गहू पिकांवरील तांबेरा रोग नियंत्रण
श्री.सतिश भोसले
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
सध्या वातावरणात वारंवार होत असलेले बदल कधी ढगाळ तर कधी अति तीव्र ऊन रात्री थंडी असे बदलते वातावरण यामुळे गहू पिकामध्ये तांबेरा हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो आहे, तसेच या रोगाची आढळून येणारी लक्षणे त्याचे प्रकार आणि व्यवस्थापन याबद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत. तांबेरा हा बुरशीजन्य रोग आहे, गहू पिकांवरील तांबेरा हा रोग पक्सिनिया या बुरशीमुळे होतो. विविध भागांत तापमानाच्या अनुकूलतेनुसार गव्हावरील तांबेऱ्याचे विविध प्रकार आढळतात. महाराष्ट्रात व दक्षिण मध्य भारतात खोडावरील काळा तांबेरा व पानांवरील नारिंगी तांबेरा हे दोन प्रकार आढळून येतात. उत्तर भारत व दक्षिण भारतातील निलगिरी पर्वत परिसरात पिवळा तांबेरा दिसून येतो.
www.janvicharnews.com
गहू पिकांवरील तांबेराचे तीन प्रकार पडतात.
१) काळा किंवा खोडावरील तांबेरा. २) नारंगी किंवा पानांवरील तांबेरा. ३) पिवळा तांबेरा.
१) काळा तांबेरा किंवा खोडावरील तांबेरा :-
काळा तांबेरा/खोडावरील तांबेरा हा पक्सिनिया ग्रामिनीस ट्रिटीसी (Puccinia graminis tritici) या रोगकारक बुरशीमुळे होतो, ही बुरशी गहू, जव गहू व बारबेरी या वनस्पतींवर आपला जीवनक्रम पूर्ण करते.
काळा तांबेरा किंवा खोडावरील तांबेरा रोगांचा प्रसार व लक्षणे :-
या रोगाचा प्रादुर्भाव हवेद्वारे वाहून आलेल्या बिजाणूमुळे प्रामुख्याने पाने, खोड, कुसळ व ओंबीवर तसेच पानाच्या मानेवर आढळून येतो. पानावर किमान ६ ते ८ तासांकरिता ओलावा किंवा दव साचलेले असल्यास व १५ ते २४ अंश सेल्सिअस तापमानात रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होतो.
प्राथमिक अवस्थेत हा रोग पानाच्या वरच्या व खालच्या बाजूवर दिसून येतो. रोग प्रादुर्भावामुळे हरितद्रव्य नष्ट होऊन पानांवर अंडाकृती ते लांब आकाराचे पांढरे ठिपके दिसून येतात. अनुकूल हवामानात त्या ठिकाणी बुरशीच्या तांबूस विटकरी रंगाच्या युरेडीओस्पोअर तयार होतात. त्यामध्ये असंख्य बिजाणू (युरेडिया) असतात. पिकांची वाढ होताना व हवेतील तापमान जसजसे वाढत जाते तसतसे युरीडोस्पोरचे रुपांतर काळ्या रंगाच्या टेल्यूटोस्पोर मध्ये होते. युरेडिओस्पोअरची एक पिढी पूर्ण होण्यासाठी १० ते १५ दिवस लागतात. अनुकूल हवामानात पिकाच्या बाल्यावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नुकसानीचे प्रमाण अधिक असते. गव्हाच्या दाण्यांना सुरकुत्या पडून, त्याच्या झिऱ्या होतात. उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट होते.
www.janvicharnews.com
२) नारंगी किंवा पानांवरील तांबेरा :-
नारिंगी तांबेरा/पानावरील तांबेरा हा पक्सिनिया रेकॉनडिटा (Puccinia recondita) या रोगकारक बुरशीमुळे होतो, प्राथमिक अवस्थेत प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने पानावरील तांबेरा असे सुद्धा म्हणतात. या रोगामुळे गहू पिकाचे काळा व पिवळा तांबेरा रोगापेक्षा अधिक नुकसान होते.
नारंगी किंवा पानांवरील तांबेरा रोगांचा प्रसार व लक्षणे :-
या रोगाचा प्रादुर्भाव गव्हाची पाने व खोडावरील देठ यावर दिसून येतो. या रोगाची लक्षणे पिकाच्या रोपावस्थेपासून ते पक्वतेपर्यंत दिसून येतात रोगाची लागण झाल्यावर गोल आकाराचे पानावर लहान लहान डाग दिसून येतात. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने हवेद्वारे वाहून आलेल्या बिजाणूमुळे होतो. पानावर रोग प्रादुर्भाव झाल्यानंतर गोलाकार ते अंडाकृती आकाराचे लहान ठिपके दिसून येतात. पानावर किमान ३ तास दव साठलेले असल्यास व हवेतील तापमान २० अंश सेल्सिअस असल्यास प्रादुर्भाव होतो. १५ ते २० अंश सेल्सिअस या अनुकूल हवामानात १० ते १४ दिवसांत रोगाची लक्षणे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या जागी असंख्य बिजाणू तयार होऊन ठिपक्यांचा रंग नारंगी ते गर्द नारंगी दिसू लागतो. रोगग्रस्त पानावरून बोट फिरविल्यास नारंगी रंगाची पावडर बोटावर दिसून येते. रोगाची लागण शेंड्यापर्यंत तीव्र प्रमाणात फुलोऱ्यापूर्वी झाल्यास उत्पादनात ८० टक्क्यांपर्यंत घट येते. बाल्यावस्थेत रोगाची लागण झाल्यास रोपे फुलोऱ्यापूर्वी मृत होतात.
३) पिवळा तांबेरा :-
हा रोग पक्सिनिया स्ट्रीफोरमीस या रोगकारक बुरशीमुळे होतो. या रोगामध्ये पिवळ्या रंगाचे बारीक पूरळ पानांच्या शिरांवर सरळ रेषांत दिसून येतात. गव्हावरील पिवळा तांबेरा हा रोग प्रामुख्याने थंड हवामान असलेल्या ठिकाणी आढळतो.तसेच वाढीस अनुकूल तापमान १५ अंश ते २० अंश सेल्सिअस असते. या रोगाची तीव्रता जास्त आर्द्रता व पर्जन्यवृष्टीच्या ठिकाणी वाढते. पिवळा तांबेरा हा महाराष्ट्र गुजरात, मध्य प्रदेश तसेच कर्नाटक राज्यात आढळून येत नाही.
पिवळा तांबेरा रोगाचा प्रसार व लक्षणे :- हवेद्वारे वाहून आलेल्या बुरशीच्या बीजाणू मुळे याचा प्रसार होतो, या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण १५ ते २५ अंश सेल्सिअस लागते. पानांवर किमान ३ तास दव साचून राहिल्यास प्रादुर्भाव होतो.
प्राथमिक अवस्थेत पिवळा तांबेरा प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर दिसून येते. रोगाची लागण झाल्यावर पानावर गोलाकार ते अंडाकृती लहान- लहान ठिपके दिसतात. अश्या पानावर हात फिरवला असता. हाताला पिवळी पावडर लागलेली दिसून येते. सदर रोगामुळे पिकाचे ६०% नुकसान होते.
रोग व्यवस्थापन :-
१) रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. युरिया शिफारसशी पेक्षा अधिक मात्रा देऊ नये.
२) तांबेरा प्रतिबंधक वाणाची पेरणीसाठी निवड करावी.
३) वेळेवर पेरणी करावी पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. शेतात पाण्यामुळे दलदल होऊ देऊ नये.
४) एकात्मिक नियंत्रण :-
www.janvicharnews.com
अ) सेंद्रिय नियंत्रण :- बोर्डेक्स २.५ मिली किंवा फंगीणील २ मिली या सेंद्रिय बुरशीनाशकांची प्रति लिटर पाणी याप्रमाणे एकत्र मिसळून फवारणी घ्यावी.
ब) रासायनिक नियंत्रण :- तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होताच २०० मिली प्रोपिकोनॅझोल प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी किंवा २ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा २ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा २ ग्रॅम झायनेब प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील प्रमाणे एकात्मिक रोग नियंत्रण प्रणालीचा वेळीच वापर करून नियंत्रण मिळवणे शक्य होईल, वेळीच नियंत्रण मिळवल्यास उत्पादनातही वाढ होईल.
फवारणी करताना स्टीकोस्प्रेड ५ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे अवश्य वापर करावा. या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका बुरशीनाशकाची कांदा पिकावरील करपा रोगाचे योग्य निदान करून गरजेनुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून फवारणी करावी गरज असल्यास पुन्हा एकदा बुरशीनाशक बदलून पंधरा दिवसांनी फवारणी करावी.
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!
शेतकरी हितार्थ
—-
*!! अन्नदाता सुखी भव: !!*
*काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो*
“Agriculture is my Love, Passion, Culture & Life”
*विचार बदला! जीवन बदलेल!!*