- सुनिल सांगळे
या देशाच्या मध्यम वर्गाइतका कृतघ्न वर्ग जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही. मी विशेषतः आज जो मध्यमवर्ग ५० ते ८५ वयोगटात आहे आणि २०१४ पासून या सात-आठ वर्षांत बिनडोक माणसाप्रमाणे बिनबोभाटपणे बोंबलतोय, की मागील ७० वर्षांत कुठलीच प्रगती झालेली नाही. होय, स्वतःच्या धडावर दुसऱ्याच्या डोक्याचे रोपण केलेल्या त्या कृतघ्न बिनडोक माणसाबद्दबद्दलच बोलतोय मी. माझा जन्म स्वातंत्र्योत्तर काळात झालेला आहे. त्यामुळे गांधी – नेहरू – पटेल वगैरेंच्या दैवतीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही माझ्या पाहण्यात मागील ६४ वर्षात देशाने जी प्रगती केली, ती आहे ( २०१४ पूर्वी ). ती या ५० ते ८५ वयोगटातील लोकांना न दिसण्याएवढे आणि न समजण्याएवढे हे आंधळे आणि मंदबुद्धी का झालेत? काही उदाहरणे पाहू.
अन्नधान्याची टंचाई मी माझ्या लहानपणी पाहिलीय. रेशन दुकानात मिळणारा वाईट प्रतीचा गहू-तांदूळ मला थोडाफार आठवतोय. पुढे देशातील हरित क्रांतीबद्दल वाचले. नेहरुजींच्या काळात भाक्रा – नानगल सारखी प्रचंड धरणे आणि आपल्या कोयना प्रकल्पासारखी शेकडो धरणे राज्या-राज्यांत उभारली गेली. सुधारित बियाणे, खतांचा वापर, सिंचन व्यवस्था यातून देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.
पुढे वाचनात आले, की स्वातंत्र्यप्राप्तीच्या केवळ पाच वर्षांपूर्वी बंगालमध्ये ( आजचा बांगलादेश धरून ) २० लाख ते ३८ लाख लोक दुष्काळात मृत्युमुखी पडले. विश्वास बसत नाही. पण २० ते ३८ लाख लोक! ही स्थिती होती देशाची स्वातंत्र्य मिळताना. १९४७ नंतरच्या काळात ही परिस्थिती कधीच का आली नाही? ह्या गोष्टीची माहिती आजच्या मध्यम वर्गातील वयस्कर लोकांना असेल तर त्यांनी ती त्यांच्या नव्या पिढीला सांगू नये? आणि नसेल, तर त्यांच्या डोक्यात पवित्र शेण भरलंय असं म्हणावं का?
तीच गोष्ट नेहरू आणि कुरियन यांच्या श्वेत क्रांतीची! १९६० व १९७० च्या दशकातही खिशात पैसे असले, तरीही दूध बाजारात विकत मिळत नसे हे सांगितले, तर नवीन पिढीला धक्का बसेल. मुंबईत शासकीय दुग्ध योजनेचे स्टॉल असायचे ज्यात दूध मिळायचे. ते मिळण्यासाठी एक कार्ड दिले जायचे आणि त्यात कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार किती बाटल्या दूध मिळेल ते नमूद केलेले असायचे. कारण त्या स्टॉलवर रांगा लावून दूध आणावे लागे. ऑपरेशन फ्लड किंवा श्वेतक्रांतीनंतर ही परिस्थिती संपली आणि आज त्या टंचाईच्या गोष्टींवर विश्वास बसत नाही अशी परिस्थिती आहे. ही गोष्ट मध्यम वर्गातील जेष्ठ नागरिकांना माहीत नाही असं म्हणावं का? त्यांचा स्मृतिभ्रंश झालाय की निव्वळ मुस्लिम विरोधाने हा वर्ग आंधळा आणि मंदबुद्धी होऊन मागील ७० वर्षात काहीच झालेले नाही असे म्हणतोय?
इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. त्या आधी केवळ शहरात आणि फक्त श्रीमंत लोकांसाठी असलेल्या बँकांना लाखोंच्या संख्येत भारतभर ग्रामीण भागात शाखा उघडायला भाग पाडले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनीही बँका कर्जे देऊ लागल्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बदलली. ही गोष्ट तर शहरी अर्धवटरावांना माहीत असण्याची शक्यताच नाही.
राजीव गांधी आणि दूरसंचार क्रांतीच्या आधीची गोष्ट तर फार जुनी नाही. त्यावेळी लँडलाईनसाठी महिनो-महिन्यांची वेटिंग लिस्ट असायची. दुसऱ्या शहरात बोलायचे असेल तर ट्रँक कॉल लावून अनेक तास वाट पाहायला लागायची. सॅम पित्रोदासारखा बुद्धिमान माणूस राजीव गांधींच्या शब्दाखातर एक रुपया पगारावर काम करण्यासाठी भारतात परत आला आणि पुढे जे झाले ते सर्वांना माहीत आहे.
राजीव यांनी संगणक क्रांतीची सुरवात केली तेव्हा आजच्या सत्ताधाऱ्यांचेच पूर्वज संगणकामुळे नोकऱ्या जातील असे ओरडत होते. आज तोच संगणक बीपीओ, कॉल सेंटर इत्यादींच्या रूपाने करोडो लोकांना नोकऱ्या देतोय. घरोघरी, कार्यालयात, बँकेत आज संगणक नाही किंवा बँकेत एटीएम नाही अशी कल्पनाही आपण करू शकत नाही. ह्या गोष्टी आज ५० वर वय असलेल्या लोकांना माहिती नाहीत?
नरसिंह राव व नंतर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना सगळी जुनी व्यवस्था टाकून जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे धोरण राबविण्यात आले. परमिट राज संपले, आयात – निर्यातीवरील बंधने खूप कमी झाली. याचा जबरदस्त फायदा व्यापारी आणि उद्योजकांना झाला, तसाच मध्यम वर्गालाही झाला. देशाची जी सात ते नऊ टक्क्याने जीडीपी वाढीची अनेक वर्षे प्रगती झाली, त्याची फळे आजही आपण चाखतो आहोत. जो मध्यम वर्ग सायकलही घेऊ शकत नसे, तो नंतरच्या काळात स्कूटर आणि चारचाकी गाड्या घेऊ लागला. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था जेव्हा अमेरिकेतील सब-प्राईम क्रायसिसमुळे संकटात सापडली होती तेव्हा मनमोहन सिंग यांनी एकट्या भारताला त्याची झळ बसू दिली नाही आणि त्याचे कौतुक जगभर झाले. या गोष्टीची किती लोकांना आठवण आहे? मुळात ही गोष्ट माहीत तरी आहे का? कारण ह्या गोष्टी म्हणजे इकडे झेंडे लाव, तिकडे बुलडोझर फिरव अशा सहज समजण्यासारख्या नाहीत. अर्थतज्ज्ञ प्रधानमंत्री लाभायलाही नशीब लागते.
ह्या प्रधानमंत्र्यांमध्ये दोष नव्हते, असे नाही. त्यांनी आयुष्यात काहीच चुका केल्या नसतील, असेही नाही. पण त्यांनी ज्या काही थोड्याफार चुका केल्या असतील त्यापुढे त्यांनी देशासाठी जे केले त्याची यादी प्रचंड मोठी आहे. उदाहरणच द्यायचे तर नेहरूंच्या १९२० ते १९६४ एवढ्या प्रदीर्घ कारकीर्दीत चीन आणि कश्मीर या दोन गोष्टींबद्दलच टीका होऊ शकते आणि त्यावरही भरपूर प्रतिवाद करता येईल असे साहित्य आहे.
इंदिराजींच्या आणीबाणीविषयी टीका होऊ शकते. पण तेव्हा आयकॉन झालेले जॉर्ज फर्नांडिस डायनामाईट लावून रेल्वे उडवायचे कट करत होते आणि आज ते तसे करत असते, तर एनएसए कायद्याखाली जन्मभर तुरुंगात सडत पडले असते, हेही लक्षात ठेवले पाहिजे. आणि अशा लोकांबद्दल अत्यंत वाईट भाषेत बोलतात कोण? एक तर तरुण पिढी, ज्या पिढीला या गोष्टींची माहितीच नाही. एसएससी पास होण्याची लायकी आहे की नाही अशी शंका ज्यांच्याबद्दल यायची, असे लोक आज गांधी – नेहरूंबद्दल वाईट भाषा वापरतात, तेव्हा खरे तर त्यांची कीव येते.
या मध्यमवर्गातील करोडोंची संख्या असलेला मोठा वर्ग केंद्र सरकार, राज्य सरकारे, बँक, इन्शुरन्स कंपन्या, ७० वर्षात औद्योगिकरणामध्ये उभ्या राहिलेल्या हजारो कंपन्या, फॅक्टऱ्या इत्यादींमध्ये नोकऱ्या करून सुस्थितीत आला. नेहरूंनी समाजवादी धोरणे राबविताना केलेल्या कायद्यांनीच आज तो वर्ग पेन्शन, ग्रॅच्युइटी, लिव्ह एन्कॅशमेंट इत्यादी फायदे घेऊन घरी आरामात बसलाय. त्यांचीच पुढील पिढी त्याच नेहरूंनी किंवा काँग्रेस सरकारांनीही स्थापन केलेल्या वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी शिक्षणसंस्थामध्ये शिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्या मिळवून सुस्थितीत आली. आणि ही नवीन पिढीदेखील त्याच नेहरू – गांधींना त्यांच्याचमुळे हातात आलेल्या संगणकावर किंवा मोबाईल फोनवर शिव्या टाईप करत असते.
त्यातील उच्चवर्गीय चिन्मय, तन्मय वगैरे अनेक लोक तर नेहरूंच्याच आयआयटी आणि आयआयएम मध्ये शिकून देशसेवा करायला परदेशी निघून गेले आणि तिथून ते नेहरू – गांधींनाच शिव्या देण्याचे पुण्यकर्म करत असतात.
जगभर कोठेही आपल्याच महान नेत्यांना पोटभर शिव्या घालण्याचे काम जर कोणता सुशिक्षित मध्यम वर्ग करत असेल, तर तो भारतातीलच असावा. अमेरिकेत अब्राहम लिंकन, आफ्रिकेत नेल्सन मंडेला आदी महान नेत्यांना एवढ्या विषारी टीकेला सामोरे जावे लागत असेल, असे वाटत नाही. या मध्यम वर्गीय मानसिकतेचे कारण काय असावे? केवळ विरोधातील प्रभावी प्रचारतंत्र हेच कारण असेल तर मग या मध्यमवर्गाने जे काही थोडेफार शिक्षण घेतले किंवा उच्च शिक्षण घेतले त्याचा फायदा काय झाला? Give the devil his due असे इंग्रजीत सैतानांबद्दलही म्हटले जाते. इथे तर ज्यांनी देशाचे भाग्य आपल्या परीने घडवायचा प्रयत्न केला त्यांना अनेक लोकांकडून केवळ आणि केवळ शिव्या-शाप का मिळावेत? एवढे कृतघ्न लोक या देशातील सुशिक्षित मध्यम वर्गात का असावेत? काही उत्तर आहे?
सूचना -सदरील लेखात लेखकाचे व्यक्तिगत मत आहे…