Home इतिहासाच्या पाऊलखुणा यवनांचे जावई जुन्नरचे वैद्यकवी लोलिंबराज

यवनांचे जावई जुन्नरचे वैद्यकवी लोलिंबराज

0
यवनांचे जावई जुन्नरचे वैद्यकवी लोलिंबराज

यवनांचे जावई जुन्नरचे वैद्यकवी लोलिंबराज

डॉ सतीश कदम

इतिहासात जोधा अकबरची मोठी चर्चा असलीतरी दयाशर्मा चिमणीबेगम, जगन्नाथ पंडित लवंगी, लोलिंबराज रत्नकला आणि बाजीराव मस्तानी यासारखी उदाहरणेसुद्धा काही कमी नाहीत. संत एकनाथाच्या समकालीन कवीत तानाजी देशमुख, महालिंगदासबरोबरच लोलिंबराजसारखे ज्ञानी लोक होऊन गेले. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये दिवाकर भट्ट जोशींच्या पोटी लोलिंबराजचा जन्म झाला असून त्यांचा कालखंड संत एकनाथाच्या समकालीन म्हणजे इ. स. 1578 ते 1648 सांगितला जातो. महिपतीने भक्तविजय ग्रंथाच्या 57 व्या अध्यायातील वर्णन याप्रमाणे आहे. लोलिंबराज चांद बोधला I शेख फरिद प्रसिद्ध भला I शेख हुसेन सत्वा गळा II लहानपणीच वडील गेल्याने आईने लोलिंबराजचा सांभाळ केला. Dr. Satish kadam अतिशय स्वच्छंदी असणारा लोलिंबराज जुन्नरला मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे मत देवीकोशात मांडले आहे. यावेळी त्यांनी एका मुस्लिम मुलीसोबत विवाह करून तिचे नाव रत्नकला ठेवले. ती नेमकी कोणाची याविषयी मतमतांतरे असून काहीजण तिला जुन्नरच्या सुभेदाराची मुलगी मानतात तर महाजनमंडलनामक गुजराती पुस्तकात ती विजापूरच्या इब्राहीम आदिलशाहाची मुलगी असून तिचे मुळ नाव नाव मुरासा सांगितले आहे. लोलिंबराजचा कालखंड पाहता रत्नकला ही अहमदनगरच्या निजामशाहीतील एखाद्या मोठ्या मुस्लिम सुभेदाराची कन्या असावी. काही संदर्भात लोलिंबराजला हम्पी साम्राज्यातील राजा हरिहरचा दरबारी कवि म्हटलेले असलेतरी ते चुकीचे आहे.

लोलिंबराज जात्याच कवि, संगीतकार, वैद्य आणि भविष्य जाणणारा होते. रत्नकलेवर त्याचे नितांत प्रेम असून 1633 मध्ये त्यांनी वैद्यजीवन नामक पहिला संस्कृत ग्रंथ लिहिला. त्यानंतर वैधवतंस, चमत्कार चिंतामणी, हरिविलासकाव्य तर वैद्यककाव्य आणि रत्नकलाचरित्र हे मराठी ग्रंथ लिहिले. त्यांच्या ग्रंथाच्या काही प्रती कुरुक्षेत्र विश्वविद्यालय, तंजावर ग्रंथालय आणि भांडारकर संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांच्या संस्कृत ग्रंथावर उत्तर भारतात खूप काम झालेले आहे.

वैद्यकजीवन ग्रंथाची निर्मिती त्यांनी आपल्या पत्नीला समोर ठेऊन केल्याचे दिसून येते. त्यात ते म्हणतात धन्वंतरी के समान, समुद्रका चंद्रमा और बडे बडे बुद्धिमान, कवियोंका मुकुट और राजाओंकी सभाका भूषण जो लोलिंबराज कवि है, उसने अपनी स्त्री के कहनेसे यह वैद्यजीवन ग्रंथ रचा है. खरंतर हा चिकित्सा शास्त्र ग्रंथ आहे. तरीपण यात त्यांनी कवित्व आणि रसिकता आणली आहे. याच ग्रंथात तो आपल्या पत्नीचे नाव मुरासा असल्याचे सांगतो, यावरून रत्नकला मुस्लिम स्त्री होती याला पुष्टी मिळते. तिच्या सांगण्यावरून हा ग्रंथ लिहिला हे सांगताना कुठल्याही रोगाचे निदान आणि उपचार सांगताना लोलिंबराज रत्नकलेवर नेताना दिसतो. उदा. जुन्या तुपासोबत हिंग घेतल्यास जुनाट ताप असा निघून जातो की, यौवनात आलेली एखादी कामिनी समोर येताच माणसातील साधुभाव पटकन निघून जातो. याच ग्रंथात त्यांनी वणीच्या सप्तशृंगदेवीचे वर्णन केलेले आहे. यावरून मध्ययुगीन कालखंडातील राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थितीचे आकलन होते. दुर्दैव आहे की आपल्या संतांनी लिखाण करताना इतिहास, भूगोल यावर टिपणी न केल्याने आपलाच इतिहास जाणून घेण्यासाठी परकीय साहित्याचा आधार घ्यावा लागतो.

वैधवतंस हा लोलिंबराज यांचा सर्वात छोटा ग्रंथ असून त्यात फक्त 58 श्लोक आहेत. या ग्रंथात फळाविषयी माहिती देताना त्याचे नाव, प्रकार, उपयोग सांगितले आहेत. त्यात आवळा, चिंच, द्राक्ष, बोर, खजूर, केळ, नारळ आणि अंजीर यासारख्या फळाविषयी आश्चर्यकारक माहिती आहे. कारल्याचे वर्णन करताना ते म्हणतात ज्याप्रमाणे त्याची सुवर्ण प्रतिमा स्त्रिया आपल्या हृदयावर धारण करतात त्याप्रमाणे कारले हे सर्व भाज्यात सर्वश्रेष्ठ आहे. या ग्रंथात ते स्वत:ला कविकुलसुलतानो लोलिंबराज आणि लोलिंबराज कवीपातशाह अशा पदव्या वापरल्या आहेत. हरिविलास ग्रंथ 314 श्लोकाचा असून यात कृष्णलीला सांगितली आहे. या ग्रंथाच्या लिखाणाबाबत ते म्हणतात अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या भुमंडळाचा स्वामी, कविवर्गाचे नायक लोलिंबराज, तिन्ही लोकीं कुतूहल निर्माण करणारे काव्य निर्माण केले आहे. सूर्य राजाचे पुत्र अर्थातच हरिहर राजाच्या सभेला ज्याने सुशोभित केले. लोलिंबराजने या ग्रंथात हरिहर राजाचे नाव घेतल्याने लोलिंबराज हे हम्पी साम्राज्याच्या आश्रयाला होते असा त्याचा अर्थ होतो. मात्र हम्पी साम्राज्य हे लोलिंबराजच्या अगोदर बुडालेले असल्याने संधिग्तता निर्माण होते. परंतु त्या कालखंडातील हम्पी साम्राज्याचे वैभव हे डोळे दिपविणारे असल्याने आपल्या कवित्वाची तुलना करण्याकरिता अलंकारिकरूपाने हा शब्द वापरला असावा असे दिसते.

त्यानंतर चमत्कार चिंतामणी नावाचा ग्रंथ आपण आपली प्रियतमा रत्नकलेला आयुर्वेदाचे उपदेश द्यायचा म्हणून तयार केल्याचे लोलिंबराज यांनी या ग्रंथात सांगितले आहे. लोलिंबराजचे वैशिष्ठ्य म्हणजे औषध किंवा उपचार सांगत असताना ते सौंदर्याचे वर्णन करताना दिसतात. यावेळी ते म्हणतात जेव्हा आंबे पिकायला लागले, मोर नाचायला लागले आणि थंड हवा सुरू झाली की, उष्णता एकदम शांत व्हायला लागते. रत्नकलेचे वर्णन करताना ते म्हणतात तुझे स्तन डोंगराप्रमाणे कठीण आहेत. लोलिंबराजच्या अशा या लेखन शैलीमुळे आधुनिक भाषाकार त्यांच्या लेखनामध्ये अश्लीलता असल्याचे सांगतात.

एकंदर लोलिंबराज हे मध्ययुगीन कालखंडात वैद्यकशास्त्रासारख्या समाजोपयोगी ग्रंथाचे कर्ते होते. पत्नी रत्नकलेच्या निधनानंतर विरक्त होऊन ते सप्तशृंग गडावर संन्यासी वृत्तीने जगले आणि विविध ग्रंथाची निर्मिती केली. पत्नीच्या विरहावर ते म्हणतात, ज्याची कीर्ती जगत्त्रइ प्रकटली मंदाकिनीचे परी, जो एके घटकेत शंभर नवी पदे विनोदे करी, ज्याला की, कविपातशाह पदवी विद्वज्जनी लाभली, तो हा रत्नकले! तुला विनवितो लोलीमराज: कवी II मुस्लिम राज्यकर्त्याचे जावई आणि वैद्यकशास्त्र तसेच इतरही पुस्तकाच्यारूपाने त्यांचे लेखन मराठी माणसाचे वैभव वाढविणारे असुनही महाराष्ट्राने त्यांची पाहिजे त्याप्रमाणात दखल घेतल्याचे दिसून येत नाही. याऐवजी वाराणसीच्या डॉ. ब्रहानंद त्रिपाठी यांनी लोलिंबराज यांच्या पाच ग्रंथाचे भाषांतर करून प्रकाशीत केल्याने त्यांच्या लेखनावर काही प्रमाणात प्रकाश पडला आहे. त्यांच्या लेखनातील ओघवत्या शैलीत दस्तूरखान, मीरखान, फरादखान, नुरीखान, कृष्णाजीपंत, तिमाजीपंत, मुरारीपंत अशी नावे आलेली असून हे लोक मोगल, निजामशाही आणि आदिलशाहाचे मोठे सरदार किल्लेदार असल्याचे दिसून येतात. यावरून तत्कालीन कालखंड आणि लोलिंबराजचे राजकीय वजन ध्यानात येऊ शकते.

संत एकनाथांचे चरित्र, सामराज यांच्या रुक्मिणी हरण, महीपतीचे भक्तविजय, मराठी वाड:मय कोश, देवीकोश, मराठी वाड:मयाचा इतिहास या मराठी ग्रंथसाहित्यात थोडाफार उल्लेख असलातरी त्यामानाने उत्तर भारतात त्यांच्यावर खूप लेखन झालेले आहे. जुन्नरमधील जाणकारांनीही लोलिंबराजविषयी विशेष माहिती आढळून आलेली नाही. याबाबत त्यांचे शब्द उपयोगी पडतात, मजविणे घडि कोठे जासि तू ना रसाले ! न पुसत परलोका केवि गेलीस बाळे ! विषय विषय करिता सर्व सौंसार गेला ! क्षणभरि परि नाही मुक्तिचा यत्न केला II वाढत्या धकाधकीच्या जीवनात लोलिंबराजच्या लेखनाचा अवलंब केलातर मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर निरोगी राहण्यास मदत होईल.