भारतीय राष्ट्रवादाविषयी अधिक माहिती पाहण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम ‘राष्ट्रवाद‘ म्हणजे काय ? हे समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. ‘राष्ट्र‘ या शब्दापासून राष्ट्रवाद हा शब्द बनतो तेव्हा राष्ट्र म्हणजे काय ? राष्ट्र बनण्यासाठी आवश्यक असणारे घटक कोणते ? राष्ट्रवाद ही संकल्पना कधी उदयास आली ? भारतात राष्ट्रवाद अस्तित्वात आहे का ? आहे तर तो भारतात कधीपासून उदयास आला ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय संपूर्ण राष्ट्रवादाची उकल होणे अशक्य आहे.
खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद ही आधुनिक युगाची देणगी होय. राष्ट्र निर्माण होण्यासाठी विशिष्ट भूभाग, जनता, त्यांचे सरकार व सरकारचे सार्वभौमत्व या चार घटकांशिवाय जनतेच्या ठायी एकत्वाची भावना निर्माण व्हावी लागते तरच राष्ट्र उभे राहते. समान संस्कृती, समान मानस, समान हितसंबंध यातून जे सामाजिक ऐक्य निर्माण होते, त्या आधारावर जगामध्ये राष्ट्र व राष्ट्रवाद निर्माण झाला. राष्ट्रवाद सामूहिक एकत्वाचा प्रत्यय देतो. सांस्कृतिक समानता व आर्थिक, राजकीय, सामाजिक हितसंबंधाची समानता यातून राष्ट्रीय समाजाच्या एकत्वाची गुंफण होते व अशी गुंफण होण्यासाठी साहित्य फार मोठी भूमिका बजावीत असते, कारण आपले मत प्रदर्शित करून ते एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत पोहोचविणे आणि त्या मताचे अनुयायी बनविणे व वाढविणे हे महत्त्वपूर्ण कार्य साहित्य करीत असते. म्हणून राष्ट्रीय एकत्व निर्माण होण्यासाठी साहित्याची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे.
राष्ट्र काही मुळातच असत नाही. इतिहास क्रमातील स्थित्यंतरातून ते निर्माण होते. भारतात प्राचीन काळापासून एक संदिग्ध स्वरूपाची सांस्कृतिक एकतेची भावना जागृत होती, पण राष्ट्र म्हणून भारताची जडणघडण झाली ती युरोपियन भारतात आल्यापासून. ब्रिटिशांचे आगमन झाले आणि त्यांच्या वसाहतवादी धोरणामुळे भारताचा ब्रिटिशांशी संघर्ष उभा राहिला आणि त्यातून भारतात राष्ट्रवादी विकास पावला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
भारतात वेगवेगळ्या काळात राष्ट्रवादाच्या वेगवेगळ्या व्याख्या अस्तित्वात असलेल्या दिसतात. जसे, शिवपूर्वकाळात परचक्र निरूपण करून यावनी राज्यातील अस्मानी- सुलतानी संकटाचे पुन: पुन्हा वर्णन करून समर्थ रामदासांनी प्रथम लोकांमध्ये परिस्थितीविषयी चिड निर्माण केली. सर्वांच्या समान शत्रुत्वाची जाणीव आणि त्या शत्रूशी दिलेला लढा यातून राष्ट्र निर्माण होते, असा जगाचा इतिहास आहे. म्हणून म्लेंछाविरूध्द शिवाजीने या राष्ट्रभावनेचा उपयोग करून मराठी सत्तेची स्थापना केली. हा एक प्रकारचा राष्ट्रवादच होय. आधुनिक भारतीय राष्ट्रवाद खऱ्या अर्थाने ब्रिटिश काळात जन्माला आला.
भारतात राष्ट्रकल्पना, इतिहास व संस्कृतीच्या आधारावर निर्माण झाली. ब्रिटिश वसाहतवाद्यांनी भारत देश समजून घेताना भारताबद्दलची ज्ञानसामग्री पुढे आणली आणि तिच्या आधारावर ही राष्ट्रकल्पना उभी राहिली. ब्रिटिश काळात इंग्रजी शिकलेला नवा मध्यमवर्गीय बुद्धिजीवी वर्ग निर्माण झाला. हा वर्ग उच्च वर्णातून विशेषता ब्राह्मण जातीतून आला होता. त्याच्यात पाश्चात्य ज्ञान, संस्कृती व ब्राह्मणी परंपरा यांचे एकत्रित अस्तित्व होते. त्यामुळे ब्राह्मणी परंपरा जतन करण्याची इच्छा, सुधारणांची आस या दोन्ही प्रवृत्ती त्याच्या ठायी होत्या. या वर्गाने सुधारणा चळवळीला सुरुवात केली, त्यामुळे ब्राह्मणी जात अस्मितेशी सुसंगत अशा इतिहास व संस्कृतीच्या अधिष्ठानावर भारताच्या राष्ट्रकल्पनेची उभारणी केली म्हणून ही राष्ट्रवादी संकल्पना ब्राह्मणकेंद्री राहिली.
ब्रिटिशांनी भारतीय संस्कृतीला हीन मानले अर्ध रानटी व असंस्कृत मानले, तेव्हा त्यांना प्रतिवाद म्हणून भारतातील उच्चविद्याविभुषित व उच्च वर्णातून आलेला ब्राह्मण मध्यमवर्ग ब्रिटिशांवर तुटून पडला व त्यांनी प्राचीन वैदिक काळाचे दाखले देऊन भारतीय संस्कृतीच्या अवनतीला मुस्लिम काळास जबाबदार धरले. त्यामुळे दादोबा पांडुरंग तर्खडकर, गो. ग. आगरकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, स्वामी दयानंद सरस्वती यांसारखे जहाल समाज सुधारक सुद्धा आर्यांचा वैदिक कालखंड आदर्श कालखंड म्हणून चितारतात व त्याला भारताचा सुवर्णयोग मानून समाजाची पुनर्रचना करण्याचाही प्रयत्न करतात. चिपळूणकर, टिळकांचा आक्रमक ब्राह्मणी राष्ट्रवाद वैदिक संस्कृतीच्या गौरवावर आधारलेला आहे. स्वजातीचा अभिमान जातीव्यवस्था व स्त्री-दास्य आदी वैगुण्याचे सरसकट समर्थन, सांस्कृतिक पुनरुज्जीवनवाद व सुधारणा विरोध ही त्याच्या राष्ट्रवादाची प्रमुख वैशिष्ट्ये होती.
त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची राष्ट्रवादाची व्याख्या म्हणजे, “इंग्रजांना भारतातून हाकलने आणि त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करणे” अशी होती. काँग्रेसमध्ये असलेले बहुसंख्य पुढारी हे उच्च वर्णातून म्हणजे ब्राह्मण वर्गातून आलेले दिसतात. यावरून भारतात कार्यरत असलेल्या राष्ट्रवादाचे ब्राह्मणी स्वरूप स्पष्ट होते. भारतीय राष्ट्र कल्पना आर्यांची ब्राह्मणी वैदिक संस्कृती व प्राचीन हिंदू इतिहास यावर आधारलेली आहे. ती हिंदू इतिहास व संस्कृती यांच्या ठायी सलगता मानते. जैन व बौद्ध यासारख्या धर्माच्या विद्रोहाकडे दुर्लक्ष करते. भारतातील जाती संघर्ष लपवून ब्राह्मण केंद्रीय संस्कृती विचार दृढ करते. ब्राह्मणवादामधून तयार झालेल्या सांस्कृतिक एकतेच्या अधिष्ठानावर राष्ट्रवादाला उभे करते.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लिखाणांमध्ये आर्य-अनार्य संघर्ष प्रधान आहे. दशावताराच्या कथांचा नवा अन्वयार्थ लावून त्यांनी भारतातील सामाजिक संघर्ष विशद केला. आर्य आक्रमकांनी भारतात राहणाऱ्या लोकशाही, समता व देश अभिमान बाळगणाऱ्या क्षत्रिय लोकांवर हल्ला केला. धूर्तपणा, कपट व लबाडीचा अवलंब करून त्यास पराभूत केले. अन्याय- अत्याचार करून त्यांच्यावर विषमता प्रधान जातीव्यवस्था लादली. त्यांना शिक्षण घेण्यास प्रतिबंध करून जातीव्यवस्थेतील नीचतम स्थान मान्य करण्यास बाध्य केले. अशी महात्मा फुलेंनी भारतीय इतिहासाची संगती लावली. महात्मा फुले यांनी आपल्या इतिहास मीमांसेतून ब्राह्मणी इतिहास व संस्कृती मिमांसेच्या आधारांना उध्वस्त केले आणि भारताचा इतिहास हा जाती संघर्षाचा इतिहास आहे. हे त्यांनी बरोबर ओळखले होते, म्हणून उच्चवर्णीय समाजाच्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या जोखडातून सर्वसामान्य मजूर, कामगार, शेतकरी व शोषितांना सोडून त्यांना न्याय मिळवून देणे. हाच महात्मा फुलेंचा खरा राष्ट्रवाद होय आणि हेच त्यांच्या इतिहास लिखाणाचे मूळ सूत्र होय.
पुढील काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंचे हे तत्व अधिक दृढ केले व स्त्री, कामगार, दलित व आदिवासी जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहात आणणे व राजकीय सत्तेत सहभागी करून घेणे, हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद आहे. राष्ट्र म्हटले तर एक समाज, एका भूप्रदेशात राहणारा, एक संस्कृती असणारा, एक भाषा बोलणारा जनसमूह होय आणि असे असेल तर, भारतात अनेक भाषा बोलणारे, अनेक धर्माचे, अनेक संस्कृती असणारे, अनेक जाती गटाचे लोक एक राष्ट्र कसे असू शकतात ? आणि त्यांच्यात राष्ट्रवाद कसा निर्माण होऊ शकतो ? “भारताच्या बाबत राष्ट्रवाद म्हणजे अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक संस्कृती आणि अनेक जाती- धर्म असूनही या विविधतेतही एकता असणे किंवा आपण एक आहोत ही भावना निर्माण होणे म्हणजे राष्ट्रवाद होय”.
महात्मा फुले यांच्या मते, राष्ट्र म्हणजे “एकमय लोक” अशी त्यांची राष्ट्राची व्याख्या होती. वर्ण जाती व्यवस्थेचा अंत ही राष्ट्रवादाची पूर्व अट अशी धारणा होती. त्यावरून “या बळीस्थानातील एकंदर शूद्रातिशुद्रासह भिल्ल, कोळी वगैरे सर्व लोक विद्वान होऊन विचार करण्यालायक होईतोपावेतो ते सर्व सारखे एकमय झाल्याशिवाय (Nation) होऊ शकत नाही”. जाती समाज टिकवण्यासाठी ब्राह्मणवाद, सांस्कृतिक एकता निर्माण करत होता, त्याचप्रमाणे जाती संस्था नष्ट करण्यासाठी अब्राहमणी प्रतिसंस्कृती आकार घेत होती. ब्राह्मणवादातून निर्माण होणाऱ्या समाजद्रोही, सांस्कृतिक एकतेला छेद देऊन संपूर्ण भारतामध्ये सामाजिक, सांस्कृतिक एकता प्रस्थापित करत होती. महात्मा फुले यांनी जातीव्यवस्थेविरोधातला संघर्ष विशद केला आहे. “आर्यांच्या आक्रमणापासून हा संघर्ष सुरू झाला. बळीपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत हा संघर्ष सुरू आहे. बुद्ध, सांख्यमताचे प्रवक्ते कपिल, वारकरी संप्रदायातील संत तुकाराम यांनी ब्राह्मणी वर्चस्व व जातीव्यवस्थेविरुद्ध हा संघर्ष हिरीरीने जारी ठेवला”. महात्मा फुले यांनी जाती संघर्षाची संस्कृती व परंपरा अब्राहमणी राष्ट्रवादाची अधिष्ठाती संस्कृती मानली आहे. जाती संघर्षाच्या इतिहासाचा गौरव, जाती संघर्षाच्या संस्कृतीतून येणाऱ्या मूल्य धारणा व जाती संघर्षाच्या संस्कृती विस्तारातून येणारी सांस्कृतिक एकता या आधारावर महात्मा फुले राष्ट्रवादाची उभारणी करतात.
बळी व बळीच्या सरदारांनी ब्राह्मणी परंपरेशी संघर्ष करताना दाखवलेले विरत्व व देशभिमान यांचा गौरव करून देशाभिमानाची प्रेरणा देतात. राष्ट्र उभारणी करण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि लोकशाही राज्यपद्धती यांची आवश्यकता असते. हे ओळखून महात्मा फुले बळीच्या इतिहासातून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि लोकशाही राज्यपद्धतीचा आदर्श उभा करून, राष्ट्र सन्मानाला आवश्यक असणाऱ्या मूल्यधारणा समाजात बिंबविण्याचा प्रयत्न करतात. बळीच्या राज्याचे शूद्रातीशुद्रांच्या संस्कृती व्यवहारात असलेले वेगळे संदर्भ गोळा करून त्याला ऐतिहासिक नवे अन्वयार्थ देऊन शूद्रातीशूद्रामधील जातीव्यवस्था विरोधी सांस्कृतिक ऐक्य अधोरेखित करतात व सांस्कृतिक एकत्वाच्या आधारावर बळीस्थानाच्या राष्ट्रवादाची उभारणी करतात.
महात्मा फुले यांनी आपल्या ‘शेतकऱ्याच्या आसूड‘ ग्रंथामधील ब्रिटिश सरकारवरची टीका इतकी कडक होती की, महात्मा फुले यांचे शिष्य नारायण मेघाजी लोखंडे यांनी शेतकऱ्याच्या आसूडची दोन प्रकरणे छापल्यावर राहिलेली प्रकरणे छापण्यास नकार दिला होता. महात्मा फुले ब्रिटिशांच्या शोषणाचे विश्लेषण करताना म्हणतात, “ब्रिटिश सरकार मुक्त व्यापार धोरणातून शेतसारा जुलमी पद्धतीने वाढवून नवनवे कर बसून भांडवल गुंतवणुकीतून पगारदारांचा पगार व पेन्शन वरील खर्चामार्फत शेतकऱ्यांचे शोषण करते. हे त्यांनी नजरेस आणून दिले व ब्रिटिश वसाहतवाद विरोधी आर्थिक राष्ट्रवादाला बळकटी दिली. महात्मा फुले सरकारला बजावतात की, ब्राह्मणी मध्यमवर्गीयांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा त्याचे भयानक परिणाम होतील”.
शेतकरी बंड करून उठतील अशी सूचना ते सरकारला देतात.
याशिवाय ते आपल्या “ब्राह्मणांचे कसब” या ग्रंथातून ब्राह्मणशाहीचे शोषक स्वरूप मार्मिकपणे रेखाटतात. ब्राह्मणांनी केलेल्या शोषण व दमनाची हकीकत लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना ब्राह्मणशाहीविरुद्ध उभे करतात. “ब्रिटिश सरकारची दुय्यम स्तरावरची ब्राह्मणी नोकरशाही शेतकऱ्यांना लुटण्याचे निरनिराळे मार्ग अवलंबते” असे ते म्हणतात.
महात्मा फुले यांनी निर्माण केलेल्या ‘सत्यशोधक समाजा‘ने स्पृश्य-अस्पृश्य भेदावर व अज्ञानावर टीका केली आहे. महात्मा फुले (1827 ते 1890) या काळातले बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. त्यांनी वर्ण व्यवस्थेवर हल्ला चढविला. अज्ञान, दारिद्र्य यापासून समाजाला वाचवले पाहिजे, त्यासाठी शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, अस्पृश्यांच्या दुःखाना वाचा फोडण्याचे काम केले. आपल्या या कामात पूरक ठरणाऱ्या विचारांना लेखनबद्ध केले. त्यातूनच त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, जातीभेद विवेकसार, सार्वजनिक सत्यधर्म, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा इत्यादी ग्रंथ तर तृतीय रत्न या सारखे नाटक, अखंड सारखे महत्वपूर्ण काव्य लिहिले. हे फक्त लिखाण नाही तर ब्राह्मण शाही विरुद्ध निर्माण झालेली प्रतिसंस्कृती होय. अर्थात यातूनच त्यांनी आपला राष्ट्रवादही प्रतिपादित केला.