Home कृषी साक्षरता पिकांचे एकात्मिक संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

पिकांचे एकात्मिक संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

0
पिकांचे एकात्मिक संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

पिकांचे एकात्मिक संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

 श्री.सतिश भोसले

नमस्कार शेतकरी बंधूनो,

भारतामध्ये पीकपद्धती आणि खतवापराविषयी विविध प्रवाह आहेत. देशात वाढत्या लोकसंख्येला पुरून उरण्यासाठी जास्तीत जास्त धान्य उत्पादनाची आवश्यकता आहे. यासाठी रासायनिक खतांचा वापर अनिवार्य असल्याचे प्रतिपादन केले जाते, तर दुसरीकडे महागड्या खतांना पूर्ण पर्याय म्हणून नैसर्गिक समजली जाणारी सेंद्रिय शेती पुरस्कृत केली जाते. संकरित आणि सुधारित पिकांच्या वाणांबरोबरच रासायनिक खतांच्या वापराने देशात पिकांच्या उत्पादनात उच्चांक गाठले गेले आहेत. वाढत्या उत्पादनात रासायनिक खतांचा सहभाग 50 टक्क्यांपर्यंत गेला आहे. रासायनिक खतांची शिफारस केलेली मात्राच पिकास पोषक ठरते. शिफारशीपेक्षा अधिक किंवा कमी खतांची मात्रा जमिनीत/पिकांत असमतोल निर्माण करते. यामुळे जमिनीच्या सुपीकतेवर आणि उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम होतो. जमिनीमध्ये खत घातल्यानंतर रासायनिक प्रकिया घडतात आणि त्याद्वारे उपलब्धावस्थेतील अन्नद्रव्ये बऱ्याच वेळेस उपलब्ध नसलेल्या अवस्थेत जातात, तर नत्रखतांचा वाफेद्वारे र्‍हास होतो. काही परिस्थितीत अन्नद्रव्यांचा कमी अधिक प्रमाणात र्‍हास होतो आणि पिकांना लागू होण्याची कार्यक्षमता घटते.

सेंद्रिय पदार्थ ही नैसर्गिक स्वरूपाचे असून त्यात नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण अतिशय कमी असते, परंतु कमी अधिक प्रमाणात विविध अन्नद्रव्ये सेंद्रिय स्वरूपात अस्तित्वात असतात. ही अन्नद्रव्ये पिकांना ताबडतोब लागू पडत नाहीत, परंतु विघटनानंतर हळुवार उपलब्ध होतात. सेंद्रिय खते जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक स्थिती सुधारण्यास मदत करतात. मात्र सेंद्रिय खताच्या देखील अनेक मर्यादा आहेत. कमी प्रमाणात अन्नद्रव्ये असल्यामुळे पिकांना लागणारी पूर्ण मात्रा सेंद्रिय खतांद्वारे पुरविली जाऊ शकत नाही म्हणून रासायनिक आणि सेंद्रिय खताचे चांगले परिणाम आणि मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही घटकांच्या समन्वयातून आणि परीक्षण, निरीक्षणातून योग्य अन्नद्रव्र पुरवठा पद्धत विकसित करता येणे शक्य आहे. एकात्मिक अन्नद्रव्य (खत) पुरवठा पद्धत ही पिकांना यथायोग्य अन्नद्रव्ये पुरवून चांगल्या शेती पद्धतीचा सुवर्णमध्य ठरू शकते

www.janvicharnews.com

एकात्मिक अन्नद्रव्य पुरवठा म्हणजे काय?

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे ज्या सर्वप्रकारच्या स्त्रोतांपासून अन्नद्रव्ये उपलब्ध होतात (उदा. रासायनिक व जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीचे पीक, पीकपद्धती व द्विदल पिकांचा अंतर्भाव इत्यादी) यांचा अवलंब करून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवून व जमिनीची सुपीकता टिकवून पीक उत्पादनात वाढ करणे होय. सेंद्रिय, रासायनिक आणि जैवीक खतांचा एकत्रित वापर, सेंद्रिय पदार्थाचे चक्रीकरण आणि योग्य पीकपद्धतीचा अवलंब करून पिकास अन्नद्रव्ये पुरविण्याच्या पद्धतीस एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात. एकात्मिक अन्नद्रव्ये पुरवठा पद्धतीमध्ये रासायनिक खताच्या वापराबरोबर सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जीवाणू खते, नत्रयुक्त अझोलासारखी हरित खते, वनस्पतींची पाने, शेतावरील धसकटे, मुळे, पालापाचोळा, काडीकचरा, इतर टाकाऊ पदार्थांच्या चक्रीकरणातून मिळणारा खताचा समतोल साधला जातो. या पद्धतीला द्विदल धान्य पिकांचा फेरपालटीत, तसेच आंतरपीक पद्धतीत समावेश करून जमिनीची सुपीकता टिकविण्याचा प्रयत्न केला जातो.

जमिनीतील अन्नद्रव्यांचा मुख्य स्त्रोत हा जमीन ज्या खडकांपासून बनलेली आहे त्यामधील अन्नद्रव्ये, तसेच सेंद्रिय खते, रासायनिक खते आणि जैविक खते ही होत. यापैकी आपण कोणत्याही एकच स्त्रोताचा वापर केला, तर तो पिकास अन्नद्रव्ये पुरविण्यास पुरेसा होणार नाही. यापैकी रासायनिक खतांचा वापर केल्यास कदाचित तो पुरेसा होईल, परंतु संतुलित असेलच असे नाही. अपेक्षित उत्पादनही मिळेल, परंतु मालाची प्रत मिळेलच असे नाही. आज देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रामुख्याने मालाच्या प्रतीकडे पाहिले जाते. उत्पादनाची प्रत केवळ कोणत्याही एका अन्नद्रव्य पुरविणारा स्त्रोत वापरून मिळणार नाही. यासाठी पिकाच्या जोमदार वाढीसाठी लागणारी अत्यावश्यक अन्नद्रव्ये पुरविणाऱ्या सर्व स्त्रोतांचा एकत्रित वापर करून द्यावा लागेल. एकत्रित वापरांतून पिकास संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा होईल.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची संकल्पना :-

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची संकल्पना ही जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून पिकांची उत्पादकता कायमस्वरूपी टिकविणे ही आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये पर्यावरणाचा विचार करून जमिनीची सुपीकता व पिकांची उत्पादकता वाढवून ती शाश्‍वत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याकरिता आपणाकडे उपलब्ध असलेल्या सर्व स्रोतांचा एकात्मिक पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये अन्नद्रव्यांचे नियोजन विविध स्रोतांतून करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविली जाऊन उत्पादनात वाढ होते, तसेच जमिनीचे आरोग्यही सुधारण्यास मदत होते. त्याकरिता सेंद्रिय स्वरूपातून पुरविणाऱ्या अन्नद्रव्यांचा सहभाग 30 ते 35 टक्के असावा. जैविक स्वरूपातील 20 ते 25 टक्के आणि रासायनिक स्वरूपातील सहभाग 40 ते 50 टक्के असावा.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज :-

1. सध्याचे देशातील खतांचे उत्पादन गरजेपेक्षा फारच कमी आहे. तसेच स्फुरद, पालाशसारखी रासायनिक खते परदेशातून आयात करावी लागतात. पर्यायाने त्यावर सरकारला अनुदान द्यावे लागते. हा अनुदानाचा भारही प्रचंड वाढत असल्याने भविष्यात अनुदान कमी होऊन रासायनिक खते महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करून कार्यक्षमता वाढविली पाहिजे.

2. जमिनीची सुपीकता आणि पिकांची उत्पादकता केवळ रासायनिक, सेंद्रिय व जैविक खतांचे एकत्रित वापरानेच वाढवून ती टिकविता येईल.

3. हरित क्रांतीमध्ये पीक उत्पादकता वाढविताना जमिनीच्या सुपीकतेकडे/आरोग्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही, ते आता देणे अत्यंत गरजेचे आहे.

4. संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा

5. जमिनीच्या जैविक, रासायनिक व भौतिक गुणधर्मात सुधारणा करण्यासाठी

6. जमिनीतील व पिकामधील जैवरासायनिक प्रक्रियांचा समतोल राखण्यासाठी

7. अविद्राव्य अन्नद्रव्यांचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर करण्यासाठी

8. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी

9. जमिनीतील सर्व पीक अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविणे

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनेचे घटक :-

1. कंपोस्ट, निंबोळी खत व गांडूळखत प्रकियेद्वारे वनस्पतीचा पालापाचोळा व टाकाऊ पदार्थांचा अन्नद्रव्यांसाठी पुनरुपयोग करणे.

2. नत्र, स्फुरद व पालाशची उपलब्धता वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर करणे.

3. संतुलित खत मात्रा देणे.

4. शहरातील सांडपाणी व कंपनीतील टाकाऊ द्रवपदार्थांचा शेतीसाठी उपयोग करणे.

5. हिरवळीची खते, निळेहिरवे शेवाळ आणि अझोलाचा पिकांसाठी उपयोग करणे.

6. फेरपालटीच्या व आंतरपिकांमध्ये द्विदल वनस्पतींचा समावेश करणे.

7. मातीपरीक्षणाद्वारे शिफारशीत खतमात्रा देणे.

8. शेतातील टाकाऊ काडीकचऱ्यापासून कंपोस्ट करून त्याचा वापर करणे.

9. पीक अवशेषाचा (उसाचे पाचट, गव्हाचे काड, सरमाड इत्यादी) शेतीमध्ये व्यवस्थित कुजवून वापर करणे.

10. साखर कारखान्यातील टाकाऊ पदार्थ प्रेसमड केक इत्यादींचा खत म्हणून वापर करणे.

✍श्री.सतिश भोसले @09762064141.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व त्यांचे फायदे :-

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे ज्या सर्वप्रकारच्या स्त्रोतांपासून अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. उदा. रासायनिक व जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीचे पीक, पीकपद्धती व द्विदल पिकांचा वापर करून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवून व जमिनीची सुपीकता टिकवून पीक उत्पादनात वाढ करणे होय. 1. पिकांना संतुलित अन्नद्रव्य पुरवठा करता येतो.

2. संतुलित खतांमुळे पिकांच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक उत्पादनात वाढ होते.

3. सेंद्रिय व जैविक खतांमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपरोगिता वाढते.

4. पीकपद्धतीत पहिल्या पिकास वापरलेल्या सेंद्रिय खतांचा वापर पुढील पिकासही उपयुक्त ठरतो.

5. जमिनीच्या भौतिक गुणधर्मात (उदा. पाणी धरून ठेवणे, हवा खेळती ठेवणे,जमीन भुसभुशीत करणे इत्यादी)

6. रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपयोगिता वाढते.

7. अविद्राव्य अन्नद्रव्यांचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर होते व स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची उपलब्धता वाढविता येते, तर नत्राची उपलब्धता आवश्यक तेवढीच ठेवता येते.

8. जमिनीची जलधारणा शक्ती, जैवरासायनिक प्रकियांचा समतोल राखला जातो.

9. उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.

10. जमिनीतील कर्ब नत्र यांच्या प्रमाणात समतोल राखला जातो.

11. योग्य पीक फेरपालटीचा व आंतरपीक पद्धतीचा पुढील पिकांस अन्नद्रव्यांची उपलब्धता विशेषतः नत्राची उपलब्धता वाढविण्यास मदत होते.

12. पीक अवशेषाचा जमिनीत प्रथम आच्छादन आणि नंतर सेंद्रिय खत म्हणून वापर केल्यास जल व मृदसंधारण तसेच अन्नद्रव्ये संधारणही करता येते.

सारांश :-

जमिनीच्या पोषक अन्नद्रव्ये पिकांना पुरविण्याच्या क्षमतेला सुपीकता व पीक उत्पादन देणाऱ्या क्षमतेला उत्पादकता म्हणतात. उत्पादन क्षमता, जमिनीचे फूल, जडणघडण, जैविक गुणधर्म, तापमान, सूर्यप्रकाश इत्यादी बाह्यबाबींवर सुपीकता व उत्पादकता अवलंबून असते. जमिनीतील हवा, पाणी व वनस्पती यांचा संतुलित संबंध राखण्यासाठी योग्य मशागतीचा अवलंब करावा लागतो. जमिनीतील अन्नद्रव्यांचे मुळाद्वारे शोषण हे जमिनीतील द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण, जमिनीचा सामू या गोष्टींवर अवलंबून असतो. जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुपीकता व उत्पादकतेवर परिणाम करतात. जमिनीची धूप, पिकांद्वारे अन्नद्रव्यांची व असंतुलित अन्नद्रव्य पुरवठा यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामधून जमिनीचे आरोग्य अबाधित राखता येऊन पिकांची उत्पादकता शाश्‍वत करता येते. भरखते, जोरखते, हिरवळीची खते, जीवाणूखते, नत्रयुक्त, स्फुरदयुक्त, पालाशयुक्त, संयुक्त व मिश्रखते ही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्वाचे घटक आहेत…!!!✍

…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍

🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी हितार्थ 🙏🙏🙏🙏🙏

—-

🦚🦚 *!! अन्नदाता सुखी भव: !!*🦚🦚

*काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो*

“Agriculture is my Love, Passion, Culture & Life”

🙏 *विचार बदला! जीवन बदलेल!!*🙏