ब्रम्हदेशाची राजकुमारी – ड्राइव्हरच्या प्रेमात गाठली रत्नागिरी

-

ब्रम्हदेशाची राजकुमारी – ड्राइव्हरच्या प्रेमात गाठली रत्नागिरी

प्रा डॉ सतीश कदम

- Advertisement -

प्रेम आंधळे असते. ठीक आहे, परंतु आंधळेपणाने प्रेमात पडल्यानंतर काय होते याची विदारक कथा पाहिल्यानंतर याला फक्त नशिबाचा भोग म्हणता येईल. ही दर्दनाक कथा आहे, बर्मा उर्फ ब्रम्हदेश अर्थातच आजच्या म्यानमारचा शेवटचा राजा थिबाच्या लेकीची. स्वातंत्र्यआंदोलनात लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात ठेवले, आझाद हिंद सेना रंगूनपर्यंत पोहोचली अशी वाक्ये खूप वाचली आहेत. हे मंडाले म्हणजे ब्रम्हदेशाची राजधानी, ज्याठिकाणी कोनबोंग घराण्याचा राजा मिंडॉन कारभार करत होता. मिंडॉनला 63 बायका आणि 45 मुले होती. पैकी मिंडॉनची शिंबुमिशन नावाची पत्नी अति महत्वाकांक्षी असून तिला सुपायागली, सुपायालत आणि सुपायागी अशा तीन मुली असून थिबा नावाचा सावत्र मुलगा होता. 1859 ला जन्मलेला थिबा अभ्यासू, धार्मिक वृत्तीचा आणि मोठा सोशीक होता. मिंडॉनराजा आजारी पडला तेव्हा शिंबुमिशनने एक घातकी योजना आखून आपल्या सर्व कुटुंबाची हत्या करून थिबा नावाच्या सावत्र मुलासोबत आपल्या तिन्ही मुलींचे लग्न लावून दिले.

ठरल्यानुसार शिंबुमिशनने वयाच्या 19 व्यावर्षी म्हणजे 1878 ला थिबाला ब्रम्हदेशाच्या गादीवर बसविले. आई से बेटी सवाई या वाक्यानुसार शिंबुची दुसर्या् क्रमांकाची मुलगी सुपायालत आईपेक्षा जास्तच महत्वाकांक्षी असून आईला हद्दपार करत ती ब्रम्हदेशाची राजमाता झाली. इंग्रज राजवटीमुळे थिबासमोर अनेक आव्हाने असून देशाची आर्थिक व्यवस्था बिकट झालेली होती. भारतातील कापूस, मसाल्याच्या पदार्थाप्रमाणेच ब्रम्हदेशातून सागवाण लाकूड मोठ्या प्रमाणावर इंग्लडला जात होते. अशावेळी देशाची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून थिबाने फ्रेंचांची मदत घेण्यास सुरुवात करताच गव्हर्नर जनरल डफरीनने राजा थिबाला अटक करून भारतात पाठविण्याचा निर्णय घेतला. यावेळी पहिली पत्नी सुपायागी त्याचठिकाणी राहिली तर दुसरी पत्नी सुपायालतला फायगी आणि फायालत अशा दोन मुली असून तिसर्याावेळी ती गरोदर होती. अशावेळी 1886 साली इंग्रजांनी राजा थिबाला प्रथम मद्रास नंतर धरणगाव आणि शेवटी रत्नागिरीला हलविले. कधीकाळी मंडालेच्या अलिशान महालात राहणारा थिबा आपल्या कुटुंबकबिल्यासह रत्नागिरीच्या तुरुंगवासात अडकला. रत्नागिरीत थिबाची शाही बडदास्त होती, एक लाख रुपये पेंशन आणि मुळची संपत्ति सोबत असल्याने अलिशान राहणे होते. तरीही थिबामात्र वारंवार परत जाण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा थिबाला खुश करण्यासाठी इंग्रजांनी 1910 साली रत्नागिरीत 27 एकर जागेत 1, 37000 हजार रुपये खर्चून 24 खोल्यांचा ब्राम्ही शैलीतील भव्य राजवाडा बांधला. या राजवाड्याला थिबा पॅलेस म्हटले जाते. त्यासाठी गाड्या, नोकरचाकर अशी बडदास्त ठेवण्यात आली. भारतात आल्यानंतर थिबाला आणखी दोन मुली आणि एक मुलगा झाला. मुलगा लवकरच दगावला. तर आशिन हितेक सू म्यात फायगी, फायलात, फया आणि फयागली अशा चार मुली आणि सुपायलगी आणि सुपायलात या दोन पत्नीसह थिबा रत्नागिरीत कायमचा जेरबंद झाला. सोन्याची पिकदानी, शाही थाट, लोकांना रोख स्वरुपात बक्षीस देणे अशा राजेशाही थाटात जीवन जगणार्याद थिबाचे मुलांच्या शिक्षणाकडेमात्र दुर्लक्ष झाले.

1880 ला जन्मलेली थिबाची सर्वात मोठी मुलगी फायगी भारतात आली त्यावेळी जेमतेम पाच सहा वर्षाची होती. तिला उमजायला लागल्यापासून घराण्याची धावपळ, इंग्रजांचा फेरा यामुळे काही प्रमाणात ऐश्वर्य असलेतरी बाह्य जगाची तिला फारसी कल्पना नव्हती. त्यामुळे रत्नागिरीतील महालात रहात असताना फायगी घरगडी आणि गाडीचा ड्रायव्हर असणार्‍या गोपाळ भाऊराव सावंतच्या प्रेमात अडकली. गोपाळ अगोदरच दोन मुलांचा दादला होता. परंतु प्रेम हे आंधळे असते आणि ते करणारे काहीजण कसे मूर्ख असतात याचे हे उत्तम उदाहरण होते. समाजाला काही समजायच्या आत अनुभवी गोपाळकडून फायगी गरोदर राहिली. अगोदरच नशिबाच्या फेर्याीत अडकलेल्या थिबाला पोरीच्या लग्नाला मुकसंमती देण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांनी गोपाळला स्वीकारले. त्यामुळे फायगी आणि गोपाळ यांनी टु टू नावाच्या मुलीला जन्म दिला.

बरेच प्रयत्न करूनही थिबाला मायदेशी जाता येईन तेव्हा तोही हताश झाला होता. इंग्रजाकडून मिळणारी पेंशनची रक्कमही कमी झाली होती. ऐशोरामाची सवय लागलेल्या थिबाने आपल्याकडील एक एक करून किंमती वस्तू विकायला सुरुवात केली. त्यातच 1912 साली थिबाची दुसरी पत्नी सुपायागलीचे निधन झाले. पुढे चार वर्षांनी म्हणजे 1916 साली राजा थिबानेही या जगाचा निरोप घेतला. जीवंतपणी मायदेशी जाण्याचे स्वप्न बाळगलेल्या थिबाच्या अस्थिलाही ते सत्यात उतरविता आले नाही. नानाविध प्रयत्न करूनही त्याच्या कुटुंबाला थिबाचा अतिमसंस्कार म्यानमारमध्ये व्हावा हे शक्य झाले नाही. वीर पुरुषांची स्मारके पुढे बोलायला लागतात आणि त्यातूनच क्रांति घडते याची जाणीव असणार्यार इंग्रजांनी 1875 च्या उठावात भाग घेतला म्हणून मोगलांचा शेवटचा बादशहा बहादुरशाहा जफरला म्यानमारमध्ये ठेवले तर थिबाला भारतात ठेवले. रत्नागिरीच्या शिवाजीनगर भागात थिबाची समाधी बांधण्यात आली.

राजा गेला, क्रांति होण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून इंग्रजांनी थिबाच्या कुटुंबाला मायदेशी जाण्याची परवानगी दिली. तेव्हा थिबाची एक पत्नी सुपायालत व फायगीसह तिन्ही मुली म्यानमारला गेल्या. फायगी आपली मुलगी टुटूसह तेथे रहायला लागली तर इतर दोघींनी अशाच सुमार लोकांसोबत मात्र जातीतच लग्ने केली. फायगीला जातीबाहेर लग्न केल्याची किंमत मोजावी लागली. बर्मी लोकांनी तिला अजिबात स्विकारले नाही. तर राजकन्या असणारी पत्नी दूर गेल्याने गोपाळला दारूचे व्यसन लागले. त्यातून त्यांनीही फायगीला परत येण्याची विनंती केल्याने टुटूसह ती परत आली. रत्नागिरीत परतलेल्या फायगीला गोपाळने रस्त्यावर आणले. अत्यंत हालखीच्या परिस्थितीत 1947 ला फायगीनेही जगाचा निरोप घेतला. तेव्हा तिथल्या कलेक्टरने वर्गणी जमा करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. सावत्र आई आणि वडीलांच्या बाजूला या अभागीची छोटीशी समाधी बांधली गेली. आईप्रमाणेच टुटूनेही शंकर पवारनामक मेकॅनिकसोबत लग्न केले. टुटूच्या नशिबी गरीबी आली तरी धीर न सोडता कागदी फुले बनविणे, गोधड्या शिवणे, गोवर्याा विकून अकरा मुलांना वाढविले. देव गरिबांना खूप आयुष्य देतो. 2000 ला वयाच्या 94 व्यावर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे मागे मालती मोरे, विलास पवारसह अनेक वारसदार हयात आहेत. यात कुणाची काय चूक ? अत्यंत धार्मिक वृत्तीच्या थिबाला मनात नसतानाही नशिबाने राजा बनविले. राजपद त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी नरक बनले. 2016 साली म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षासह थिबाचे वंशज रत्नागिरीला येऊन गेले. शंभरएक वर्षांनातरही थिबाच्या अस्थिच नाहीतर आठवणीही रत्नागिरीत कायम आहेत. मुलगी फायगी आणि नात टुटूला राजघराण्यात जन्माला येण्याचा काय फायदा झाला. फायगीला कर्माने तर टुटूला नशिबाने धोका दिला. गरिबीत चॉइसला वाव नसतो. म्हणून दिसेल त्या रस्त्याने त्या गेल्या, माहित नव्हते कुठं जाणार आहोत. कारण नशीब त्यांच्यासोबत नव्हते. अशा अभागींना नशीब सोडून गेले की, दारिद्र्य जवळ करते. काळाला उत्तर नाही हेच खरे.

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

खोके संस्कृतीने देशप्रेम आणि पक्षनिष्ठा ह्या आणखी धुळीस मिळतील याबद्दल आपणास काय वाटते?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें