देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पूजा व्हावी अशी पांडुरंगाची इच्छा नव्हती | अमोल मिटकरी
www.janvicharnews.com
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या इतर काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्याच्या राजकारणात सत्तानाट्य सुरू झालं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यास यंदा आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा कोण करणार, याची राज्यभरात चर्चा सुरू होती. अखेर भाजपच्या पाठीब्याने शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद मिळवलं आणि राजकीय नाट्यावर पडदा पडला . त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यंमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच पांडुरंगाची पूजा करणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकार कोसळणार असा खळबळजनक दावा केला आहे.
‘यावर्षी विठ्ठलाच्या महापूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार हे निश्चित झाले आहे, मात्र शासकीय पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा करणाऱ्यांचं सरकार राहणार की नाही, हा प्रश्न आहे. कारण सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत शिवसेनेचे बंडखोर आमदार अपात्र ठरल्यास मग सर्व काही समोर येणार आहे. मात्र भाजपच्या बाशिंग बांधून बसलेल्या देवेंद्र फडणवीसांवर पांडुरंग का नाराज आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे,’ असा खोचक टोला मिटकरी यांनी लगावला आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कारकिर्द कदाचित (30जुन 2022ते 11जुलै 2022)..देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक.. असं ट्विट मिटकरी यांनी केलेय…दरम्यान, सत्तेपायी हपापलेल्या स्वार्थी लोकांसाठी श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत लिहून ठेवलं होतं. “सत्तेसाठी हपापावे l वाटेल तैसे पाप करावे l जनशक्तीस पायी तुडवावे l ऐसे चाले स्वार्थासाठीll” महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे टेंडर घेणारे आज सरकार स्थापन करत आहेत!सावधान !! असे ट्विटही मिटकरी यांनी केले होते. ‘काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करत यंदा विठ्ठलाची पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपचा मुख्यमंत्री करणार, असं सुचवलं होतं. परंतु आता विठ्ठलानं एकनाथाला बोलावलं. त्यामुळे आता सरकार नेमकं भाजपचं की शिवसेनेचं आहे, याचं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी द्यावं,’ असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालावरच सरकारचे भवितव्य ठरणार हे मात्र नक्की