मुलूख मैदान तोफ
डॉ सतीश कदम
मुळच्या जॉर्जिया प्रांतातून गुलाम म्हणून आलेल्या युसूफ आदिलशाहने इ. स. 1489 साली विजापूरच्या आदिलशाहीची निर्मिती केली. आदिल म्हणजे न्यायी. तर युसूफने स्थापन केलेल्या सत्तेला आदिलशाही सत्ता म्हटले गेले. 1489 ते 1686 या दोनशे वर्षाच्या दरम्यान आदिलशाहीत एकूण नऊ लोकांनी राज्यकारभार केला. विजयपूर शहराचा निर्माता असणार्या युसूफ आदिलशाहने गिचनहळ्ळी, विजयहळ्ळी, चंदनकेरी, खादगी, खेडेकरी, कोरबोरहळ्ळी व कुरणकोटी या सात खेड्यांना एकत्र करून विजयपूरला आपली राजधानी बनविले. मुळचा इंदापूरचा व नंतर जमखंडीचा जहागीरदार राहिलेल्या मुकुंदरावाची बहिण फुंजी खानमपासून आदिलशाहीतील पुढील वारसदाराची उत्पत्ती झाली. दोनशे वर्षात आदिलशाहीत तेथील 1600 एकरावरील भव्य किल्ल्यासह गोल घुमटसारख्या अनेक आश्चर्यकारक वास्तुची निर्मिती झाली. इ. स. 1563 साली अली आदिलशाहने विजापूर शहराला 9 मैल घेराची भक्कम तटबंदी बांधली. या तटबंदीला बुर्ज अलिबाग, बुर्ज हिलालीबाग, सुंदर, अहमद, शापुर , शर्जा, गगन असे एकूण 120 बुरुज तर पादशाहापूर, मक्का, अल्लापूर, बोमणी, शापूर, सारवार, दिंडी व फत्ते यासारखे एकूण 77 दरवाजे होते. परंतु विजापूर म्हटल्यानंतर चर्चा होते ती म्हणजे फक्त मुलूख मैदान तोफेची.
पैकी शापुर दरवाज्यादरम्यान शर्जा बुरूजावर जगप्रसिद्ध अशी मुलूख मैदान तोफ ठेवलेली आहे. विजापूरमध्ये फिरंगी, लांडा कसाब, मुस्तफा, लांब मिर्ची अशा इतरही तोफा असल्यातरी मुलूख मैदान तोफेने जगातील सर्वात अवजड तोफ म्हणून मिळविलेला लौकिक आजही कायम आहे.
या तोफेचे मुळ नाव मलिक ए मैदान म्हणजे रणभूमीची राणी असा होतो. परंतु विजापूरकर या तोफेचे नाव रणभूमीतील सिंह याप्रमाणे लावतात. बुरूजातील शर्जा म्हणजे सिंह आणि त्यावर रणभूमीचा सिंह विराजमान आहे हे विशेष. काही पुस्तकात या तोफेचा उल्लेख महाकाली असाही सापडतो. 1889 साली सीताराम गायकवाड यांनी लिहिलेल्या विजापूर दर्शननामक पुस्तकात मुलूख मैदानविषयी बरीच पूरक माहिती आलेली असून या तोफेची लांबी 14 फुट 4 इंच तर 4 फुट 11 इंच इतका तोफेचा व्यास असल्याने तिच्या जबड्यात माणूस सहजपणे बसतो. या महाकाय तोफेचे वजन 31000 रतल म्हणजे 55 टन भरते. तोफेची जाडी जवळपास एक फुटाची असून ती बनविण्याकरिता तांबे, जस्त, लोखंड इत्यादि मिश्र धातूचा वापर केलेला आहे. तोफेचा तोंडाकडील आकार सिंहाच्या जबड्यासारखा असून त्या सिंहाच्या जबड्यात हत्ती धरलेले आहेत. त्यानुसार सिंहासारखी ताकद असलेली मुलूख मैदान हत्तीसारख्या महाकाय ताकदीला आपल्या कब्ज्यात ठेऊ शकते हेच यातून दाखविलेले आहे.
इ. स. 1549 साली अहमदनगरच्या निजामशहाच्या आज्ञेवरून महमदबिन हसन रुमीखानाने अहमदनगर याठिकाणी ही जगातील महाकाय तोफ बनविली. पुढे 26 जानेवारी 1561 ला विजयनगर साम्राज्याचा राजा सदाशिवरावच्या विरोधात विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही या तीन सत्ता एकत्र येऊन तालीकोटच्या युद्धात सदाशिवरावचा पराभव केला. या लढाईत मुलूख मैदान तोफेची कामगिरी महत्वाची असून या युद्धामुळे जगातील स्वप्ननगरी ठरलेल्या हम्पी साम्राज्याचा अस्त झाला. असे म्हटले जाते की, या तोफेच्या आवाजाने कित्येक स्त्रियांचे गर्भपात झाले. याशिवाय निजामशाहीचा दिवाण मलिक अंबरने या तोफेचा वापर सोलापूरच्या युद्धातही केल्याचा संदर्भ सापडतो.
16 व्या शतकात अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही यांच्यात मोठा संघर्ष असून भीमा नदी त्यांची हद्द होती. शत्रूच्या बंदोबस्ताकरिता निजामाने आपल्या ताब्यातील परंड्याच्या किल्ल्याला दारूगोळ्याचे कोठार बनविले होते. त्यामुळे मुलूख मैदान तोफही बरीच वर्ष परंड्याच्या किल्ल्यावर विराजमान होती. पुढे आदिलशाहाने परंड्याचा किल्ला जिंकून घेतल्यानंतर मुलूख मैदान तोफ विजापूरकरांच्या ताब्यात गेली. दैनिक भास्करच्या 27 डिसेंबर 2016 च्या अंकात मुलूख मैदानविषयी काही रोचक माहिती दिलेली आहे. त्यानुसार 1632 साली आदिलशाहाचा दिवाण मुरारपंताने ही तोफ परंड्याहून विजापूरला हलविली. ती वाहून नेण्यासाठी 10 हत्ती आणि 400 बैलाचा वापर करण्यात आला. मुलूख मैदानसोबतच कडक बिजली नावाची आणखी एक तोफ वाहून नेत असताना भीमा नदीपात्रात पडली. ती तशीच राहिली. पुढे याच पत्रात उजणी धरण झाल्याने कडक बिजली कायमची पडद्याआड गेली. त्यामुळे कच्चे रस्ते आणि वाहतुकीची कुठलीही साधने नसताना मुलूख मैदानला कशाप्रकारे वाहून नेत असतील हे एक प्रकारचे कोडेच आहे.
मुलूख मैदान विजापूरला नेल्यानंतर तिच्या वापराचे विशेष संदर्भ सापडत नाही. औरंगजेबालाही तिच्या महाकाय आकाराची भुरळ पडली. त्यानुसार इ. स. 1686 साली औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही बुडवून टाकल्यानंतर या बाबाने मुलूख मैदान तोफेवर आपले नाव कोरून टाकले. मुलूख मैदान तोफेवर एकूण तीन लेख असून पहिल्या लेखात बुर्ज ए शर्जा दुसर्या एका लेखात इ. स. 1549 साली अहमदनगर येथे मुहमद हसन रुमीने ही तोफ बनविल्याचा उल्लेख असून तिसरा लेख कोरताना औरंगजेबाने पुढील शब्द कोरलेले आहेत.
www.janvicharnews.com
(DR. SATISH KADAM) त्यानुसार जो आलमगीर बादशहा बहादूर धर्मसंरक्षक त्याने सन तारीख हिजरी 1097 मध्ये विजापूर फत्ते केले. व इनसाफीने बादशहाचा मुलूख घेऊन आपल्या दैवाने प्रसिद्ध मुल्कमैदान तोफ काबिज केली.
पुढे इंग्रज राजवटीत मुल्कमैदान तोफेला विजापुरवरून इतरत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला परंतु ते नेहमी असफल झाले. पुढे तिच्या महाकाय वजनामुळे मुलूख मैदान तोफेचा वापर झाला नाही. त्यामुळे इंग्रज राजवटीत 1854 साली या तोफेला वापराअयोग्य ठरवून तिचा लिलाव करण्यात आला. तेव्हा मुलूख मैदान फक्त दीड लाखात विकली गेली. मात्र तेथील कमिशनरने हा सौदा रद्द करुन मुलूख मैदान तोफेला संरक्षित म्हणून घोषित केल्याने आज भारतच नाहीतर जगभरातील पर्यटकांना डोळ्याचे पारणे फेडायला लावले आहे. बुक ऑफ बॉम्बे पुस्तकात या तोफेविषयी आलेले वर्णन मार्मिक असून त्यानुसार लढाईसाठी ही तोफ एक देणगीच असून एडिंबरो येथील किल्ल्यावर मॉन्स मेग नावाची तोफ आहे. ती तोफ हिच्या पासंगालाही पुरणार नाही.
सर्वात लांब तोफ बिदरच्या किल्ल्यावर, दहा फुटी चाकावर विराजमान म्हणजे व्हील बेस्ड असणारी सर्वात मोठी तोफ जयपूरमधील एका किल्ल्यावर आहे. तर सर्वात अवजड तोफ म्हणजे मुलूख मैदान विजापूरच्या किल्ल्यात आहे. अशाप्रकारच्या बलाढ्य तोफा असतानाही या भारतभुमीला 150 वर्षे इंग्रजसारख्या परकीय सत्तेच्या पारतंत्र्यात का रहावे लागले यावरपण मंथन झाले पाहिजे. छत्रपती शिवरायांनी राजापूर याठिकाणी तोफेचा कारखाना काढला होता त्यामुळे त्यांना जर आणखी आयुष्य लाभले असतेतर भारताचा नकाशा काही वेगळाच दिसला असता. एखाद्या वक्त्याला मुलूख मैदान पदवी देऊन आपण तोंडाची वाफ घालवतो हे तिच्या वर्णनावरून सहज ध्यानात येते. मुलूख मैदान म्हणजे रणभूमीतील या सिंहाचा विशेष वापर न होताही एवढा रुबाब आहे. आणि जर वापर झालाच असतातर अनेकांचे नामोनिशाण राहिले नसते यातच सर्वकाही आले.