श्री राजा शंभू छत्रपती म्हणजेच आपले श्री संभाजी महाराज! जगाच्या इतिहासावर नजर टाकली तर श्री शंभूराजांसारख वीर, पराक्रमी, व्यक्तिमत्व झालं नाही हे समजून येते. शंभूराजांनी जे हौतात्म्य पत्करलं ते एका धर्मासाठी होतं की स्वराज्यासाठी होतं? याचा निकाल आपण इतिहासाची साधने अभ्यासल्यानंतर घेऊ शकतो. शंभूराजांच्या हौतात्म्या विषयी औरंगजेबाच्या दरबारातील इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे. ज्या वेळेला बहादूरगडामध्ये दिवाने आम मध्ये शंभूराजांना औरंगजेबाच्या समोर कैद करून आणले गेले त्यावेळेला महाराष्ट्राच्या, सह्याद्रीच्या , शिवरायांच्या या छाव्याने तसूभरही आपली मान औरंगजेबासमोर झुकवली नाही. औरंगजेबाला ताजीम दिली नाही. अशा नोंदी औरंगजेबाच्या इतिहासकारांनीच लिहून ठेवल्या आहेत. औरंगजेबाने शंभूराजांना पकडल्यानंतर त्यांच्याकडे तीन प्रमुख मागण्या केलेल्या होत्या.
1 – तुला माझ्याकडचे कोण कोण फितूर झाले ते सांग.
2 – तुझा खजिना कुठे ठेवला आहे तो सांग.
3 – तुझे सगळे गडकोट माझ्या स्वाधीन कर.
अशा अटी औरंग्याने शंभूराजांच्या पुढे ठेवलेल्या होत्या. पण पराक्रमी आणि स्वाभिमानी शंभूराजांनी यातली कुठलीही अट मानण्यास नकार दिला. आणि त्याच क्षणी आपल्या या स्वराज्याच्या छत्रपतींचे डोळे काढले. इतिहासाच्या संदर्भ साधनांमध्ये कुठेही शंभुराजांनी इस्लाम धर्म स्वीकारावा मग तुझी मी मुक्तता करतो असा औरंगजेब म्हटला अशी नोंद नाही. ही घटना घडल्यानंतर दीडशे वर्षानंतर मल्हार रामराव चिटणीस नावाच्या एका बखरकाराने शंभूराजांचे चरित्र लिहिलं. हा बखरकार म्हणजे ज्या बाळाजीं आवजीना संभाजी महाराजांनी अण्णाजीपंताबरोबर हत्तीच्या पायी देऊन शिक्षा दिलेली होती, त्याचा हा चिटणीस वारस! आपल्या पंजोबाला दिलेल्या शिक्षेची सल मनात ठेवून या मल्हार रामराव चिटणीसाने शंभूराजांचे चरित्र जेवढं होता होईल तेवढं बदनाम करायचं अशा पद्धतीने अत्यंत खोट्या आणि कुठलेही पुरावे नसणाऱ्या गोष्टी शंभूराजांच्या चरित्रामध्ये घुसडल्या. या चिटणीसाने औरंगजेबाच्यासमोर शंभूराजे आल्यानंतर औरंगजेबाने त्याला तू इस्लाम धर्म स्वीकार मग तुला मी सोडून देतो, तुझे राज्य परत देतो असं लिहून ठेवलं. पुढं हा चिटणीस लिहितो की शंभूराजे औरंगजेबला असे म्हटले की मी बाटत नाही, पण जर तू तुझी बेटी (मुलगी)जर मला दिलीस तर मी बाटतो म्हणजे मी इस्लाम धर्म स्वीकारतो. असा मनघडत इतिहास चिटणीसाने लिहला आणि यातूनच पुढे संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून केली; अशा वंदतांची महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर पेरणीची सुरुवात झाली. शंभूराजांची बदनामी करून ही त्यांच्याविषयी असणारे महाराष्ट्राच्या मनातील प्रेम कमी होत नाही. असे पाहिल्यानंतर संभाजी महाराजांच्या चरित्राचा उपयोग आपल्या विचारधारेला करण्यासाठी संभाजी महाराजांची धर्मवीर अशी प्रतिमा निर्माण करण्याची सुरुवात झाली. याविषयी पुन्हा कधीतरी मी सविस्तर आपल्यासमोर मांडेनच.
संभाजी महाराजांच्या इतिहासाची प्रथम दर्जाची संदर्भ साधने औरंग्यानं संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन कर असं सांगितलं होतं का? तर याचे उत्तर नाही! असं देतात आणि जर चिटणीसाचं म्हणणे आपण मानायचे ठरवले तर शंभूराजांसारखा महान पराक्रमी स्त्री दाक्षिण्य पाळणारा राजा हा औरंगजेबाची मुलगी दिल्यानंतर आपला धर्म बदलायला तयार होतो, हे सुद्धा आपल्याला मान्य करावे लागते. हे आपण मान्य करणार का?
पण वास्तव इतिहास असा नाही. वास्तव इतिहास तो आहे की जो मोगलांच्या इतिहासकारांनी लिहून ठेवला, की संभाजी महाराज औरंगजेबाच्या समोर त्याच्या दरबारात आल्यानंतर त्यांनी तसूभरही ही आपली मान झुकवली नाही. या छाव्याने डोळे काढल्यानंतरही औरंगजेबासमोर मान झुकवली नाही, आणि औरंगजेबाच्या अटी मान्य केल्या नाहीत. आपले गडकोट स्वाधीन केले नाहीत. खजिना कुठे आहे ते सांगितलं नाही. आणि स्वतःचे रक्त सांडून, मरण पत्करून इथल्या मराठ्यांना शंभूराजांनी औरंगजेबासारख्या सम्राटासमोर मान झुकवायची नाही! स्वाभिमानाने कसं उभ राहायचं आणि शत्रूसमोर न घाबरता निडरपणे मृत्यूला सुद्धा कसे सामोरे जायचे याचा धडा घालून दिला. आणि म्हणूनच शंभूराजांच्या क्रूर हत्ये नंतर महाराष्ट्रातल्या मातीत उगवणाऱ्या गवताला सुद्धा भाले फुटले. आणि औरंगजेबासारखा महाशत्रू ला 27 वर्षे मराठ्यांशी झुंजावं लागलं आणि मराठ्यांनी औरंगजेबाला – दिल्लीच्या या बादशहाला महाराष्ट्राच्या मातीतच गाडले. हा इतिहास आहे. शंभूराजांचा हा दैदिप्यमान – धैर्यशाली इतिहास सांगत असताना आपण खोट्या असत्य इतिहासाच्या आहारी न जाता संभाजी महाराजांचे हौतात्म्य हे जगामध्ये झालेल्या, कुठल्याही मानवाने दिलेल्या हौतात्म्यापेक्षा उच्च दर्जाचे आहे. त्या हौतात्म्याचा आदर करायचा असेल महाराष्ट्र धर्म टिकवायचा असेल तर आपण संभाजी महाराजांना एका संकुचित चौकटीमध्ये न बांधता इतिहासाचा अभ्यास करुन संदर्भ साधनांचा आदर राखून जे सत्य आहे ते वारंवार सांगितलं पाहिजे. .
जोहार!!!
इंद्र्जित सावंत
कोल्हापूर