शाहू विचारांचा आढळ दीपस्तंभ :
www.janvicharnews.com
श्री शाहू छत्रपती महाराज आजचे कोल्हापूरचे लाडके छत्रपती आणि सर्वांचे आदराचे स्थान. आम्हचे महाराजसाहेब!!!अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा आणि जोहार !
महाराजसाहेब म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंबच आहेत! महाराजसाहेबांचा साधेपणा, लोकांच्यात मिसळण्याची त्यांची वृत्ती, त्यांचा दिलदारपणा आणि अभ्यासून प्रकटण्याची त्यांची सवय, ही लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करीत असते. अशा आकर्षणातूनच माझे आणि महाराजसाहेबांचे ऋणानुबंध तयार झाले. इतिहासाची आवड हा हे ऋणानुबंध तयार होण्याचा आणखी एक समान धागा. अनेकवेळा तासन् तास महाराजांशी इतिहासावर गप्पा होतात. महाराजांचे प्रश्न हे सखोल अभ्यासातून आलेले असतात. ते विचार करायला लावतात. अशा विचारातून मराठ्यांच्या इतिहासातील, राजर्षी शाहू महाराजांच्या इतिहासातील अनेक गोष्टी नव्याने आकलन होण्यासाठी उपयोग होतो. महाराजसाहेबांच्या बरोबर इतिहासावर चर्चा करणे यासारखी आनंददायक गोष्ट नसते. कारण, महाराजसाहेब स्वतः इतिहासाचे चांगले जाणकार! अभ्यासक आणि संशोधक म्हणावे इतक्या खोलात जाऊन त्यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला आहे. महाराजसाहेब अनेक वेळेला आपण विचारही केलेला नसतो किंवा अगोदर कोणीही असा विचार केलेला नसतो अशा पद्धतीचे मराठ्यांच्या इतिहासाबद्दलचे प्रश्न आपल्यापुढे ठेवतात आणि मग आपले विचार मंथन चालू होते. खरंतर फक्त महाराजसाहेब इतिहासावर चर्चा करत नाहीत तर माझ्यासारख्या एका सामान्य इतिहास अभ्यासकाच्या मनातल्या प्रश्नांना सुद्धा पुराव्यासह उत्तर देतात आणि जी माझी मते अभ्यासानंतर तयार झालेली असतात त्या मतांना सुद्धा शांतपणे ऐकून घेऊन त्याच्यावर आपले मत प्रकट करतात. एखाद्या विषयाचा अभ्यास करून महाराजसाहेबांची मते ठाम झाली असतील आणि आपण त्यांना नवीन पुरावे किंवा संदर्भ सांगितले तर ती मते उदार अंतकरणाने बदलण्याचा सुद्धा त्यांचा मानस असतो. यातून इतिहास प्रवाही असतो. हे आपल्याला त्यांच्या कृतीतून समजून येते. माझ्या महाराजसाहेबांच्या बरोबर शिवाजी महाराजांच्या इतिहासावर, शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार असेल शिवाजी महाराजांच्या अस्थिरक्षा असतील, शिवाजी महाराजांची पेंटिंग असतील अशा अनेक विषयांवर चर्चा झालेल्या आहेत. या चर्चेतून मराठा इतिहासाचे नवीन पैलू मला सुद्धा समजले.
आजच्या काळामध्ये आदर्श घेण्यासाठी आपण कुणाकडे पाहावे? अशी परिस्थिती असताना एखाद्या पदासाठी महान विचार सोडून देण्याची तयारी लोक दाखवत असताना; हे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे सच्चे वारस कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता शाहूविचार आपल्या कृतीतून, आचरणातून आणि बोलण्यातून सर्व समाजासमोर ठामपणे ठेवत आहेत . महाराजसाहेबांचे शाहू विचारावर आढळ राहणे ही महाराष्ट्राला मिळालेली फार मोठी देणगी आहे असे माझे मत आहे. महाराजसाहेबांना त्यांना जो वारसा मिळालाय छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराबाईसाहेब, राजर्षी शाहू छत्रपती, छत्रपती राजाराम महाराज या सर्वांचा सार्थ अभिमान आहेच; पण त्याचबरोबर आजच्या लोकशाहीमध्ये हा वारसा सातत्याने न सांगता त्यांच्या विचारांचा वारसा सांगायचे काम महाराजसाहेब सातत्याने करत असतात. एका महान राजाचा वारसा असताना, राजेशाहीचा वारसा असताना आणि या सर्वाच्या माध्यमातून पद, सत्ता, पैसा, मानसन्मान मिळवण्याची स्पर्धा लागलेली असताना आपले महाराजसाहेब हे “भारताची लोकशाही ही घटनेनुसार चालावी, आज भारतीय संविधान वाचवण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे यासंदर्भात विचार मांडतात. यातच त्यांच्यामध्ये लोकशाहीचा विचार कसा रुजलाय हे समजते.
कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या बाहेरील तमाम बहुजन मराठा समाज सर्व जाती धर्माचे लोक महाराजसाहेबांना आज आपले वैचारिक नेतृत्व म्हणून स्वीकारत आहेत. याचे कारण सुद्धा महाराजांचे राजा असून सुद्धा लोकशाहीचा विचार करणे, घटनेचा विचार मांडणे हा आहे असे मला वाटते. खरंतर महाराष्ट्रातील तमाम सगळा बहुजन मराठा समाज हा आज राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने चालावा अशी सांगण्याची हिंमत आणि धमक आज महाराजसाहेब या वयात सुद्धा दाखवतात याबद्दल त्यांना पुन्हा पुन्हा जोहार करावसा वाटतो. राज ऋषी शाहू महाराज एक वाक्य कायम म्हणत असत ते अधोरेखित करणे यावेळी मला गरजेचे वाटते राजर्षी शाहू महाराज म्हणत –
“कोल्हापूरच्या या गादीचा महिमाच असा आहे की तिच्यावर अधिष्ठित होण्याबरोबर कोणाही व्यक्तीस ब्राह्मणांचे गुणधर्म स्पष्टपणे दिसू लागून ब्राह्मणेतरांची न्याय बाजू सांभाळावी असे आपोआपच वाटू लागते. करवीर राज्य संस्थापक महाराणी ताराबाई पासून तहत आमच्या कारकीर्दीपर्यंत कोल्हापूरच्या कोणत्या राजाने पेशव्यांची अगर त्यांच्या जातभाईंची बाजू सांभाळलेली आहे?”
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा हा वारसा आजचे शाहू महाराजसाहेब हे समर्थपणे सांभाळतात आणि म्हणूनच ते महाराष्ट्राचे शाहूविचाराचे दीपस्तंभ आहेत.
इंद्रजित सावंत
कोल्हापूर