गरज जमीन सुपिकता व्यवस्थापनाची
श्री.सतिश भोसले
नमस्कार शेतकरी बंधूनो,
पिकांचे ऊत्पादन वाढविण्यासाठी उत्पादन खर्च वाढवणे हा पर्याय नाही. तर उत्पादन खर्च कमी करुन जमिनीचा कस टिकवुन, रासायनिक खतांचे योग्य प्रमाण म्हणजे (N P K) समतोल करून देणे. त्याच बरोबर ते उपलब्ध होण्यासाठी जमिनीचा सामु आणि ई सी साधारण ठेवणे. या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे. जितका जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला तितकेच उत्पादन वाढविता येते.
www.janvicharnews.com
सेंद्रिय आणि असेंद्रिय निविष्ठांचा वापर जैविक खतांसोबत करून पीक उत्पादनामध्ये निश्चितपणे वाढ होते, उत्पादनाची प्रतही सुधारते. हळूहळू जमिनीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांवरील निर्भरता काही प्रमाणात कमी होते. शेतावरच उपलब्ध पालापाचोळा, काडीकचरा, कुटार इत्यादी घटकांचा वापर केल्याने एकूण खतांवरील खर्चात बचत करता येते. सेंद्रिय खते वापरल्यामुळे दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकास मिळून पिकांचे संतुलित पोषण होते आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते. एक टन शेणखत जमिनीत मिसळल्यास 6 ते 7 किलो नत्र, 3 ते 4 किलो स्फुरद व 7 ते 8 किलो पालाश जमिनीला मिळतो. या सोबतच 1 किलो गंधक, 250 ग्रॅम मँगेनिज, 100 ग्रॅम जस्त, 75 ग्रॅम लोह, 25 ग्रॅम बोरॉन आणि 2 ग्रॅम मॉलिब्डेनम इतकी अन्नद्रव्ये जमिनीला मिळतात. परंतु शेणखत हे योग्य रित्या कुजलेले असावे अशा शेणखताचा नियमित वापर केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जमिनीत जाणवत नाहीत. याशिवाय मोठ्या प्रमाणात जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळतो आणि जमिनीचे आरोग्य सुधारते, जमिनीची जडणघडण सुधारते. दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे इतर मुख्य अन्नद्रव्यांच्या पिकावाटे होणाऱ्या शोषणास मदत होते आणि पर्यायाने अतिशय महाग असलेल्या रासायनिक खतांचा प्रभावी आणि कार्यक्षम वापर होण्यास मदत होते. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो त्यामुळे जमिनीतील संरचना सुधारते, पाणी आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते, निचरा चांगला होतो, धूप कमी होते आणि जमिनीचे एकूणच आरोग्य सुधारते. जमिनीतील सूक्ष्म जिवाणुंची वाढ होते. गरजेनुसार संतुलित पुरवठा झाल्यामुळे अन्नद्रव्यांचा प्रभावी वापर होतो आणि जमिनीच्या आणि पाण्याच्या प्रदूषणाचा धोका टळतो. अन्नद्रव्यांचे निरनिराळे स्रोत वापरले जाऊन त्यांचा शेतीमध्ये योग्य वापर केला जातो. अन्नद्रव्यांची निसर्गातील साखळी सुस्थितीत ठेवण्यास मदत होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखला जातो. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामधून जमिनीचे आरोग्य अबाधित राखता येऊन पिकांची उत्पादकता शाश्वत करता येते. सेंद्रिय खते, भरखते, जोरखते, हिरवळीची खते, जीवाणूखते, नत्रयुक्त, स्फुरदयुक्त, पालाशयुक्त, संयुक्त व मिश्रखते ही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्वाचे घटक आहेत…!!!
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!
शेतकरी हितार्थ
—-
*!! अन्नदाता सुखी भव: !!*
*काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो*
“Agriculture is my Love, Passion, Culture & Life”
*विचार बदला! जीवन बदलेल!!*