Home जीवनसार “दिसणं” महत्वाचं आहेच.. पण “असणं” लाख मोलाचं

“दिसणं” महत्वाचं आहेच.. पण “असणं” लाख मोलाचं

0
“दिसणं” महत्वाचं आहेच.. पण “असणं” लाख मोलाचं

“दिसणं” महत्वाचं आहेच.. पण “असणं” लाख मोलाचं

एकदा खूप महिन्यांनंतर एका मित्राच्या घरी गेलो होतो. मस्तं गप्पा टप्पा आणि चहाचा रतीब चालू होता. तितक्यात आतल्या खोलीतून मित्राची आजी बाहेर आली. खूप आस्थेने त्यांनी माझी, घरच्यांची चौकशी केली आणि मग “चालू दे तुमचं” म्हणून त्या परत आत गेल्या. थोड्या वेळाने मी निघालो. बाहेरूनच आजींना हाक मारली.. “आजी, निघतो मी”. आजी बाहेर आल्या. मी त्यांच्या पाया पडलो. प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेऊन म्हणाल्या..”खूप दिवसांनी आलास. येत जा हो अधूनमधून. दिसंत राहावं बाबा..बरं वाटतं”

खरंच.. किती महत्त्वाचं असतं “असणं आणि दिसत राहाणं”…

आपल्या आयुष्यात अनेकजण येऊन जातात. कमी अधिक प्रमाणात तरंग उमटवून जातात.. आपले ठसे मागे सोडून जातात.. काळाच्या ओघात काही ठसे पुसट होत जातात तर काही गहिरे रंग ठेवून जातात. या प्रवासात अनेक नाती, हृणानुबंध जपलेले असतात. सगळ्याच नात्यांना नावं नाही देता येत. मग त्याला आपण मित्र किंवा मैत्रीण म्हणतो. त्यांचं असणं हा एक मोठा दिलासा असतो. एकाच वस्तीत राहूनही दिवस दिवस भेटू न शकणारे सुहृदही असतातच की.. पण ते आहेत.. नुसते जिवंत आहेत असं नव्हे तर आपल्या मैत्रीत आहेत ही भावनाही सुखावह असते. ते “असणं” खूप महत्वाचं पण ते “असणंपण” टिकवणं हे सर्वात महत्वाचं.

माझा खूप जवळचा एक मित्र आम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना त्याच्या घरी जेवणाचा जर काही खास बेत असेल तर माझ्या घरी बोलवायला यायचा. “अरे शेखर, आईने स्पेशल डिश केल्ये आज. दुपारी जेवायला आमच्या घरी ये”. फोन नव्हते तेंव्हा घरोघरी. त्याच्याबरोबर डबा पाठवणंही शक्य असायचं. पण घरी खास बेत असताना पंक्तीला जिवाभावाचा मित्र हवा ही भावना मोठी. ते “असणंपण” टिकवणारी…

आयुष्य पुढे जात राहातं.. क्षितिजं रुंदावतात, आपापले संसार सुरू होतात.. वाढतात.. आणि लहानपणी जे असण्याबरोबर दिसणं असायचं ते दुरापास्तं होऊ लागतं. जगण्याच्या गर्दीत सो कॉल्ड अनुभवाची पुटं चढतात मनावर.. बुध्दीवर.. संवेदना निबर होऊ लागतात आणि इच्छा असो वा नसो “दिसणं” कमी होऊ लागतं. वय वाढल्यावर दिसणं तसही कमीच होऊ लागतं म्हणा.. एकच दिलासा असतो.. तो किंवा ती आहे याचा…

तसे मित्र मैत्रिणी पुष्कळ असतात. सध्याच्या सोशल मिडियाच्या जमान्यात तर फारच.. पण शब्दांच्या पलिकडे जाऊन हृणानुबंध जपणारे फारच थोडे.. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.. काही प्रत्यक्षातले तर काही आठवणीतले. काही जवळ असलेले तर काही दुरावलेले. काही खांद्यावर हात ठेवून शेजारीच उभे असलेले तर काही पापण्यांच्या कडांवरचे
मित्रमैत्रिणी…

“दिसणं” महत्वाचं आहेच.. पण “असणं” लाख मोलाचं,,,,,,,,!!!!!!!!!!!!!