स्वराज्य संकल्पक शहाजीराजे!
डॉ.श्रीमंत कोकाटे
महाराजा शहाजीराजे – जिजाऊ माँसाहेब यांच्या संकल्पनेतील आणि अथक प्रयत्नतील स्वराज्य छत्रपती शिवरायांनी साकार केले. विखुरलेल्या मराठ्यांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वातंत्र्य निर्माण करण्याचा प्रयत्न शहाजीराजांनी केला. आदिलशाही, निजामशाही आणि मोगलशाही या तिन्ही शाह्यांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा, पराक्रमाचा दरारा असणारे शहाजीराजे हे दक्षिण भारताचे महापराक्रमी शहेनशहा होते. उत्तरेकडे शहाजान तर दक्षिणेकडे शहाजीराजे तसेच समकालीन म्हणतात. अशा महापराक्रमी शहाजीराजे यांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मालोजीराजे तर आईचे नाव उमाबाई उर्फ दीपाबाई होते. शहाजीराजे यांचे आजोळ फलटणचे निंबाळकर तर जिजाऊंचे आजोळ देखील फलटणचे निंबाळकराकडील होते.
मालोजीराजे भोसले आणि सिंदखेडचे लखुजीराजे जाधवराव हे निजामशहाकडचे मातब्बर सरदार होते.
जाधव-भोसले यांचे नाते संबंध असल्याने त्यांचा घरोब्याचा संबंध होता. लखुजीराजे जाधवराव यांनी आपली कन्या जिजाऊचा विवाह मालोजीपुत्र शहाजीराजांशी जमविला. दरम्यान मालोजीराजे यांचे इंदापूरच्या लढाईत निधन झाले. लखुजीराजे जाधवरावांनी मानपान देऊन शहाजी जिजाऊ यांचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात लावून दिला. वडिलांच्या निधनानंतर शहाजीराजे हे पुणे, सुपे, बारामती, चाकण ,इंदापूरचे सरदार झाले. पत्नी जिजाऊ, आई उमाबाई, बंधू शरीफजी अशा परिवाराचं शहाजीराजे पुणे जहागिरीत आले.
निजामशाहीत शहाजीराजांचा मोठा दरारा होता. निजामशाही वाचविण्यासाठी शहाजीराजे आणि मलिक अंबर हे मोगल आणि आदिलशहा या संयुक्त फौजेविरुद्ध अहमदनगर जवळील भातवडी येथे मोठ्या निकराने लढले. महाबलाढ्य अशा मोगल आणि आदिलशहा या संयुक्त फौजेचा शहाजीराजांनी पराभव केला. या युद्धात शहाजीराजे यांचे प्रिय बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. शहाजीराजांनी पराक्रमाची शर्थ केली. बादशाह शहाजान हादेखील शहाजीराजांना दबकून असे.
स्वतःचे स्वतंत्र राज्य असावे ही शहाजीराजे – जिजाऊंची भूमिका होती. त्यासाठी शहाजीराजे- जिजाऊंनी अविरत कष्ट घेतले. मराठ्यांचा इतिहास घडविण्याचे काम शहाजीराजांनी केले. शहाजीराजे- जिजाऊ यांचे वर्णन करताना समकालीन कवींद्र परमानंद लिहितात “मालोजीराजांचे पुत्र भाग्यशाली, सुलक्षणी, वाऱ्याप्रमाणे वेगवान, सूर्याप्रमाणे तेजस्वी, विश्वविजेता, पुण्यवान, पराक्रमी असे शहाजीराजे दक्षिणेतील प्रख्यात नृपश्रेष्ठ आहेत. त्यांची महाराणी महासाध्वी, महापतिव्रता, यशस्विनी, जाधवराव यांची कन्या जिजाबाई या पृथ्वीवर जागृत आहेत.” (शिवभारत – अध्याय 5, 51 ते 53) अशा कर्तृत्ववान दांपत्याने महाराष्ट्राचा इतिहास निर्माण केला. शहाजीराजे यांना जिजाऊ पोटी सहा मुलं झाली. त्यातील चौघांचे अकाली निधन झाले, तर ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे आणि कनिष्ठ पुत्र शिवाजीराजे हे वंशवर्धक आणि कर्तृत्ववान ठरले.
शहाजीराजांनी जेष्ठ पुत्र संभाजीराजांचा विवाह विजयराज विश्वासराव यांची कन्या जयंती यांच्याशी केला. विजयराज हे शरीफजीचे मेहुणे म्हणजेच दुर्गाबाईचे भाऊ होते. ते शिवनेरीचे किल्लेदार होते. शहाजीराजांनी आपल्या गरोदर जिजाऊस शिवनेरी किल्ल्यावर ठेवले. याठिकाणी शिवरायांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला. शिवरायांचा जन्म झाल्याची वार्ता ऐकून शहाजीराजांना मोठा आनंद झाला. ते तात्काळ बाल शिवाजीचे मुखावलोकन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर आले आणि त्यांनी तेथे शिवजन्माचा मोठा आनंदोत्सव साजरा केला. तेथे त्यांनी मोठा दानधर्म केला.
शहाजीराजांनी कोकण, नाशिक, संगमनेर, सिन्नर ,अहमदनगर, धारूर, औसा, परांडा हा भाग जिंकला. जिजाऊ, बाल शिवबा, दुर्गाबाई, संभाजी, जयंती, मातोश्री यांना घेऊन शहाजीराजे संगमनेर जवळील पेमगिरी किल्ल्यावर स्वतंत्र राजासारखे राहू लागले. निजामाचा वारस मुर्तजा याला मांडीवर घेऊन स्वतंत्र राज्याची द्वाही शहाजीराजांनी फिरविली. स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची शहाजीराजांची महत्वकांक्षा याठिकाणी प्रकर्षाने दिसते.
शहाजीराजे – जिजाऊनी संभाजीराजे , शिवाजीराजे यांना राजनीतीचे, युद्धकलेचे शिक्षण दिले. शहाजीराजे हे स्वतः मराठी संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार होते. हेच संस्कार त्यांनी आपल्या पुत्रांवर केले.
1636 सालापर्यंत शहाजीराजे शिवनेरी, संगमनेर, पुणे, चाकण, अहमदनगर, नाशिक, कोकण या भागात होते. निजामशाहीचे ते मोठे आधारस्तंभ होते. 1636 मध्ये निजामशाही संपुष्टात आली. मोगल आदिलशाही करारानुसार शहाजीराजे 1636 मध्ये आदिलशहाकडे सरलष्कर म्हणून गेले. तेथे त्यांनी मोठा पराक्रम गाजविला. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र या ठिकाणचा बराचसा भाग शहाजीराजांनी जिंकला. बेंगलोर शहराचा शहाजीराजांनी मोठा कायापालट केला. बेंगलोर शहराच्या जडणघडणीमध्ये शहाजीराजे यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्याप्रमाणे पुढे जिजाऊ माँसाहेबानी बेचिराख झालेले पुणे वसविले व पुण्याचा जीर्णोद्धार केला, त्याच पद्धतीने शहाजीराजांनी बेंगलोर शहराचा कायापालट केला. याच ठिकाणी शहाजीराजांनी स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला.
पुणे, सुपे, चाकण, बारामती, इंदापूर येथील कारभार पाहण्यासाठी त्यांनी आपल्या महाराणी जिजाऊ माँसाहेब, बाल शिवबा आणि अत्यंत जीवलग स्नेही, सहकारी पुण्याकडे पाठविले. आपल्या कर्तृत्ववान, दूरदृष्टीच्या महाराणीला स्वातंत्र्य देणारे शहाजीराजे हे अत्यंत विशाल अंतःकरणाचे राजे होते. शिवाजीराजे आयुष्यभर जी राजमुद्रा वापरत होते
*प्रतिपच्चंद्रलेखेव*
*वर्धिष्णुर्विश्ववंदिता*
*शाहसुनोः शिवस्यैषा*
*मुद्रा भद्राय राजते*
अर्थ- प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो, तसे शहाजीपुत्र शिवाजीचे लोककल्याणकारी राज्य कलेकलेने वाढत जाणारे राज्य आहे.
ती *राजमुद्रा* शहाजीराजानी शिवरायांना दिली. शिवाजीराजाना *भगवा झेंडा* शहाजीराजे-जिजाऊंनी दिला.
स्वराज्यनिर्मीतीच्या कामासाठी पहिल्या फळीतील कान्होजी जेधेयांसारखे मातब्बर सहकारी शहाजीराजांनी शिवरायांच्या मदतीला पाठविले. शिवाजीराजांना द्रव्यबळ, सैन्यबळ, शस्त्रबळ शहाजीराजांनी दिले. अत्यंत विश्वासू सहकारी शहाजीराजांनी पाठवले. विखुरलेला मराठा समाज एकत्र करावा व स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे यासाठी शहाजी- जिजाऊ यांनी शिवरायांचे आठ विवाह केले.
शिवाजीराजांच्या स्वराज्यनिर्मितीसाठी शहाजीराजांनी मदत केली. विजापूर दरबारात शहाजीराजे यांना मानाचे स्थान होते. ते सरलष्कर होते. परंतु केवळ शिवाजीराजांना मदत करतात व आदिलशाहीविरुद्ध बंड पुकारतात म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना जिंजी येथे कैद केले. शहाजीराजांची सुटका करण्यासाठी शिवाजीराजांनी प्रयत्नांची शिकस्त केली. शहाजीराजे आणि शिवबा या पिता-पुत्रमध्ये अत्यंत स्नेहाचे संबंध होते. शहाजीराजांना शिवरायांच्या कार्यकर्तृत्वबद्दल प्रचंड अभिमान होता. शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य पाहण्यासाठी शहाजीराजे स्वराज्यात आले. शिवरायांनी शहाजीराजांच्या पालखीला खांदा दिला. शिवाजीराजे महान मातृ-पितृ भक्त होते. जेजुरीगडावरती शहाजीराजे, शिवबा, जिजाऊ माँसाहेब यांची भेट झाली. स्वराज्यासाठी रायगड ही सुरक्षित राजधानी आहे, हा सल्ला शहाजीराजांनी शिवरायांना दिला. शिवरायांच्या कार्याबद्दल शहाजीराजांना प्रचंड अभिमान होता.
शहाजीराजांचे कार्यक्षेत्र केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इत्यादी प्रांतावर आपले कार्यकर्तृत्व गाजविले. जिंजी , तंजावर हा भाग शहाजीराजांनी जिंकून घेतला होता. पुढे याचा उपयोग शिवाजीराजे, व्यंकोजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज यांना स्वराज्य विस्तारासाठी व स्वराज्य संरक्षणासाठी झाला.
शहाजीराजे हे उत्तम प्रशासक होते. ते प्रचंड महत्वकांक्षी होते. ते निर्भीड आणि स्वाभिमानी होते. ते महापराक्रमी होते. ते महाविद्वान होते. त्यांच्या दरबारामध्ये अनेक कवी, लेखक, अभ्यासक होते. त्यांच्याशी ते विविध विषयावरती चर्चा करत असत. *राधामाधवविलासचंपू* आणि *पर्णालपर्वतग्रहणाख्यान* हे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिणारे जयराम पिंडे हे शहाजीराजांच्या दरबारातील महान कवी होते. स्वराज्य निर्मितीची पायाभरणी करण्याचे ऐतिहासिक कार्य शहाजीराजांनी केले. सिमोगा येथील काही गुंडांचा बंदोबस्त करून परतत असताना होदिगिरे येथे शहाजीराजांचा 23 जानेवारी 1664 रोजी मृत्यू झाला. ही वार्ता जिजाऊ-शिवबांना समजली. त्यांना प्रचंड दुःख झाले. पण जिजाऊ शिवबा दुःख करत बसले नाहीत. त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. जिजाऊनी सतीप्रथा नाकारून शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यामुळेच रयतेचे स्वराज्य निर्माण झाले.
शहाजीराजांच्या कार्यकर्तृत्व, पराक्रमाचे वर्णन त्यांचा महापराक्रमी आणि महाबुद्धिमान नातू छत्रपती संभाजीराजे यांनी *बुद्धभूषण* ग्रंथात पुढील प्रमाणे केलेले आहे.
*भृशबलान्वयसिन्धुसुधाकर:।*
*प्रथितकीर्तिरुदारपराक्रम:।*
*अभवदर्थकलासु विशारदोजगति।*
* शाहनृप: क्षितिवासव:।*
(अ. 1.7)
अर्थ- या जगात पृथ्वीतलावर इंद्राप्रमाणे पराक्रमी असणारे शहाजीमहाराज होऊन गेले. ते भोसले वंशरूपी सागरातून चंद्र जसा अमृतमंथनाचे वेळी वर आला, त्याप्रमाणे स्वपराक्रमाने उदय पावले होते. त्यांची कीर्ती चहूकडे पसरली होती. त्यांचा पराक्रम वरच्या दर्जाचा होता आणि सर्व प्रकारच्या राजनैतिक डावपेचात ते निष्णांत, कुशल व प्रवीण होते.
*येनाकर्णविकृष्टकार्मुकचलतकांडावलिकार्तित।*
*प्रत्यर्थीक्षितिपालममौलिनिवहैरभ्यर्चि विश्वंभरा।।* *यस्यानेकवसुंधरापरिवृढप्रोतुंगचुडामणे: पूत्रत्वम।*
*समुपागत: शिव इतिख्यान: पुराणो विभु:।।*
अर्थ – आपल्या कानापर्यंत जोराने धनुष्याची दोरी ओढलेल्या आपल्या युद्धसज्ज धनुष्यबाणातून शहाजीराजांनी बाणांचा सतत वर्षाव केला. त्या वर्षावामुळे प्रतिस्पर्धी शत्रूंच्या पक्षात असलेल्या राजांची शिरे तुटून पडली होती. त्या तुटलेल्या मस्तकांच्या राशीनी शहाजीमहाराजांनी भूमातेस वंदन केले होते. तिची पूजा बांधली होती. तिचे पूजन केले होते. अनेक राजांच्या मस्तकावर शहाजीमहाराज देदिप्यमान प्रकाश पूजा संपन्न तेजोरश्मी चूडामणी सूर्याप्रमाणे शोभून दिसत होते. अशा शहाजीराजांच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
*इतिश्रीमद भृशबलान्वयमुकुटअलंकार।*
*श्रीमतशाहराजसुत श्रीमत शिवछत्रपतीसुत।*
*श्रीमतशंभूराजविरचिते बुधभूषण राजनीती:।*
अर्थ- दुर्गबळ, सैन्यबळ आणि द्रव्यबळ या बलामध्ये आणि सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असणारे शहाजीराजे यांचे पुत्र शिवाजीराजे यांचे पुत्र शंभूराजे यांनी बुद्धभूषण ग्रंथातील राजनीति हे प्रकरण लिहून पूर्ण केले.
छत्रपती संभाजीराजे आपले आजोबा शहाजीराजे यांच्या पराक्रमाचे, कर्तृत्वाचे बुधभूषण या ग्रंथात वरीलप्रमाणे प्रकारे वर्णन करतात. महान शिवशाहीर अमर शेख शहाजीराजांच्या कार्याचे वर्णन करताना म्हणतात
*पेरावं तेच पीक येतं।*
*जगाची रीत,नवं नाही त्यात।*
*शहाजीन पराक्रम पेरला।*
*शिवाजी सर्जा अवतरला ।*
*मराठयांचा भाग्योदय झाला।*
आज शहाजीराजे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
*-डॉ. श्रीमंत कोकाटे*