवसांनी एकरी चार किलो प्रमाणे संपूर्ण शेतात सारख्या प्रमाणात पसरावे. ऍझोला:ही पाणवनस्पती शेवाळाबरोबर सहजीवी पद्धतीने हवेतील नत्र स्थिरीकरण करते. याचा उपयोग भात खाचरात हिरवळीचे खत म्हणून करतात.
    २. स्फुरद विरघळविणारे जीवाणू: स्फुरद हे पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असे एक मूलभूत अन्नद्रव्य आहे. निसर्गात स्फुरद मुक्त स्वरूपात आढळून येत नाही. परंतु खनिजे, प्राण्यांचे अवशेष, खडक इ.मध्ये आढळतो. हे अन्नद्रव्य जमिनीत विरघळण्यास कठीण असून, शिफारशीप्रमाणे दिलेल्या स्फुरदयुक्त खतांचा उपयोग पूर्णपणे होऊ शकत नाही. स्फुरद विरघळविणारे जीवाणू न विरघळलेल्या स्थिर स्फुरदाचे पिकांना उपलब्ध अशा रासायनिक स्वरूपात रूपांतर करतात. प्रमाण- बीजप्रक्रियेसाठी- २५० ग्रॅम प्रति१० किलो बियाणे, एकरी ४ किलो- शेणखतातून, एकरी २ लिटर –ड्रीपद्वारे, फळझाडांसाठी – ५० ग्रॅम प्रति झाड.
    ३. पालाश विरघळविणारे व वहन करणारे जीवाणू :वनस्पतींच्या पानांची जाडी व खोड, फांद्यांच्या सालीची वाढ व बलकटीकरण करण्यास पालाश हे मुख्य अन्न द्रव्य मानले जाते, तसेच पालाश पिकांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतो. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये पालाश या अन्नद्रव्यांची मुबलकता असूनही, स्थिर स्वरूपात असल्याने पिकांना उपलब्ध होत नाही. हे जीवाणू स्थिर स्वरूपातील पालाशातून जैवरासायनिक क्रियांद्वारे पालाश मुक्त करतात व पिकाला उपलब्ध करून देतात. पालाश या मूलद्रव्याचे वहन होत नाही. हे जीवाणू या पालाशची वहन क्रियाही सक्रिय करतात.
    प्रमाण- बीजप्रक्रियेसाठी- २५० ग्रॅम प्रति १०० किलो बियाणे, एकरी ४ किलो- शेणखतातून, एकरी २ लिटर- ड्रीपद्वारे, फळझाडांसाठी- ५० ग्रॅम प्रति झाड.
    ४. सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू:पिकांची काढणी झाल्यानंतर उरलेली काडी, पाने, पाचट, पालापाचोळा यासारखे पिकांचे अवशेष हे पोषणद्रव्यांचे उत्तम स्रोत असतात. त्यातील काहींचे विघटन होण्यास अधिक कालावधी लागतो. या विघटन प्रक्रियेमध्ये ठराविक जीवाणूंचे योगदान असते. असे जीवाणू निसर्गतः आढळून येतात. प्रमाण- एकरी चार किलो शेणखतातून, चार किलो प्रतिटन काडी कचरा.
    ५. सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे जीवाणू:जमिनीतील उपलब्ध अशा अविद्राव्य स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये उदा. लोह, गंधक इ.चे उपलब्ध स्वरूपात रूपांतरण करण्याचे कार्य हे जीवाणू करतात. प्रमाण- एकरी दोन लिटर, ड्रिपद्वारे किंवा शेणखतातून.
    जीवाणू खते वापरण्याच्या पद्धती:
    १. बीजप्रक्रिया: २५० ग्रॅम जीवाणू खते १० किलो बियाणास पुरेसे होतात. बियाणाच्या प्रमाणानुसार बीजप्रक्रियेसाठी पुरेसे पाणी घेऊन त्यात वरील प्रमाणामध्ये जीवाणू खते मिसळावीत. एकरी किंवा हेक्‍टरी लागणारे बियाणे फरशी, ताडपत्री, अथवा गोणपटावर पसरावे. त्यावर वरील द्रावण शिंपडून हलक्‍या हाताने एकसारखे मिसळावे. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीमध्ये सुकवावे. बियाणे सुकल्यानंतर लगेचच पेरणी करावी. कोणत्याही रासायनिक खतांबरोबर जीवाणू खते किंवा बियाणे मिसळू नयेत.
    २. रोपांच्या मुळावर अंतरक्षीकरण: ऍझोटोबॅक्‍टर किंवा ऍझोस्पिरीलम किंवा स्फुरद विरघळविणारे जीवाणू आणि ट्रायकोडर्मा बुरशी संवर्धनाकरिता, जीवाणू संवर्धने प्रत्येकी ५०० ग्रॅम प्रत्येकी ५ लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात रोपांची मुळे ५ मिनिटे बुडवून ठेवावी. त्यानंतर त्वरित रोपांची लागवड करावी. पिकांना पाणी द्यावे.
    ३. जीवाणू खते शेणखतात मिसळून जमिनीत पेरणे: १ ते २.५ किलो जीवाणू खते २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून द्यावीत. शक्‍यतो हे मिश्रण झाडांच्या किंवा पिकांच्या मुळाशी टाकावे. पिकास हलके पाणी द्यावे.
    ४. उसाच्या बेण्यावर प्रक्रिया (बेणे प्रक्रिया): ऍसिटोबॅक्‍टर जीवाणू खत प्रत्येकी २ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात उसाच्या कांड्या (बेणे) १० ते १५ मिनटे बुडवून ठेवावे. त्यानंतर उसाची लागवड करावी व पाणी द्यावे.
    ५. भात पिकासाठी निळे हिरवे शेवाळे वापरण्याची पद्धती: भात पिकाच्या रोपांची लागवड पूर्ण करून घ्यावी. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी पाणी स्वच्छ झाल्यानंतर निळे-हिरवे शेवाळ हेक्‍टरी २० किलो प्रमाणात वापरावे. मातीमिश्रित निळे-हिरवे शेवाळ शेतात विस्कटून द्यावे. त्यानंतर बांधातील पाणी ढवळू नये.
    ६. ऍझोलाचा वापर: भात बांधातील पाण्यामध्ये ऍझोला ७०० ग्रॅम प्रति चौरस मीटर क्षेत्र या प्रमाणात शिंपडून घ्यावा. या वनस्पतीची वाढ होऊन साधारणतः २५ ते ३० दिवसांत संपूर्ण पृष्ठभाग आच्छादून जातो. ही वनस्पती त्याच बांधातील पाण्यात चिखलण करून गाडून टाकावी.
    ७. व्ही. ए. मायकोरायझा (व्हॅम)चा वापर: वाफ्यावरील सरीमध्ये व्ही. ए. मायकोरायझा जीवाणू खत एकरी २ ते ३ किलो या प्रमाणात टाकावे. त्यानंतर बी पेरावे. पेरलेले बी मातीने झाकून टाकावे. पाणी द्यावे.
    जैविक कीडनाशक:
    ट्रायकोडर्मा: ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची बुरशी आहे. या बुरशीचा उपयोग जैविक कीडनाशक (बायो पेस्टिसाईड) म्हणून केला जातो. ट्रायकोडर्माचा उपयोग बीज प्रक्रिया, मुळावर अंतरक्षीकरण तसेच जमिनीतून मातीमध्ये मिसळून केला जातो. प्रमाण- बीजप्रक्रियेसाठी ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे, हेक्‍टरी ५ किलो प्रमाणे शेणखतात मिसळून द्यावे.
    जैविक खते वापरताना घ्यावयाची काळजी :
     जीवाणू संवर्धनाची पाकिटे सावलीत थंड ठिकाणी ठेवावे, तसेच सूर्यप्रकाश व उष्णता यांपासून संरक्षण करावे.
     जीवाणू खते हे जैविक घटक असल्यामुळे त्याचा वापर रासायनिक खत किंवा कीडनाशकासह करू नये.
     बियाण्याला किंवा बेण्याला बुरशीनाशक अथवा कीटकनाशकांची बीजप्रक्रिया करायची असल्यास अगोदर अशी प्रक्रिया पूर्ण करून, नंतर जीवाणूंची प्रक्रिया करावी.
     कडधान्यवर्गीय पिकासाठी गटानुसार योग्य ते रायझोबियम खत निवडावे.
     जैविक खत खरेदी करण्यापूर्वी, त्यावरील उत्पादन तिथी व वापराची अंतिम तिथी, वापरण्याच्या पद्धती या गोष्टी वाचून अंतिम तारखेपूर्वीच वापर करावा.