Home इतिहासाच्या पाऊलखुणा सातकस घोरपडे आणि नवकस घोरपडे

सातकस घोरपडे आणि नवकस घोरपडे

0
सातकस घोरपडे आणि नवकस घोरपडे

सातकस घोरपडे आणि नवकस घोरपडे

डॉ सतीश कदम

भोसले आणि घोरपडे घराण्याचा मुळ पुरुष एकच असून यादवांची सत्ता गेल्यानंतर इ. स. 1334 साली सुजानसिंह भोसले अल्लाउद्दीन खिलजीकडे चाकरी करू लागले. याच भोसले घराण्यातील कर्णसिंहाने 1469 साली आपले प्राणार्पण करुन घोरपडीच्या साहाय्याने खेळणा किल्ला जिंकून घेतला. तेव्हा बरिदशहाने त्यांना घोरपडे राजे भोसले हा किताब दिला. तेव्हापासून कर्णसिंहाच्या घराण्याला घोरपडे नाव मिळाले. यावेळी त्यांचा भाऊ शुभकर्णला भोसले नाव कायम राहून छत्रपती शिवराय त्यांचेच वंशज. कर्णसिंह घोरपडेचा मुलगा चोलराज आदिलशाहाकडे गेल्यानंतर 1573 साली त्यांना विटा, भाळवणी, वांगी, न्हावी गावची पाटलकी तर हुकेरी प्रांताची देशमुखी दिली. पुढे चोलराजच्या सातकस घोरपडे आणि नवकस घोरपडे अशा दोन शाखा पडल्या. त्यासाठी दोन कथा प्रचलित असून पैकी एका प्रवादानुसार चोलराजला दोन पत्नी असून एकीला सात मुले झाली त्यांना सातकस तर दुसरीला नऊ मुले झाली म्हणून त्यांना नवकस घोरपडे नाव पडले. संदर्भानुसार मात्र चोलराजला तीन मुले असून थोरला पिलाजी मुधोळ गादीचा संस्थापक, मधल्या कानोजीचा वंश वाढला नाही तर तिसरा वल्लभसिंह हा कापशी गादीचा संस्थापक मानला जातो. त्यानुसार एका युद्धात मुधोळकर घोरपडे घराण्यातील सात वीरांनी बलिदान दिले ते मुधोळकर सातकस घोरपडे तर कापशीकरांचे नऊ वीर पडले म्हणून कापशीकर नऊकस घोरपडे म्हणून ओळखले जाऊ लागले. कस म्हणजे असामी तर आसामी म्हणजे वीरपुरुष. यावरून त्यात्या घराण्यातील नऊ आणि सात पुरुष पराक्रमी निपजले म्हणून त्यांना हे नाव पडले.

विजापूर जिल्ह्यातील मुधोळ हे घोरपडेंच्या जहागिरीचे ठिकाण असून आदिलशाहाने त्यांना मुधोळ व वाईसह 54 गावची जहागिरी दिली होती. 1471 पासून या घराण्यात भीमसिंह, खेळोजी, महालोजी, आखमसिंह, कर्णसिंह आणि चोलराज असे पराक्रमी पुरुष उपजले. त्यानंतर चोलराजचे पुत्र पिलाजींनी आपले ठाणे कायमचे मुधोळला हलविल्यानंतर ते मुधोळकर घोरपडे झाले. पिलाजी आणि त्यांचा पुत्र प्रतापरावने आदिलशहाकडून लढत असताना शहाजीराजांकडील पुणे परिसरातील किल्ले जिंकून घेतले. पुढे शहाजीराजेही आदिलशाहकडे गेल्यानंतर प्रतापराव आणि त्यांचा मुलगा बाजी घोरपडे यांच्यात कायमचे वितुष्ट आले. 1648 ला मुस्तफाखानाच्या सांगण्यावरून बाजीने शहाजीराजांना बेसावध असताना अटक केली होती. बदला घेण्यासाठी शिवरायांनी मुधोळवर आक्रमण करत बाजीला ठार केले. बाजीचे पुतणे मालोजी, शंकराजी यांनीही शिवरायासोबत संघर्ष केला. त्यामुळे शंकराजी घोरपडे शिवरायांच्या विरोधात लढताना तासगावच्या लढाईत मारले गेले. एकंदरीतच मुधोळकर घोरपडे हे कायम भोसले घराण्याच्या विरोधात राहिले. अशारितीने मुधोळचे सातकस घोरपडे हे मध्ययुगातील पराक्रमी घराणे होऊन गेले.

चोलराजचा कनिष्ठ पुत्र वल्लभसिंहला नवकस घोरपडे घराण्याचा संस्थापक मानला जातो. 1570 साली आदिलशाहने त्यांना विटा, भाळवणी, वांगी, न्हावी, जांब तसेच कर्नाटकातील हुक्केरी प्रांताची देशमुखी दिली. त्यामुळे भाळवणीला नवकस घोरपडेंच्या शाखेचे मुख्य ठिकाण राहिले. वल्लभसिंहाचे नातू म्हाळोजीबाबा घोरपडे यांच्यापासून घोरपडे घराण्याच्या दैदिप्यमान इतिहासाला सुरुवात होते. म्हाळोजीबाबा हे शहाजीराजाप्रमाणे आदिलशाहकडे असूनही शहाजीराजेंच्या स्वराज्य संकल्पनेला तनमनधनाने पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांची कारकीर्द शहाजीराजेसह त्यांची दोन्ही मुले संभाजी व शिवाजी, तसेच छत्रपती संभाजी एवढी प्रदिर्घ राहिली. शिवरायांच्या अनेक बर्‍यावाईट गोष्टीत त्यांनी मनोभावे सहभाग नोंदविला. एवढेच नाहीतर संगमेश्वर याठिकाणी छत्रपती संभाजीराजांना वाचविण्यासाठी त्यांनी बलिदान दिले.

म्हाळोजीबाबांना संताजी, बहिर्जी आणि मालोजी अशी तीन कर्तृत्वान मुले होती. शिवरायांपासून तिघेही लष्करी सेवेत दाखल होऊन संभाजीराजे, राजाराम ते ताराबाईपर्यंत स्वराज्यासाठी योगदान देत राहिले. घोरपडे घराण्यात संताजीसारखा महान योद्धा जन्माला आला हे मराठ्यांचे भाग्यच. संभाजीराजांच्या हत्येनंतर संताजीने आपल्या दोन भावासह औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून त्याच्या तंबूचे कळस कापून आणले. तेव्हा राजारामांनी संताजीला ममलकतमदार म्हणजे राज्याचा आधार, बहिर्जीला हिंदुराव तर मालोजीला अमीरुलउमराव पदव्या दिल्या. सोबतच संताजीला कापशीची जहागीर दिली. त्यामुळे संताजीपासून कापशीकर घोरपडे म्हणून ओळखले जाऊ लागले. संताजींला सोयराबाई आणि द्वारकाबाई या पत्नीपासून राणोजी आणि पिराजी ही दोन मुले झाली. यातील द्वारकाबाईची कारकीर्द अज्ञात असलीतरी फार गाजली. त्यांनी बरेच दिवस कापशीच्या गादीचा कारभारही हाकला होता. म्हणूनच त्यांच्या नाताने कापशीत त्यांचे मंदिर उभे केले. संताजींच्या दोन्ही मुलांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. कागल तालुक्यातील कापशीकर घोरपडे शेवटपर्यंत स्वराज्याप्रती एकनिष्ठ राहिले. 1910 पर्यंत या घराण्यात एकूण पाच संताजी होऊन गेले. तर याच घराण्यातील राणोजी दुसरे यांना नऊ मुले असल्याने कापशीकरांचा हसूर, गलगले, नववीहाळ, नागनूर, कासारी इत्यादिठिकाणी साम्राज्यविस्तार झाला. आजही कापशीत संताजीबाबांचे वंशज विद्यमान आहेत.

त्यानंतर संताजीचे दोन बंधु बहिर्जीला छत्रपती राजाराम महाराजांनी गजेंद्रगडची जहागिरी दिली होती. बदामीजवळ असणार्‍या गजेंद्रगडला भव्य असा किल्ला असून त्याची पुनर्बांधणी छत्रपती शिवरायांनी केली होती. बहिर्जीला हिंदुराव किताब असून त्यांना सयाजीराव, मुरारराव, सिधोजी अशी मुले झाली. यातील सिधोजीराव फार कर्तृत्वान निघाले. सिधोजीरावावर कोल्हापूर आणि सातारा अशा दोन्ही छत्रपतींची मर्जी असून कोल्हापूर छत्रपती संभाजीराजांनी त्यांना वाशिम, मेहकर, माहुर, संगमनेर, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर इत्यादि ठिकाणची जहागिरी दिली. याशिवाय मुसलमान आमदानीत कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मंदिराबाहेर अन्यत्र ठेवलेली मूर्ति छत्रपतींच्या सल्ल्याने पुन्हा एकदा सिंहासनावर बसविण्याचे महान काम सिधोजीराजांनी केले. स्वराज्याचे सेनापतीपद सांभाळत गुत्ती याठिकाणी आणखी एका गादीची स्थापना करून तेथे आपला थोरला मुलगा मुरारराव दुसरे यांची नेमणूक केली तर दूसरा दौलतरावाला गजेंद्रगड दिले. यातील मुरारराव घोरपडे हे पेशवे काळातील एक पराक्रमी सेनापती असून दक्षिणेत त्यांचा मोठा दरारा होता. हैदरअलीने गुत्तीवर आक्रमण करून मुरररावाला कैदे करून वेदनादायक मृत्यू देऊन संपविले. सोबतच हैदरने मुराररावांच्या दोन्ही पुत्रांनाही हाला हाल करून ठार मारले. त्यामुळे गुत्तीचे राज्य बुडाले. सिधोजीरावांनीच 1700 च्या सुमारास सोंडूर जिंकून घेतले होते. परंतु त्यांच्या दोन्ही पुत्रांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने दत्तक घेऊन सोंडूर संस्थान पुढे चालविले. ते स्वातंत्र्यपर्यंत टिकले.

याचवेळी संताजीचे तिसरे बंधु मालोजी घोरपडे यांनी दत्तवाड संस्थांनची स्थापना केली. संताजीबाबाप्रमाणे छत्रपती राजारामासाठी मालोजी घोरपडे यांनीही बलिदान दिले. पुढे स्वातंत्र्यपर्यंत दत्तवाड शाखा कार्यरत असून 1917 साली दत्तवाड घराण्यातील नरसिंगराव घोरपडे यांच्या कार्यतत्परतेबद्दल राजश्री शाहू महाराजांनी त्यांना पायात सोन्याचा तोडा घालण्याचा मान दिला होता. एकंदरच भोसले आणि घोरपडे हे एकाच शाखेतील असून त्यांच्यात पुढे सातकस घोरपडे मुधोळकर आणि नवकस घोरपडे कापशीकर अशा दोन शाखा पडल्या. तशाप्रकारचे उल्लेख त्यांच्या वतनपत्रातही सापडतात. त्यातल्यात नवकस घोरपडे घराण्यातच संताजीसारख्या महान योध्याचा जन्म झाला. अशा या नवकस घोरपडेविषयी जास्त काय वर्णावे ? कारण ते जन्माने नवकस असलेतरी कर्माने बावनकशी होते हेमात्र निश्चितपणे सांगता येईल.