Home महापुरुषांचे विचारविश्व महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्‍या कार्याचे योगदान

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्‍या कार्याचे योगदान

0
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्‍या कार्याचे योगदान

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्‍या कार्याचे योगदान    

समाजाच्या उन्नतीकरिता प्रगती करीता ज्या महापुरूषांनी आपले आयुष्य खर्ची घातले त्‍यामध्‍ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे योगदान फार मोठे आहे. भारतामध्‍ये इंग्रजांची राजवट संपूर्ण भारतभर प्रस्थापीत झाल्यानंतर इंग्रजानी भारतामध्‍ये आपल्‍या  सत्तेला अनुकूल असे धोरण राबवायला सुरुवात केली. त्यामुळे भारतातील राजकीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक जनजीवन ढवळून निघाले. भारतामध्‍ये इंग्रजी सत्तेच्या विरोधात मोठा जनआक्रोष निर्माण होऊ लागला. 1885 च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर समाजामध्‍ये राष्ट्रीयत्वाची भावना रूजु लागली. त्यातुनच पुढे जहाल व मवाळ असे दोन गट निर्माण झाले. राष्ट्रीयत्वाची भावना मोठ्या प्रमाणावर जागृत होवून समाज जागृत झाला. त्याचबरोबर समाजामधे अनेक घातक प्रथा, रूढी, परंपरा, जातीभेद अस्पृश्‍यता, अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होत्या. त्‍यामुळे समाजामध्‍ये सामाजीक व राजकीय परिवर्तनाचे वारे वाहायला लागले. समाजाची परिस्थिती बदलल्याशिवाय समाजाचा विकास साधला जाऊ शकणार नाही  याची जाणीव होऊन सामाजिक दृष्ट्या समाजाला जागे करण्यासाठी समाजसुधारकांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्राला समृद्ध अशी परंपरा व वारसा समाजसुधारकांचा लाभलेला आहे. सर्वच समाजसुधारकांनी समाजाच्या उद्धारांसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे योगदान अमुल्य आहे.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे कार्य

 एकोणीसाव्या शतकातील उत्तरार्धात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. महर्षी धोंडो कर्वे यांनी स्‍त्रीयांच्‍या उद्धारासाठी ज्‍या महापुरूषांनी अथक परिश्रम घेतले  अशा महापुरुषांमध्‍ये महर्षी केशव धोंडो कर्वे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. स्त्रि शिक्षणासाठी, स्‍त्री विकासासाठी त्यांनी अतिशय परिश्रम घेतले. पुरुषांच्‍या गुलामगिरीतून व सामाजिक परावलंबीत्‍वातुन  सुटका करून घेण्यासाठी स्त्रियांना शिक्षण दिले पाहीजे. 

स्त्रियांच्‍या  शिक्षितपणावर कुटुंब व समाजाची प्रगती अवलंबुन आहे या जाणिवेतुन त्‍यांनी स्त्रियांच्‍या शिक्षणासाठी महिला विद्यालयाची 1907 मधे हिंगणा येथे स्थापना केली. स्त्रियांमध्‍ये शिक्षणाचा प्रचार-प्रसार करणे अत्‍यंत पवित्र असे देशकार्य व धर्मकार्य आहे असा त्यांचा विश्वास होता. पुढे त्‍यांनी 1916 मध्‍ये महिला विद्यापीठाची स्थापना केली. स्त्री जीवनाला आवश्‍यक ते सर्व शिक्षण स्त्रियांना दिले गेले पाहीजे हा त्‍यांचा विचार समाजाच्‍या प्रगतीचा, कुटुंबाच्‍या विकासाचा आणि राष्ट्र उभारणीचा होता हे यावरुन स्पष्ट होते. स्त्रियांना उच्च शिक्षणासाठी  सोयीसुविधा उपलब्ध केल्‍या. ग्राम पातळीवर शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणासाठी, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची 1936 मध्‍ये स्थापना केली. अनेक गावांमधे शिक्षण मंडळाच्‍या माध्यमातून समाजाची  प्रगती व समाजामध्‍ये समानता आणण्‍यासाठी वाईट रूढी , प्रथा, परंपरा, अस्पृश्यता, कशी नष्‍ट करता येईल यावर भर दिला. त्यांनी विद्यापीठामधे प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्‍त्र, चित्रकला, पाककला, गायन या विषयांचे शिक्षण मिळावे हा त्यांचा प्रयत्न होता. माध्यमिक प्रशिक्षण पदवी, गृहविज्ञान पदवी, परिचारिका पदवी  यांसारखे अभ्यासक्रम सुरु केले. स्त्रि शिक्षणासाठी त्‍यांनी अपार मेहनत घेऊन ग्रामीण भागामधे शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न केले. स्त्रि शिक्षण आणि स्त्रियांच्‍या सर्वांगीण उन्नतीची चळवळ त्यामुळे गतिमान झाली. आचार्य अत्रे त्यांचा गौरव करतांना म्हणतात भारताच्‍या  इतिहासातील एका क्रांतिकारक शतकाचे ते मूर्तिमंत साक्षीदार आहेत. महाराष्ट्राच्‍या सामाजिक इतिहासाचे ते एक महान शिल्‍पकार होते. हे त्‍यांच्‍या कार्यावरून स्पष्ट होते. 1920 मधे शेठ विठ्ठलदास ठाकरसी यांनी या भारतीय महिला विद्यापीठाला आपल्या आईच्या स्मरणार्थ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्‍या नावे १५ लाख रुपयांची देणगी या विद्यापीठास दिली. यावरून स्त्रि शिक्षणाविषयी समाजामधे झालेली जागृती हे या यावरून स्‍पष्‍ट होते. समाजामधे बालविवाहाची प्रथा रूढ होती. त्यामध्‍ये बालमृत्युचे प्रमाणही मोठया प्रमाणावर होते. त्यामुळे विधवांचा प्रश्न निर्माण झाला. या स्त्रियांना घरात, समाजामधे दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असे. सण-समारंभ, उत्‍सव यामध्‍ये त्‍यांना वावरायला बंदी होती. अंधा-या खोली मध्‍ये त्‍यांना आपले जीवन  जगावे लागत असे. विधवा स्त्रियांचे केशवपन करून पांढरे वस्‍त्र नेसावे लागे. 

या विधवा स्त्रियांचे जीवन सुखी करण्यासाठी त्‍यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. विधवा विवाहोत्तेजक मंडळ  स्थापन करून त्‍यांनी विधवा विवाहाला चालना दिली. समाजामध्‍ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा आदर्श समाजाला घालून दिला. त्यांच्‍या पहिल्या पत्नीचा मृत्यु झाल्यानंतर त्यांनी एका विधवेशी विवाह केला. त्‍यावेळी समाजाने, नातेवाईकांनी त्यांची खूप अवहेलना केली. त्‍यांच्‍याशी  असलेले संबंध तोडले. तरीही त्यानी हार मानली नाही.  या घटनेवरुन विधवांच्‍या समस्या सोडवण्‍याची त्‍यांची तळमळ  अंत:करणापासून होती हे यावरून स्पष्ट होते. विधवा विवाहाचे तेच पुरस्कर्ते होते. जे सांगीतले ते वर्तले हा त्‍यांचा विचार होता. या विधवा विवाहोत्तेजक मंडळानी अनाथ विधवांच्‍या मुलांवर लक्ष ठेवून त्यांचा सांभाळ केला. शिक्षणाची सोय केली. तसेच विधवा विवाहाचा पुरस्कार करणे, समाजामध्‍ये जागृती घडवुन आणणे अशाप्रकारची कामे ही संस्था करीत होती. अनाथ बालीकाश्रम स्थापन करून विधवा परित्यक्ता व अनाथ स्त्रियांना आत्‍मविश्वासाचा मार्ग मोकळा  करून दिला. विधवा स्त्रियांबरोबर कुमारीकांनाही प्रवेश दिला. इथे जीवन उपयोगी व्यावसायिक शिक्षण दिले गेले. विधवांची दुःखे कमी करण्‍यात, हलकी करण्यात या आश्रम संस्थेला मोठे यश मिळाले. विधवा स्त्रियांना एक हक्काचे ठिकाण मिळाले.राष्ट्राचा विकासासाठी काम करणाऱ्या स्त्रि-पुरुषांची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी त्यागाच्‍या तत्‍वावर  काम करणारी कार्यकर्त्‍यांची फळी निर्माण करण्यासाठी 1908 मधे “निष्कामकर्म मठ”या संस्‍थेची स्थापना केली. नि:स्वार्थ  बुद्धीने व श्रध्‍दामय  अंत:करणाने सेवा करावी हा संस्थेचा मूळ हेतु होता. स्त्रियांच्‍या प्रगतीसाठी निष्ठावान कार्यकर्त्‍यांची फळी तयार करावी हा उद्देश ही संस्था स्थापन करण्यामागे होता. स्त्रियांनी स्त्रियांचा उध्‍दार करावा,  शिक्षणाच्‍या प्रसाराचे काम करावे हे प्रामाणीक व त्यागी स्त्रिया चांगल्‍या प्रकारे करू शकतात याची जाणीव त्यांना होती. या हेतुनेच त्यांनी निष्कामकर्म मठाची  स्थापना केली. सुरुवातीच्‍या काळात समाजाने महर्षी धोंडो केशव कर्वे यांची अवहेलना केली तरी पुढे मात्र समाजाला त्यांच्‍या कार्याचे खरे मोल कळले. सर्वसामान्‍य लोकांनी  त्‍यांच्‍या कार्याची दखल घेतली आणि त्‍यांचा उचित असा गौरव केला.  १८५८ मध्‍ये जन्‍म झालेल्‍या  या महापूरूषाने स्त्रि शिक्षणासाठी अपार कष्‍ट केले. आपले संपूर्ण आयुष्‍य स्त्रि उद्धरासाठी खर्ची घातले.  ईश्‍वराच्‍या न्‍याय मंदिरात पुनर्जन्‍म असेल आणि तो मला मिळाला तर मी स्‍त्री उद्धाराचे कार्य करेल  असे ते म्‍हणत.  यावरून त्‍यांची या कार्यावरील निष्‍ठा व परिश्रम घेण्‍याची तयारी स्‍पष्‍ट होते. बनारस व पूणे विद्यापीठाने त्‍यांना डि.लिट. ही सन्‍मानदर्शक ही पदवी दिली. 

मुंबई विद्यापीठाने त्‍यांना एल.एल.डी. ही पदवी बहाल केली. भारत सरकारने त्‍यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च बहूमान १९५८ मध्‍ये देवून त्‍यांचा गौरव केला. यातच त्‍यांच्‍या कार्याचे महत्‍व सामावलेले आहे. आज जीवनाच्‍या प्रत्‍येक क्षेत्रांत स्‍त्रीपुरूषांच्‍या बरोबरीने आपले कर्तृत्‍व सिध्‍द केलेले दिसते हे सर्व परिवर्तन शिक्षणामुळे आले. शिक्षणाचे त्‍यांनी तपोवन उभे करून स्‍त्री उदधारासाठी आपले संपूर्ण आयुष्‍य वेचले. स्‍त्री समस्‍यांचे समर्थपणे निराकरण करून त्‍याचा जीवनातील अंधार नष्‍ट केला. प्रकाशाचा नवकिरण आणून स्‍त्रीला समर्थपणे समाजामध्‍ये उभे केले. आज स्‍त्री केवळ तिच्‍या पारंपारीक क्षेत्रातच नव्‍हे तर पुरूषांच्‍या मक्‍तेदारीच्‍या क्षेत्रात सुध्‍दा अगदी भक्‍कमपणे उभी राहून यशस्‍वीपणे  कार्य करतांना दिसत आहे. यामध्‍ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्‍या कार्याचे योगदान अविस्‍मरणीय आहे.