नेहरू भारताचे भाग्यविधाते
डॉ मल्हार शिंदे
www.janvicharnews.com
आधुनिक भारताच्या इतिहासात दोन व्यक्तिमत्त्व असे आहेत ज्यांच्याबद्दल जितकं चांगलं बोललं गेलं , तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त वाईट बोललं गेलं. ती दोन व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू. या दोघांना लोकांचं जेवढं प्रेम मिळालं, तेवढीच टीकाही त्यांच्या वाटयाला आली. देशाचे पहिले पंतप्रधान असलेल्या युगपुरुष पंडित नेहरूंचा आज स्मृतिदिन. भारतात स्वातंत्रपूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर ही नेहरूंचे कर्तृत्व नव्या भारताला दिशा देणारेच होते . परंतु आज नव्या पिढीसमोर जाणूनबुजून नेहरूंचे कपोकल्पित आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व काही पक्ष आणि संघटनांकडून सादर केले जाते. नेहरू कसे स्त्रीलंपट होते इथपासून ते त्यांनी पटेलांवर कसा अन्याय केला, तेच कसे फाळणीला जबाबदार होते, काश्मीर प्रश्नापासून ते नेहरू मुसलमान होते इथपर्यंत त्यांच्यावर घाणेरडे आरोप केले जात आहेत.
www.janvicharnews.com
नेहरूंना जाऊन सहा दशके होत आली. तरीही भारताच्या राजकारणात अजूनही नेहरूच केंद्रस्थानी आहेत. ‘मेरे बाद जवाहर मेरी भाषा बोलेंग’ असे म्हणून गांधींनी नेहरूंना वारसदार म्हणून निवडले होते. देश स्वतंत्र झाला त्यावेळी नेहरू 58 वर्षांचे होते तर सरदार पटेल 72 वर्षांचे होते. (सरदार पटेलांना आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी होत्या. तसेच पटेलांना अगोदर दोन वेळा हृदय विकाराचे झटके येऊन गेले होते.) कॉंग्ग्रेसच्या मतदान प्रक्रियेतसुद्धा नेहरूंपेक्षा पटेलांनाच पंतप्रधान म्हणून पसंती होती. ऐनवेळी गांधींनी सरदार पटेलांना माघार घ्यायला लावली अन नेहरू पंतप्रधान झाले. हा इतिहास सर्वाना माहिती आहे. परंतु सध्या याच इतिहासाची तोडफोड करून खोटा इतिहास सांगितला जात आहे. सरदार पटेल स्वातंत्र्यनंतर केवळ तीनच वर्षात गेले होते. प्रकृती साथ देत नसताना नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाचं नेतृत्व सरदार पटेलांकडे देणं त्यावेळी गांधीं सारख्या तीन दशके स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केलेल्या नेत्याला कदाचित योग्य वाटले नसेल ,आणि म्हणूनच त्यावेळी नेहरूंची निवड त्यांनी केली असावी असा अंदाज आपण बांधू शकतो.
www.janvicharnews.com
नेहरूंच्या निवडीमागे गांधींना नेहरूंबद्दल प्रेम वगैरे होते असा समज करून घेणं चुकीचं ठरेल. कारण नेहरूंच्या अगोदर पासूनच सरदार बारडोली सत्याग्रहापासून गांधींसोबत होते. शिवाय गांधी आणि सरदार दोघेही गुजरात मधून येत असल्यामुळे त्यांच्यात ऋनानुबंध होतेच. तेंव्हा नेहरू गांधींचे आवडते होते हा मुद्दा गौण ठरतो. गांधींच्या स्वप्नातील भारताला आकार देणारे,स्वप्नदर्शी नेहरू सलग सतरा वर्षे देशाचे पंतप्रधान होते. या सतरा वर्षात नेहरूंच्या नेतृत्वाला आव्हान देणारे काँग्रेसमधे तर कोणी नव्हतेच शिवाय विरोधी पक्षात देखील कोणी नव्हते. सध्या सरदार पटेल यांना नेहरूंचा प्रतिस्पर्धी म्हणून सांगितले जाते,तशा कथित कहाण्याही रंगवून सांगितल्या जातात. परंतु या कथित कहाण्यातील फोलपणा सरदार पटेलांच्या तत्कालीन पत्रव्यवहारा वरून दिसून येतो. स्वतः सरदार पटेल नेहरूंना आपला आणि देशाचा नेता मानत होते.
www.janvicharnews.com
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुद्दे तर अनेक होते, परंतु विकास या मुद्द्यासोबतच नेहरू हा या व्यक्तिमत्वाला केंद्रस्थानी ठेवून भाजपाने निवडणूक लढवली. सरदार पटेलांवर कसा अन्याय झाला, याच्या कथित कहाण्या रचून जणू सरदार पटेल जनसंघाचेच होते की काय असे वाटण्या पर्यंत भाजपा पटेलांची बाजू घेऊन (जिवंत नसलेल्या) नेहरूंवर वार करत होते. 2014 पासून नेहरूंना ऐतिहासिक खलनायक बनवण्यासाठी कसोशीने सुरू केलेले प्रयत्न आजही सुरूच आहेत. दुर्दैव असे की व्हाट्स अप विद्यापीठातून तयार झालेली नवी पिढी सत्यता तपासून घेत नसल्यामुळे आज भारतातील प्रत्येक प्रश्नाला नेहरूच कसे जबाबदार आहे या भाकड कथांवर या पिढीचा लगेच विश्वास बसतो. मग तो प्रश्न काश्मीर चा असो की चीन चा असो. नेहरूंच्या हिमालया एवढ्या व्यक्तिमत्वाला आजही काश्मीर आणि चीनच्या चुकांमधेच मोजले जाते हे दुर्दैवी आहे. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलेल्या एका दरिद्री, निरक्षर देशाचं नेतृत्व करणं सोपी गोष्ट नव्हती. असंख्य प्रश्न होते. गरिबी, बेरोजगारी, दारिद्र्य, नवजात लोकशाही टिकवण्याची जबाबदारी, स्वतंत्र भारतात सामील झालेल्या संस्थानांचे मन राखणे, औद्योगिकीकरण करणे,प्रशासकीय सेवांची नव्याने रचना करणे,राज्या-राज्यातील प्रादेशिक आणि भाषिक वाद सोडवणे, या सर्व प्रश्नांची सोडवणूक करून देशाला प्रगतीपथावर नेणे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्या तीनच वर्षात गांधी सारखा मार्गदर्शक आणि सरदार पटेलांसारखा खंदा समर्थक गेल्यानंतर नेहरूंनी हिमतीने स्वप्नातील भारत सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले.
भाक्रा-नानगल,
www.janvicharnews.com
भाक्रा-नानगल,हिराकुड, नागार्जुनसागर यांची निर्मिती, उद्योगांच्या वाढीसाठी दुर्गापूर-भिलाई-राऊरकेला येथे कारखान्याची निर्मिती, शून्यपेक्षा खाली असणाऱ्या विकासदराला गती देणे, अणुऊर्जा आयोगाची स्थापना, आयआयटी-आयआयएम-एम्स ची स्थापना, विदेशनीती तयार करून परराष्ट्र संबंध भक्कम करणे, निवडणूक आयोगाच्या स्थापना करून पहिल्या सार्वत्रिक निवडणूका निःपक्षपातीपणे पार पाडणे ही आव्हाने नेहरूंनी देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या पाच ते सहा वर्षात अगदी लीलया पार पाडली होती.नेहरूंना पंतप्रधान पद मिळाले खरे पण भारताला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी येथील जमीन फारशी भुसभुशीत आणि पोषक नव्हती. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी फाळणीमुळे जवळजवळ एक कोटी दहा लाख लोक निर्वासित होते,त्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न गंभीर होता, काश्मीर-जुनागड-हैदराबाद या संस्थानांचा प्रश्न विक्राळ रूप धारण करत होता, खलिस्तानची चळवळ मास्टर तारासिंग यांच्या नेतृत्वाखाली बाळसं धरत होती . दक्षिण भारतात पेरियार रामस्वामींची द्राविडी चळवळ ऐन भरात आलेली होती. बंगालमध्ये पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल यांना एकत्र करून एक वेगळे बंगाल राष्ट्र निर्माण करण्यासाठीची चळवळ शहिद सुरहावर्दी आणि शरद बोस (सुभाषचंद्र बोस यांचे बंधू) यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती. अशा असंख्य अंतर्गत प्रश्नांनी पोखरलेल्या देशाचं नेतृत्व करण्यासाठी जिगर,धमक, हिम्मत तर असावीच शिवाय छप्पन्न इंच छातीपेक्षा खूप मोठी छाती असावी लागते आणि या सर्व गोष्टी नेहरूंमधे होत्या.
www.janvicharnews.com
देश स्वतंत्र झाला त्यावेळी साधी टाचणी देखील या देशात तयार होत नव्हती, अशा देशात नेहरूंनी पोलादाचे कारखाने काढले, रेल्वे इंजिनाचे कारखाने काढले. नियोजन आयोगाची स्थापना करून विकासाची दिशा दाखवली, पंचवार्षिक योजना तयार करून विकासाच्या दिशेला गती दिली. भाक्रा-नानगल पासून ते आपल्या सातारच्या कोयने पर्यंत कर्तृत्व हे नेहरूंचेच होते. नेहरूंनी जितकी धरणं बांधली तितकी धरणं ( क्षमतेने आणि संख्येनेही) त्यांच्यानंतर कोणत्याही पंतप्रधानांनी बांधली नाहीत हे विशेष. अणुऊर्जा आयोगाचा जन्म असो की अगदी सायकलवर क्षेपणास्त्रे वाहून नेऊन थुंबा येथे क्षेपणास्त्र निर्मिती सुरू करणे असो ही त्यांची कामगिरी बेदखल करताच येणार नाही.आज अग्नी-5 काढले म्हणून टेंभा मिरवणाऱ्या नेतृत्वाने किमान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत तरी नेहरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी .भारताच्या स्वातंत्र्यानंतर इंग्लडचा पंतप्रधान चर्चिल,नामवंत पत्रकार नेव्हिल मॅक्सवेल यांसारख्या असंख्य तज्ज्ञांनी असे मत व्यक्त केले होते की ,शेकडो वर्षे गुलामगिरीत राहिलेला भारत लोकशाहीचं ओझं पेलू शकणार नाही. पुढील पंचवीस वर्षातच भारताचे असंख्य तुकडे होतील. चर्चिल सारख्या अनेकांची भविष्यवाणी खोटी ठरवण्यात भारत यशस्वी ठरला कारण नेहरूंसारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांनी या देशाचं नेतृत्व समर्थपणे केलं. भारतात लोकशाही रुजली,टिकली ती केवळ अन केवळ नेहरूंमुळेच.
www.janvicharnews.com
नेहरूंनी स्थापन केलेल्या आयआयटी मधून लाखो बुद्धिमान तरुण जगाच्या कानाकोपऱ्यात चमकत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन शोध आणि क्रांती आणण्यासाठी त्यांनीच स्थापन केलेली एम्स चे महत्व आजच्या कोरोना च्या गंभीर काळातही दिसून येते. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संशोधन आणि विकास करण्यासाठी डीआरडीओ ची निर्मिती त्यांनीच केली. कुशल प्रशासकीय अधिकारी निर्माण करून प्रशासकीय सेवा भक्कम करण्यासाठी नॅशनल अकॅडमी ऑफ अडमिनिस्ट्रेशन ची स्थापना त्यांनीच केली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग, सरदार पटेल अकॅडमी अशी अजून किती उदाहरणे द्यावीत?
www.janvicharnews.com
उद्योग हीच आधुनिक भारताची मंदिरे आहेत,अशी साद घालून देशाचे औद्योगिकरण करणारे नेहरू समजून घेण्यासाठी कुण्या अंधभक्ताच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट ची गरज नाही. अलिप्ततावादाची चळवळ सुरू करून नेहरूंनी जागतिक पातळीवर स्वतःचे पर्यायाने भारताचे नेतृत्व सिद्ध केले. भारतात समाजवाद आणि लोकशाही रुजवणारे,विज्ञान-तंत्रज्ञानात देशाला प्रगतीपथावर नेणारे, कृषी आणि उद्योग क्षेत्रात देशाला संपन्न करणारे,धर्मनिरपेक्षतेची तत्वे देशात रुजवणारे, उत्तम विदेशनीतीकार,लेखक,इतिहासकार, भारतीय संस्कृतीचे अभ्यासक असणारे नेहरू युगपुरुष होते. आणि युगपुरुष कधी मरत नसतात ते कायम जिवंत असतात त्यांनी केलेल्या कामातून. देशासाठी आयुष्य समर्पित केलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या स्मृतीस वंदन…….🙏