Home कृषी साक्षरता कांदा पिकातील फुलकिडे व करपा रोग व्यवस्थापन सल्ला

कांदा पिकातील फुलकिडे व करपा रोग व्यवस्थापन सल्ला

0
कांदा पिकातील फुलकिडे व करपा रोग व्यवस्थापन सल्ला

कांदा पिकातील फुलकिडे व करपा रोग व्यवस्थापन सल्ला

श्री.सतिश भोसले

नमस्कार शेतकरी बंधुनो,

सध्या वातावरणात वारंवार होत असलेले बदल कधी ढगाळ तर कधी अति तीव्र ऊन रात्री थंडी असे बदलते वातावरण त्यामुळे कांदा पिकांवरती फुलकिडे व करपा रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देऊन नियंत्रण केल्यास योग्य वेळी कीड व रोगांचे नियंत्रण करता येईल त्याचबरोबर उत्पादन खर्चात हि बचत होईल. यासाठी खालीलप्रमाणे एकात्मिक रोग व कीड नियंत्रण प्रणालीचा अवलंब करावा.

www.janvicharnews.com

(A) कांदा पिकावरील फुलकिडी नियंत्रणाकरिता एकात्मिक व्यवस्थापन योजना :-

फुलकिडी ही कांदा पिकाची नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. रब्बी हंगामात कांदा पिकावर या किडीचे प्रादुर्भावाचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या अधिक आढळून येते व तिव्र प्रादुर्भाव झाल्यास या किडीमुळे कांदा पिकाचे ३० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. कोरडी हवा आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान या किडीच्या वाढीसाठी पोषक असते. कांद्यावरील फुलकिडी ही किड पिवळसर तपकिरी रंगाची असून तिच्या शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात. कांद्यावरील फुल किडीचे प्रौढ आकाराने अत्यंत लहान असून त्यांचा आकार साधारणत: १ ते २ मीमी इतका असतो. कांद्यावरील फुलकिडीचे प्रौढ फिक्कट तपकिरी रंगाचे असतात. कांद्यावरील या फुलकिडीच्या प्रौढ अवस्थेला पंखांच्या दोन जोड्या असतात. समोरील पंख दोन्ही बाजूस दाते असलेल्या कंगवा सारखे दिसतात. कांद्यावरील हे प्रौढ फुलकिडे एका शेतातून दुसऱ्या शेतात उडून जाऊ शकतात. साधारणत: कांद्यावरील फुलकिडे कांद्याच्या पानाचे आवरण व खोड यामध्ये म्हणजेच पातीच्या बेचक्यात लपलेले असतात. या किडीची मादी पानाच्या कोवळ्या उतीमध्ये पांढऱ्या रंगाची ५० ते ६० अंडी घालते. साधारणतः चार ते सात दिवसात अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात व पिलाचा कालावधी साधारणपणे सहा ते सात दिवसांचा असतो परंतु डिसेंबर सारख्या महिन्यातील थंड हवामानात हा कालावधी २० ते २५ दिवसापर्यंत सुद्धा वाढू शकतो. या कीडीच्या अंड्यातून निघालेली पिल्ले व प्रौढ कीटक कांद्याची पाने खरडून पानातून येणारा रस शोषण करतात. त्यामुळे कांद्याच्या पानावर पांढरे ठिपके पडतात त्याला बरेच शेतकरी बंधू टाके या नावाने ओळखतात. असे असंख्य पांढरे ठिपके जोडल्या गेल्याने कालांतराने कांद्याची पाने तपकिरी बनवून वाकडी होतात व वाळतात. फुल किडीमुळे कांद्याच्या पानाला झालेल्या जखमांमधून विविध प्रकारच्या करपा रोगाच्या हानीकारक बुरशीस कांद्याच्या पानात शिरकाव करण्यास पोषक वातावरण तयार होते. कांदा पिकाच्या सर्व अवस्थेत फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो परंतु रोपावस्थेत फुलकिडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास कांद्याची पाने वाळून कांदे चागली पोसल्या जात नाहीत व कांद्याच्या उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते.

कांदा पिकावरील फुलकिडी करिता एकात्मिक व्यवस्थापन योजना :-

(१) कांदा पिकाची लागवड करण्यापूर्वी साधारणत: पंधरा दिवस अगोदर शेताच्या कडेने मका या पिकाच्या दोन ओळीची सापळा पीक म्हणून लागवड करावी त्यामुळे फुलकिडीचा बऱ्याच अंशी प्रतिबंध मिळतो.

(२) कांदा पिकाची सतत त्याच त्या शेतात लागवड करणे टाळून कांदा पिकाची तृणधान्य किंवा गळित धान्य पिकासोबत फेरपालट करावी.

(३) क्रायसोपा सारख्या मित्र किडीचे कांदा शेतामध्ये संवर्धन व जतन होईल याची काळजी घ्यावी.

(४) सेंद्रिय नियंत्रण :-

सुरुवातीपासून साधारणतः आठ ते दहा दिवसांच्या अंतराने वेळोवेळी ५ % निंबोळी अर्क २५ मिली किंवा गार्डनिम १५ मिली किंवा गार्डप्लस १५ मिली या वनस्पतिजन्य कीटकनाशकाची कांद्यावरील फुल किडीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनाकरिता प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

(५) जैविक नियंत्रण :-

कांदा पिकावर फुल किडीच्या नियंत्रणासाठी बायोअमृत बिव्हेरिया अधिक बायोअमृत व्हर्टी या जैविक कीडनाशकांची ५ मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन व्यवस्थित फवारणी घ्यावी.

(६) रासायनिक नियंत्रण :-

कांदा पिकावर फुल किडीचा तीव्र प्रादुर्भाव असल्यास वर निर्देशीत उपाय योजने बरोबर तिव्र प्रादुर्भावात लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ईसी (Lambda Cyhalothrin 5 EC) 10 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन सुरक्षित कीटकनाशक वापर तंत्राचा वापर करून फवारणी करावी. कांद्यावर फवारणी करताना प्रति लिटर पाण्यामध्ये एक मिली या प्रमाणात उत्तम दर्जाचे सिलिकॉन आधारित स्टिकर मिसळावे.

टीप : (१) कांदा पिकात रसायने फवारताना लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच रसायने फवारावी तसेच अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी.

(२) कांदा पिकावरील फुल किडीचे व्यवस्थापन शास्त्रोक्त शिफारशीत पद्धतीने करावे.

(३) तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कांदा पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीने अन्नद्रव्याचे किंवा खताचे व्यवस्थापन करावे तसेच नत्रयुक्त खताचा वापर संतुलित करावा व अतिरिक्त नत्रयुक्त खताचा वापर टाळावा तसेच माती परीक्षणाच्या आधारावर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पालाशयुक्त खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा.

(४) कांदा बिजोत्पादन पिकाकरिता रसायनाचा वापर करताना मधमाशी या बीजोत्पादनासाठी मदत करणाऱ्या मित्र कीटकाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी तसेच किडीच्या व्यवस्थापनासाठी इतर व अरासायनिक एकात्मिक व्यवस्थापन घटकाचा अंगीकार करावा.

(B) कांदा पिकावरील करपा रोग नियंत्रणाच्या एकात्मिक व्यवस्थापन योजना :-

कांदा पिकावर प्रामुख्याने तीन प्रकारच्या करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो.

(१) जांभळा करपा किंवा अल्टरनेरिया करपा :-

प्रामुख्याने हा करपा कांदा पिकावर खरीप हंगामात अल्टरनेरिया पोरी या बुरशीमुळे होतो. बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्यावर सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. याप्रकारच्या करपा रोगात कांदा पिकावर पानावर सुरवातीस खोलगट लांब पांढरे चट्टे पडतात. या पट्ट्याचा मधला भाग सुरुवातीला जांभळट लालसर व नंतर काळपट होतो. अनेक चट्टे पानावर पडून आणि एकमेकात मिसळून पाने करपतात व वाळतात. खरीप हंगामातील दमट ढगाळ व पावसाळी वातावरण या रोगास पोषक असते.

(२) काळा करपा :-

या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने खरीप हंगामातील कांदा पिकावर कोलेटोट्रीकम (Colletotrichum) नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगात सुरुवातीला कांद्याच्या पानावर गोलाकार राखाडी ते काळ्या रंगाचे ठिपके दिसतात. काळ्या रंगाच्या ठिपक्याचा मधला भाग पांढऱ्या रंगाचा असून त्या भोवती गोलाकार काळे ठिपके असल्याचे दिसते. ठिपक्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाने आखडतात, खाली वळतात आणि वेडीवाकडी होऊन शेवटी वाळतात. पाण्याचा निचरा न होणे सतत ढगाळ वातावरण आणि सतत रिमझिम पाऊस यामुळे या रोगाचे प्रमाण वाढते.

(३) कांदा पिकावरील तपकिरी करपा :-

कांदा पिकावरील हा रोग प्रामुख्याने रबी पिकावरील कांद्यावर तसेच खाण्याच्या व बियाण्याच्या कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. कांदा पिकावर या करप्याचा प्रादुर्भाव स्टेमफेलियम (Stemphylium leaf blight (SLB) of onion) या बुरशीमुळे होतो. या रोगात सुरुवातीला पानावर पिवळसर ते तपकिरी चट्टे पडतात. नंतर हे चट्टे बुंध्या कडून शेंड्याकडे वाढत जाऊन पाने तपकिरी पडून सुकतात. या रोगात कांद्याची पात सुरकुतल्यासारखी आणि शेंडे जळाल्या सारखे दिसतात. फुलाच्या दांड्यावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ होतात व त्या जागी वाकून मोडतात. पाऊस आल्यास किंवा सतत ढगाळ वातावरण झाल्यास या रोगाचा प्रसार जोरात होतो.

कांदा पिकावरील करपा रोगासाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना :-

(१) कांदा पिकासाठी लागवड करताना रोपे नेहमी गादीवाफ्यावर तयार करावी तसेच गादीवाफ्यावर रोपासाठी बी टाकण्यापूर्वी शिफारशीत बायोअमृत ट्रायकोची बीजप्रक्रिया करून घ्यावी.

(२) रोपवाटिकेची जागा दरवर्षी बदलावी आणि पिकांची फेरपालट करावी.

(३) तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कांदा पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीने अन्नद्रव्याचे किंवा खताचे व्यवस्थापन करावे तसेच नत्रयुक्त खताचा वापर संतुलित करावा व अतिरिक्त नत्रयुक्त खताचा वापर टाळावा तसेच माती परीक्षणाच्या आधारावर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पालाशयुक्त खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा.

(४) कांदा पिकावर करपा रोगाची लक्षणे आढळून आल्यास योग्य निदान करून तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार खालील पैकी कोणत्या एका बुरशीनाशकाची निर्देशीत प्रमाणात फवारणी करावी.

अ) सेंद्रिय नियंत्रण :-

करपा रोगांच्या सेंद्रिय नियंत्रणासाठी बोर्डेक्स ४० मिली किंवा देवअमृत फंगीनिल १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना स्टीकोस्प्रेड ५ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे अवश्य वापर करावा.

ब) जैविक नियंत्रण :-

कांदा पिकावरील करपा रोगांच्या जैविक नियंत्रणासाठी बायोअमृत ट्रायको अधिक बायोअमृत बॅसिलस या जैविक बुरशीनाशकांची ५ मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन व्यवस्थित फवारणी घ्यावी.

क) रासायनिक नियंत्रण :-

कांदा पिकावरील करपा रोगांच्या नियंत्रणासाठी डायथेन (एम-४५) २५ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल २५.९% ई सी. १० मिली किंवा डायफेनकोनॅझोल २५% ई सी. १० मिली किंवा किटाझीन ४८% ई सी. १० मिली किंवा मेटीराम ५५% अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन ५% डब्लूजी हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना स्टीकोस्प्रेड ५ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे अवश्य वापर करावा. या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका बुरशीनाशकाची कांदा पिकावरील करपा रोगाचे योग्य निदान करून गरजेनुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून फवारणी करावी गरज असल्यास पुन्हा एकदा बुरशीनाशक बदलून पंधरा दिवसांनी फवारणी करावी.

टीप :- तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कांदा पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीने अन्नद्रव्याचे किंवा खताचे व्यवस्थापन करावे तसेच नत्रयुक्त खताचा वापर संतुलित करावा व अतिरिक्त नत्रयुक्त खताचा वापर टाळावा तसेच माती परीक्षणाच्या आधारावर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पालाशयुक्त खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा. कांद्याच्या उत्तम पोषण, साईज, कलर, चकाकीसाठी सॉईल पॉवर आणि ड्रीप-के आळवणीसाठी २ लिटर प्रति एकर व फवारणीसाठी १ लिटर प्रति एकर वापरावे.

…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍

🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी हितार्थ 🙏🙏🙏🙏🙏

—-

🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚

काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो

🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏