हरभरा पिकांतील घाटेअळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन
श्री.सतिश भोसले
नमस्कार शेतकरी बंधूनो,
www.janvicharnews.com
हरभरा किंवा हरबरा हे रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य आहे. ही वनस्पती सुमारे २४ इंच उंच वाढते. हरभरे दाणा स्वरूपात असताना एका वेष्टणांत असतो. त्याला घांटा असें म्हणतात. याचे मूळस्थान तुर्कस्तान आहे असे मानतात. भारत, पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते. हरभरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते. हरभरा जमिनीला वातावरणातील ३० किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करुन देतो. हरभऱ्यापासून डाळ, बेसन किंवा भाजी ही तयार करतात. हरभरा पाण्यात उकळवून, भाजून खाता येतो. पांनाची भाजी पण तयार करतात. अंकूर आलेले बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयुक्त आहे. हिरव्या पानातून मिळणारे माँलिक आणि आँक्झालिक अँसिड पोटांच्या आजारासाठी उपाय म्हणून वापरता येते. हरभरयापासून अनेक खाद्यपदार्थ बनवता येतात.
हरभरा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल, तर प्रामुख्याने अधिक उत्पादन देणार्या आणि रोगप्रतिकारक्षम सुधारीत वाणांचा वापर, योग्य जमिनीची निवड आणि पूर्व मशागत, वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर, बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धनाचा वापर, पाणी आणि पीकसंरक्षणाचे योग्य नियोजन, रासायनिक खतांचा संतुलित वापर, वेळीच आंतरमशागत या बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दृष्टीने हरभरा पीक लागवड सुधारीत पद्धतीने करणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारीत वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी या पिकांसाठी मध्यम ते भारी काळी जमीन निवडून हस्त नक्षत्रावर पडणार्या पावसाच्या ओलीचा फायदा घेऊन अतिशय मोठमोठ्या क्षेत्रावर या पिकाची लागवड करतात आणि समाधानकारक उत्पादन घेतात.
हरभरा पिकातील मुख्य किड म्हणजे घाटेअळी होय, या किडीच्या एकात्मिक व्यवस्थापनाची सविस्तर माहिती पुढील लेखात दिली आहे.
हरभरा घाटेअळी कीड व्यवस्थापन :- घाटेअळी ही अळी विविध नावांनी ओळखली जाते. पूर्ण विकसित घाटे अळी पोपटी रंगाची (यात विविध रंगछटा सुद्धा आढळतात) व शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात.
नुकसान :-
लहान अळ्या सुरवातीस पानावरील आवरण खरडून खातात. अशी पाने काही अंशी जाळीदार व भुरकट पांढरी पडलेली दिसतात. विकसित घाटे अळी कळ्या व फुले कुरतडून खातात. पूर्ण वाढ झालेली अवस्था तोंडाकडील भाग घाट्यात घालून आतील दाणे फस्त करते.
हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण :-
हरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे घाटेअळीचा प्रादुर्भाव. ही घाटे अळी हरभरा पिकावर आपले २ जीवनक्रम पूर्ण करते. त्यामुळे नुकसानीची पातळी वाढते.
अ) घाटे अळीच्या अवस्था :- अंडी – अळी – कोष – पतंग
ब) प्रादुर्भावाची वैशिष्ट्ये :-
१) विशेषतः पीक कळी व फुलोरा अवस्थेत आल्यावर अळीचा अधिक प्रादुर्भाव. मात्र, घाटे व परिपक्व होणाऱ्या दाण्यावरील प्रादुर्भाव जास्त नुकसान कारक ठरतो.
२) हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव ४० टक्के पर्यंत आढळतो.
३) साधारणतः एक अळी ३० – ४० घाट्याचे नुकसान करते.
४) काबुली हरभऱ्यावर देशी वाणापेक्षा घाटे अळीचा अधिक प्रादुर्भाव आढळतो.
५) टपोऱ्या देशी वाणावर लहान दाण्यांच्या वाणापेक्षा घाटेअळीचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो.
६) दाट पेरलेल्या हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव अधिक होतो.
क) घाटेअळी एकात्मिक कीड नियंत्रण :-
१) उन्हाळ्यात जमिनीची खोल चांगली नांगरणी करावी, त्यामुळे किडीचे कोष उघडे पडतात. पक्षी ते वेचून खातात. यासाठी पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी चार-पाच दिवस आधी सकाळी लवकर थोडा भात शिजवून शेतात रिकाम्या जागी धुर्यावर विखरून टाकावा.
२) पक्षी थांबे एकरी १० ते २० प्रमाणात लावावेत किंवा पेरतेवेळी ज्वारी किंवा मक्याचे दाणे टाकावे. याकडेही पक्षी आकर्षित होतात. त्यावर बसून पक्षी अळ्यांचा फडशा पाडतात.
३) शिफारशीत आणि रोगास प्रतिकारक्षम वाण लागवडीसाठी निवडावे, तसेच शिफारशीत अंतरावर पेरणी करावी.
४) घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी गंधसापळ्यांचा वापर करावा घाटे अळीच्या सनियंत्रणाकरिता एकरी २ ते ५ कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या वर साधारणतः एक ते दीड फूट उंचीवर हेलिल्युर या कामगंध गोळी सह लावावे. या कामगंध सापळा सतत दोन ते तीन दिवस आठ ते दहा घाटअळीचे नर पतंग ही सरासरी आढळल्यास घाटे अळीच्या व्यवस्थापनाचा संकेतार्थ घ्यावा.
५) हरभरा पिकात आंतरपीक किंवा मिश्र पद्धतीचा अवलंब करावा.
६) मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.
७) वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करावा. अळीचा प्रादुर्भाव दिसताच, गार्डनिम १ ते २ मिली प्रति लिटर पाणी किंवा निंबोळीअर्क ( ५%,) किंवा अॅझाडीरॅक्टिन (३०० पीपीएम) ५ मिली प्रति लिटर पाणी.
८) जैविक कीटकनाशक एचएएनपीव्ही हेक्टरी ५०० एल.ई म्हणजेच ५०० मिली विषाणू प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळावे. त्यामध्ये ५०० मिली चिकटद्रव्य आणि ५० ग्रॅम उत्तम दर्जाची नीळ टाकून फवारणी करावी. ही फवारणी शेतात प्रथम-द्वितीय अवस्थेतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते.
९) देवअमृत बिव्हेरिया (बिव्हेरिया बॅसियाना) आणि मेटाकिल (मेटार्झियम अनिसोप्ली) १ लिटर प्रति एकर, प्रति २००लिटर पाणी किंवा ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
ड) रासायनिक नियंत्रण :- (फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी)
१) क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा
२) ईमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के) ०.४५ ग्रॅम किंवा
३) डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मिली. किंवा
४) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) १.२५ मिली किंवा
५) क्लोरअँन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.२५ मिली किंवा
६) फ्लूबेंडीअमाईड (४८ टक्के प्रवाही) ०.२५ मिली किंवा
७) क्लोरपायरीफॉस (२० टक्के) २.५ मिली.
** टीप :- आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी…!!!
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!
शेतकरी हितार्थ
—-
!! अन्नदाता सुखी भव: !!
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
विचार बदला! जीवन बदलेल!!