प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागतेच. मग ती समस्या आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो. आपण आता स्पर्धेच्या युगात जगत आहोत. इथे टिकण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने धडपड करत आहे. आपली समस्या हीच आहे कि, याच स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी स्वतःला सक्षम बनविण्याविषयीची. जी व्यक्ती सक्षम असेल, तत्पर असेल महत्त्वाचं म्हणजे हार्ड वर्क व स्मार्ट वर्क या दोन्हींचा परस्परसंबंध समजून घेवून काम करणारी असेल तीच व्यक्ती आज जगामध्ये टिकणार आहे. इथं प्रत्येक समस्येला उत्तर हे आहेच म्हणजे एव्हरी प्रॉब्लेम हॅज सोल्युशन . पण मुळात प्रश्नच हा आहे की, सोल्युशन मिळवण्यासाठी आपण कोणाकडे जातो? साधारणतः तीन गोष्टींचा आपण विचार करतो.
1) नातेवाईक किंवा जाणकार तज्ञ मंडळींचा सल्ला घेणे.
2) ज्योतिष सल्ला घेणे (कारण मनात शंका असते, कदाचित माझा ग्रह फिरला असेल की काय?)
3) देवाकडे जाणे, देवाला शरण जाणे.
मंडळी, वरील तीन मार्गांचा वापर करण्याचा खटाटोप आणि प्रयत्न समाजामध्ये लोक करत असतात. पण या मार्गातून आपल्याला योग्य आणि प्रभावी मार्गदर्शन किंवा उत्तर मिळेलच याची शाशवती नसते. मग असा प्रभावी मार्ग कोणता? तो म्हणजे आपलं अंतर्मन . जे आपल्याला प्रत्येक समस्येतून सहीसलामत बाहेर काढतं.
नेपोलियन बोनापार्ट समोर जेव्हा अवघड युध्द प्रसंग येई, तेव्हा त्याला सैन्याची व्यूहरचना कशी लावावी हे समजत नसे. अशावेळी तो आपल्या अंतर्मनाला कमांड देत असे कि ” हे अंतर्मना मला योग्य उत्तर दे.” आणि आंघोळ करून झोपी जात असे.आणि ज्यावेळी जागा होई त्यावेळेला त्याचे उत्तर त्याला मिळालेले असे. कॅनडाचे प्रसिध्द डॉक्टर फेडरिक बेंटींग हे मधुमेही रोग्यांच्या बाबतीत खूप काळजी करत. कारण मधुमेहावर कोणताच औषधोपचार नव्हता. त्यांनी हे औषध शोधण्यासाठी खूप अभ्यास केला. संशोधन केले. पण यश येत नव्हते. शेवटी अंतर्मनाला त्यांनी सूचना दिली. अंतर्मनाने ताबडतोब प्रतिसाद दिला आणि कुत्र्याच्या स्वादुपिंडाचा संप्रेरकाचा प्रयोग रोग्यावर करण्याची सूचना त्यांना मिळाली आणि अशाप्रकारे मित्रहो, इन्सुलिन नावाच्या औषधाचा शोध लागला.
इलियास होउ याचं शिलाई मशीन, जगप्रसिध्द कवी शेली, किटस, महान साहित्यीक विल्यम शेक्सपिअर, रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन, संगीतकार असलेला पण आपण जे काय वाजवतोय ते ऐकू न येणारा महान म्युझीशियन बिथोव्हेन, अशा अनेक मंडळींनी जी वैचारिक व सां॑स्कृतिक क्रांती केली ती अंतर्मनाच्या जोरावर. ज्यावेळेला त्यांना समस्या आली त्यावेळेला त्यांनी अंतर्मनाचा आधार घेतला.
म्हणून मंडळी, जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये समस्या आली असेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळत नसेल. त्यावेळेला अंतर्मनाकडे जावा, ते आपल्याला कधीच निराश करणार नाही. अंतर्मन आपल्याला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असत. महत्वाचं म्हणजे ते चौवीस तास आपल्याबरोबर असतं. फक्त त्याची एक अट असते. ती म्हणजे ते हून आपली मदत करत नाही, आपण त्याला विचारलं पाहिजे. सो याचा वापर आपण कसा करायचा हे शास्त्रीय पद्धतीने शिकून घेतलं तर आपलं जीवन अधिकाधिक सुकर होण्याची शक्यता निर्माण होणार आहे.