जनुकशास्त्र (Genetics) विषयातील करिअर
जेनेटिक हा शब्द ग्रीक भाषेतील जेनेसिस म्हणजे प्रारंभ / उदभव या शब्दापासून आला आहे. सजीवांच्या पुनरुत्पादन प्रक्रियेतून नव संतती निर्माण होते. ज्या कारणांमुळे हे भेद किंवा साम्य निर्माण होते व हे (भेद किंवा साम्य) एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. याचा अभ्यास जनुकशास्त्रामध्ये केला जातो. सजीवांमध्ये असे भेद किंवा साम्य निर्माण होण्यास जी जनुकीय माहिती आवश्यक असते ती पेशीमधील केंद्रकातील डी. एन. ए. ( Deoxyribonucleic Acid) मध्ये उपलब्ध असते. एखादया व्यक्तीच्या जनुकविधेवरून (Genotype) त्या व्यक्तीची स्वरूपविधा (Phenotype) ठरते.
क्षेत्राची व्याप्ती
जेनेटिक्स या विषयाची व्याप्ती अतिशय विस्तृत आहे. त्यांपैकी व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा काही शाखांची थोडक्यात माहिती पुढे दिली आहे.
प्लांट ब्रीडिंग: यामध्ये दोन वेगवेगळ्या वनस्पतींच्या प्रजातींमध्ये ब्रीडिंग (संकर) करून त्यांची गुणवत्ता सुधारण्यात येते.
अॅनिमल ब्रीडिंग: यात दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या प्राण्यांमध्ये / गुरांमध्ये ब्रीडिंग (संकर) करून त्यांची गुणवत्ता सुधारण्यात येते.
मायक्रोबिअल स्ट्रेन डेव्हलपमेंट: जिवाणू / विषाणूंच्या नवीन प्रजाती निर्माण केल्या जातात…
ह्युमन कॅरिओटायपिंग यात मानवी गुणसूत्रांचा अभ्यास करून मानवाला होणारे (संभाव्य) आनुवांशिक आजार जाणून घेता येतात व योग्य तो उपाय करता येतो.
युजेनिक्स: यात मानवामध्ये जनुकीय बदल करून मानवाची (शारीरिक) गुणवत्ता वाढवण्यात / सुधारण्यात येते.
युथेनिक्स: यात नैसर्गिक (बाह्य) घटकांचा अभ्यास करून मानवाच्या आंतरिक आरोग्यात सुधारणा / बदल करता येतो.
मैरिज कम्पैटिबल कौन्सिलर: दोन उपवर एकमेकांशी लग्न करण्यास जनुकीय पातळीवर अनुरूप आहेत किंवा नाहीत याचा अभ्यास करून समुपदेशन करता येते.
क्षेत्रातील संधी
जनुकशास्त्रामुळे आनुवंशिक आजार हे बाळ जन्माला येण्याआधीच आपण ओळखू शकतो व उपचारासाठी योग्य तो निर्णय घेऊ शकतो. जनुकशास्त्राची पदवी संपादन केल्यास जेनेटिक कौन्सिलर म्हणून वैद्यकीय क्षेत्रात कार्य करता येते.
जेनेटिक इंजिनीअरिंगसारखे विशेष अभ्यासक्रम करून विविध जेनेटिकली मॉडिफाइड फूड (सुधारित जनुकीय अन्न) उत्पादित करणाऱ्या संस्थेत संशोधक म्हणून काम करता येते.
M.Sc झाल्यानंतर NET / SET परीक्षा उत्तीर्ण होऊन विविध महाविदयालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करण्याची संधी असते.
NET परीक्षा उत्तीर्ण होऊन संशोधक म्हणून संशोधन संस्थामध्ये काम करता येते.
आवश्यक गुण / कौशल्ये
चिकित्सक वृत्ती
आपल्या विषयातील नवनवीन संकल्पना/घडामोडी / सुधारणा इत्यादींचे अद्ययावत ज्ञान मिळवण्यास आवश्यक ते वाचन करणे.
अभ्यासक्रम
1.B.Sc जेनेटिक्स–
शैक्षणिक पात्रता-बारावी विज्ञानशाखा
आवश्यक विषयः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित
2.M.Sc जेनेटिक्स
शैक्षणिक पात्रता –B.Sc बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स, बायोकेमिस्ट्री किंवा झूलॉजी
3.Ph.D जेनेटिक्स
शैक्षणिक पात्रता-M.Sc बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, बायोकेमिस्ट्री किंवा झूलॉजी (काही संस्थांमध्ये NET / GATE परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.)