महादजी शिंदेच्या सैनिक पत्नीने पतीसाठी बांधला ताजमहाल
डॉ सतीश कदम
पानिपतावर आपल्या चार बंधूंचे बलिदान झाल्यानंतर महादजीबाबांनी पुन्हा एकदा उभारी घेत शिंदे घराण्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी रात्रंदिवस एक केला. पानिपतावर मराठा हारला हे वाक्य खोडून काढत 1771 साली लाल किल्ल्यावर भगवा फडकावत दिल्लीचा बादशाह मराठ्यांच्या पाठबळाशिवाय गादीवर बसू शकत नाही हे त्यांनी दाखवून दिले. त्यासाठी एका कवीने रचलेल्या काव्यपंक्ती बोलक्या आहेत, ताज क्या देखते हो I जन्नत तो ग्वालियर है II दिल्ली को भी पुछो, उसकी जान मराठा है II महादाजी शिंदेंनी उत्तरेत साम्राज्य विस्तार करत ग्वालियरला आपले मुख्य ठाणे बनविले.कवायती फौजेची उभारणी करताना भविष्यात आपणाला इंग्रजासोबत चार हात करावे लागणार याची चाहूल त्यांना अगोदरच झालेली होती. त्यामुळे डी बॉयन या फ्रेंच सेनापतीच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपली कवायती फौज उभी केली होती. त्यात पेरॉन, पेड्रोन, दद्रुनेक, लुईस बोविर्वन, द्रुजॉन, रोहन, बेवर्स, डार्सन, अलिमंडसोबतच जॉन विलीयम हेसिंग सारखे विविध देशांचे जवान आपल्या सैन्यात ठेवले. त्यामुळे महादजींच्या कवायती फौजेत 30 हजार पायदळ आणि 30 हजार घोडदलासह सुसज्ज तोफखाना ठेवण्यात आला होता. यावेळी मेजरला 1800 तर साध्या शिपायाला 9 रुपये महिना पगार दिला जायचा. सेनापती डी बॉयन महादजींचा उजवा हात असून त्याने आग्र्यात तोफ निर्मिताचा कारखानाही उभा केला होता. म्हटले जाते की, डी बॉयन हा नेपोलियनही सल्ला द्यायचा. याच डी बॉयनच्या नेतृत्वाखाली जॉन विलियम हेसिंग नावाचा डच सैनिक शिंदेंच्या सैन्यदलात दाखल झाला. यारम्यान त्याने श्रीमती अॅन डेरियनसोबत लग्न केले. तिच्यापासून जॉर्ज आणि थॉमस ही दोन मुले आणि मॅडेलाइन नावाची एक मुलगी झाली. मुलामध्ये जॉर्ज हेसिंग शिंदेच्याच फौजेत अधिकारी म्हणून दाखल झाला तर मुलीचा पती सदरलँडसुद्धा सैन्यातील महत्वाच्या पदावर कार्यरत होता.
5 नोव्हेंबर 1739 ला नेदरलँडमध्ये जन्मलेल्या जॉन हेसिंगने 1757 ला श्रीलंकेमध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरी पत्करली. त्यानंतर 1763 ला हेसिंग हैद्राबादच्या निजाम सैन्यात गेला. पुढे 1784 साली डी बॉयनच्या नेतृत्वाखाली तो महादजी शिंदेंच्या कवायती फौजेत दाखल झाला. यादरम्यान आग्र्याजवळील भोंदागाव उर्फ भंदै याठिकाणी झालेल्या लढाईत जॉन हेसिंगने मोठा पराक्रम गाजविला. यावेळी हेसिंग जबर जखमी झाला होता. त्याच्या कामगिरीची दखल घेऊन डी बॉयने हेसिंगला कर्नलपदी बढती देत दोन बटालियनचे प्रमुख म्हणून नियुक्त केले. काम करत असताना डी बॉयनसोबत मतभेत झाल्यामुळे त्याने शिंदेची नोकरी सोडली. मात्र त्याच्यातील पराक्रम पाहून महादजीनी हेसिंगल पुन्हा एकदा आपल्या सेवेत दाखल करून घेत त्याला आपल्या खास घोडदल किंवा खास रिसालाचे प्रमुख बनविले. 1794 ला महादजी शिंदेचे निधन झाल्यानंतर ग्वाल्हेरच्या गादीवर आलेल्या दौलतराव शिंदेंकडे त्याने त्याच उमेदीने नोकरी कायम केली. यावेळी त्याच्याकडे 3000 फौजेची तुकडी असून त्याद्वारे हेसिंगने निजमाविरोधात झालेल्या खर्ड्याच्या लढाईत पराक्रम गाजवत मराठ्यांच्या विजयास चांगलाच हातभार लावला. याशिवाय हेसिंगने दुसर्याि मराठा इंग्रज युद्धात भाग घेत थेट ईस्ट इंडिया कंपनीसोबत चार हात केले.
www.janvicharnews.com
1798 ला महादजी शिंदेच्या विधवा पत्नी आणि दत्तकपुत्र दौलतराव यांच्यात बेबनाव निर्माण झाला तेव्हा शिंदेंचा सेनापती आबाजी इंगळे यांनी बायकांची बाजू घेताच दौलतरावाने आपला फ्रेंच सेनापती पेरोनला पाठवून आग्र्याचा किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा दौलतराव शिंदेंनी जॉन हेसिंगला आग्र्याचा किल्लेदार म्हणून नियुक्त केले. तर त्याच्याजागी हेसिंगचा मुलगा जॉर्जला सैन्याधिकारी म्हणून नियुक्त केले. आग्र्याचा किल्लेदार म्हणून जॉन हेसिंगची कारकीर्द उठावदार ठरली. यावेळी आग्र्याच्या किल्ल्यात शिंदेंची नाणी पाडली जात होती. यात आश्चर्याची बाब म्हणजे तांब्याच्या या नाण्यावर चक्क जॉन विलियम हेसिंग ( JWH ) असे नाव कोरलेले असायचे. बहुतेक असे उदाहरण अन्यत्र दिसत नाही.
सुरूवातीला जेव्हा महादजींचा सेनापती डी बॉयनने आग्र्याचा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा किल्ल्याशेजारी असलेल्या ताजमहाल परिसरात शिंदेच्या घोड्याचा तबेला ठेवण्यात आला होता. डी बॉयन दूरदृष्टीचा माणूस असल्याने त्याचे लक्ष ताजमहालच्या सौंदर्याकडे गेले. यावेळी किल्ल्याचा वापर होत असलातरी ताजमहालसारखी स्मृतिस्थळे दुर्लक्षित होती. त्यामुळे ताजमहालसारख्या वास्तूला जपले पाहिजे म्हणून डी बॉयनने मोठ्या कष्टाने महादजीबाबाकडून काही रक्कम घेऊन त्याची दुरूस्ती करुन ताजमहालला प्रसिद्धीस आणले.
ईकडे 21 जुलै 1803 रोजी वयाच्या चौंसष्ठाव्यावर्षी जॉन विलियम हेसिंगचे प्रदीर्घ आजाराने आग्रा याठिकाणी निधन झाले. आग्र्यातील रोमन कॅथलिक स्मशानभूमीत हेसिंगवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पतीच्या मृत्यूमुळे पत्नी याननवर दुख:चा डोंगर कोसळला. पतीवर जिवापाड प्रेम करणार्या् यानने आपल्या पतीची कायमस्वरुपी आठवण राहावी म्हणून त्याचे अनोखे स्मृतिस्थळ तयार करण्याचा निर्णय घेतला. आईच्या विचाराला त्यांच्या मुलांनीही उस्फूर्तपणे पाठींबा दिला. हे स्मृतिस्थळ कसे असावे यावर चर्चा होऊन प्रेमाचे प्रतिक म्हणून ताजमहालसारखी अनोखी वास्तु तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
फार कमी लोकांना माहित आहे की, भारतात काळा, पांढरा आणि लाल असे तीन प्रकारचे ताजमहाल आहेत. ताजमहाल तसा एकच, परंतु आपल्या आवडत्या माणसासाठी एकाच प्रकारची वास्तू. काळा ताज म्हणजे जहांगीरचा दक्षिणेतील सुभेदार इरज उर्फ शहानवाजखानची कबर असून 1623 मध्ये जहांगीरने बुर्हाकनपूर याठिकाणी या वास्तुची निर्मिती केलेली आहे. काळ्या पाषाणातील या कबरीला चारही बाजूला मिनार असून याकडे पाहताच ताजमहालची प्रतिकृती असल्याचे जाणवते. त्यामुळे स्थानिक लोक याला काळा ताजमहाल म्हणतात. याच शहरात शहाजहानची दुसरी पत्नी मुमताजचा आपल्या 14 व्या बाळंतपणात 1632 साली मृत्यू झाला तेव्हा तिचे प्रेत या कबरीच्या परिसरात दफन करण्यात आले होते. वर्षभरानंतर मुमताजचा मृतदेह आग्र्याला नेऊन तेथे पांढर्याा दगडातील जगप्रसिद्ध असा ताजमहाल बांधला.
याच आग्रा शहरात जॉन हेसिंगचा मृत्यू झाल्यानंतर पत्नी अॅनने तत्कालीन एक लाख रुपये खर्चून आपल्या पतीचे स्मारक उभारले. अर्थातच याचा आकार ताजमहालची प्रतिकृती असून तो लाल दगडात बांधण्यात आलेला आहे. जमिनीवर हेसिंगची कबर असून आतील छताची ऊंची 17.5 एवढी आहे. चौकोनी चबुतरा पांढर्या दगडात तर बाजूच्या लाल दगडातील भिंती 54 फुट उंचीच्या आहेत. पश्चिमेकडील भिंतीला दोन जीने आहेत. आतल्या बाजूला काही खोल्या असून वरील घुमट द्विस्तरीय पद्धतीने बांधलेले आहेत. स्थानिक लोक याला रेड म्हणजे लाल ताज म्हणतात. मुस्लिम शैलीतील ख्रिश्चनाचे हे एकमेव स्मारक असावे. स्मारकावरील शिललेखात हेसिंगच्या कार्याच्या आढाव्यासोबतच शिंदे घराण्याविषयी गौरवोद्गार काढलेले आहेत. पुरातत्व विभागाने याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. अशारितीने भारतात तीन प्रकारचे ताजमहाल असून आग्र्यातील लाल दगडातील हा ताजमहाल म्हणजे पत्नीने पतीच्या स्मरणार्थ बांधलेला ताजमहाल आहे. आणि हा सैनिक शिंदे घराण्याचा आहे हे विशेष. धामधुमीमुळे कदाचित मराठ्यांना अशा वास्तु बांधता आल्या नाहीत हे शल्यमात्र कायम बोचत राहते.